व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणार्यांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होतात. घरामध्ये अस्वस्थ वाटणे, नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढणे, लहानसहान कारणांवरूनही घरात वादविवाद होणे, आर्थिक हानी होणे, सतत कुणीतरी आजारी असणे यांसारख्या विविध समस्या या अशाच त्रासाची लक्षणे आहेत. वास्तूला दृष्ट लागूच नये, यासाठी प्रारंभापासूनच प्रयत्न करणे, केव्हाही अधिक श्रेयस्कर ठरते. व्यक्तीपेक्षा वास्तूला लवकर दृष्ट का लागते, त्या संदर्भातील प्रक्रिया आणि वास्तूतील त्रासाच्या संदर्भात त्या वास्तूमध्ये रहाणार्या व्यक्तींच्या साधनेचे महत्त्व ही माहिती या लेखात देत आहोत.
१. एखाद्या व्यक्तीपेक्षा एखादी वास्तू त्रासदायक स्पंदनांनी लवकर बाधित होण्याची कारणे
अ. पवित्र वास्तूला बाधित करणे अवघड असणे
पवित्र वास्तू
‘पवित्र वास्तूला (उदा. देवळाला) त्रासदायक स्पंदनांनी बाधित करणे अवघड असते; कारण तेथे चैतन्याचा वास असतो, तसेच तेथे सात्त्विक लहरींचे कार्यकारी भ्रमण चालू झाल्याने अशा वास्तूत वाईट शक्तींना शिरकाव करणे कठीण असते.
आ. त्रासदायक (वाईट) कर्म करणार्या व्यक्ती रहाणार्या वास्तूला बाधित करणे सोपे असणे
ज्या वास्तूत त्रासदायक कर्म करणार्या व्यक्ती रहात असतात, त्या ठिकाणी सतत त्यांच्या दूषित विचारांतील तमोगुणी स्पंदने घनीभूत होऊन वास्तू त्रासदायक स्पंदनांनी भारित होते. असे सतत काही वर्षे होत राहिल्यास वास्तू पूर्णतः बाधित बनते. लक्षात घ्या, तमोगुणी विचारांच्या व्यक्ती रहाणार्या वास्तूच्या तुलनेत सत्त्वगुणी विचारांच्या व्यक्ती रहाणार्या वास्तूला बाधित करणे कठीण असते.
(वास्तूत रहाणार्या व्यक्तींची विचारसरणी, गुण-दोष आणि त्यांची साधना या गोष्टी त्या वास्तूत निर्माण होणार्या बर्या-वाईट स्पंदनांना कारणीभूत असतात. त्यामुळे व्यक्तीने योग्य मार्गाने आध्यात्मिक साधना करणे, हा जीवनातील प्रत्येक समस्येवरील सर्वांत महत्त्वाचा उपाय आहे. – संकलक)
इ. वास्तू निर्जीव असल्याने तिच्यात वाईट शक्तींविरुद्ध लढण्याची क्षमता नसणे
वास्तू निर्जीव असल्याने आणि ती साधना करून स्वतःची वाईट शक्तींविरुद्ध लढण्याची क्षमता वाढवू शकत नाही. तसेच स्वतःही भावाच्या स्तरावर लढू शकत नाही. त्यामुळे तिला बाधित करणे, एखाद्या व्यक्तीपेक्षा सोपे असते; परंतु व्यक्ती तमोगुणी असेल, तर मात्र तिलाही बाधित करणे सत्त्वगुणी व्यक्तीपेक्षा सोपे असते. (वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी व्यक्तीची योग्य मार्गाने आध्यात्मिक साधना चालू असणेच, आवश्यक आहे, हेच यावरून स्पष्ट होते. – संकलक)
२. वास्तूला दृष्ट लागण्याची प्रक्रिया आणि परिणाम
अ. वास्तू स्वतः निर्जीव असल्याने आणि ती साधना करत नसल्याने तिला तिच्यातील दूषित स्पंदने घालवणे अवघड असते; म्हणून वास्तूवर दूषित दृष्टदर्शक वाईट स्पंदनांचा प्रभाव पडू लागला की, ती स्पंदने कालांतराने त्याच वास्तूत घनीभूत होऊ लागतात.
आ. वास्तूचे जीवनमान मनुष्याच्या आयुष्यकालापेक्षा अधिक असते. त्यामुळे दूषित वास्तू अधिक काळ त्रासदायक स्पंदनांच्या माध्यमातून कार्य करू शकते.
३. दूषित वास्तूचा व्यक्तीवर होणारा परिणाम
अ. व्यक्तीत वाईट शक्तीचा शिरकाव होण्याची शक्यता असणे
वास्तूत घनीभूत झालेली दूषित स्पंदने कालांतराने तिच्यातील मर्यादित वायूमंडलालाच तिचे कार्यकारी क्षेत्र बनवू शकतात. परिणामी वर्षानुवर्षे तेथे रहाणार्या व्यक्तींवर या दूषित स्पंदनांचा प्रभाव पडून त्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास होण्याचीही शक्यता असते; म्हणून त्रासदायक वास्तू सोडणे हे व्यक्तीच्या ऐहिक तसेच पारमार्थिक उन्नतीसाठी पोषक ठरते.
आ. व्यक्तीची साधना व्यय (खर्च) होणे
साधना करणार्या व्यक्तीची साधना वास्तूतील त्रासदायक स्पंदने न्यून (कमी) करण्यात व्यय (खर्च) होते.
इ. वास्तू वाईट शक्तींचे निवासस्थान बनल्याने तेथे रहाणार्या व्यक्तीला व्यापक स्तरावर त्रास होऊ शकणे
दूषित वास्तू कालांतराने वाईट शक्तींचे निवासस्थान बनल्याने तेथे रहाणार्या व्यक्तींना शारीरिक, मानसिक, तसेच आध्यात्मिक अशा सर्वच स्तरांवर त्रास होण्याची, म्हणजेच व्यापक स्तरावर त्रास होण्याची दाट शक्यता असते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ शु. १४, कलियुग वर्ष ५१११, ६.७.२००९, रात्री ८.४३)