सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली महर्षि
अध्यात्म विश्वविद्यालयाच्या गटाचा ‘दक्षिण-पूर्व आशियायी देशांचा अभ्यासदौरा’
‘महाभारतात ज्या भूभागाला ‘कंभोज देश’, असे संबोधले आहे, तो भूभाग म्हणजे आताचा कंबोडिया देश ! येथे १५ व्या शतकापर्यंत हिंदू रहात होते. ‘ख्रिस्ताब्द ८०२ ते १४२१ या कालावधीत तेथे ‘खमेर’ नावाचे हिंदु साम्राज्य होते’, असे सांगितले जाते. खरेतर कंभोज देश हा ‘नागलोक’ होता. ‘नागलोक’ असल्यामुळे हे ‘शिवक्षेत्र’ आहे. येथील महेंद्र पर्वतावर श्रीविष्णूचे वाहन गरुड असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे ‘विष्णुक्षेत्र’देखील आहे.
१. जयवर्मन राजाने (सातव्या) हिंदूंच्या मंदिराच्या मागे ‘जयगिरी’ नगरी स्थापणे
आणि तिच्या मध्यभागी बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे प्रतीक म्हणून ‘बॅयान मंदिर’ बांधणे
‘आम्ही २८ मार्च या दिवशी ‘अंकोर वाट’ मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या ‘अंकोर थाम’ या मंदिराच्या परिसरात गेलो होतो. ‘अंकोर थाम’ मंदिर जरी लहान असले, तरी त्याचा परिसर ‘अंकोर वाट’ मंदिरापेक्षा ९ पटींनी मोठा आहे. जयवर्मन राजाने (सातव्या) १२ व्या शतकाच्या शेवटी या मंदिराच्या निर्मितीचे कार्य चालू केले आणि १३ व्या शतकाच्या आरंभी जयवर्मन राजाने (आठव्या) ते पूर्ण केले. जयवर्मन राजाने (सातव्या) बौद्ध राजकुमारीशी विवाह केला होता. त्याने ‘अंकोर वाट’ या हिंदु मंदिराच्या मागे एक मोठी नगरी स्थापन करून त्यास ‘जयगिरी’, असे नाव दिले. जयगिरीनगरीच्या मध्यभागी राजाने बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे प्रतीक म्हणून एक मंदिर बांधले. त्यास ‘बॅयान मंदिर’ असे संबोधले जाते.
२. ‘बॅयान’चा अर्थ ‘बोधी’, असा असून मंदिरात बुद्धाचे ४९ चेहरे असणे
‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत. आमच्यासमवेत असलेल्या ‘गाईड’ने सांगितले की, पूर्वी बुद्धाच्या तोंडवळ्यामध्येे ३ प्रकारचे तोंडवळे होते. मंदिराला ५ शिखरे होती. त्या सर्वांनाही बुद्धाचे तोंडवळे होते. त्यामुळे ‘बुद्धाचे एकूण ५४ तोंडवळे होते’, असे सांगितले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी एकूण ५४ देवता आणि ५४ असुर एकाच वेळी मंथन करत. त्याचे प्रतीक म्हणूनही ‘येथे बुद्धाचे ५४ तोंडवळे असू शकतात’ किंवा ‘बुद्धाने (बोधीसत्त्वाने) ५४ अवतार घेतले’, असे म्हटले जाते. त्यामुळे त्याचेही ते प्रतीक असू शकतात.
३. मंदिर गोलाकारात असून मंदिराच्या वरच्या बाजूला बुद्धाचे
तोंडवळे असलेली मोठी दगडी शिल्पे चारही दिशांना बघत असल्याचे जाणवणे
सध्या हे मंदिर भग्नावस्थेत, तसेच पडलेल्या स्थितीत असल्याने ते आहे त्या दगडांनी परत बांधण्यात आले आहे. ‘मंदिराच्या आत दक्षिण-पूर्व (आग्नेय) बाजूला दक्षिण ग्रंथालय आणि पूर्वोत्तर बाजूला उत्तर ग्रंथालय होते’, असे आमच्या ‘गाईड’ने आम्हाला सांगितले. मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात काही शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या आत गेल्यावर मुख्य गर्भगृहाकडे जाण्यासाठी काही पायर्या चढाव्या लागतात. त्या ठिकाणी एक शिव मंदिर आहे. संपूर्ण मंदिर गोलाकारात आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला ‘बुद्धाचे तोंडवळे असलेली मोठी दगडी शिल्पे चारही दिशांना बघत आहेत’, असे जाणवते. (छायाचित्र पहा.) काही इतिहासतज्ञांचे म्हणणे आहे की, ‘बॅयान मंदिरा’चे वास्तूशिल्प ‘श्रीयंत्रा’वर आधारित असू शकते.