उल्हासनगर, १ नोव्हेंबर (वार्ता.) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली. अशाच प्रकारे पुढची घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करता येऊ शकते, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे यांनी येथे एका व्याख्यानात केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रिडर्स कोचिंग क्लासेसमध्ये ‘राष्ट्र आणि धर्म’ या विषयावर २८ ऑक्टोबर या दिवशी व्याख्यान घेण्यात आले. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना समितीच्या कार्याविषयी श्री. अतुल देव यांनी अवगत केले.
श्री. सूरज मिश्रा म्हणाले, ‘‘हिंदू भ्रमणभाषवर वेळ घालवतात. सामाजिक संकेतस्थळाद्वारे धर्मशिक्षण देऊन जागृती केली पाहिजे.’’ अधिवक्ता राहुल चतुर्वेदी म्हणाले, ‘‘हिंदूंची धर्माप्रती आस्था नसल्यानेच धर्मांतर होत आहे. यासाठी संघटनच हवे.’’ श्री. लक्ष्मण दुबे म्हणाले, ‘‘हिंदूंनी आपल्या मुलांवर सुसंस्कार करायला हवेत. धर्मपालन केल्यासच आदर्श पिढी निर्माण होऊ शकते.’’
स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. अनिलकुमार पांड्ये म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य प्रशंसनीय आहे. या कार्याला आपले समजून धर्मकार्यात सहभागी झाले पाहिजे.’’