महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली
गाडगीळ आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य
‘प्रवासवर्णनांचे अनेक लेख आणि ग्रंथ आहेत. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या प्रवासवर्णनांचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यांत स्थुलातील, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या स्तरावरील लिखाणासह आवश्यक तेथे त्यांच्या पलीकडील सूक्ष्मातील, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरील परीक्षणे आहेत आणि चैतन्यही आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘श्रीलंकेतील मध्य प्रांतामध्ये उंचच्या उंच पर्वतांच्या ठिकाणी असलेल्या ‘नुवारा एलिया’ या शहरापासून ५१ कि.मी. अंतरावर ‘एल्ला’ हे लहान शहर आहे. या शहराला ‘रावण एल्ला’ असेही म्हणतात. या ठिकाणी रावणाशी संबंधित काही स्थाने आढळतात.
१. ‘रावणा फॉल्स्’
एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक ‘रावणा फॉल्स’ असे म्हणतात. (छायाचित्र क्रमांक १ पहा.) थोड्या दूरवर असलेल्या मोठ्या गुहेला ‘रावणाची गुहा’ असे म्हटले जाते. दोन्ही धबधबे आणि गुहा पर्वत-प्रदेशात आहेत.
रावण गुहेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी दगडावर उमटलेला राक्षसाचा मोठा तोंडवळा, तसेच गुहेच्या आत अनेक दगडांवर उमटलेले भयानक तोंडवळे
२. रावणाने मायावी शक्तीने वेगवेगळी शहरे वसवणे
आणि या शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरातून भुयारांद्वारे मार्ग निर्माण करणे
रावण अनेक विद्यांमध्ये पारंगत होता. तो बलाढ्य असुर असल्याने त्याच्याकडे मायावी शक्ती होती. रावणाने मायावी शक्तीच्या आधारे लंकेतील प्रजेवर राज्य केले. त्याने मायावी शक्तीने प्रजेसाठी वेगवेगळी शहरे वसवली होती. या शहरांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगरातून भुयारांद्वारे मार्ग केले होते. ही भुयारे एका वेळी ४ बैलगाड्या जाऊ शकतील एवढी रूंद होती. एका भुयारात प्रवेश केला की, आत अनेक फाटे फुटलेले असून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग आहेत. शत्रूने युद्ध केल्यावर लपण्यासाठीही या भुयारांचा वापर करण्यात येत होता.
३. रावणाची गुहा
३ अ. गुहेच्या आत २०० मीटर अंतरानंतर जाण्यास मनाई असणे आणि
गुहेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी दगडावर राक्षसाचा मोठा तोंडवळा उमटलेला असणे
गुहेपर्यंत जाण्यासाठी ७०० पायर्या चढाव्या लागतात. (छायाचित्र क्रमांक २ पहा.)
या पायर्या चढून गेल्यावर आपण गुहेच्या प्रवेशाद्वाराकडे पोहोचतो. गुहेच्या प्रवेशद्वाराची उंची ३ मजली इमारतीएवढी आहे. प्रवेशद्वाराच्या समोर पोहोचल्यावर ‘आत मोठे भुयार असेल’, असे वाटत नव्हते. (छायाचित्र क्रमांक ३ पहा.)
रावणाने बांधलेल्या या गुहेच्या आत आपण २०० मीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यापुढे जायला मनाई आहे. तेथे सरकारने दगड लावून प्रवेश अडवला आहे. आता ‘गुहेत वटवाघळे, हिंस्त्र प्राणी आणि विषारी साप असतात’, असे आम्हाला स्थानिक लोकांनी सांगितले. गुहेच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी दगडावर राक्षसाचा मोठा तोंडवळा उमटला आहे. गुहेच्या आत अनेक दगडांवर भयानक तोंडवळे आणि आपल्याकडे बघणारे डोळे उमटलेले दिसतात. (छायाचित्र क्रमांक ४ आणि ५ पहा.)
३ आ. गुहेच्या आत गेल्यावर जाणवलेली सूत्रे
१. गुहेच्या आत गेल्यावर प्रचंड दाब जाणवतो, मळमळल्यासारखे होते आणि डोके दुखायला लागते. आम्ही सर्व जण गुहेत असेपर्यंत ‘प्रभु श्रीरामचंद्र की जय’ असा जयघोष करत होतो. आम्ही जयघोष करतांना आमच्या अंगावर शहारे येत होते.
२. अनेक स्थानिक लोकही तेथे जायला घाबरतात. आम्हाला श्रीरामाच्या कृपेने एक चांगला गाईड (मार्गदर्शक) मिळाला. त्यामुळे आम्हाला गुहेत प्रवेश करणे सोपे झाले. तो म्हणाला, ‘‘येथे येणार्या व्यक्ती १० मिनिटेही थांबत नाहीत. काही जण प्रवेशद्वारातूूनच परत जातात.’’
३. त्रेतायुगात रावणाचे राज्य होते, म्हणजे या गोष्टीला आता लक्षावधी वर्षे उलटून गेली, तरी रावणाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीत तशीच स्पंदने जाणवतात. गुहेत गेल्यावर ‘गुरुकृपेचे कवच आपले सतत रक्षण करत असते’, याची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली. आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता वाटली.’
– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.