सनातन संस्था अध्यात्मशास्त्रानुसार देवतांची चित्रे बनवते. या लेखात सनातन-निर्मित ‘शिवाच्या सात्त्विक चित्राच्या’ निर्मितीमागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि तत्त्वे पाहूया.
१. चित्राचा उद्देश
देवतेचे चित्र किंवा मूर्ती हे जितके देवतेच्या मूळ रूपाशी जुळणारे असेल, तितके त्यात देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. असे चित्र किंवा मूर्ती यांमुळे उपासकाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होऊन त्याच्यात भक्तीभाव जागृत होण्यास साहाय्य होते. अशा रूपातून देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने वातावरणही सात्त्विक बनते. हाच उद्देश समोर ठेवून सनातन संस्थेच्या साधक-चित्रकारांनी ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणून सेवाभावातून शिवाचे चित्र साकारले आहे. (ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्र)
२. चित्राच्या निर्मितीमागील तत्त्वे
२ अ. अध्यात्मशास्त्रानुसार
सनातनअध्यात्मशास्त्रानुसार चित्र बनवते. याचे उदाहरण – शिवाच्या डोक्यावरचा चंद्र त्याच्या उजव्या अंगालाच दाखवला आहे. याचे कारण, उजवे अंग हे सूर्यनाडीचे म्हणजेच शक्तीचे अंग असते. शिवाच्या शक्तीचा भक्ताला त्रास होऊ नये, म्हणून शीतलतेचे प्रतीक असलेला चंद्र शिवाच्या उजव्या अंगाला असावा.
२ आ. स्पंदनशास्त्रानुसार
सनातन संस्थेचे साधक-चित्रकार संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सूक्ष्मस्पंदनशास्त्राचा अभ्यास करून चित्र साकार करतात. शिव अंगाला भस्म लावतो म्हणून शिवाचा रंग राखाडी घेण्याचे ठरवल्यावर राखाडी रंगाची नेमकी कोणती छटा घ्यायची, यांसारख्या गोष्टी ईश्वराला प्रश्न विचारून आणि सूक्ष्मातून प्रयोग करून (शिवाच्या स्पंदनांचा अभ्यास करून) ठरवल्या आहेत.
३. अनुभूती
हे चित्र शांतीची अनुभूती देते.
४. सनातन निर्मित ‘शिव’ या ग्रंथाचे ३ भाग प्रकाशित झाले आहेत.
या ग्रंथाच्या तीनही भागांच्या मुखपृष्ठ संकल्पनांमागील दृष्टीकोन
शिव भाग १
देवतेची सगुण आणि निर्गुण, अशी दोन रूपे असतात. ‘भाग १’ मधील ज्ञान हे पूर्णतः सगुण तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘भाग १’ च्या मुखपृष्ठावर शिवाचे प्रत्यक्ष सगुण रूप दर्शवले आहे. सगुण रूप हे व्यक्त असल्याने या रूपातील शिवाचा आकार हा अन्य भागांतील शिवाच्या आकाराच्या तुलनेत सर्वांत मोठा, म्हणजेच १०० टक्के दर्शवला आहे, तसेच रूपाची स्पष्टताही १०० टक्के दर्शवली आहे.
शिव भाग २
‘भाग २’ मधील ज्ञान हे सगुण आणि थोड्या प्रमाणात निर्गुण तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘भाग २’च्या मुखपृष्ठावर शिवाचा आकार ७० टक्के अन् स्पष्टता ५० टक्के दर्शवली आहे. ‘भाग २’चा रंग हा ‘भाग १’चा निळा रंग (सगुण तत्त्व) आणि ‘भाग ३’चा भस्मासारखा म्हणजेच राखाडी रंग (निर्गुण तत्त्व) यांच्यातील मधला (मिश्रित) रंग आहे. हा रंग सगुणातून निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास दर्शवतो.
शिव भाग ३
‘भाग ३’ मधील ज्ञान हे निर्गुण आणि अल्प प्रमाणात सगुण तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘भाग ३’च्या मुखपृष्ठावर शिवाचा आकार ५० टक्के अन् स्पष्टता ४० टक्के दर्शवली आहे. शिवाच्या पार्श्वभूमीचा रंग हा निर्गुण तत्त्वाशी साधर्म्य असलेल्या भस्मासारख दर्शवला आहे. निर्गुण तत्त्वाचे प्रमाण अधिक असल्याचे प्रतीक म्हणून शिवाची मूर्ती नेहमीसारखी न दर्शवता मूर्तीची केवळ बाह्यरेषा दाखवली आहे.