महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत. असे असले, तरी श्रीलंकेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत. ‘या सर्व स्थानांची माहिती मिळावी आणि जगभरातील सर्व हिंदूंना ती सांगता यावी’, यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधकांनी १ मास (महिना) श्रीलंकेचा दौरा केला.
जगभरात १४ कोटी तमिळ भाषिक आहेत. बहुतेक तमिळ भाषिकांची कुलदेवता कार्तिकेय स्वामी आहे. कार्तिकेय स्वामींची तमिळनाडूतील ६ स्थाने प्रसिद्ध आहेत. यानंतर भारताच्या बाहेर कार्तिकेय स्वामींचे सर्वांत प्रसिद्ध आणि जागृत मंदिर म्हणजे श्रीलंकेतील ‘कदरगामा’ हे आहे. ‘कदरगामा’ हे बौद्ध नाव आहे. बौद्ध या ठिकाणी येण्याआधी या पौराणिक स्थळाचे नाव होते ‘कदिर ग्राम’. ‘कदिर’ हे कार्तिकेयांचे एक नाव आहे. हे गाव युगानुयुगे कार्तिकस्वामींचे मानले गेले आहे.
१. रामायणात राम-रावण युद्धाच्या वेळी प्रभु श्रीरामाच्या साहाय्यासाठी
इंद्रदेवाच्या आज्ञेने ज्या ठिकाणी कार्तिकेय स्वामी प्रकट झाले, ते स्थान म्हणजे श्रीलंकेतील ‘कदरगामा’!
त्रेतायुगात श्रीराम-रावण युद्ध जेव्हा शेवटच्या टप्प्यात येते, तेव्हा इंद्रदेव कार्तिकेयांना आवाहन करतो, ‘‘आता युद्ध अंतिम टप्प्यात आलेले आहे. प्रभु श्रीरामाला युद्ध पूर्ण करण्यासाठी तुमचे साहाय्य लागणार आहे. श्रीराम दुर्गादेवीची पूजा करील, तोपर्यंत तुम्ही सेनेचे अधिपत्य करा.’’ श्रीराम पूजेला बसल्यावर साक्षात कार्तिकेय युद्धाची धुरा सांभाळत असत. कार्तिकेय पृथ्वीवर प्रकट झाले, ते स्थान आहे श्रीलंकेतील ‘कदरगामा’.
२. रावणाच्या १८ विमानतळांपैकी एक विमानतळ ‘कदरगामा’ येथे असणे आणि
युद्धानंतर अयोध्येला परत जाण्यासाठी प्रभु श्रीरामाने पुष्पक विमानातून येथूनच प्रयाण केलेले असणे
‘कदरगामा’चे दुसरे वैशिष्ट्य, म्हणजे रावणाच्या १८ विमानतळांपैकी एक विमानतळ येथे होते. याच विमानतळावर रावणाचे पुष्पक विमान होते. रावणाचे ते आवडते विमान होते. रावणाचा वध झाल्यावर आणि लंकेतील युद्धानंतरचे कार्य पूर्ण झाल्यावर प्रभु श्रीरामाने याच पुष्पक विमानातून सीता, लक्ष्मण, हनुमंत आणि सर्व यांना घेऊन जेथून प्रयाण (उड्डाण) केले, ते स्थान म्हणजे ‘कदरगामा’ होय.
३. त्रेतायुगापासून ‘कदरगामा’ येथील कार्तिकेयांचे स्थान सध्या बौद्धांच्या प्रभावाखाली असणे
‘कदरगामा’ हे त्रेतायुगातील स्थान असून याला लाखो वर्षांचा इतिहास आहे. सध्याच्या कलियुगात ‘कदरगामा’ हे बौद्ध आणि श्रीलंकेतील बौद्ध सरकार यांच्या प्रभावाखाली आले आहे. जेव्हा आम्ही ‘कदरगामा’ या स्थानाच्या इतिहासाविषयी येथील बौद्ध भिक्कूंना माहिती विचारली, तेव्हा त्यांना त्याविषयी काहीही ठाऊक नसल्याचे लक्षात आले. येथे असलेली गणपति, देवी आणि कार्तिकेय यांंची मंदिरे सहस्रो वर्षांपासून आहे. मंदिराच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूला जे मंदिर बांधलेले आहे, ते कार्तिकेयांचे स्थान आहे.
४. ‘बुद्ध’ ही मुख्य देवता असून अन्य सर्व देवता बुद्धाचे कार्य करणार्या गौण देवता आहेत’, असे मानले जाणे
गेल्या शेकडो वर्षांमध्ये येथील लोकांची अशी मानसिकता सिद्ध झाली आहे की, बौद्ध धर्मात ‘बुद्ध’ हा सर्वांत श्रेष्ठ देव आहे आणि ‘कार्तिकेय’ हा बुद्धाचे कार्य करणार्या अनेक देवदूतांमधील एक देवदूत आहेत. त्याला ते ‘स्कंद’ म्हणतात. बौद्ध गणपतीलाही देवता मानतात. ‘बुद्ध’ ही मुख्य देवता असून त्यांचे कार्य करणार्या अन्य सर्व गौण देवता आहेत’, असे मानले जाते. त्यांच्या दृष्टीने कार्तिकेय ‘वॉरिअर गॉड’ म्हणजे ‘युद्धाला जाणारा देव’ आहे.
५. बौद्धांनी हिंदूंच्या स्थानांवर आक्रमणे करून ती कह्यात घेणे, नंतर
तेथेच स्तूप अन् बुद्धाच्या मूर्ती उभारून ती स्थाने बौद्धांचीच असल्याचे
सांगणे आणि तेथील बौद्ध भाविक अन् भिक्कू यांनाही तेेथील इतिहास ठाऊक नसणे
श्रीलंकेतील सरकार हे बौद्ध सरकार आहे. बौद्धांनी या मंदिरावर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण करून ‘हे बौद्धांचे स्थान आहे’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘भारतातील हिंदूंची स्थाने स्वतःची आहेत’, असे मुसलमान सांगतात, तसाच प्रकार श्रीलंकेत घडतांना दिसतो. येथे त्यांनी त्यांचा स्तूप बांधला आहे. ते म्हणतात, ‘बुद्ध येथे आले होते. शेवटच्या वेळी बुद्ध कदरगामाला आले होते. तेथे त्यांनी स्तूप बांधला आहे.’ मुरुगन (कार्तिकेय) मंदिराच्या परिसरातच बौद्ध लोकांनी निरनिराळे स्तूप, बुद्धाच्या मूर्ती आणि एक संग्रहालय उभे केले आहे. जिथे हिंदूंची शिल्पकला होती, ती पाडून तिथे त्यांची शिल्पकला उभी केली आहे. हे आपला धर्म आणि धार्मिक क्षेत्र यांवर झालेले एक प्रकारचे आक्रमणच आहे. सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही येथे येणार्या बौद्ध भाविकांना आणि बौद्ध भिक्कूंनाही विचारले, ‘‘येथील इतिहास काय आहे ?’’ तेव्हा कुणीही आम्हाला स्पष्ट उत्तर देऊ शकले नाही. खरे सांगायचे, तर त्यांना उत्तरच ठाऊक नव्हते.
६. श्रीलंकेतील बहुतेक सर्व मंदिरांत मूर्तीसमोरच पडदा लावलेला असणे, तेथे बौद्ध लोकांनी
हिंदूंना मूर्तीदर्शन अन् पूजा बंद केलेली असणे आणि दुर्दैवाने तेथील हिंदूंना त्याविषयी काहीही न वाटणे
श्रीलंकेत हिंदुबहुल उत्तर श्रीलंका सोडली, तर इतर सर्व ठिकाणी हिंदूंच्या कोणत्याही देवळात मूर्तीसमोर एक पडदा असतो. मूर्तीचे दर्शन होत नाही. बौद्धांनी मूर्तीपूजा आणि मूर्तीदर्शन बंद केले आहे. या ठिकाणांच्या सर्व मंदिरांतील पुजारी बौद्ध आहेत. ते पांढरे कपडे परिधान करतात आणि पडद्याच्या मागे गर्भगृहाच्या आत जाऊन बौद्ध सूत्र म्हणतात. या वेळी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी तेथील पुजार्याला विचारले, ‘‘परंपरेने गर्भगृहात आतमध्ये काय आहे ?’’ त्यावर तो पुजारी म्हणाला, ‘‘परंपरेने हे असेच आहे. पहिल्यापासून असाच पडदा लावलेला आहे. पडद्याबाहेरूनच त्या देवाचे दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे.’’ येथील हिंदूंनाही आम्ही याविषयी विचारले. तेव्हा ‘येथे अशीच पद्धत आहे’, असे उत्तर मिळाले. ‘तेथील हिंदूंनाही ‘आपल्या देवतेचे आपल्याला दर्शन व्हावे’, असे वाटत नाही’, ही खरीच दुर्भाग्याची गोष्ट आहे !
७. कदरगामाच्या परिसरात पत्तिनीदेवी आणि क्षेत्रपालदेवता
मदुरईवीरन् यांचे मंदिर असणे आणि त्या मंदिराचे पुजारीही बौद्धच असणे
कदरगामा येथील कार्तिकेय मंदिराच्या मागे दोन मंदिरे आहेत – एक पत्तिनीदेवीचे मंदिर आणि दुसरे मदुरईवीरन् मंदिर. ‘ज्यांना मूल-बाळ होत नाही, त्यांना पत्तिनीदेवी मूल-बाळ देते’, असे येथील स्थानिक बौद्ध लोकांचे मानणे आहे. मदुरईवीरन् ही कदरगामा गावाची क्षेत्रपालदेवता असून ती गावाचे रक्षण करते. ‘कार्तिकेयांचा सेनापती मदुरईवीरन् आहे’, असे येथील स्थानिक लोक मानतात. पत्तिनीदेवी आणि मदुरईवीरन् या मंदिरांचे पुजारीही बौद्ध आहेत. त्यांनाही ही मंदिरे आणि तेथील इतिहास यांविषयी काही ठाऊक नाही.’
– श्री. विनायक शानभाग, श्रीलंका (१२.१.२०१८)
‘कार्तिकेय स्वामींची पूजा केली नाही, तर श्रीलंकेवर संकट येईल’, अशी तेथील बौद्ध लोकांची श्रद्धा असणे
‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ कदरगामाच्या कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्याच वेळी श्रीलंकेचे पंतप्रधान श्री. रनिल विक्रमसिंघे मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेथील काही लोकांनी सांगितले, ‘‘श्रीलंकेतील सर्व बौद्ध राजकारण्यांची कदरगामाच्या कार्तिकस्वामींवर श्रद्धा आहे. ‘पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी कदरगामाच्या कार्तिकेय स्वामींच्या मंदिरात पूजा केली नाही, तर श्रीलंकेवर संकट येईल’, असे आम्हाला वाटते.’’ त्यामुळे या मंदिराला राष्ट्रीय मंदिराचा दर्जा आणि येथील उत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘वर्ष १९४७ पासून श्रीलंकेतील लोकांची आणि त्या आधीही ब्रिटिशांचीही अशीच धारणा होती’, असे म्हटले जाते.’ – श्री. विनायक शानभाग, श्रीलंका (१२.१.२०१८)