पुणे येथील ह.भ.प. वेदमूर्ती पुं.वि. हळबेगुरुजी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेचे कार्य यांचे वर्णिलेले काव्यात्मक माहात्म्य !

३.३.२०१८ या दिवशी पुणे येथील ह.भ.प. वेदमूर्ती पुं. वि. हळबेगुरुजी यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी आश्रमात कीर्तनही सादर केले. त्यानंतर त्यांनी केलेले काव्य पुढे दिले आहे.
ह.भ.प. वेदमूर्ती पुं.वि. हळबेगुरुजी

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वर्णिलेली थोरवी !

परम पूज्य दिग्गज जयंतराव ।

वंदितो तुमचे चरणरज ।

आत्यंतिक प्रेमाने ॥ १ ॥

आपुले ग्रामी कीर्तन केले । बहुत कौतुक जाहले ।

दृक्श्राव्य करून पाठवले । किती प्रेम वर्णावे ॥ २ ॥

बरोबर खाऊही धाडिला । माहेरपणाच अनुभवला ।

किती आनंद जाहला । वर्णावया शब्द नाही ॥ ३ ॥

बोबडे बोल मुलाचे । मायबाप कौतुक त्याचे ।

त्यापरी माझ्यावरचे । प्रेम मजला वाटले ॥ ४ ॥

एकदाच भेट झाली । आठवण तुम्ही ठेवली ।

मज त्याची प्रचीती आली । भाग्य माझे केवढे ॥ ५ ॥

 

२. सनातन आश्रमाचे माहात्म्य

सनातन आश्रम । मज लाभला विना श्रम ।

जेथे चारी आश्रम । तत्त्वरूपे नांदती ॥ ६ ॥

३. सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य

आजच्या घडीला आधार । धर्म-संस्कृतीचे माहेर ।

सनातन संस्था सुंदर । विराजमान गोव्यात ॥ ७ ॥

धर्मशिक्षणाचे विद्यापीठ । राजधर्माचे वस्तुपाठ ।

सर्वही मिळे पाठोपाठ । वैशिष्ट्य हे संस्थेचे ॥ ८ ॥

धर्मराज्य उभे रहावे । रामराज्य अवतरावे ।

सर्वजन तरावे । ध्येय निश्‍चित जाहले ॥ ९ ॥

या ध्येया साधण्यासाठी । कराव्या लागती खटपटी ।

नामस्मरण उठाउठी । घ्यावे लागे साधका ॥ १० ॥

सनातन संस्था गोव्यात । नेटाने हे कार्य करत ।

यश लाभे अतोनात । कृपा परमेश्‍वराची ॥ ११ ॥

देव-देश धर्माकारणे । सनातन संस्थेचे जगणे ।

हे अपरिहार्य जाणणे । त्रिकालाबाधित सत्य हे ॥ १२ ॥

सनातन संस्था गोव्याचे । भूषण आहे भाग्याचे ।

खरोखर जयंतरावांचे । कार्य केवढे अफाट ॥ १३ ॥

सर्व साधक प्रामाणिक । किती करावे कौतुक ।

मजलागी हे अलौकिक । कर्तृत्व वाटे संस्थेचे ॥ १४ ॥

जणू हे ईश्‍वराचे स्वरूप । वाटे सर्वांना अप्रूप ।

का करावे आरोप । नतद्रष्ट लोकांनी ॥ १५ ॥

परी सूर्यावरी थुंकिता । ती पडे आपुल्या माथा ।

त्यापरी विरोधकां आता । प्रचीती येईल वाटते ॥ १६ ॥

चिरंजीव संस्था व्हावी । नवी पालवी फुटावी ।

वटवृक्ष जशी दावी । साऊली अनेक शतकांची ॥ १७ ॥

धर्मराज्य लवकर येवो । अधर्म अवघा लया जावो ।

शिवाजी तैसा राजा होवो । स्वदेशी आणि स्वधर्मी ॥ १८॥

जयंतराव जयवंत । होवोत या भारतात ।

हिंदु धर्माचे शाश्‍वत । दर्शन घडो हिंदूंना ॥ १९ ॥

४. धर्मशिक्षणाच्या अभावी समाजाची झालेली दुःस्थिती

वैदिक धर्म कळेना । कळला तर पाळीना ।

काय करावे ऐशा जना । कोण्या परी समजवावे ॥ २० ॥

धर्मावाचून सुख नाही । ऐसे वेद बोले पाही ।

त्या धर्माचे नाही काही । ज्ञान कोणा कशाचे ॥ २१ ॥

कोणी सर्वधर्मसमभाव । कोणी आणिती निधर्मीपणाचा आव ।

स्वधर्माचा अभाव । हे तो परम दुःखद ॥ २२ ॥

प्राचीन आचार विसरले । परकियांचे अनुकरण केले ।

लोक बहुत गांगरले । श्रद्धा मुळी उरेना ॥ २३ ॥

परंपरा तोडा म्हणती । स्मृतिग्रंथ जाळिती ।

भारतीय संस्कृती । ऐसी नाही निश्‍चये ॥ २४ ॥

भारतीय वेश नावडे । मराठी बोले बोबडे ।

कुंकुमतिलकाचे वावडे । ऐसी नाही निश्‍चये ॥ २५ ॥

हिंदूंंची शिखा गेली । बोडकी डोकी उरली ।

स्मशानवत अवकळा आली ।

आज आपुल्या वाट्याला ॥ २६ ॥

म्हणती काळ बदलला । आता असेच चाला ।

सर्वार्ंनी आपणा बदला । देश तैसा वेश म्हणे ॥ २७ ॥

हे सर्व आपणा कळावे । म्हणूनी सनातन संस्थेत जावे ।

मी हे सांगतो भावे । भारतीय बांधवांना ॥ २८ ॥

आज आपण दिशाहीन । कशाचे नाहीच बंधन ।

सर्व स्वैर आचरण । हे तो निश्‍चित बरे नव्हे ॥ २९ ॥

५. सनातन संस्थेचे कार्य समजून घेण्यासाठी केलेले आवाहन !

आपुले पूर्वज आठवावे । देशभक्तांना पहावे ।

ऋषि-मुनींना वंदावे । प्रेरणा मिळे हिताची ॥ ३० ॥

हे सर्व मार्गदर्शन । करील संस्था सनातन ।

आता उशीर करून । वेळ वाया घालवू नये ॥ ३१ ॥

अशी ही थोर संस्था । पाथेय देई पांथस्था ।

परी मनी पाहिजे आस्था । तेणे यश मिळेल ॥ ३२ ॥

अधिक काय सांगावे । जाऊनीच अनुभवावे ।

जीवन सार्थक करावे । स्वधर्माचरण करूनी ॥ ३३ ॥

६. सनातन आश्रमात कीर्तन करायला मिळाल्याबद्दल
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

अशा या सनातन संस्थेत । आमुची कीर्तन सेवा होत ।

परम पूज्य जयंत । प्रसन्न झाले मजवरी ॥ ३४ ॥

पुन्हा पुन्हा सेवा व्हावी । प्रवचन कीर्तने करावी ।

माझी काया डोलावी । भगवंताच्या गुणगानी ॥ ३५ ॥

एवढे सांगून थांबतो । परम पूज्यांना वंदितो ।

लेखणीला विराम देतो । पुंडलिक हरिदास ॥ ३६ ॥

– ह.भ.प. वेदमूर्ती पुं.वि. हळबेगुरुजी, पुणे (१०.१०.२०१८)

होवो संतजन भेटी । न हो अंगसंग तुटी ॥

प.पू. डॉक्टरांच्या चरणी वंदन

आपल्या भेटीने मी धन्य धन्य झालो ।

आपली संस्था वैदिक सनातन धर्माचरणाने विश्‍वाच्या अग्रस्थानी विराजमान होवो.

धन्यवाद

हळबे (शास्त्री) गुरुजी (कीर्तनकार, पुणे)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment