बाळेकुंद्री (बेळगाव) येथील सत्पुरुष श्रीपंत महाराज यांचे अवतारकार्य !

 

१. जन्म आणि बालपण

रामचंद्रपंत आणि गोदूबाई (सीताबाई) या सत्त्वशील दांपत्याच्या पोटी शके १७७७ मध्ये (वर्ष १८५५ मध्ये) श्रीपंत महाराज यांचा जन्म झाला. त्यांनी आपला प्राथमिक विद्याभ्यास आपल्या आजोळीच केला. त्यानंतर बेळगाव येथे इंग्रजी शिक्षण पूर्ण केल्यावर तेथील एका इंग्रजी शाळेत ते शिक्षक म्हणून काम करू लागले.

 

२. अध्यात्माची आवड

आरंभीपासूनच त्यांचे लक्ष नीतीमत्ता, नियमितपणा आणि सद्वर्तन यांकडे असे. पंतांच्या पितृकुलांतील सर्वच माणसे सत्यप्रतिज्ञ, ईश्‍वरनिष्ठ आणि अढळ अशा सात्त्विक धैर्याची होती. या सर्वांची दत्तावर अत्यंत निष्ठा असे. दड्डी या आजोळच्या गावाचे निसर्गसौंदर्य अनुपम असल्यामुळे श्रीपंतांना एकांतवासाची आवड लहानपणापासूनच लागली. पारमार्थिक विषयांचे चिंतन आणि तत्त्वविवेचनाची आवड यांमुळे त्यांची मानसिक भूमिका फारच उंच झाली.

 

३. अनुग्रह आणि केलेले धर्मकार्य !

बाळेकुंद्रीजवळ कडींगुद्दीच्या डोंगरात वास्तव्यास राहिलेल्या एका महायोग्याने वर्ष १८७५ मध्ये श्रीपंतांना अनुग्रह केला. त्यानंतर पंतांनी काही दिवस योगाचा अभ्यास केला. श्रीपंत महाराजांना मराठी, कन्नड, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा चांगल्याच अवगत होत्या. आध्यात्मिक ग्रंथांच्या परिशीलनात आणि वेदांतचर्चा करण्यात त्यांचा बराचसा काळ जाऊ लागल्यावर शेकडो शास्त्री पंडित त्यांच्याभोवती जमू लागले. त्यांचा शिष्यसमुदाय बर्‍याच मोठ्या प्रमाणावर जमला.

पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ आणि निःस्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने आणि सौजन्याने संसार आनंदमय बनवून आपले अवतारकार्य वयाच्या ५१ व्या वर्षी, म्हणजेच आश्‍विन कृष्ण पक्ष तृतीया, शके १८२७ या दिवशी संपवले. बेळगाव येथे देहत्याग केल्यावर त्यांच्या सहस्रो शिष्यांनी मोठ्या समारंभाने त्यांचा देह बाळेकुंद्री येथे नेला आणि त्यांच्या आंबराईत त्याला अग्निनारायणाच्या स्वाधीन करून त्या ठिकाणी एक औदुंबर वृक्ष लावला. या ठिकाणी त्यांच्या भक्तांकडून प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर त्यांचा उत्सव होत असतो.

संदर्भ : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’ (लेखक : प्रल्हाद नरहर जोशी)

श्रीपंत जेव्हा भजनाला बसत, तेव्हा ते उत्स्फूर्तपणे पदे म्हणत. भक्तांनी टिपून घेतलेली श्रीपंतांची २७३० मराठी आणि २७ कन्नड पदे संकलित केली आहेत. ही पदे पंतांच्या आत्मानुभवातून आणि गुरुभक्तीतून निघालेली उत्स्फूर्त गीते आहेत. श्रीपंतरचित पदे ‘श्रीदत्तप्रेमलहरी – भजन गाथा’ या ग्रंथात संकलित करण्यात आली आहेत.

शके १८२७ च्या आश्‍विन कृष्ण पक्ष तृतीयेला (१६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी) बेळगावजवळ असलेल्या बाळेकुंद्रीचे प्रसिद्ध सत्पुरुष श्रीपंत महाराज यांनी समाधी घेतली.

१. थोर संत श्रीपंत महाराजांच्या पादुका ! महाराजांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या पादुकांना भावपूर्ण नमस्कार करूया.
२. बाळेकुंद्री येथील या शिलेवर बसून महाराज साधना करत. त्यांच्या तपोसामर्थ्याने जागृत झालेल्या या परिसरात दैवी अनुभूती येते.
३. वर्ष १९०५ मध्ये श्रीपंत महाराजांचे पार्थिव ज्या अग्निनारायणाच्या स्वाधीन केले, तो अग्नी येथे अव्याहत चालू आहे. बाळेकुंद्री येथील ती ‘अवधून धुनी’ !;
४. बाळेकुंद्री येथील श्रीपंत महाराजांची दिव्य समाधी !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment