संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. ६.१२.२०१६ या दिनांकापर्यंत या मालिकेतील १३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’ या ग्रंथाचा परिचय करून देत आहोत. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. या ग्रंथाचे दोन्ही भाग वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत.
‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ हा ग्रंथ केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. |
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन
पद्धतींचे जनक : परात्पर गुरु डॉ. आठवले !
आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचे विवेचन
करणारे जगाच्या पाठीवरील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !
व्यक्तीला होणार्या शारीरिक आणि मानसिक त्रासांचे कारण बहुतेक वेळा आध्यात्मिक असते. त्यातील प्रमुख कारण म्हणजे वाईट शक्तींचा त्रास. हे त्रास दूर होण्यासाठी आजवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आध्यात्मिक उपायांच्या अनेक नवनवीन पद्धतींचे विवेचन केले आहे, उदा. देवतांचा एक-आड-एक नामजप, प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपाय. या उपायपद्धतींचा सनातनच्या शेकडो साधकांना लाभ होत असल्याने या पद्धती प्रमाणभूत शास्त्रेच झाली आहेत. यांतीलच एक पद्धत म्हणजे, ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः खोक्यांच्या उपायांच्या संदर्भात विविध प्रयोग केले आणि अनुभव घेतला. सनातनच्या शेकडो साधकांनीही या उपायांचे प्रयोग केले आणि त्यांना लाभ झाला. या उपायपद्धतीचे साधकांना झालेले लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत करत आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवी जीवन त्रासमुक्त आणि आनंदी बनवणारी ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ ही अत्यंत सोपी पद्धत शोधून अखिल मानवजातीवर उपकार केले आहेत. हे उपकार कधीही फेडता येणार नाहीत, असे आहेत. त्यांनी मानवजातीवर केलेल्या या उपकारांसाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत ! – (पू.) श्री. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक
प्रस्तावना
रिकाम्या खोक्यात पोकळी असते. पोकळीत आकाशतत्त्व असते. आकाशतत्त्वामुळे आध्यात्मिक उपाय होतात. आध्यात्मिक उपायासाठी खोके वापरल्याने व्यक्तीचा देह, मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण, तसेच व्यक्तीमधील त्रासदायक शक्ती खोक्यातील पोकळीत खेचली जाऊन नष्ट केली जाते. या योगे विकारांमागील मूळ कारणच नष्ट केले जात असल्याने विकारही लवकर नष्ट होण्यास साहाय्य होते.
खोक्यांचे उपाय, ही अत्यंत सोपी आणि बंधनविरहित उपायपद्धत आहे. ग्रंथाच्या पहिल्या भागात खोक्यांचे शास्त्रीय महत्त्व सांगण्यासह खोक्यांचे उपाय करण्याची शरिरातील विविध स्थाने, खोका कसा बनवावा आदींविषयी विवेचन केले आहे. ग्रंथाच्या दुसर्या भागात विकारांनुसार विशिष्ट मापांचे खोके वापरणे; खोक्यांचे उपाय करण्याच्या विविध पद्धती; दैनंदिन कामकाज, अभ्यास इत्यादी करतांनाही खोक्यांचे उपाय करणे आदींविषयी मार्गदर्शन केले आहे. आजकाल अनेकांना रात्री शांत झोप लागत नाही. शांत झोप लागण्यासाठी साहाय्यक ठरणारे खोक्यांचे उपाय कसे करावेत, याचेही विवेचन या भागात केले आहे. खोक्यांचे उपाय करतांना नामजप आणि मुद्रा किंवा न्यासही केला, तर उपायांची फलनिष्पत्ती वाढते. यासाठी ग्रंथाच्या या दुसर्या भागात तेही सांगितले आहेत.
‘खोक्याचे उपाय करून जास्तीतजास्त रुग्ण लवकरात लवकर विकारमुक्त होवोत’, ही श्री गुरुचरणी आणि विश्वपालक श्री नारायणाच्या चरणी प्रार्थना !
१. रिकाम्या खोक्याविषयी सर्वसाधारण विवेचन
१ अ. खोका कोणत्या मापाचा असावा ?
१ अ १. खोक्याच्या मापाविषयीचा दृष्टीकोन
अ. मानवी शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांनी (पंचमहाभूतांनी) बनलेले आहे. या पंचतत्त्वांचे शरिरातील संतुलन बिघडल्यास शरिरात विकार निर्माण होतात. विकार पंचतत्त्वांपैकी कोणत्या तत्त्वाशी संबंधित आहे, त्या तत्त्वाशी संबंधित असलेल्या मापाचा खोका वापरणे, हे त्या विकाराच्या निर्मूलनासाठी १०० टक्के लाभदायक ठरते, तर सर्व पंचतत्त्वे समाविष्ट असणारा, म्हणजे सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायचा खोका हा त्या विकाराच्या निर्मूलनासाठी ७० टक्के लाभदायक ठरतो. त्या त्या विशिष्ट पंचतत्त्वाशी संबंधित असलेले खोक्याचे विशिष्ट माप कोणते, याविषयी ग्रंथात सांगितले आहे. या लेखात केवळ सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायच्या खोक्याचे माप सांगितले आहे.
एखाद्याला विविध विकारांनुसार विविध मापांचे खोके बनवणे शक्य नसेल, तर त्याने सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायचा खोका उपयोगात आणला तरी चालू शकेल.
१ अ २. सर्वसाधारणपणे कोणत्याही उद्देशासाठी वापरायच्या खोक्याचे माप
१ अ २ अ. खोक्याची लांबी, रुंदी अन् खोली (उंची) यांचे एकमेकांशी प्रमाण (गुणोत्तर) – १० : ७ : ६
१ अ २ आ. खोक्याचे सर्वसाधारण माप : २५ सें.मी. लांब × १७.५ सें.मी. रुंद × १५ सें.मी. खोल (उंच)
वरील मापात १० टक्के अल्प-अधिक असलेला तयार (रेडीमेड) खोकाही चालू शकतो.
(खोका बनवण्याविषयीचे सचित्र विवेचन ग्रंथात केले आहे.)
१ अ ३. मोठा खोका आणि लहान खोका यांची उपयुक्तता
अ. मोठा खोका : सभोवताली खोके ठेवून उपाय करणे, झोपतांना अंथरुणाभोवती खोके ठेवणे आदींसाठी मोठे (सर्वसाधारण मापाचे किंवा त्यापेक्षा मोठ्या मापाचे) खोके वापरावेत.
आ. लहान खोका : प्रवास करतांना खोक्यांचे उपाय करणे, खोक्यांचे शिरस्त्राण (हेल्मेट) बनवणे आदींसाठी लहान खोके वापरावेत.
१ अ ४. ‘खोका कोणत्या मापाचा आहे’ यापेक्षा ‘खोका वापरण्यामागील भाव’ महत्त्वाचा !
खोका कोणत्याही मापाचा असला, तरी खोक्याचे उपाय करतांना भाव ठेवला, तर कोणत्याही मापाच्या खोक्याद्वारे उपाय होतात. असे असले, तरी भाव ठेवून योग्य मापाचा खोका उपायांसाठी वापरला, तर उपायांची फलनिष्पत्ती निश्चितच अधिक मिळते.
१ आ. खोक्याच्या रंग
खोका शक्यतो पांढर्या रंगाचा असावा !
१ इ. खोक्याच्या पोकळीला अधिक महत्त्व असून
‘खोका कशापासून बनवला आहे’, याला गौण महत्त्व असणे
आपत्काळात एखाद्या वेळी खोका वापरणे शक्य नसल्यास घरातील बादली, पातेले, डबा यांसारख्या वस्तूंचाही उपायांसाठी उपयोग करू शकतो.
२. खोक्यांचे उपाय करण्याची शरिरातील स्थाने
२ अ. प्राधान्याने शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत
२ अ १. कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करण्यामागील शास्त्र
ब्रह्मांडातील प्राणशक्ती (चेतना) मनुष्याच्या शरिरातील कुंडलिनीचक्रांमध्ये ग्रहण केली जाते आणि त्या त्या चक्राद्वारे ती शरिरातील त्या त्या इंद्रियापर्यंत पोचवली जाते. इंद्रियामध्ये प्राणशक्तीच्या वहनात (चेतनेच्या प्रवाहात) अडथळा निर्माण झाला की, विकार निर्माण होतात. यासाठी वाईट शक्ती प्रामुख्याने कुंडलिनीचक्रांवर आक्रमण करून तेथे त्रासदायक (काळी) शक्ती साठवून ठेवतात. यावर उपाय म्हणून कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी खोक्यांचे उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
(कुंडलिनीचक्रांच्या स्थानांव्यतिरिक्त विकारग्रस्त अवयवांच्या स्थानीही खोक्यांचे उपाय करता येतात.)
२ अ २. विकारांनुसार कोणत्या कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत ?
विकार | संबंधित कुंडलिनीचक्र (टीप १) |
१. शारीरिक विकार | |
अ. डोके आणि डोळे यांच्याशी संबंधित विकार | आज्ञाचक्र (भ्रूमध्य, म्हणजे दोन भुवयांच्या मधोमध) |
आ. नाक, तोंड, कान आणि घसा यांच्याशी संबंधित विकार | विशुद्धचक्र (कंठ, म्हणजे स्वरयंत्राचा भाग) |
इ. छातीशी संबंधित विकार | अनाहतचक्र (छातीच्या मधोमध) |
ई. पोटाशी संबंधित विकार | मणिपुरचक्र (नाभी / बेंबी) |
उ. ओटीपोटाशी संबंधित विकार | स्वाधिष्ठानचक्र [जननेंद्रियाच्या १ ते २ सें.मी. वर (लिंगमूळ)] |
ऊ. हात आणि डोक्यापासून छातीपर्यंतच्या भागातील विकार (वरील सूत्रे ‘अ’ ते ‘इ’ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार) |
अनाहतचक्र
|
ए. पाय आणि छाती संपून त्याखाली चालू होणारा भाग यांतील विकार (वरील सूत्रे ‘ई’ आणि ‘उ’ यांत नमूद केलेल्या अवयवांच्या विकारांव्यतिरिक्त अन्य विकार) |
मणिपुरचक्र |
ऐ. संपूर्ण शरिराचा विकार (उदा. थकवा, ताप, स्थूलपणा, अंगभर त्वचारोग) | १. सहस्रारचक्र (डोक्याचा मध्य, टाळू) (टीप २)
२. अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र |
२. मानसिक विकार | १. सहस्रारचक्र (टीप २)
२. अनाहतचक्र |
टीप १ – मूलाधारचक्राच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितलेले नाही; कारण या चक्राच्या ठिकाणी न्यास करणे कठीण असते.
टीप २ – सहस्रारचक्र : हे कुंडलिनीच्या षट्चक्रांमध्ये गणले न जाता स्वतंत्र चक्र म्हणून गणले जाते. ब्रह्मांडातील प्राणशक्ती या चक्रामधूनच शरिरात प्रवेश करते. या चक्राला ‘ब्रह्मद्वार’ असेही म्हणतात. सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सहस्रारचक्र बंद असते. साधनेत प्रगती झाल्यानंतर ते उघडते. त्यामुळे अन्य व्यक्तींच्या तुलनेत साधनेत प्रगती झालेल्याने सहस्रारचक्राच्या ठिकाणी न्यास केल्यास त्याला अधिक लाभ होतो.
(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’)
३. खोक्यांचे प्रत्यक्ष उपाय करण्याच्या विविध पद्धती
खोक्यांद्वारे उपाय करतांना पुढे दिलेल्या ज्या उपायपद्धतींमध्येे शरिरातील कुंडलिनीचक्रे, विकारग्रस्त अवयव किंवा नवद्वारे यांच्या स्थानी उपाय करण्यास सांगितले असेल, तेथे या तीन स्थानांपैकी प्राधान्याने कुंडलिनीचक्रांच्या स्थानी खोक्यांचे उपाय करावेत. (दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, मूत्रद्वार आणि गुदद्वार, ही शरिराची नवद्वारे आहेत.)
३ अ. मोठ्या खोक्यांद्वारे शरिरातील कुंडलिनीचक्रे,
विकारग्रस्त अवयव किंवा नवद्वारे यांच्या स्थानी उपाय करणे
३ अ १. उपायांच्या संदर्भात काही सूचना
अ. व्यक्तीपासून साधारणपणे ३० सें.मी. (१ फूट) अंतरावर खोके ठेवावेत. या अंतरात १० सें.मी. अल्प-अधिक फरक झाला, तरी चालेल. बसून उपाय करतांना जवळच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे खोके उभे ठेवावेत.
आ. व्यक्तीच्या उपायाच्या स्थानांच्या पातळीला खोके ठेवावेत. याचे कारण म्हणजे, उपायाच्या स्थानांच्या, म्हणजे कुंडलिनीचक्रे किंवा विकारग्रस्त अवयव यांच्या समोर खोके ठेवले, तर तेथील त्रासदायक शक्ती परिणामकारकपणे खोक्यामध्ये खेचून घेतली जाऊन व्यक्तीचा विकार लवकर बरा होण्यास साहाय्य होते. यासाठी व्यक्ती उपायासाठी आसंदीत (खुर्चीत) बसणार कि भूमीवर बसणार त्यानुसार खोके किती उंचीवर ठेवायचे ते ठरवावे, उदा. डोके दुखत असणारी व्यक्ती उपायासाठी आसंदीत बसणार असेल, तर एक खोका तिच्या अनाहतचक्राच्या (छातीच्या मधोमध) पातळीला येईल, तर दुसरा खोका तिच्या आज्ञाचक्राच्या (दोन भुवयांच्या मधोमध) पातळीला येईल, एवढ्या उंचीवर एखाद्या पटलावर एकावर एक असे खोके ठेवावेत. (खोक्यांचे उपाय करतांना नामजप आणि मुद्रा किंवा न्यास करणे लाभदायी असते. यासाठी आकृतीतील व्यक्ती एका हाताने मुद्रा आणि दुसर्या हाताने न्यास करतांना दाखवली आहे.)
खोके उपायाच्या स्थानांच्या पातळीला ठेवणे शक्य नसेल, तर ते कमी उंचीवर किंवा भूमीवर ठेवावेत. खोके समपातळीला ठेवल्याने होणार्या लाभाच्या १० – २० टक्केच लाभ खोके समपातळीला न ठेवल्याने होतो, हे लक्षात घेऊन खोके समपातळीला ठेवायचा प्रयत्न करावा.
खोके समपातळीला ठेवता येत नसल्यास ते अशा कोनात ठेवावेत, जेणेकरून खोक्यांची पोकळी व्यक्तीच्या दिशेने असेल. खोका तिरका होण्यासाठी खोक्याखाली ठोकळा ठेवू शकतो.
इ. ज्या स्थानी उपाय करायचे आहेत, त्याच्या समोर खोक्याची उघडी बाजू येईल, अशा रितीने खोका ठेवावा, तसेच खोक्याचा मध्यभाग बरोबर त्या स्थानासमोर येईल, असे पहावे.
ई. रुग्णाला आडवे पडून उपाय करायचे असल्यास त्याने तसे केले तरी चालेल; पण त्या वेळी खोके उपायाच्या स्थानांच्या बाजूला येतील, असे पहावे. आडवे पडून उपाय करतांना सूत्र ‘३ ई २ अ’ येथील आकृतीत दाखवल्याप्रमाणे खोके आडवे ठेवावेत.
३ आ. खोके शरिरापासून साधारण १ – २ सें.मी. अंतरावर हातांत धरून
कुंडलिनीचक्रे, विकारग्रस्त अवयव किंवा नवद्वारे यांच्या स्थानी उपाय करणे
प्रवास, कार्यालय, बैठक (मिटींग) आदी ठिकाणी मोठे खोके ठेवून उपाय करणे शक्य होत नाही. अशा वेळी लहान खोके हातांत धरून उपाय करता येतात. (जवळच्या आकृतीत उदाहरण म्हणून खोके हातांत धरून आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांच्या स्थानी उपाय करतांना दाखवले आहे.)
३ आ १. खोक्याचे माप
खोका हातात धरण्याच्या दृष्टीने सोयीच्या मापाचा असावा. त्याची ‘लांबी, रुंदी अन् खोली यांचे एकमेकांशी प्रमाण (गुणोत्तर)’ १० : ७ : ६ असे असावे.
३ आ २. उपायांच्या संदर्भात काही सूचना
अ. ज्या स्थानी उपाय करायचे आहेत, त्याच्या समोर खोक्याची उघडी बाजू येईल, अशा रितीने खोका धरावा, तसेच खोक्याचा मध्यभाग बरोबर त्या स्थानासमोर येईल, असे पहावे.
आ. खोके धरून हात दुखायला लागले, तर हातांची अदलाबदल करावी.
इ. उपाय करतांना हात अधांतरी राहिले, तर दुखू शकतात. हे टाळण्यासाठी आसंदीत बसलेल्या व्यक्तीने तिच्या हातांची कोपरे आसंदीच्या हातांवर टेकवावीत. तसेच अशक्त किंवा वृद्ध व्यक्ती यांना थकव्यामुळे खोके उपायांच्या स्थानी १ – २ सें.मी. अंतरावर हातांत धरून ठेवणे शक्य नसेल, तर त्यांनी खोके उपायांच्या स्थानी स्पर्श करून ठेवावेत.
३ इ. दैनंदिन कामकाज, अभ्यास, सेवा आदी करतांनाही खोक्यांचे उपाय सहजपणे करता येणे
उपाय म्हणून खोके शरिरापासून साधारण ३० सें.मी. (१ फूट) अंतरावर ठेवून उपाय करणे, खोके हातांत धरून उपाय करणे, यांसारखे निवळ खोक्यांचे उपाय करण्याच्या व्यतिरिक्तही खोक्यांचे उपाय प्रतिदिन अगदी सहजपणे कसे करता येतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. आसंदीत बसून अभ्यास करणे, धान्य निवडणे, सेवा करणे आदी करतांना खोके ठेवणे
आसंदीच्या खाली १ खोका भूमीच्या दिशेने तोंड करून ठेवू शकतो. यामुळे पाताळातून येणार्या त्रासदायक शक्तीपासून रक्षण होण्यास साहाय्य होते. २ खोके आसंदीत दोन मांड्यांच्या मध्ये खोक्यांची तोंडे आपल्याकडे करून एकावर एक असे ठेवू शकतो. स्वाधिष्ठान (जननेंद्रियाच्या १ ते २ सें.मी. वर) आणि मणिपुर (नाभीचे स्थान) या कुंडलिनीचक्रांशी संबंधित त्रास होत असणार्यांना किंवा ओटीपोट आणि पोट या भागांशी संबंधित विकार असणार्यांना यामुळे लाभ होण्यास साहाय्य होते.
२. कोणाशी बोलतांना किंवा बैठकीत (‘मिटींग’मध्ये) बसलेलो असतांना लहान खोका हातात धरून उपायाच्या स्थानी ठेवू शकतो.
३. आपण जेथे बसतो तेथे ‘खोका आपल्या डोक्यावर येईल’, अशा रितीने छताला टांगून ठेवणे; खोक्यांचे शिरस्त्राण दिवसभर घालणे; खोका ‘सेलोटेप’ने उपायाच्या स्थानी चिकटवणे यांसारख्या पद्धतींमध्येही खोक्यांचे उपाय सहजपणे करता येतात.
३ ई. झोपतांना खोक्यांचे उपाय करणे
रात्रीच्या वेळी वाईट शक्तींचा त्रास वाढतो. यासाठी विकारग्रस्त व्यक्तीने दिवसा खोक्यांचे उपाय करण्यासह रात्री झोपतांनाही खोक्यांचे उपाय करणे आवश्यक ठरते. विकार नसलेल्या व्यक्तींनीही स्वतःभोवती संरक्षक-कवच निर्माण होण्यासाठी रात्री झोपतांना खोक्यांचे उपाय करणे योग्य ठरते.
३ ई १. अंथरुणाभोवती खोके ठेवून उपाय करण्याच्या संदर्भात काही सूचना
३ ई १ अ. व्यक्ती ज्या पातळीला झोपणार (भूमीवर वा पलंगावर झोपणार) असेल, त्या पातळीला खोके ठेवावेत.
१. पलंगाच्या पातळीला खोके ठेवण्यासाठी आसंदी (खुर्ची), स्टूल, टीपॉय आदींचा उपयोग करून त्यातल्यात्यात समपातळी राखण्याचा प्रयत्न करावा. खोके पलंगाच्या पातळीला ठेवणे शक्य नसेल, तर ते कमी उंचीवर किंवा भूमीवर ठेवावेत. खोके समपातळीला ठेवल्याने होणार्या लाभाच्या २० – ३० टक्केच लाभ खोके समपातळीला न ठेवल्याने होतो, हे लक्षात घेऊन खोके समपातळीला ठेवायचा प्रयत्न करावा.
खोके समपातळीला ठेवता येत नसल्यास ते अशा कोनात ठेवावेत, जेणेकरून खोक्यांची पोकळी व्यक्तीच्या दिशेने असेल. खोका तिरका होण्यासाठी खोक्याखाली ठोकळा ठेवू शकतो. (जवळची आकृती पहा. या आकृतीत सोयीसाठी केवळ २ खोके दाखवले आहेत.)
२. पलंग एक किंवा दोन बाजूंनी भिंतीला चिकटून ठेवलेला असेल, तर झोपण्यापूर्वी पलंग पुढे ओढून त्याच्या पातळीला खोके ठेवावेत. (पलंग पुढे ओढणे शक्य नसेल, तर भिंतींकडील गादीच्या कडांवर लहान खोके ठेवावेत. मोठ्या खोक्यांच्या तुलनेत लहान खोक्यांमुळे थोडाच लाभ होत असला, तरी खोके न ठेवण्यापेक्षा लहान खोके तरी ठेवावेत.)
३ ई १ आ. खोके अंथरुणापासून साधारण ३० सें.मी. (एक फूट) अंतरावर ठेवावेत. या अंतरात १० सें.मी. अल्प-अधिक फरक झाला, तरी चालू शकते. अगदीच शक्य नसेल, तर हे अंतर यापेक्षाही अल्प असल्यास चालू शकते.
३ ई १ इ. सूत्र ‘३ ई २ अ’ यातील आकृतीत दाखवल्याप्रमाणे खोके आडवे ठेवावेत. यामुळे व्यक्तीच्या शरिराचा जास्तीतजास्त भाग खोक्यांच्या कक्षेत येईल.
३ ई २. विकार असलेली एक व्यक्ती किंवा विकार असलेल्या एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र झोपतांना खोक्यांचे उपाय करणे
३ ई २ अ. विकार असलेली एक व्यक्ती झोपणार असल्यास खोके कसे ठेवावेत ?
व्यक्तीच्या अंथरुणाच्या चार बाजूंना पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे खोके ठेवावेत.
३ ई २ अ १. व्यक्तीच्या डोक्याच्या वर सरळ रेषेत एक खोका ठेवावा. खोक्याची उघडी बाजू डोक्याच्या दिशेने असावी.
३ ई २ अ २. व्यक्तीच्या पावलांच्या खाली सरळ रेषेत एक खोका ठेवावा. खोक्याची उघडी बाजू तळपायांच्या दिशेने असावी.
३ ई २ अ ३. व्यक्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २ खोके उपाय करण्याच्या स्थानांसमोर ठेवावेत. खोक्याची उघडी बाजू व्यक्तीच्या दिशेने असावी. (उपाय करण्याची विशेष अशी स्थाने नसतील, तर सूत्र ‘३ ई २ अ’ या आकृतीतील ‘खोका १’, ‘खोका २’, ‘खोका ३’ आणि ‘खोका ४’ या खोक्यांच्या स्थानांप्रमाणे खोके ठेवावेत.)
३ ई २ अ ४. अजून २ खोके घेेऊन त्यांतील एका खोक्याची उघडी बाजू ऊर्ध्व (वरच्या) दिशेने करून, तर दुसर्या खोक्याची उघडी बाजू अधर (खालच्या) दिशेने करून ते खोके सूत्र ‘३ ई २ अ’ या आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्यक्तीभोवती ठेवलेल्या अन्य खोक्यांच्या मंडलात कुठेही ठेवावेत. (त्या आकृतीत सोयीसाठी हे २ खोके व्यक्तीच्या पायांच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना ठेवले आहेत.)
व्यक्ती पलंगावर झोपत असल्यास खोक्याची उघडी बाजू अधर दिशेने असलेला खोका पलंगाच्या खाली भूमीवर ठेवावा आणि खोक्याची उघडी बाजू ऊर्ध्व दिशेने असलेला खोका अन्य खोक्यांच्या मंडलात कुठेही किंवा व्यक्तीच्या भोवती (मात्र पलंगाखाली न ठेवता) ठेवावा.
(जवळजवळ झोपणार्या दोन व्यक्तींपैकी एक जण विकारग्रस्त असल्यास खोके कसे ठेवावेत ?, विकारग्रस्त आई आणि विकारग्रस्त नसणारे तिचे मूल एकत्र झोपतांना खोके कसे ठेवावेत ? आदींविषयी विवेचन ग्रंथात केले आहे.)
३ ई ३. विकार नसलेली एक व्यक्ती किंवा विकार नसलेल्या एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र झोपतांना वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी खोक्यांचे उपाय करणे
या उपायपद्धतीत खोक्यांची तोंडे व्यक्तीच्या शरिराच्या विरुद्ध दिशेला करून ठेवायची असतात. खोक्याचे तोंड शरिराच्या विरुद्ध दिशेला केल्याने बाहेरून होणार्या वाईट शक्तींच्या आक्रमणातील त्रासदायक शक्ती खोक्याच्या पोकळीत खेचली जाते; त्यामुळे व्यक्तीचे रक्षण होते.
३ ई ३ अ. एक व्यक्ती झोपणार असल्यास खोके कसे ठेवावेत ?
१. व्यक्तीच्या अंथरुणाच्या चार बाजूंना पुढीलप्रमाणे ४ खोके, खोक्यांची तोंडे व्यक्तीच्या शरिराच्या विरुद्ध दिशेला करून ठेवावेत.
अ. व्यक्तीच्या डोक्याच्या वर सरळ रेषेत एक खोका ठेवावा.
आ. व्यक्तीच्या पावलांच्या खाली सरळ रेषेत एक खोका ठेवावा.
इ. व्यक्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला साधारण मध्यावर प्रत्येकी १ खोका ठेवावा.
२. सूत्र ‘३ ई २ अ ४.’ पहा. (जवळची आकृती पहा.)
४. विकार-निर्मूलनासाठी प्रतिदिन
खोक्यांचे उपाय करण्याचा सर्वसाधारण अवधी
आणि विकाराच्या तीव्रतेनुसार खोक्यांचे उपाय वाढवणे
विकार-निर्मूलनासाठी खोक्यांचे उपाय सर्वसाधारणपणे प्रतिदिन १ ते २ घंटे (तास) करावेत. काही दिवस प्रतिदिन १ ते २ घंटे खोक्यांचे उपाय करूनही विकार घटत नसेल किंवा नियंत्रणात रहात नसेल, तर उपायांमध्ये वाढ करावी.
५. खोक्यांच्या उपायांच्या संदर्भातील सामाईक सूचना
५ अ. खोक्यांचे उपाय करतांना लक्षात घ्यावयाच्या सूचना
५ अ १. उपायांना असे बसावे !
उपाय करण्यासाठी शक्यतो पूर्व-पश्चिम दिशेने बसावे. कोणत्याही परिस्थितीत दक्षिण दिशेस तोंड करून बसू नये.
५ अ २. उपास्यदेवतेला भावपूर्ण प्रार्थना करावी !
प्रार्थना अशी करावी – ‘हे देवते (देवतेचे नाव उच्चारावे), तुझ्या कृपेने माझ्या या (व्याधीचे नाव उच्चारावे) व्याधीवर उपाय होऊन मी लवकरात लवकर व्याधीमुक्त होऊ दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
५ अ ३. उपाय भावपूर्ण करावेत !
देव भावाचा भुकेला असतो ! आपल्या भावामुळे खोक्यातील आकाशतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते आणि आपला त्रास लवकर अल्प होण्यास साहाय्य होते.
५ अ ३ अ. उपाय भावपूर्ण होण्यासाठी करायच्या काही कृती
१.‘खोक्यामध्ये देवत्व आहे’, या भावाने खोक्याला नमस्कार आणि प्रार्थना करावी.
२.उपाय करतांना ‘खोक्यातील आकाशतत्त्वामुळे माझ्यावरील सर्व त्रासदायक आवरण आणि माझ्यातील सर्व त्रासदायक शक्ती नष्ट होत असून मी चैतन्य ग्रहण करत आहे’, असा भाव ठेवावा.
५ अ ४. उपाय पूर्ण झाल्यावर उपास्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करावी !
‘हे देवते, तुझ्या कृपेमुळेच मी उपाय करू शकलो. मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे’, अशी कृतज्ञता व्यक्त करावी.
५ आ. अन्य सूचना
५ आ १. उपायांच्या खोक्यांची शुद्धी करावी !
सात्त्विक उदबत्तीच्या धुराने खोक्यांची प्रतिदिन शुद्धी करावी.
५ आ २. रिकाम्या खोक्याच्या पोकळीतील देवत्व जागृत रहाण्यासाठी असे करावे !
अ. प्रार्थना करणे : ‘उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, ‘खोक्यातील पोकळी चैतन्याच्या स्तरावर सतत कार्यरत राहू दे.’
आ. उदबत्तीने ओवाळणे : खोक्यातील पोकळीला मध्ये मध्ये उदबत्तीने ओवाळून तिच्यातील देवत्व कृतीच्या स्तरावर जागृत ठेवावे.’ – एक विद्वान, १६.१०.२००७, दुपारी १२.३५. [सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.]
६. खोक्यांचे अप्रत्यक्ष उपाय करण्याच्या काही पद्धती
६ अ. व्यक्तीला असलेला विकार दूर होण्यासाठी तिने स्वतःचे
पूर्ण नाव लिहिलेला कागद किंवा स्वतःचे छायाचित्र खोक्यात ठेवणे
६ अ १. कृती : व्यक्तीला असलेला विकार दूर होण्यासाठी तिने स्वतःचे पूर्ण नाव एका कोर्या कागदावर लिहून तो कागद खोक्यात ठेवावा किंवा स्वतःचे छायाचित्र खोक्यात ठेवावे.
६ अ २. विशेष उपयुक्तता : व्यक्तीच्या जवळ (आसपास) उपायांसाठी खोके ठेवणे शक्य नसेल (उदा. अतीदक्षता विभागात असणारा रुग्ण, रांगणारे मूल), तेव्हा तिच्यासाठी हा उपाय आवर्जून करावा.
६ आ. व्यक्तीच्या मनात नकारात्मक,
निराशाजनक, वाईट किंवा साधनेपासून दूर नेणारे विचार
येत असल्यास व्यक्तीने ते विचार कागदावर लिहून तो कागद खोक्यात
ठेवणे अथवा स्वतःचे हस्ताक्षर असलेला कागद वा स्वतःची वही खोक्यात ठेवणे .
६ आ १. कृती
अ. व्यक्तीने वर उल्लेख केलेले विचार एका कोर्या कागदावर लिहून, त्या लिखाणाच्या भोवती ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपाचे किंवा उपास्यदेवतेच्या नामजपाचे लिखित मंडल काढून तो कागद खोक्यात ठेवावा.
आ. वरील कृती करणे शक्य नसेल, तर व्यक्तीनेे स्वतःच्या हस्ताक्षरातील एखादा कागद किंवा वही खोक्यात ठेवावी. हस्ताक्षर शक्यतो त्रास होत असलेल्या काळातील असावे.
‘खोक्यांच्या साहाय्याने वास्तूशुद्धी कशी करावी ?’ याविषयीचे विवेचन ग्रंथात केले आहे.
(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय (२ भाग)’) ॐ
आगामी काळात भीषण आपत्तींतून वाचण्यासाठी
साधना करणे आणि भगवंताचे भक्त बनणे अपरिहार्य
भावी आपत्काळाचा धैर्याने सामना करता येण्यासाठी सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील विविध उपचारपद्धती शिकून घ्याव्यात. तथापि आपण कितीही उपचारपद्धती शिकून घेतल्या, तरी त्सुनामी, भूकंप अशा काही क्षणांत सहस्रो नागरिकांचा बळी घेणार्या महाभयंकर आपत्तींमध्ये जिवंत राहिलो, तरच त्या उपचारपद्धतींचा उपयोग करू शकतो अशा आपत्तींत आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच !
‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, असे वाटत असेल, तर आपण साधना आणि भक्ती करायला हवी. श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (अर्थ : माझ्या भक्तांचा नाश होणार नाही), असे वचन त्याच्या भक्तांना दिले आहे. याचाच अर्थ असा की, कोणत्याही आपत्तीतून वाचण्यासाठी आपल्याला साधना करणे अनिवार्य आहे. साधनेविषयी जाणून घेण्यासाठी –
वाचा ‘सनातन संस्थे’ची ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारी ग्रंथमालिका
‘सनातन संस्थे’च्या जवळच्या सत्संगाचा लाभ घ्या !
वैज्ञानिकांना साहाय्यासाठी विनंती !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा’ यांनी आध्यात्मिक उपायांसाठी खोक्यांचे उपाय करणे व्यक्तीसाठी लाभदायक आहे का ?, खोके वापरल्याने व्यक्ती आणि वातावरण यांवर काय परिणाम होतो ? आदींसंदर्भात ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ आणि ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या / उपकरणांच्या माध्यमातून संशोधन केले आहे. याविषयी अधिक संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक आणि यासंदर्भात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी साहाय्य करावे, ही विनंती !