आजही भारतातील (विशेषतः महाराष्ट्रातील) अनेक घरांत, खेडेगावांत उतारा देण्याची पद्धत आहे. तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी या पद्धतीची खिल्ली उडवत असले, तरी याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान उपलब्ध झाले आहे. यामागील शास्त्र जाणून घेतल्यास भूताखेतांसारख्या अदृश्य शक्तींवर संशोधन करणार्या पाश्चात्त्यांपेक्षा अध्यात्मशास्त्र हे किती प्रगत आहे, याचा आपल्याला अत्यंत अभिमान वाटेल. या लेखात आपण उतारा देण्यामागील नेमके शास्त्र, त्याची उपयुक्तता आणि तो देण्याची आवश्यकता यांविषयी जाणून घेऊया !
उतारा देणे
१. उतारा देण्यामागील शास्त्र काय ?
‘इहलोकी जीवन जगत असतांना बहुतांश व्यक्ती विविध व्यावहारिक इच्छा आणि वासना यांमध्ये अडकलेल्या असू शकतात, तसेच त्या साधनाही करत नसतात. मृत्यूनंतर अशा व्यक्तींच्या इच्छा आणि वासना अतृप्त रहू शकतात. अशा व्यक्तींच्या अतृप्त आत्म्यांभोवती (लिंगदेहांभोवती) इच्छारूपी आणि वासनारूपी रज-तमात्मक आवरण निर्माण झाल्यामुळे, तसेच साधनेचे पाठबळ नसल्यामुळे अशा लिंगदेहांवर वाईट शक्ती सहज नियंत्रण मिळवू शकतात. या अदृश्य शक्ती आपल्या इच्छा आणि वासना यांची पूर्ती करण्यासाठी शक्यतो त्यांच्या घराण्यातील कुटुंबियांना विविध प्रकारे त्रास देऊ शकतात. ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आपल्या इच्छा आणि वासना यांची पूर्ती होईल, अशाच व्यक्तीला वाईट शक्ती पछाडू शकतात. म्हणजेच एखाद्या अतृप्त लिंगदेहाला वासनांची पूर्ती करायची असेल, तर तो ज्या व्यक्तीमध्ये वासनांचे प्रमाण अधिक असते, अशा व्यक्तीला पछाडू शकतो.
२. उतारा देण्यास केव्हा सांगितले जाते ?
घराण्यातील अतृप्त पूर्वज आत्म्यांची अन्नवासनेच्या माध्यमातून त्रास देण्याची प्रवृत्ती असेल, तर अन्नपदार्थजन्य उतारादर्शक घटकांच्या माध्यमातून दृष्ट काढण्यास सांगितली जाते. दृष्ट काढण्यासाठी दृष्ट लागणार्या घटकाशी साधर्म्य दर्शवणाराच घटक घेतला, तर त्रासाचे निराकरण लवकर होऊ शकते.
३. उतारा देतांना कोणती प्रक्रिया घडते ?
अन्नघटकांच्या माध्यमातून व्यक्तीला रज-तमात्मकरूपी स्पंदनांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर अन्नपदार्थजन्य घटक दृष्ट काढल्यासारखे त्या व्यक्तीवरून उतरवून व्यक्तीतील दृष्टीची दूषित स्पंदने खेचून घेतली जाऊ शकतात.’
– सूक्ष्म-जगतातील एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ कृ. ४, कलियुग वर्ष ५१११ (११.६.२००९), सकाळी ११.१५)
४. उतारा देण्याची उपयुक्तता
अन्नवासनेच्या माध्यमातून वाईट शक्ती जिवाला (व्यक्तीला) त्रास देत असतील, तर तो त्रास अतृप्त पूर्वज लिंगदेहांमुळे (पूर्वज वाईट शक्तींमुळे) होणारा असू शकतो. यावर उपाय म्हणून त्या वाईट शक्तींना उतारा देणे उपयुक्त ठरू शकते.
काही वेळा वाईट शक्ती त्यांच्या वेगवेगळ्या इच्छांच्या पूर्तीसाठी मूठ मारणे, करणी करणे यांसारखे त्रासही कोणाच्या तरी माध्यमातून देऊ शकतात. त्यांवरही उपाय म्हणून वाईट शक्तींना उतारा देणे उपयुक्त ठरू शकते.
५. उतारा देणे आवश्यक असल्याचे ओळखण्याची काही लक्षणे
वाईट शक्तींचा त्रास असल्यास ‘तांत्रिक-मांत्रिक’ किंवा शक्तीमार्गी (शक्ती-संप्रदायी) संत उतारा देण्यास सांगतात. अन्यथा उतारा देण्याची आवश्यकता आहे, हे पुढील काही लक्षणांवरून ओळखता येते.
अ. अन्नवासनेशी संबंधित लक्षणे : अती भूक लागणे, वेगवेगळे अन्नपदार्थ खाण्याची वारंवार इच्छा होणे, भूक मंदावणे, जेवण पाहिल्यावर उलटी आल्याप्रमाणे होणे मद्य-सिगारेट यांचे व्यसन लागणे इत्यादी.
आ. आध्यात्मिक त्रासांशी संबंधित लक्षणे : स्वप्नात सतत साप दिसणे (अतृप्त पूर्वज बर्याचदा सापांच्या रूपात दिसतात.), स्वप्नात सतत भयानक दृश्ये दिसणे, मनात आत्महत्येचे विचार येणे इत्यादी.
इ. काही वेळा त्रास असलेल्या व्यक्तीमधील वाईट शक्ती प्रत्यक्ष प्रकट होऊन विशिष्ट उतारा मागते.
ई. काही वेळा व्यक्तीला त्रास देत असलेली वाईट शक्ती व्यक्तीच्या स्वप्नात दृश्याच्या माध्यमातून विशिष्ट उतारा देण्यास संबोधित करते.