ह.भ.प. पू. वक्ते महाराजांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सनातन संस्थेकडून सन्मान
पंढरपूर – सनातन संस्था हिंदु धर्माच्या प्रसाराचे अलौकिक कार्य करत आहे. सनातनचे साधक निष्काम भावाने तन, मन आणि धन यांचा त्याग करून ईश्वरी कार्य करत आहेत, याविषयी मला त्यांचा अभिमान वाटतो. सनातन हिंदु धर्माची स्थापना होऊन ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. माझे या कार्याला सदैव शुभाशीर्वाद आहेत. तथाकथित निधर्मी शासनकर्ते पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदु धर्माला अपकीर्त करत आहेत. अशा घोर आपत्काळात समाजाला साधना आणि धर्मरक्षण यांचे महत्त्व सांगून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे निष्काम कार्य सनातन संस्था करत असून, हे कार्य दैवी आणि अलौकिक आहे. असे दैवी कार्य करणार्या सनातन संस्थेशी मी निगडित असल्याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवौद्गार वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू, धर्माचार्य शड्दर्शनाचार्य भिष्माचार्य वेदशास्त्रसंपन्न ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांनी काढले. पू. निवृत्ती महाराज वक्ते (बाबा) यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
पू. वक्ते महाराज पुढे म्हणाले की,
१. सध्या सप्ताह, अन्नछत्र यांना धंदेवाईक स्वरूप आले आहे. वेद, श्रृती, स्मृती, पुराण, यज्ञ, हवन यांमध्ये प्रचंड शक्ती आहे. यज्ञयाग, नामजप, दान यांतून प्रचंड सामर्थ्य प्राप्त होते. हे सामर्थ्य धर्मकार्य करण्यासाठी आवश्यक असते.
२. सत्तालोभी शासनकर्ते हिंदु धर्मावरील आघातांविषयी शब्दही काढत नाहीत. धर्मांध शासनकर्त्यांनी हिंदु सरदारांना वतनाची आमिषे दाखवून आपलेसे केले आणि हिंदूंवर ८०० वर्षे राज्य करून वर्चस्व गाजवले.
३. तथाकथित पुरोगामी हे संत तुकाराम महाराज, प्रभु श्रीराम यांच्याविषयी विखारी लिखाण करून हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करत आहेत. या सर्व पाखंडी विचारांचे मी माझ्या ग्रंथातून खंडण केले आहे.
या वेळी पू. वक्ते महाराज यांचा सन्मान सनातनचे साधक आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर यांनी पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन केला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सुवर्णा पेठकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, श्री. मोहन लोखंडे, श्री. सिद्धीविनायक खरात, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, राष्ट्रीय वारकरी सेनेचे युवा अध्यक्ष ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर आदी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. ह.भ.प. पू. वक्ते महाराज यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर दिग्विजय ग्रंथ भव्य पारायण सोहळा, तसेच श्री संत मुक्ताबाई चरित्र अनुष्ठान अखंड हरिनाम सप्ताह २४ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पार पडला.
२. ह.भ.प. पू. वक्ते महाराज यांनी सन्मानाच्या वेळी त्यांना घातलेला हार काढून त्यांच्या शिष्याकरवी सनातन संस्थेच्या साधकांच्या गळ्यात घातला. या वेळी पू. वक्ते महाराज म्हणाले, ‘‘सनातनचे साधक निष्काम कर्म करणारे खरे साधूच आहेत.’’
३. पू. वक्ते महाराज यांनी स्वतः लिहिलेले ‘वाल्मीकि रामायण भाष्य (समीक्षण) भाग १ आणि २’ हे खंड उपस्थित सर्व साधक अन् कार्यकर्ते यांना भेट दिले.
४. या वेळी पू. वक्ते महाराजांना दैनिक सनातन प्रभातचा ‘श्री हालसिद्धनाथ भाकणूक विशेषांक’ भेट दिला. त्या अंकाचे त्यांनी त्वरित वाचनही केले.
दैनिक सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार !
ह.भ.प. पू. वक्ते महाराज म्हणाले, ‘‘हे अवघ्या विश्वाला मार्गदर्शन करणारे एकमेव दैनिक आहे. हे दैनिक हिंदूंना धर्माधिष्ठित बनवून हिंदु राष्ट्र स्थापनेस प्रेरित करील.’’sanatan
साधकाच्या डोक्यावर हात ठेवल्यावर सनातनच्या सर्व
साधकांना धर्मकार्य करण्यासाठी बळ आणि आशीर्वाद मिळाल्याचे जाणवणे
पू. वक्ते महाराज यांना सन्मानाच्या वेळी दिलेले पेढे सर्व साधकांना प्रसाद म्हणून दिले. ‘अजून तुम्हाला मी काय देऊ’, असे म्हटल्यावर मी त्यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी बळ आणि आशीर्वाद द्यावा’, अशी प्रार्थना केली. त्या वेळी त्यांनी त्यांचा उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवला. त्या वेळी ‘माझा देह म्हणजे सर्व साधकांचा देह आहे आणि सर्वांना राष्ट्र अन् धर्मकार्य करण्यासाठी चैतन्य मिळत आहे’, असे जाणवले. मन आनंदी होऊन मला होणारे शारीरिक त्रासही अल्प झाले. – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर, पंढरपूर