कवळे, गोवा येथील नयनमनोहारी आणि जागृत श्री शांतादुर्गा देवस्थान !

Article also available in :

१. श्री शांतादुर्गा देवीची मनमोहक नि तेजस्वी मूर्ती

 

२. कवळे, गोवा येथील भव्य श्री शांतादुर्गा देवस्थान
आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी ! हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. श्री शांतादुर्गादेवी आणि देवीच्या रूपांविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊया.

 

१. श्री शांतादुर्गादेवीची पौराणिक कथा

एकदा काही कारणास्तव शिव आणि श्रीविष्णु यांच्यात युद्ध झाले आणि प्रलय ओढवला. तेव्हा समस्त देव, मानव, ऋषि आदींच्या आर्त प्रार्थनेने भगवती जगदंबा महाकायरूपाने प्रगट झाली आणि तिने हरिहरांना शांत करून बालरूपाने दोन्ही हातांनी दोन बाजूला धरले. ‘कृद्धौ शान्तियुतौ कृतौ हरिहरौ’ म्हणजेच क्रोधाविष्ट हरिहरांना शांत केले म्हणून जगदंबा ‘शांतादुर्गा’ झाली. कर्दलीवन म्हणजेच आजचे सासष्टी तालुक्यातील केळशी हे श्री शांतादुर्गेचे मूळ स्थान. इथे श्री शांतादुर्गेचे मंदिर इसवी सनाच्या सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत होते. परशुरामकाळी परशुरामाने गोमंतकात आणलेल्या दशगोत्री ब्राह्मणांतील कौशिक गोत्री लोमशर्मा या ब्राह्मणास कर्दलीपूर हा गाव अग्रहार मिळाला होता. त्यानेच कर्दलीपुरात श्री शांतादुर्गादेवीची स्थापना केली, अशी माहिती पौराणिक ग्रंथांच्या आधारे सापडते.

 

२. श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिराचा इतिहास

केळशी येथील श्री शांतादुर्गादेवीचे देवालय हे शेणवी मोने नावाच्या नामांकित व्यापार्‍याने बांधले होते, अशी माहिती ऐतिहासिक दप्तरातून घेतलेली आढळते. त्यानंतर सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी सासष्टी भागावर आक्रमण करून तेथील हिंदूंच्या देवतांची देवालये उद्ध्वस्त केली. त्या वेळी देवीच्या काही भक्तांनी देवीची मूर्ती घेऊन फोंडा येथील कैवल्यपूर (कवळे) या गावी स्थलांतर केले. कवळे येथे प्रारंभी हे देवालय नक्की अमुकच वर्षी बांधले गेले, याविषयीचा पुरावा किंवा दाखला त्या देवस्थानच्या दप्तरात आढळत नाही. नंतरच्या काळात म्हणजे वर्ष १७१३ नंतर आणि वर्ष १७३८ च्या अवधीत या देवालयाची नवी वास्तू भक्कम स्थितीत उभी होती अन् तीच अद्याप कायम आहे, ही गोष्ट सिद्ध करणारी कागदपत्रे सापडतात.

हे देवालय बांधण्याची प्रेरणा श्री शांतादुर्गादेवीने नारोराम मंत्री यांना दिली. सरदार नारोराम शेणवी रेगे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यानजीक कोचरे या गावातले.

त्यांना सातारा येथे शाहू छत्रपतींच्या दरबारी वर्ष १७१३ मध्ये मंत्रीपद लाभले. ‘आपणास देवीने एवढे ऐश्‍वर्य दिले, अशी त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळे देवीचे देवालय बांधले पाहिजे’, याची जाणीव त्यांना झाली आाणि त्यांनी वर्ष १७३० च्या सुमारास स्वखर्चाने सध्याचे श्री शांतादर्गादेवीचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारले.

 

३. मंदिराची माहिती

श्री शांतादुर्गा देवालयाची सुंदर आणि भव्य इमारत पूर्वाभिमुख असून समोर नयन मनोहर असा दीपस्तंभ आहे. मंदिरासमोर तलाव आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्याच्या महाद्वारावर चौघडा वाजवण्यासाठी नगारखाना आहे. गर्भागाराच्या वर घुमट असून त्यावर सोन्याचा कळस आहे. देवालयातील गर्भागारात श्री शांतादुर्गादेवीची चतुर्भुज मूर्ती आहे. तिच्या एका हातात शिव आणि दुसर्‍या हातात श्रीविष्णु आहे. या मूर्तीशेजारी सहा इंच आकाराचे काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. या देवळाच्या शेजारी डावीकडे श्री नारायणदेवाचे मंदिर आहे. त्या मंदिरात मुख्यासनावर श्री नारायणदेव आणि श्री गणपति यांच्या मूर्ती आहेत. या मंदिराच्या डावीकडे पारिजात वृक्षाचा पार आहे. त्यावर बारावीर भगवतीची मूर्ती आणि एका अज्ञात संन्याशाच्या पादुका आहेत. देवालयासमोर श्री क्षेत्रपालाची शिला आहे. देवालयाच्या मागच्या बाजूला म्हारू देवाची शिला आहे, तसेच देवालयाजवळ एका लहान देवालयात मूळ पुरुष कौशिक गोत्री लोमशर्मा यांची पाषाणी मूर्ती स्थापन केलेली आहे.

 

४. देवीचा जत्रोत्सव

माघ शुक्ल पक्ष पंचमी हा महापर्वणीचा दिवस होय. माघ शुक्ल पक्ष षष्ठी या दिवशी पहाटेस महारथातून श्री शांतादुर्गादेवीची मिरवणूक निघते अन् हा महापर्वणीचा महत्त्वाचा उत्सव पूर्ण होतो. ही मिरवणूक निघण्यापूर्वी रथात आरूढ झालेल्या श्री देवीची पूजा करून देवस्थानाचा नारळ फोडला जातो. या देवस्थानात प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण या दोन्ही पक्षांतील पंचमी हा दिवस नित्योत्सवाचा आहे. या दिवशी रात्री पुराण-कीर्तनादी कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखीतून मिरवणूक निघते.

 

५. प्रार्थना

सर्व दु:ख, पीडा आणि संकटे हरण करणारी आणि शत्रूचा विनाश करणारी ही महादेवी आपल्या पूजकाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्यामुळेच तिची पूजा करणारा तिचा उपासक तिला प्रार्थना करतो, ‘हे देवी, मला सद्बुद्धी दे. माझ्या जीवनात येणार्‍या संकटांचे निवारण कर.’ आजच्या कठीण काळात मातेला असे साकडे घालण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.

संकलक : सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय.

 

आई जगदंबेला करावयाची प्रार्थना !

‘हे देवी, आम्ही शक्तीहीन झालो आहोत, अमर्याद भोग भोगून मायासक्त झालो आहोत. हे माते, आम्हाला बळ देणारी हो. तुझ्या शक्तीने आम्ही आमच्यातील अनिष्ट वृत्तीचा नाश करू शकू.’

Leave a Comment