बालक संतांच्या आगमनाने सनातन कुटुंबात आध्यात्मिक दीपावली साजरी !
मंगळूरू (कर्नाटक) – आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कठोर साधना करून लहान वयातच संतपद प्राप्त केल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. साधकाला संतपद प्राप्त करण्यासाठी कठोर साधना करावी लागते; मात्र ‘जन्मत:च कोणी संत असू शकते का ?’ याचे उत्तर सनातन संस्थेचे साधक ‘हो’ असे देतील. कारणही तसेच आहे. ‘विविध बाललीलांद्वारे स्वतःतील विशेष दैवी गुणांचे दर्शन घडवणारे मंगळुरू (कर्नाटक) येथील बालक चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले असून ते जन्मतःच संतपदावर विराजमान आहेत’, असे एका सोहळ्याद्वारे घोषित करण्यात आले. साधकांना उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या अनेक दैवी बालसाधकांची गुणवैशिष्ट्ये ज्ञात आहेत; मात्र संत असलेल्या बालकाचे सनातन संस्थेच्या कुटुंबात दिवाळीच्या शुभमुहुर्तावर आगमन झाले आहे. ४ नोव्हेंबर या दिवशी मंगळुरू येथील सेवाकेंद्रात पार पडलेल्या आनंददायी भावसोहळ्यात सनातन संस्थेचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांनी ही ऐतिहासिक घोषणा केली, तर पू. भार्गवराम यांच्या पणजी सनातन संस्थेच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांनी त्यांचा सन्मान केला. या सोहळ्यात ‘पू. भार्गवराम यांच्या छायाचित्रांकडे पाहून सूक्ष्मातून काय जाणवते’, याचा प्रयोगही घेण्यात आला.
सनातन संस्थेचे पू. विनायक कर्वेमामा, पू. भार्गवराम यांच्या आई सौ. भवानी, वडील श्री. भरत प्रभु, श्री. भरत प्रभु यांचे अन्य कुटुंबीय, सौ. भवानी प्रभु यांचे आई-वडील आणि सनातनचे साधक याप्रसंगी उपस्थित होते. या आनंददायी सोहळ्याचा लाभ सनातनच्या देशभरातील साधकांनी संगणकीय प्रणालीद्वारे घेतला.
साधकांनी अनुभवली आध्यात्मिक दिवाळी !
दीपावलीच्या शुभमुहुर्तावर विश्वाच्या इतिहासातील ही अद्वितीय घोषणा झाल्यामुळे साधकांना खरी आध्यात्मिक दिवाळी याच दिवशी अनुभवायला मिळाली. ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’, अशी उक्ती आहे. आज मात्र दिवाळीच्या शुभमुहुर्तावर सनातन परिवारात या बालसंतांचे आगमन झाल्यामुळे दीपावलीचे आध्यात्मिक दीपावलीत रूपांतर झाले.
पू. भार्गवराम यांच्या बालसुलभ लीलांनी युक्त असा सन्मान सोहळा !
दीपावलीच्या निमित्ताने भारतभरातील साधकांसाठी ऑनलाईन सत्संगाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. ‘या सत्संगात परात्पर गुरु डॉक्टर आपल्याला काय भावभेट देणार ?’, यासंदर्भात साधकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सत्संगाला प्रारंभ झाल्यावर गोवत्स द्वादशीचे महत्त्व सांगण्यात आले. अशातच चि. भार्गवराम यांच्या जन्मापासून ते दीड वर्षापर्यंत विविध प्रसंगांतील विशेषत्व दर्शवणारी छायाचित्रे आणि ध्वनीचित्र-चकतीही दाखवण्यात आल्या. जन्मानंतर पू. भार्गवराम यांच्यावर झालेले धार्मिक संस्कार, त्यांचा दिनक्रम, अनेक प्रसंगांत लक्षात आलेली त्यांची प्रगल्भता, श्रीकृष्णाप्रमाणे त्यांचे मोहक अन् नटखट रूप अशा बालसुलभ लीलांचा आनंद यांद्वारे साधकांना अनुभवता आला.
पू. भार्गवराम यांच्या कुटुंबियांसह सनातनच्या देशभरातील आणि विदेशांतील साधकांनी ‘हा अद्वितीय आणि ऐतिहासिक आनंदसोहळा अनुभवता आला’, यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली.
पू. भार्गवराम यांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यक्त केलेले विचार
१. पू. भार्गवरामच्या गुणवैशिष्ट्यांची धारिका वाचतांना
पहिल्या काही ओळी वाचल्यानंतरच ते निराळे (दैवी) बाळ असल्याचे जाणवणे
‘भार्गवरामच्या गुणवैशिष्ट्यांची धारिका उघडल्यानंतर पहिल्या काही ओळी वाचल्यानंतर लगेचच मला ‘हे निराळेच, म्हणजे दैवी बाळ असल्याचे जाणवलेे.’ नंतर छायाचित्र पाहून मी परीक्षण केले आणि ‘जन्मतःच त्याची पातळी ७१ टक्के असून ते संत आहे’, हे समजले. आतापर्यंत मी १ सहस्रहून अधिक दैवी बालकांच्या संदर्भातील धारिका वाचल्या आहेत आणि त्यांची छायाचित्रे पाहिली आहेत; पण भार्गवरामची धारिका वाचल्यावर आणि त्याची छायाचित्रे पाहिल्यावर मनाला जितका आनंद मिळाला, तितका कधीच अनुभवला नव्हता.
२. पू. भार्गवराममुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुढच्याच्या पुढच्या पिढीची काळजी न उरणे
वर्ष २०२३ मध्ये ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. हे ईश्वरी राज्य चालवण्यासाठी भाव, तळमळ, त्याग, प्रेमभाव, प्रगल्भ विचार आणि देवाप्रती ओढ इत्यादी गुण असलेले उच्च लोकांतील सात्त्विक जीव साधनेसाठी पृथ्वीवर येत आहेत. माझ्या पुढच्या पिढीतील ८५ साधकांनी संत, सद्गुरु आणि परात्पर गुरुपद प्राप्त केले आहे. यांमध्ये अनेक दांपत्यांनीही संतपद प्राप्त केले आहे. तसे १ सहस्रहून अधिक साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत; म्हणून मला पुढच्या पिढीची काळजी नाही. आता त्याच्या पुढच्या पिढीचीही काळजी उरली नाही; कारण आतापर्यंत उच्च स्वर्गलोकातून ७०५ आणि महर्लोकातून १४७ दैवी बालके पृथ्वीवर जन्माला आली आहेत.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपत्काळात साधकांना मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचे रक्षण व्हावे’,
यासाठी ईश्वराने सनातनला आणि सात्त्विक मानवांना दिलेले एक अपूर्व
दैवी बाळ म्हणजे जन्मतःच ७१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला पू. भार्गवराम !
अ. आपण श्रीकृष्णाच्या बाललीला वाचलेल्या असतात; पण त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नसतो. पू. भार्गवराम यांची गुणवैशिष्ट्ये वाचतांना ‘आपण त्या अनुभूती स्वतः घेत आहोत’, असे आपल्याला जाणवते.
आ. आपण अनेक संतांची चरित्रे वाचलेली असतात; पण त्यांच्या बाल्यावस्थेची आपल्याला माहिती नसते. ही माहितीही पू. भार्गवराम यांच्याद्वारे आपल्याला मिळते.
इ. भारतात यापूर्वी आदि शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर यांच्यासारखी बालपणी संत झालेल्यांची उदाहरणे पहायला मिळालेली आहेत; पण आतापर्यंत झालेल्या संतांच्या चरित्रांमध्ये त्यांना जन्मतःच संतपद प्राप्त झाल्याचे एकही उदाहरण वाचनात आलेले नाही.
श्रीकृष्णाच्या कृपेने आज चि. भार्गवराम भरत प्रभु याच्या रूपाने जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले सनातनचे पहिले बालक संतपदावर विराजमान झाल्याचा एक अपूर्व योग सनातनमध्ये पहायला मिळत आहे. या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे सनातनच्या ४४ व्या संत श्रीमती पू. राधा प्रभु यांचा चि. भार्गवराम भरत प्रभु हा पणतू आहे.
ई. आतापर्यंत ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’, ही म्हण प्रचलित होती; पण हे अपूर्व दैवी बाळ पोटात असल्यापासूनच त्याच्या दैवी लीलांचा प्रत्यय त्याच्या आईला, म्हणजे सौ. भवानी प्रभु यांना येत होता. भार्गवरामची दैवी गुणवैशिष्ट्ये वाचतांना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला. त्यावरून हे निराळेच, म्हणजे दैवी बाळ असल्याचे लक्षात आले.
उ. आपत्काळात साधकांना मार्गदर्शन आणि त्यांचे रक्षण एवढेच या बाळाचे कार्य नाही, तर जगात सर्वत्र हिंदु (सात्त्विक) राष्ट्राची घडी सर्वत्र बसवण्याचे कार्यही हेच बाळ करणार आहे. या उदाहरणावरून ‘ईश्वर कार्य कसे करतो’, हेही थोडेफार कळते.
ऊ. असे अपूर्व दैवी बाळ जन्माला घातल्याविषयी प्रभु आणि पडियार कुटुंबियांचे आभार मानावे तेवढे थोडे ! त्या दोन्ही कुटुंबांतील सर्वजण पूर्णवेळ साधना करणारे आहेत. त्यांनी सर्वस्वाचा त्यागही केला आहे. यावरूनही ‘संत कोणत्या कुटुंबात जन्माला येतात’, हेही लक्षात येते.
ए. चि. भार्गवराम याचे एक छायाचित्र पाहून आणि त्याच्याविषयीची माहिती वाचून ‘त्याच्याबद्दल एक लेख लिहावा’, असे मला वाटले; म्हणून त्याच्या आई-वडिलांकडे त्याची छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती मागवल्या. त्यांनी भार्गवरामची निरनिराळ्या वयात काढलेली पुष्कळ छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती पाठवल्या. तेव्हा मला वाटले, ‘भार्गवराम संत असल्याचे लवकरच घोषित करतील, तेव्हा त्याची निरनिराळ्या वयांत काढलेली विविध छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती लागतील; म्हणून त्यांनी आधीच छायाचित्रे काढली आणि ध्वनीचित्रफिती बनवल्या होत्या.’
कलियुगांतर्गत सत्ययुगाचा आरंभ करणार्या या बालकाच्या चरणी सर्व साधकांच्या वतीने मी कृतज्ञता व्यक्त करतो !
पू. भार्गवरामच्या गुणवैशिष्ट्यांची धारिका वाचल्यानंतर आकाशात ५ मिनिटे एक गडद रंगांचे आणि एक फिकट रंगांचे अशी दोन इंद्रधनुष्ये दिसली ! ‘हीसुद्धा देवाने दिलेली एक दैवी साक्ष आहे’, असे वाटलेे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अध्यात्मात प्रगतीपथावर असलेले प्रभु कुटुंब !
इंद्रधनुष्याद्वारे देवाने चि. भार्गवराम संत असल्याची साक्ष देणे !
पू. भार्गवराम यांच्या संतपदाची घोषणा झाल्यानंतर
पू. भार्गवराम यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत अन् कृतज्ञता !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दीपावलीची आनंददायी भेट दिली ! –
पू. (श्रीमती) राधा प्रभु, सनातनच्या ४४ व्या संत आणि पू. भार्गवराम यांची पणजी
‘आम्हा प्रभु कुटुंबियांना परात्पर गुरु डॉक्टरांनी दीपावलीची आनंददायी भेट दिली आहे. असा आनंद यापूर्वी कधी कोणाला मिळाला नसेल. तो आम्ही अनुभवला. संत बाळाला जन्म दिल्याने सौ. भवानी आणि श्री. भरत हे दोघेही धन्य झाले. परात्पर गुरु डॉक्टरांची ही आम्हा प्रभु कुटुंबियांवर कृपाच आहे. दीड वर्षांचा कुलदीपकच त्यांनी प्रभु कुटुंबियांना दिला आहे. ‘हा दीपक यापुढेही प्रभु कुटुंबासह सर्वांना प्रकाश देत राहो’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !
काही दिवसांपूर्वी मला ‘भार्गवराम याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करतील’, असे वाटले होते; पण परात्पर गुरूंनी आम्हाला त्याहीपेक्षा मोठी भेट दिली. हे सर्व त्यांनीच केले. मला आनंदही व्यक्त करता येत नाही. ‘भार्गवराम नटखट आहे. त्यामुळे त्याचे रक्षण करा’, अशी प्रार्थना मी गुरुदेवांच्या चरणी करत होते. यापुढेही त्यांनीच त्याचे रक्षण करावे.’
पू. भार्गवराम यांची पू. (श्रीमती) राधा प्रभु यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये !
‘भार्गवराम याच्या बाललीलांचा आनंद केवळ त्याचे आई-वडीलच नव्हे, तर मंगळूरू सेवाकेंद्रातील सर्व जण अनुभवत आहेत. तो ३ मासांचा असतांना आईच्या माहेरीहून घरी आला. तेव्हा तो माझ्याकडे पाहून हसला. तो माझ्याकडे एकटक बघत असतो. मी त्याच्याशी बोलते. तेव्हा तो कान देऊन ऐकत असतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी ‘मी बोलत असलेले त्याला कळते आणि पूर्वजन्मातील त्याला काहीतरी आठवते’, असे वाटते. ‘तो मोठा झाल्यावर कीर्तीवान होईल. राष्ट्र आणि हिंदु धर्म यांसाठी मोठे कार्य करील’, असे मी सर्वांना नेहमी म्हणते.’
परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली,
तरी अल्प आहे ! – श्रीमती अश्विनी प्रभु (पू. भार्गवराम यांची आजी)
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला पुष्कळ मोठी भेट दिली आहे. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. २-३ दिवसांपूर्वी सर्व साधकांप्रती कृतज्ञता वाटत होती. एका प्रसंगानंतर ‘माझ्या जीवनात यापुढे कधीच दिवाळी साजरी होणार नाही’, असा विचार माझ्या मनात आला होता; मात्र परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक दिवाळीत मला आनंद देत आहेत. २ संत असलेले कुटुंब मला देवाने दिले, मला अजून काय हवे आहे ? ‘असे संत आणि दैवी बालके सर्व कुटुंबांमध्ये असावीत आणि लवकर हिंदु राष्ट्र यावे. त्यासाठी देवाने आमच्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घ्यावेत’, हीच प्रार्थना आहे.’
संतच पू. भार्गवराम यांच्याकडून पुढील साधना
करवून घेतील ! – श्री. भरत प्रभु (पू. भार्गवराम यांचे वडील)
भावाश्रू अनावर झाले । कंठही दाटून आला ।
कसे होऊ उतराई गुरुराया । पोटी संत जन्मला ॥
‘भार्गवराम यांच्या संतत्वाची घोषणा झाल्यापासून मन शांत आहे. मनात कोणतेही विचार नाहीत. धर्मप्रसाराच्या सेवेनिमित्त बाहेर असल्यामुळे पू. भार्गवराम यांचा मला विशेष सहवास मिळाला नाही; मात्र मी जेवढा वेळ त्यांच्या समवेत असतो, तेवढा वेळ आनंद मिळतो. ‘पू. भार्गवराम यांच्याशी माझे नाते वडील-मुलगा नाही, तर वेगळेच आहे’, असे जाणवते. ‘यापुढे पू. भार्गवराम यांचा सांभाळ कसा करावा’, याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावे. ‘मंगळूरू सेवाकेंद्रातील पू. कर्वेमामा, पू. रमानंदअण्णा आणि पू. आजी (पू. (श्रीमती) राधा प्रभु) यांच्या मार्गदर्शनामुळेच पू. भार्गवराम यांची पुढील साधना होईल’, असे वाटते. त्यामुळे मी निश्चिंत आहे. यापुढे आम्हाला पू. भार्गवराम यांच्याकडून शिकायला मिळेल.’
भार्गवराम यांना संत घोषित करतील, असे वाटले ! – सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई)
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. विवाहानंतर सासरी पू. प्रभुआजींच्या रूपात संत मिळाले. आता देवाने घरात दोन संत दिले आहेत. आज या सत्संगाची सिद्धता चालू असतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता. येथे लावलेल्या मोरपिसांच्या मधोमध ठेवलेल्या फुलाकडे पाहिल्यावर त्यात चि. भार्गवरामचा तोंडवळा दिसत होता. तेव्हा ‘चि. भार्गवराम याला संत घोषित करणार नाहीत ना ?’, असा विचार मनात आला.
पू. भार्गवराम यांच्या जन्मापूर्वी माझी साधना नीट चालू नव्हती. पू. भार्गवराम यांच्या जन्मापासून अनेक संतांनी त्यांच्यासंदर्भात वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे सांगितली आहेत. ते लहान असले, तरी समंजस आहेत. पू. भार्गवराम नटखट आहेत; पण ‘माझ्या आईला शारीरिक त्रास आहे’, हे ठाऊक असल्याप्रमाणे ते आईजवळ असतांना शांत असतात. भार्गवराम याच्या जन्मानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘भार्गवराम तुझ्याकडून साधना करवून घेईल’, असे मला सांगितले होते. असे अनेक प्रसंगांमध्ये लक्षात येते.
पू. भार्गवरामला दूध पाजतांना मी नामजप करत नसल्यास ते दूध पित नसत. ‘पू. भार्गवराम माझा हात पकडून मला साधनेत पुढे घेऊन जात आहेत’, असे वाटते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना अपेक्षित असे संस्कार पू. भार्गवरामवर कसे करायचे’, हे शिकवावे, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’
रूप पहाता दृष्टी भरली । धन्य गुरूंची थोरवी ॥
तुज पाहता सामोरी । दृष्टी न फिरे माघारी ।
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली श्रीकृष्णराया ॥
ईश्वराचे राज्य येईल । रज-तमाचा नाश होईल ॥
तो पहा आला मोहन । करण्या भारत महान पुन्हा ॥
अमोल चीज जो दी गुरुने । न दे सके भगवान भी ॥
भक्तीभावे अनुभवावा अनुपम्य विश्वरूपदर्शन सोहळा !
१ वर्षाचे असतांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पू. भार्गवराम यांना श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती.
या ‘आ’ केलेल्या मुखात विश्वरूपदर्शन होत असल्याची अनुभूती साधकांना येते. ते चित्र खाली दिले आहे.
छायाचित्र १ : पू. भार्गवराम आनंदाने अंघोळ करतात. त्या वेळी त्यांच्या देहावरून पडणारे पाण्याचे थेंब मोत्यांसारखे दिसतात.
छायाचित्र २ : लहान असूनही पू. भार्गवराम सेवाकेंद्रात सेवा करतात. कुंड्यांतील रोपांना लक्षपूर्वक पाणी घालतात, तसेच काही कारणाने नळीतून पाणी येणे बंद झाल्यास साधकांना सूचितही करतात.
छायाचित्र ३ : पू. भार्गवराम यांचा श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव आहे. श्रीकृष्णाची प्रतिमा पाहिल्यानंतर धावत येऊन आनंदाने त्याची पापी घेतांना पू. भार्गवराम !
छायाचित्र ४ : सेवाकेंद्रात इवल्याशा हातांनी केर काढण्याची सेवा करतांना पू. भार्गवराम !
तेजस्वी अन् बोलके नेत्र । सुंदर अन् मोहक चर्या ।
कान्हापरी शामकांती ।
भुरळ पडे पहाताक्षणी ।
लोभस, खट्याळ भाव ।
प्रत्येक मुद्रा तुझी आगळी ।
सांग, पहावे तुजकडे किती ?
वाटे, तुज पहातच रहावे।
करावी कन्हैयासम प्रीती ॥
पू. भार्गवराम प्रभु यांच्यातील ‘असामान्यत्वा’
संदर्भात त्यांच्या जन्माआधी कुटुंबियांना आलेल्या अनुभूती !
सात्त्विक बाळ जन्मण्याविषयी संत आणि एक साधिका यांनी केलेले भाकित !
१. सनातनचे संत पू. उमेश शेणै
‘हे मूल सामान्य नाही. ते संत म्हणूनच जन्मेल. गुुरुदेवांच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे तुझ्यावर गर्भसंस्कार होत आहेत’, असे पू. उमेशअण्णा यांनी मला सांगितले.
२. ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर
गरोदरपणी बाळ पहाटे ४ – ४.३० वाजता उठून पोटात आपले हात-पाय हलवायचे. याविषयी मी कु. प्रियांका लोटलीकर यांना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हे बाळ सात्त्विक आहे. सर्व देवतांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेण्यासाठी ते ब्राह्ममुहूर्तावर लवकर उठते.’’ प्रत्यक्षात जन्मानंतरही भार्गवराम याच वेळी पहाटे उठत असे.’
– सौ. भवानी प्रभु (आई) (२२.४.२०१८)
१. सौ. भवानी भरत प्रभु (आई), मंगळूरू सेवाकेंद्र
१ अ. गर्भवती असतांना ‘बाळाशी कोणताच संबंध नाही’, असे वाटत असल्याने ‘स्वतःत प्रेमभाव नाही’, असे नकारात्मक विचार येणे
‘इतर स्त्रिया गरोदरपणी स्वतःच्या अर्भकाशी जोडल्या गेलेल्या असतात; पण गर्भवती असतांना ‘माझा बाळाशी कोणताच संबंध नाही’, असे मला वाटत होते. त्यामुळे ‘माझ्यात प्रेमभाव नाही’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात यायचे. तेव्हा ईश्वर माझ्यातील प्रेमभाव वाढणे आणि गर्भामध्येच बालरूपी ईश्वर पहाणे यांसाठी मला बाल गणेशाची स्वप्ने दाखवत होता. या स्वप्नांविषयी मी एका संतांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘असा नकारात्मक विचार करण्याची आवश्यकता नाही. ‘अशा प्रकारे बाळाबद्दल कोणतीही आसक्ती न वाटणे’, हे आध्यात्मिकदृष्ट्या चांगलेच आहे.’’
१ आ. मनातील नकारात्मक विचार वाढल्यावर ‘बाळ सकारात्मक विचार देत आहे’, असे जाणवणे
५ व्या मासात माझ्या मनातील नकारात्मक विचार पुष्कळ वाढले असतांना ‘पोटातील बाळ मला सकारात्मक विचार देत आहे’, असे मला जाणवत होते. नंतर संतांनी ‘हे सकारात्मक विचार तुला पोटातील बाळाकडून मिळत आहे’, असे मला सांगितले.
१ इ. स्वभावदोेष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात गेल्यावर ‘या माध्यमातून गर्भसंस्कार होत आहेत’, असे वाटू लागणे
काही वेळा माझ्या मनात तीव्र नकारात्मक विचार यायचे, ‘माझी प्रकृती चांगली नसल्यामुळे माझ्याकडून कोणतीच समष्टी सेवा होत नाही. मला होणार्या मुलात जर माझे स्वभावदोष आणि अहं आले, तर मला हे मूल कशाला हवे ?’ त्या वेळी गुरुकृपेने ६ व्या मासात मला स्वभावदोेष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी ‘या प्रक्रियेच्या माध्यमातून गर्भावर संस्कार होत आहेत’, अशी माझी दृढ श्रद्धा निर्माण झाली.
१ ई. पू. सौरभदादांजवळ उभी असतांना पहिल्यांदा बाळाची हालचाल जाणवून बाळाने पोटात जोराने हात-पाय हलवणे
आश्रमात पू. सौरभदादा (पू. सौरभ जोशी) यांचा आवाज ऐकून मला पहिल्यांदा बाळाची हालचाल जाणवली आणि ‘पू. दादा मला बोलावत आहेत’, असे वाटून मी त्यांच्याकडे गेले. मी पू. दादांजवळ उभी असतांना बाळ पोटात जोराने हात-पाय हलवत होते.
१ उ. भाववृद्धी सत्संग आरंभ होण्यास ५ मिनिटे शेष असतांना पोटातील बाळाने जोरात हात-पाय हलवून आईला जागे करणे आणि सत्संगात भावप्रयोग चालू असतांना ‘बाळाने हात-पाय हलवून सतर्क रहाण्यास सुचवले’, असे जाणवणे
एकदा दुपारी २ वाजता असलेल्या भाववृद्धी सत्संगाची आठवण व्हावी; म्हणून मी दुपारी १.३० वाजताचा गजर लावला होता, तरीही मला जाग आली नाही. भाववृद्धी सत्संग आरंभ होण्यास ५ मिनिटे शेष असतांना पोटातील बाळाने जोरात हात-पाय हलवून मला जागे केले आणि त्याच वेळी मला प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. यावरून ‘बाळाला भाववृद्धी सत्संगाविषयी सूक्ष्मातून आधीच कळले होते’, असे मला वाटले. नंतरच्या एका भाववृद्धी सत्संगात ‘स्वतःभोवती आणि आश्रमाभोवती श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरत आहे’, असा भावप्रयोग घेतला गेला. तेव्हा मला काहीच वाटत नव्हते आणि माझी एकाग्रताही होत नव्हती. तेव्हा ‘पोटातील बाळाने हात-पाय हलवून माझ्यात एकाग्रता आणण्याचा प्रयत्न केला आणि मला सतर्क रहाण्यास सुचवले’, असे मला वाटले.
१ ऊ. गर्भसंस्कार होण्यासाठी धार्मिक ग्रंथ वाचण्यास आरंभ करताच बाळाने पोटात आनंदाने हात-पाय हलवणे
सनातनच्या ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे ‘गर्भधारणा झाल्यानंतर गर्भसंस्कार व्हावेत’, यासाठी मी मनाचे श्लोक, ज्ञानेश्वरी, श्रीधरस्वामींचे चरित्र इत्यादी ग्रंथ वाचत होते. ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करताच बाळ पोटात आनंदाने हात-पाय हलवत असे आणि त्या वेळी मलाही आनंद होत असे. ग्रंथवाचन पूर्ण झाल्यानंतरही ‘ते एकाग्रतेने आणखी काहीतरी ऐकण्यास उत्सुक आहे’, असे मला जाणवायचे. श्रीधरस्वामींच्या चरित्रातील गोष्ट वाचतांना ‘मी जे वाचत आहे, ते सगळे त्याला कळत असून त्याला आनंद होत आहे’, अशा प्रकारची त्याची हालचाल होत असे.
१ ए. घरासमोर अन्य धर्मियांची वस्ती आणि स्मशानभूमी असूनही घराभोवती अभेद्य कवच निर्माण होऊन संरक्षण होत असल्याचे जाणवणे
मी ८ व्या आणि ९ व्या मासात माहेरी रहात होते. आमच्या घरासमोरच अन्य धर्मियांची वस्ती आणि स्मशानभूमी असूनही ‘घराभोवती एक अभेद्य कवच निर्माण झाले आहे आणि त्यामुळे माझे संरक्षण होत आहे’, असे मला वाटत होते. यामुळे माझ्यात धैर्य निर्माण होत होते. घरापासून मंगळूरूपर्यंत येतांनाही माझ्या मनात हाच विचार होता. यावरून ‘बाळाच्या जन्मापूर्वी ईश्वर त्याची किती काळजी घेत होता’, हे माझ्या लक्षात आले.’
२. श्री. भरत प्रभु (वडील), बेंगळूरू सेवाकेंद्र
२ अ. ‘कोणी संत जवळ आले की, पत्नीच्या पोटात गर्भाची हालचाल जाणवत असल्याचे ती सांगायची.’
३. सौ. शशिकला पडियार (आजी – आईची आई), मंगळूरू सेवाकेंद्र
३ अ. मुलीजवळ झोपल्यावर आपोआप नामजप होणे आणि मुलीच्या पोटाला हात लावून बाळाला ‘हरि’ म्हणून बोलवल्यावर बाळाने पाय हलवल्याचे जाणवणे
‘माझ्या मुलीला ७ वा मास चालू असतांना ती झोपलेली असतांना तिच्या गर्भातून ‘मंद गतीने नामजप ऐकू येत आहे’, असे मला वाटायचे. मी मुलीजवळ झोपायचे. तेव्हा माझा नामजप आपोआप होत असे. ‘मी मुलीच्या पोटाला हात लावून बाळाला ‘हरि’ म्हणून बोलवायचे. तेव्हा बाळ पाय हलवायचे’, असे मला बर्याचदा जाणवले.’
पू. भार्गवराम यांच्या जन्माच्या वेळेस कुटुंबियांना आलेल्या अनुभूती
१. सौ. भवानी प्रभु
१ अ. सुलभ प्रसूती होऊन बाळाचा जन्म होणे
‘मला केवळ १५ ते २० मिनिटेच प्रसूतीवेदना झाल्या आणि नंतर ५ मिनिटांत बाळ जन्माला आले. सुलभ प्रसूती करून आणि कोणत्याही त्रासाविना देवाने मला हे दैवी बालक दिले. यासाठी मी त्याच्या चरणी अनंत ऋणी आहे.
१ आ. बाळाच्या कानात मंत्र म्हटल्यानंतर ते लगेच उठणे
बाळाच्या कानात ‘ॐ नमः शिवाय ।’ ‘श्री विष्णवे नमः ।’ आणि ‘श्री गुरवे नमः ।’ हे मंत्र म्हणण्यास साधक डॉ. अजय जोशीकाकांनी सांगितले होते. बाळाला रुग्णालयातील खोलीत आणल्यावर सर्वांनी त्याचे हात-पाय हलवले, तरी बाळ उठले नाही; पण त्याच्या कानात मंत्र म्हणताच ते लगेच उठले.’
२. सौ. शशिकला पडियार (आजी – आईची आई)
२ अ. पू. राधा प्रभु यांनी सांगितल्याप्रमाणे कोणताही त्रास न होता भवानीचे बाळंतपण चांगले होणे आणि नवजात बालकाला हातात घेतल्यावर त्याच्यात बालकृष्णाचे रूप दिसून ‘स्वतःच्या कानात वेदमंत्र ऐकू येत आहेत’, असे जाणवणे
‘सौ. भवानीच्या (मुलीच्या) बाळंतपणाच्या अगोदर पू. आजी (मुलीच्या आजेसासूबाई, सनातनच्या संत पू. राधा प्रभु) म्हणायच्या, ‘‘हे बालक देवाच्या कृपेने जन्म घेत आहे. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नाही. बाळंतपणात भवानीला कोणताही त्रास न होता तिचे बाळंतपण चांगले होईल !’’ पू. आजींच्या म्हणण्याप्रमाणेच झाले. ५.५.२०१७ या दिवशी दुपारी ४ वाजता आम्ही भवानीला रुग्णालयात दाखल केले आणि दुपारी ४.५० वाजता बाळाचा जन्म झाला.
परिचारिकेने बाळाला माझ्या हातात दिले. तेव्हा मला बाळामध्ये बाळकृष्णाचे रूप दिसत होते आणि पुष्कळ आनंद होत होता. ‘ही भगवंताचीच लीला आहे’, असे वाटून मला आनंद होत होता. बाळाला हातात घेतल्यावर ‘माझ्या कानात वेदमंत्र ऐकू येत आहेत’, असे जाणवले. परिचारिका मला म्हणाली, ‘‘हे बाळ अतिशय स्वच्छ आहे. असे असणे दुर्मिळ असते.’’
पू. भार्गवराम यांच्या सन्मान सोहळ्याच्या मंगलप्रसंगी
त्यांचे नातेवाईक आणि सनातनचे संत यांनी व्यक्त केलेले मनोगत !
आम्ही पुष्कळ भाग्यवान आहोत !
‘आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या कुटुंबात २ संत आहेत. त्यांच्या सेवेची संधी मिळाली आहे. ‘पू. भार्गवराम यांच्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे’, हे जाणवत होते; परंतु संत असल्याचे समजले नाही.’ – श्री. शिवानंद प्रभु (श्री. भरत प्रभु यांचे काका)
कृतज्ञता वाटली !
‘आता प.पू. गुरुदेवांच्या कृपेने साधना आणखी शीघ्रतेने होईल. आम्ही पू. भार्गवराम यांच्याकडून शिकून पुढे जाऊ शकतो. ‘गुरुदेवांच्या सेवेत संपूर्ण समर्पित व्हावे’, असे वाटले.’ – सौ. प्रतिमा प्रभु (श्री. भरत प्रभु यांच्या काकू)
आनंदाचे वर्णन करता येत नाही ! – श्री. प्रभाकर
पडियार (पू. भार्गवराम यांची आई सौ. भवानी प्रभु यांचे वडील)
‘आतापर्यंत एवढा आनंद कधी झाला नव्हता. या आनंदाचे वर्णन करता येत नाही. परात्पर गुरु डॉक्टर स्वत: ईश्वर आहेत. ‘आमच्या घरी संत जन्म घेणार आहेत’, असे आधीपासून वाटत होते. पू. भार्गवराम आमच्या घरी असतांना घराच्या बाजूला चिमण्या आणि गाय येत असे. तेव्हा ‘पू. भार्गवराम त्यांच्याशी संवाद साधत आहेत’, असे वाटायचे. ते असतांना घरातील वातावरण चांगले वाटत होते. पू. भार्गवराम यांच्याशी खेळतांना आनंद वाटतो; पण त्यांचे खेळून झाल्यावर जातांना ते दु:खी वाटत नाहीत. ‘तेव्हा ते अव्यक्त आनंदात असतात’, असे वाटते. पू. भार्गवराम यांचा सांभाळ करतांना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्यासाठी आम्ही ईश्वराची क्षमा मागतो.’
‘बस रहे मन में कृतज्ञता !’ – सौ. शशिकला
पडियार(पू. भार्गवराम यांची आई सौ. भवानी प्रभु यांची आई)
‘काय सांगावे, हे लक्षात येत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच पू. भार्गवराम यांच्या संदर्भात अनुभूती आल्या. त्यांच्याच कृपेने भार्गवराम यांचा जन्म झाला. ‘पू. भार्गवराम हे श्रीकृष्णच आहेत’, असे वाटते. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला संतसेवेची संधी दिली, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता ! पू. भार्गवराम यांच्यामुळेच मी टिकून आहे. ‘मला वर्ष २०१७ मध्ये तीव्र शारीरिक त्रास सहन करावे लागतील’, असे माझ्या जन्मपत्रिकेत म्हटले होते. त्याच वर्षी पू. भार्गवराम यांचा जन्म झाला. त्यांच्या चैतन्यामुळेच मला त्रास झाला नाही. सोहळ्यासाठी येतांना चैतन्य जाणवत होते. सत्संगस्थळी आल्यावर आपोआप नामजप चालू झाला. पू. भार्गवराम यांच्या सेवेत मी अल्प पडले, त्यासाठी क्षमायाचना करते. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच त्यांची सेवा आमच्याकडून करवून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !’
या वेळी सौ. पडियार यांनी ‘बस रहे मन में कृतज्ञता !’ या गीताच्या पंक्ती गायल्या.
पू. भार्गवराम यांच्या प्रत्येक कृतीतून चैतन्याचे प्रक्षेपण !
– पू. रमानंद गौडा, कर्नाटक राज्य धर्मप्रसारक, सनातन संस्था
‘गुरुदेवांनी जनलोकातील जिवाला कर्नाटक राज्यात जन्म दिला आहे. पू. भार्गवराम यांचे हसणे, खेळणे यांतून आनंद आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होत असते. ‘ते अंगणात खेळण्यासाठी येतात. तेव्हा त्यांच्यासह दैवी शक्तीही येत आहे’, असे जाणवते. त्यांच्याकडे कितीही वेळ पाहिले, तरीही ‘पहातच रहावे’, असे वाटते. ‘पू. भार्गवराम यांच्यामुळे केवळ मंगळूरू येथीलच नाही, तर कर्नाटक राज्यातील साधकांनाही चैतन्य लाभेल’, याचा आनंद वाटतो. ‘या सोहळ्यानंतर गुरुदेवांचे कार्य अधिकाधिक वाढेल’, असे वाटते.’
संतांच्या माध्यमातून परात्पर गुरूंचे तत्त्व प्रकट होत आहे ! – पू. विनायक कर्वे
‘परात्पर गुरुदेव स्वतः निर्गुण तत्त्व आहेत आणि पू. भार्गवराम यांच्यासारख्या संतांच्या माध्यमातून ते अनेक ठिकाणी साकार होत आहेत. परात्पर गुरु परमतत्त्व, परमज्ञान आणि परमसत्य आहेत.’