गंभीर स्थितीतील रुग्ण म्हणजे कोणत्याही कारणाने हृदयक्रिया-श्वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्यवस्थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्ण. अशा रुग्णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्य’ करतांना प्रथमोपचारकाने AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्त ठरते. (यापूर्वी प्रथमोपचाराची ABC (दुसरे नाव DRSABCD) ही पद्धत वापरण्यात येत असे.) इंग्रजी आद्याक्षरांनी निर्माण झालेला AB-CABS हा शब्द (पद्धत) मूलभूत जीवितरक्षण साहाय्याविषयी प्रथमोपचारातील महत्त्वाचे टप्पे योग्य त्या क्रमाने लक्षात ठेवण्यास प्रथमोपचारकाला साहाय्य करतो. AB-CABS या शब्दातील इंग्रजी आद्याक्षरांचे संक्षिप्त विवरण पुढीलप्रमाणे आहे.
A – Airway ? : रुग्णाचा श्वसनमार्ग मोकळा आहे का ?
B – Breathing ? : रुग्णाचा श्वासोच्छ्वास चालू आहे का ?
C – Chest Compressions : छातीदाबन करा.
A – Opening the Airway : श्वसनमार्ग मोकळा करा.
B – Breathing for the patient (३०:२) : रुग्णाचे छातीदाबन ३० वेळा केल्यानंतर त्याला २ वेळा तोंडातून तोंडात श्वसन द्या. रुग्णाचा श्वासोच्छ्वास चालू असल्यास (अथवा वरील उपचारांनंतर रुग्णाचा श्वासोच्छ्वास नीट आणि आपोआप होऊ लागल्यानंतर) पुढील गोष्टी क्रमाने लगेच पडताळा.
S – check for
Serious Bleeding : गंभीर रक्तस्राव होत आहे का ?
Shock : मर्माघात झाला आहे का ?
Spinal Injury : मणक्याला दुखापत झाली आहे का ?
(संदर्भ : रुग्णाचे जीवितरक्षण आणि मर्माघातादी विकारांवरील प्रथमोपचार)
आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकांवर संपर्क करा !
१. पोलीस : १०० / ११२
२. अग्नीशमन दल : १०१ / ११२
३. रुग्णवाहिका : १०२ / ११२
४. आपत्कालीन साहाय्य केंद्र (इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर) : १०८ / ११२