रामनाथी, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – नियमित साधना कशी करावी? याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी येथील सनातन आश्रमात १६ ते १९ नोव्हेंबर या काळात प्रांतीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव या जिल्ह्यांतील युवा साधक सहभागी झाले आहेत.
शिबिराला १६ नोव्हेंबर या दिवशी प्रारंभ झाला. प्रारंभी शंखनाद करण्यात आला. यानंतर हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला, तसेच सनातनच्या सौ. मनाली भाटकर यांनी परात्पर गुरु परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले. सौ. शुभा सावंत यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय करून दिला आणि सनातन संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. श्री. सत्यविजय नाईक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी सर्वांना माहिती दिली. सौ. शुभा सावंत यांनी जीवनात साधनेचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शांभवी वझे यांनी केले. शिबिरात प्रतिदिन कौशल्य विकास या विषयांतर्गत प्रायोगिक भाग असणार आहे, तसेच शिबिरात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शिकवली जाणार आहे.
समष्टी साधना केल्याने अहं अल्प होऊन व्यापकत्व निर्माण होते ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
रामनाथी (गोवा) – समष्टी साधना करतांना ‘मी साधनेत कुठे अल्प पडत आहे’, हे समजते अन्यथा ‘माझे साधनेचे सर्व प्रयत्न चांगले चालू आहेत’, या विचाराने स्वत:च्या कोषात राहिल्यामुळे अहंमध्ये वृद्धी होते. समष्टीत साधना करतांना विविध माध्यमातून ईश्वर शिकवत असल्याने व्यापक होता येते, तसेच अहं अल्प होण्यास साहाय्य होते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसल्याने शक्य तेवढी सेवा करायला हवी, असे मार्गदर्शन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी युवा साधकांना केले.
येथे ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युवा साधक प्रशिक्षण शिबीर उत्साही वातावरणात पार पडले. शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेतील भावजागृतीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन अन् सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देण्यात आली.
शिबिरात झालेल्या गटचर्चांद्वारे ‘स्वभावदोेष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी स्वभावदोषांची सूची कशी काढावी ?’, ‘स्वयंसूचना कशा सिद्ध कराव्यात ?’, तसेच ‘स्वभावदोषांची सारणी कशी लिहावी ?’, ‘सामाजिक माध्यमांद्वारे धर्मप्रसार कसा करावा ?’, ‘वृत्तसंकलन कसे करावे ?’, या विषयांवरील तात्त्विक आणि प्रायोगिक सत्रे घेण्यात आली.