गणेशोत्सव : धर्मशास्त्रासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण माहिती !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘दोन-तीन दशकांपूर्वी हिंदु समाजात व्रते, सण-उत्सव पारंपरिकरित्या आणि उत्साहाने साजरे केले जात. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया या दिवशी हिंदु स्त्रिया आणि मुली ‘हरितालिका व्रत’ करत असत. आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली हिंदु धर्मातील व्रते, सण-उत्सव यांना मागासलेपणाचे लक्षण ठरवून नावे ठेवणे, हे हिंदूंना भूषणावह वाटते. तसेच काहीजण व्रते करतात; पण त्यासाठी अशास्त्रीय पर्याय सर्रासपणे निवडतांना आढळतात, उदा. वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची लहान फांदी कुंडीत लावून तिचे पूजन करणे, गुढीपाडव्याला छोटी तयार गुढी (मिनी रेडीमेड गुढी) विकत आणून तिचे पूजन करणे इत्यादी. असे अशास्त्रीय प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. हिंदूंच्या गत दोन-तीन पिढ्यांना धर्मशिक्षण न मिळाल्याचे हे फलित आहे. आजच्या विज्ञानयुगात एखादी गोष्ट यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच त्यावर हिंदूंचा विश्वास बसतो.
‘हरितालिका व्रता’मध्ये केलेल्या पूजाविधीचा पूजकाला (पूजन करणार्या स्त्रीला) आणि पूजाविधी सांगणार्या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १२.९.२०१८ या दिवशी फोंडा, गोवा येथील सौ. शकुंतला जोशी यांच्या घरातील पूजास्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत हरितालिकेच्या पूजनापूर्वी आणि पूजनानंतर ‘हरितालिका पूजनाची मांडणी’, ‘पूजन करणारी साधिका सौ. शकुंतला जोशी’ आणि ‘पूजा सांगणारे पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर ’ यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणींच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ अ १. हरितालिका पूजनाच्या मांडणीमध्ये पूजनापूर्वी आणि पूजनानंतरही ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
२ अ २. हरितालिका पूजन करणार्या साधिकेमध्ये ते पूजन करण्यापूर्वी आणि पूजनानंतरही ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
२ अ ३. हरितालिका पूजन सांगणार्या पुरोहितांमध्ये पूजाविधीपूर्वी अल्प प्रमाणात असलेली ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूजाविधी झाल्यानंतर पूर्णपणे नाहीशी होणे
हरितालिका पूजन सांगणार्या पुरोहितांमध्ये ते आजारी असल्यामुळे पूजाविधी आरंभ करण्यापूर्वी ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा अल्प प्रमाणात होती. तेव्हा त्यांच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येत असल्याने पुरोहितांच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली नाही. हरितालिका पूजाविधी झाल्यानंतर त्या पुरोहितांमधील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी झाली.
पुरोहितांमध्ये हरितालिका पूजाविधी आरंभ होण्यापूर्वी आणि पूजाविधी झाल्यानंतरही ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ आ १. हरितालिका पूजन झाल्यानंतर हरितालिका पूजनाची मांडणी, पूजन करणारी साधिका आणि पूजन सांगणारे पुरोहित यांच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. हरितालिका पूजनाची मांडणी, पूजन करणारी साधिका आणि पूजन सांगणारे पुरोहित यांच्यामध्ये पूजाविधी आरंभ होण्यापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती. पूजाविधी झाल्यानंतर त्या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ पुढे दिली आहे.
टीप १ – पुरोहितांच्या संदर्भात स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. त्यामुळे पुरोहितांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मोजता आली नाही.
२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ इ १. पूजाविधी झाल्यानंतर हरितालिका पूजनाची मांडणी, पूजन करणारी साधिका आणि पूजन सांगणारे पुरोहित यांच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. हरितालिका पूजन झाल्यानंतर हरितालिका पूजनाची मांडणी, पूजन करणारी साधिका आणि पूजन सांगणारे पुरोहित यांच्या एकूण प्रभावळीत झालेली वाढ पुढे दिली आहे.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. ‘हरितालिका व्रता’चे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व
‘पार्वतीने ‘भगवान शिवाची वर रूपाने प्राप्ती व्हावी’, म्हणून हरितालिका व्रत केले होते. ‘सुयोग्य पती मिळावा’, यासाठी कुमारिका आणि ‘मिळालेले सौभाग्य अखंड रहावे’, यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामध्ये महेश्वर, म्हणजे भगवान शिव आणि उमा, म्हणजे पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांचे यथाशक्ती पूजन करतात. या दिवशी हरितालिकेचे पूजन करण्यासमवेतच स्त्रिया दिवसभर उपवास करतात. या दिवशी पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला दिवा पूजेच्या विसर्जनापर्यंत, म्हणजे दुसर्या दिवसापर्यंत अखंड तेवत ठेवतात. असे केल्याने पूजकाला त्याच्या भावानुसार शिवतत्त्व आणि तेजतत्त्व यांचा लाभ होतो. या दिवशी स्त्रिया जीवनात येणारी विघ्ने दूर करण्यासाठी शिवाला प्रार्थना करतात. भावपूर्ण प्रार्थनेमुळे स्त्रीकडे शिव-शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो आणि याचा स्त्रीच्या भावानुसार तिला लाभ होतो.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘श्री गणपति’)
३ आ. हरितालिका पूजन भावपूर्ण झाल्याने त्या पूजाविधीतून चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्याचा चाचणीतील घटकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे
चाचणीतील हरितालिका पूजनाच्या मांडणीमध्ये पूजन आरंभ होण्यापूर्वी सकारात्मक ऊर्जा होती. हरितालिका पूजन भावपूर्ण झाल्याने त्या पूजाविधीतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. यामुळे पूजाविधी झाल्यानंतर चाचणीतील हरितालिका पूजनाच्या मांडणीच्या सकारात्मक ऊर्जेत १.६० मीटर वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे तिच्या एकूण प्रभावळीतही वाढ झाली. पूजाविधीतून प्रक्षेपित झालेल्या सकारात्मक स्पंदनांमुळे (चैतन्यामुळे) पूजन करणारी साधिका आणि पूजाविधी सांगणारे पुरोहित यांना पुढीलप्रमाणे आध्यात्मिक स्तरावर लाभ झाले.
१. चाचणीतील साधिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती, तसेच तिच्यामध्ये आधीपासूनच सकारात्मक ऊर्जा होती. तिने पूजाविधीतून प्रक्षेपित झालेली सकारात्मक स्पंदने (चैतन्य) ग्रहण केली. त्यामुळे तिच्या सकारात्मक ऊर्जेत १.४७ मीटर वाढ झाली. तिच्या एकूण प्रभावळीत त्या सकारात्मक स्पंदनांची भर पडल्याने तिची एकूण प्रभावळही वाढली.
२. पूजाविधी सांगणार्या पुरोहितांमध्ये पूजनाच्या आरंभी थोडी नकारात्मक ऊर्जा होती. पूजाविधीतील चैतन्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली, तसेच त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत तिची प्रभावळ मोजता येईल इतपत वाढ झाली. पुरोहितांच्या एकूण प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने नाहीशी झाल्याने, तसेच त्यांच्या सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ झाल्याने त्यांच्या एकूण प्रभावळीत वाढ झाली.
थोडक्यात सांगायचे, तर हिंदु धर्मात सांगितलेले हरितालिका व्रत भावपूर्णरित्या केल्यामुळे पूजा केली त्या वास्तूला, पूजकाला, तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले. यातून हिंदु धर्मातील व्रतांमध्ये केवढे आध्यात्मिक सामर्थ्य आहे, हेही लक्षात येते. आजच्या विज्ञानयुगातील पिढीने वैज्ञानिक चाचणीच्या निष्कर्षांमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घ्यावे, तसेच धर्मशिक्षण घेऊन आपले जीवन समृद्ध करावे, असे नम्र आवाहन !’