‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
(‘धन्वंतरि यागाचा सद्गुरुद्वयी, पुरोहित आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे साधक यांच्यावर झालेला परिणाम’ याविषयीचे संशोधन निराळ्या लेखात दिले आहे.)
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना होणारे शारीरिक त्रास, तसेच साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास आणि विविध शारीरिक व्याधी दूर व्हाव्यात, यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २० आणि २१ सप्टेंबर २०१८ या दिवशी धन्वंतरि याग करण्यात आला. ‘धन्वंतरि यागाचा यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी यज्ञस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत २०.९.२०१८ या दिवशी धन्वंतरि याग आरंभ होण्यापूर्वी आणि पूर्णाहुती झाल्यानंतर, तसेच दुसर्या दिवशी (२१.९.२०१८ या दिवशी) यागातील पुढील विधी आरंभ होण्यापूर्वी आणि महापूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
२. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
२ अ. जळू
धन्वंतरि देवता चतुर्भूज श्रीविष्णूचे रूप आहे. समुद्रमंथनानंतर सर्वांसाठी धन्वंतरि देवता हातात अमृतकलश घेऊन प्रकट होते. धन्वंतरि देवतेच्या एका हातात शंख, दुसर्या हातात चक्र, तिसर्या हातात ‘जळू’ आणि चौथ्या हातात अमृतकलश आहे. धन्वंतरि देवता जळूने रक्तातील जंतूंचा नाश करून अमृतकलशातील अमृताने दीर्घ आरोग्य प्रदान करणारी देवता आहे. ‘धन्वंतरि यागाचा जळूवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी या यागामध्ये पूजेतील मांडणीजवळ एका काचेच्या बरणीत पाण्यामध्ये ३ – ४ जळवा ठेवण्यात आल्या.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जेथे व्यक्तीचे छायाचित्र (रूप) असते, तेथे तिच्याशी संबंधित स्पंदने (शक्ती) असतात. ‘धन्वंतरि यागाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी यागातील पूजेच्या मांडणीजवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवण्यात आले होते.
३. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
३ अ १. यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे
२०.९.२०१८ या दिनी धन्वंतरि याग आरंभ होण्यापूर्वी आणि पूर्णाहुती झाल्यानंतर, तसेच दुसर्या दिवशी यागातील पुढील विधी आरंभ होण्यापूर्वी आणि महापूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
३ आ १. धन्वंतरि याग आरंभ होण्यापूर्वीही यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असणे अन् याग झाल्यानंतर त्या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे
सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. २०.९.२०१८ या दिनी याग आरंभ होण्यापूर्वी, तसेच दुसर्या दिवशी पुढील विधी आरंभ होण्यापूर्वीही यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती. २०.९.२०१८ या दिनी पूर्णाहुती दिल्यानंतर, तसेच दुसर्या दिवशी महापूर्णाहुती दिल्यानंतर त्या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ पुढे दिली आहे.
४. केलेल्या मोजणीच्या नोंदींचेे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
४ अ. धन्वंतरि याग अतिशय भावपूर्णरित्या
झाल्याने वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण होणे
साधकांनी यागाची पूर्वसिद्धता अतिशय भावपूर्ण केली होती. यागाचा परिसर गोमयाने सारवलेला होता. यागासाठी उपयोगात आणलेले पूजासाहित्य, पूजेची मांडणी आदी सात्त्विक होते. यागाचा संकल्प ‘सद्गुरुपदा’वरील संतद्वयी (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांनी हा याग अतिशय भावपूर्णरीत्या आणि सेवाभावाने केला. त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि वेदमूर्ती राजकुमार यांनी ओजस्वी वाणीत मंत्रोच्चार केले. धन्वंतरि याग आरंभ झाल्यावर, तसेच यागातील प्रत्येक विधी चालू असतांना तेथील चैतन्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली. सनातन पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहितांनी विधींच्या वेळी केलेल्या शंखनादामुळे वातावरण पुष्कळ चैतन्यमय झाले होते. थोडक्यात धन्वंतरि याग अतिशय भावपूर्णरीत्या झाल्याने वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण झाले.
४ आ. धन्वंतरि यागातील चैतन्याचा परिणाम यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू,
धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर
झाल्याने त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत अन् त्यांच्या एकूण प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे
धन्वंतरि यागातील चैतन्याचा परिणाम यज्ञकुंड, पूजेची मांडणी, जळू, धन्वंतरि देवाची मूर्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांवर झाला. त्यामुळे त्या सर्वांच्या सकारात्मक ऊर्जेत आणि त्यांच्या एकूण प्रभावळीत सरासरी दीडपटीने वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.
थोडक्यात सांगायचे, तर हिंदु धर्मात विविध प्रसंगी करण्यास सांगितलेले धार्मिक विधी, यज्ञयाग आदी भावपूर्णरीत्या केले, तर ते करणार्यांना आध्यात्मिक लाभ होतात. विधीचे यजमान, पुरोहित, विधीचे ठिकाण, विधीसाठीचे पूजासाहित्य आदी घटक सात्त्विक असल्यास विधीमुळे होणारे लाभ द्विगुणीत होतात. चाचणीतील ‘धन्वंतरि यागातील सर्व घटक सात्त्विक असल्याने, तसेच हा याग अतिशय भावपूर्णरीत्या करण्यात आल्याने वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण होऊन त्याचा सकारात्मक परिणाम यागातील सर्व घटकांवर झाला’, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.९.२०१८)
ई-मेल : [email protected]