अनुक्रमणिका
१. व्यवस्थितपणा
अ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीची जागा ठरलेली आहे. ते प्रत्येक वस्तू ठरलेल्या जागेवरच ठेवतात.
आ. त्यांच्या खोलीतील देवघरात निरांजन आणि उदबत्ती पेटवण्यासाठी काड्यापेटी वापरतात. जळलेली काडी ठेवतांना लादी खराब होऊ नये, यासाठी प.पू. डॉक्टरांनी एक छोटासा पत्र्याचा तुकडा ठेवला आहे. ते त्यावरच ती काडी ठेवतात, तसेच काड्यापेटी पावसाने दमट होऊ नये, यासाठी ते ती प्लास्टिकच्या डबीत ठेवतात.
इ. प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी नोंद करून आणि जतन करून ठेवलेल्या आहेत.
२. स्वयंशिस्त
अ. प.पू. डॉक्टरांच्या जवळ नेहमी कागद आणि पेन असते. ते प्रत्येक गोष्ट लिहून ठेवतात आणि त्यानुसार पाठपुरावा करतात किंवा साधकांना आठवण करून देतात.
आ. प.पू. डॉक्टर व्याधींवर उपचार म्हणून आयुर्वेदिक आणि अॅलोपॅथीच्या विविध प्रकारच्या गोळ्या अन् पातळ औषधे घेतात. ते ती ज्या पद्धतीने घ्यायची (मधातून, पाण्यासह, दूधासह इत्यादी) असतात, त्याच पद्धतीने आणि नियोजित वेळेतच घेतात. त्यांची औषधांची वेळ कधीच चुकत नाही.
३. काटकसरीपणा
अ. प.पू. डॉक्टर तिकिटे, कागदाचे छोटे तुकडे, पाठकोरे कागद लिहिण्यासाठी वापरतात. आम्ही सनातन संस्थेत आल्यावर काटकसरीपणाने वस्तू कशा वापरू शकतो, ते प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या कृतीतून आम्हाला शिकवले.
आ. प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सकाळी साधारण ५० मिनिटे आणि सायंकाळी १५ मिनिटे मंत्रपठण असते. त्या वेळी अधिक वेळेसाठी जळण्यासाठी मोठी उदबत्ती आणि अल्प वेळेसाठी लागणारी लहान उदबत्ती अशा दोन वेगवेगळ्या लांबीच्या उदबत्त्या ते ठेवतात. त्यामुळे उदबत्तीचा योग्य वापर होतो.
४. स्वावलंबन
प.पू. डॉक्टर स्वतः शक्यतो इतरांचे साहाय्य घेत नाहीत; पण इतरांना शक्य ते सर्व साहाय्य लक्ष ठेवून करतात.
५. नियोजनकौशल्य
प.पू. डॉक्टर प्रत्येक कृतीचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती करतात. मी इतक्या वर्षात ‘ते कुठेही गडबडीने निघाले आहेत’, असे कधी बघितले नाही.
६. शिकण्याची वृत्ती
प.पू. डॉक्टर ‘शनिमहात्म्य स्तोत्र’ वाचायचे. ते वाचायला बराच वेळ लागतो. तेव्हा एकदा मी त्यांना विचारले, ‘‘हे वाचतांना कंटाळा येत नाही का ?’’ त्यावर ते सहजतेने म्हणाले, ‘‘त्यात छान छान गोष्टी आहेत ना!’’ ‘शिकण्याची वृत्ती ठेवल्यास कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न येता आनंदच मिळतो’, हे मला शिकता आले.
७. इतरांना समजून घेणे
प.पू. डॉक्टरांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर आपल्याला समजली नाही आणि आपण ती त्यांना पुन्हा विचारली, तरी ते न रागावता आपल्याला ती गोष्ट समजेपर्यंत सांगतात.
८. साधकांना शिकवणे
८ अ. अयोग्य कृतीची जाणीव करून देणे
एकदा प.पू. डॉक्टरांना एका साधकाचा दूरभाष आला होता. तो साधक मोठ्याने आणि जलद गतीने बोलत होता. प.पू. डॉक्टरांनी त्याला सांगितले, ‘‘सावकाश बोलायला पाहिजे.’’ पुढे ते त्याला समजावून सांगत म्हणाले, ‘‘मी कसा सावकाश बोलतो, तसे बोलायला पाहिजे.’’
८ आ. ईश्वराप्रती सदैव कृतज्ञ रहायला शिकवणे
एकदा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण ईश्वराचे उपकार मानायला पाहिजेत; कारण देवाने आपल्याला दोन कान, दोन डोळे, दोन हात आणि दोन पाय दिले आहेत. त्यामुळे एखाद्या अवयवाला काही झाले, तरी आपले काही अडत नाही.’’
९. इतरांचा विचार करणे
अ. आम्ही प्रतिदिन खोलीत आरती करतो. तेव्हा मी देवळात आरती फिरवतात, तशी ती उंचावरून खाली गोल फिरवायचो. प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आरती उंचावरून न फिरवता मध्यातून फिरवा, म्हणजे सगळ्यांना आरती ग्रहण करणे सोपे जाईल.’’
आ. आरती म्हणून झाली की, मी आरतीचे ताट त्वरित बाजूला नेऊन ठेवायचो. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आरतीतील कापूर पेटून संपेपर्यंत आरती देवासमोर राहू देत.’’ तेव्हा आम्ही आरतीतील कापूर जळून संपेपर्यंत तिथेच थांबायचो. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आरतीचे ताट तिथेच राहू दे. कापूर संपला की, मी ते काढून ठेवीन, म्हणजे तुमचा वेळ जायला नको.’’
१०. समष्टीचा विचार करणे
अ. प.पू. डॉक्टरांना कुणी काही नवीन गोष्ट सांगितली, तर ते शांतपणे ऐकून घेतात. त्यांना कुणी एखादी नवीन वस्तू पाठवली, तर त्याविषयी माहिती विचारून घेतात आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तू असल्यास ती सगळ्यांना पहाण्यासाठी ठेवायला सांगतात, उदा. फळे, फुले, चित्रे, छायाचित्रे, लग्नपत्रिका इत्यादी.
आ. प.पू. डॉक्टरांनी ‘आता रामराज्य आणायचे आहे, हे प्रत्येक साधकाच्या लक्षात यावे’; म्हणून रामपंचायतनाचे चित्र सर्व साधकांना आवर्जून भेट दिले.
११. आध्यात्मिक दृष्टीकोन देणे
अ. आमच्या गावात एक जुना साधक आहे. त्याला प्रत्येक वेळी व्यवसायात हानी होत असे; म्हणून मी एकदा त्याविषयी प.पू. डॉक्टरांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यांचे हे प्रारब्ध आहे आणि प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते.’’
अ. मी प.पू. डॉक्टरांना एकदा म्हणालो की, सर्वांना मरणाची भीती वाटते. त्यावर ते म्हणाले, ‘‘साधकांना मरणाची भीती वाटत नाही; कारण ते भगवंताच्या अनुसंधानात असतात.’’
१२. साधकांवरील प्रीती !
१२ अ. स्वतःचा वाढदिवस साजरा न करता साधकांचे वाढदिवस मात्र आवर्जून साजरे करून त्यांचे कौतुक करणारे प.पू. डॉक्टर !
पूर्वी प.पू. डॉक्टर फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ सेवाकेंद्रात असतांना अनेक साधक स्वतःच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला जायचे. त्या वेळेला मी नेसाई येथे होतो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी नेसाईहून आलो आणि प.पू. डॉक्टरांना भेटलो. तेव्हा आमच्यात पुढील संभाषण झाले.
प.पू. डॉक्टर : आज तुम्हाला किती वर्षे झाली?
मी : ६० वर्षे झाली आहेत.
प.पू. डॉक्टर : आपण तुमची साठी साजरी करूया.
मी : परम पूज्य, तुम्ही तुमची साठी कुठे साजरी केलीत ?
तरीही त्यांनी मला पँट-शर्टचे कापड आणि खाऊ दिला.