रामनामाचा १३ कोटी जप करणारे पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतली सदिच्छा भेट !

नगर – रामनामाचा १३ कोटी जप करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त बेळगाव (कर्नाटक) निवासी पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नगर येथे १९ मे या दिवशी सदिच्छा भेट घेतली.

डावीकडे पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांना नमस्कार करतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
डावीकडे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. अरुण शिवकामत, डॉ. चिंतामणि कुलकर्णी आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत

नगर येथील प्रसिद्ध आधुनिक वैद्य आणि ‘ब्रह्मचैतन्य रुग्णालया’चे संस्थापक डॉ. चिंतामणि कुलकर्णी यांनी अधिक मासानिमित्त ‘नाममहिमा’ या विषयावर प्रवचन घेण्यासाठी पू. अरुण शिवकामत यांना नगरला निमंत्रित केले होते. या वेळी पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत हे दोघे डॉ. चिंतामणि कुलकर्णी यांच्या निवासस्थानी असतांना तेथे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी डॉ. चिंतामणि कुलकर्णी, त्यांच्या धर्मपत्नी डॉ. (सौ.) गौरी कुलकर्णी, नगर येथील सनातनचे साधक श्री. कृष्णा केंगे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. अरुंधती केंगे हे उपस्थित होते. या वेळी श्री. कृष्णा केंगे यांनी पू. अरुण शिवकामत यांचा, तर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांचा सन्मान केला. या वेळी पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांनी सनातनच्या कार्याला भरभरून आशीर्वाद दिले, तसेच ‘आम्ही लवकरच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊ’, असेही सांगितले.

 

पू. अरुण शिवकामत यांनी केलेल्या मार्गदर्शनातील काही अमूल्य ज्ञानमोती

१. रामनामाची शक्ती फार मोठी असून ती वज्रासारखी आहे !

वर्ष १९९७ मध्ये मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याविषयी प्रचंड ओढ निर्माण झाली. मला त्यांचे वेडच लागले होते. त्यांच्या प्रतिमेकडे बघून मी ‘महाराज तुम्ही मला दर्शन द्या’, असे सातत्याने म्हणत असे. एका दिवसाला ४०० माळा रामनामाचा जप करत असे. रामनामाची शक्ती फार मोठी असून ती वज्रासारखी आहे. मी माझ्या जीवनात हे प्रत्यक्ष अनुभवले आहे. ‘नाम घे’, असे समोरच्या व्यक्तीला सांगायचा अधिकार आपल्याला तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा आपण नाम घेतो. १०० माळा नाम घेतले, तर समोरच्या व्यक्तीला आपण १ वेळा नाम घ्यायला सांगू शकतो. नाम घेतांना ‘मी कुणी नाही. माझे गुरु माझ्याकडून नामस्मरण करवून घेत आहेत’, असा भाव हवा. ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे नामावतारच होते.’

२. परमार्थाने प्रारब्धावर मात करता येते

परमार्थामध्ये प्रयत्न आणि तळमळ यांना फार महत्त्व आहे. ९० टक्के भक्तांना काहीतरी हवे असते; म्हणून ते भगवंताकडे येतात. प्रारब्धात परमार्थ नसतो; परंतु स्वत:च्या क्रियमाणाने परमार्थ करावा लागतो. त्यासाठी जीवनात संघर्ष करून निश्‍चयाने आध्यात्मिक प्रगतीकडे प्रवास करावा लागतो, तरच परमार्थाने प्रारब्धावर मात करता येते.

३. भावपूर्ण नामजप केल्यास आध्यात्मिक उन्नती होते

भाव ठेवून नामजप केला, तर आध्यात्मिक उन्नती होते. भावपूर्ण घेतलेले नाम, हे परावाणीतील असते. शिष्याने ‘माझे नामस्मरण होत नाही’, असे म्हणणे म्हणजे स्वतःच्या सद्गुरूंना दूषणे दिल्यासारखे आहे.

४. स्वतःच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरल्यावर त्यानुसार वाटचाल केली पाहिजे !

वर्ष १९९७ मध्ये मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याकडे आलो आणि नामसाधना प्रारंभ केली. गेली २० वर्षे मी ‘टी.व्ही.’ पाहिलेला नाही किंवा बातमीपत्रही वाचत नाही. नामसाधनेसाठी मी स्वत:ला जी बंधने घातली, त्याचा मला लाभ झाला, हे लक्षात आले. एकदा स्वतःच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले की, आपण त्या मार्गावरच वाटचाल केली पाहिजे. माझ्या मनात सतत ‘मला महाराज पाहिजेत’, हे एकच ध्येय होते. नाम घेतल्याने आपली सर्व काळजी भगवंतच घेत असतो.

५. ‘नामाचा महिमा’, या विषयावर प्रवचने

जेव्हा माझा ३ कोटी रामनामाचा जप झाला, तेव्हा मला कुठेही रस्त्यावरून जातांना एखाद्या दगडावर उभे राहून सर्वांना ‘ऐका हो ऐका, नामाचा महिमा ऐका’, असे सांगावेसे वाटत होते. तेव्हापासून महाराजांनी माझ्याकडून ‘नामाचा महिमा’, या विषयावर प्रवचने करवून घेतली. आतापर्यंत माझी १०८ प्रवचने झाली आहेत.

६. महाराजांचे एकेक वचन म्हणजे साधकांसाठी चैतन्यमय वाणीच !

महाराज म्हणत, ‘‘तुम्ही मला मनापासून घट्ट धरा (मनापासून नामस्मरण करा); मग माझे मन तुमच्या मनाची जागा घेईल.’’ महाराजांचे असे एकेक वचन म्हणजे साधकांसाठी चैतन्यमय वाणीच आहे.

 

हिंदुत्वनिष्ठांनी श्रीरामाचा नामजप केल्याविना राममंदिराची स्थापना होणार नाही !

मध्यंतरी एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेने अनेक ठिकाणी ‘कोटी रामनाम जपयज्ञ’ आयोजित केले होते. एके ठिकाणी गेल्यावर मी त्याचे आयोजक आणि त्यांचे कार्यकर्ते यांना विचारले, ‘‘तुम्ही किती नामजप केला ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अहो, आम्हाला नाम घ्यायला वेळ तरी कुठे आहे ?’’ यावरून एक लक्षात आले की, जोपर्यंत राममंदिरासाठी झटणारे कार्यकर्ते श्रीरामाचा नामजप करत नाहीत, तोपर्यंत राममंदिराची स्थापना होणार नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते आणि प्रवचनकार यांनी स्वत: नाम घेणे आवश्यक आहे.

पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत यांचा अल्प परिचय

मूळचे कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील रहिवासी असलेले पू. अरुण शिवकामत आणि पू. (सौ.) मंगला अरुण शिवकामत हे दोघेही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत. पू. अरुण शिवकामत यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह घेतला आणि त्यांनी नामात स्वत:ला रममाण केले. महाराजांच्या प्रेरणेने त्या दोघांनी १३ कोटी रामनामाचा जप करण्याचा संकल्प केला आणि त्यांनी तो ११ वर्षे आणि ११ मासांमध्ये पूर्ण केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment