‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
(अनुष्ठानाचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर झालेला परिणाम’ आणि ‘सनातन पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती ओकार पाध्ये यांच्यावर झालेला परिणाम’ यांविषयी केलेले संशोधन निराळ्या लेखांत दिले आहे.)
‘१८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत चैत्र नवरात्रीनिमित्त एका व्यक्तीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी अनुष्ठान करण्यास सांगितले होते. त्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात (खोलीत) चौरंगावर देवीचे चित्र ठेवून तिचे पूजन करून ‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथाचे पठण करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती ओकार पाध्ये यांनी हे अनुष्ठान केले. या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत १८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात देवीच्या चित्राची प्रतिदिन पूजनापूर्वी आणि पूजनानंतर (म्हणजे पूजन करून पठण झाल्यानंतर) ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
वाचकांना सूचना
जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या
goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन
२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – अनुष्ठानातील आठही दिवस देवीच्या चित्रामध्ये पूजनापूर्वी आणि पूजनानंतरही नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे
अनुष्ठानाच्या आरंभी देवीच्या चित्रामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. अनुष्ठानातील आठही दिवस देवीच्या चित्रामध्ये पूजनापूर्वी आणि पूजनानंतरही ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ आ १. देवीच्या चित्राच्या पूजनानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अनुष्ठानातील प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर वाढ होत जाणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अनुष्ठानाच्या आरंभी, म्हणजे पहिल्या दिवशीच्या पूजनापूर्वी देवीच्या चित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती, हे त्या चित्राच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरने पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती २.५२ मीटर होती. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशीच्या पूजनानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होत गेली. हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.
अ. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी (१८.३.२०१८ या दिनी) पूजनापूर्वी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा २.५२ मीटर होती. आठव्या दिवशी (२५.३.२०१८ या दिनी) पूजनानंतर ती ५.१५ मीटर होती. याचा अर्थ देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) ८ दिवसांत अनुमाने दुपटीने वाढली.
आ. वरील सारणीमधील देवीच्या चित्राच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेल्या वाढीचा स्तंभ बघितल्यास त्या वाढीचा एकंदर कल (ट्रेंड) वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे लक्षात येते. पहिले २ दिवस ही वाढ अधिकाधिक होत गेली. त्यानंतर पुढील ४ दिवस वाढीचे प्रमाण अल्प अल्प होत गेले. पूजनाचे शेवटचे २ दिवस पुन्हा वाढ अधिकाधिक होत गेली.
२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन
२ इ १. अनुष्ठानातील मधले २ दिवस सोडले, तर अन्य दिवशी देवीच्या चित्राच्या पूजनानंतरच्या एकूण प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होत जाणे
सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी पूजनापूर्वी देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ ३.४० मीटर होती. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशी पूजनानंतर देवीच्या चित्राच्या एकूण प्रभावळीत किती वाढ होत गेली, हे पुढील सारणीत दिले आहे.
अ. देवीच्या चित्राच्या पूजनानंतरच्या प्रभावळीच्या स्तंभामध्ये अनुष्ठानातील २१ आणि २३ मार्च २०१८ हे दोन दिवस सोडले, तर अन्य दिवशी देवीच्या चित्राच्या प्रभावळीत आधीच्या दिवसाच्या प्रभावळीच्या तुलनेत वाढ झाली होती. २० मार्च या दिवशी पूजनानंतरची देवीच्या चित्राची प्रभावळ ४.८० मीटर होती, ती २१ मार्च या दिवशी ४.६७ मीटर झाली, म्हणजे अल्प झाली. तसेच दिनांक २३ मार्च या दिवशी आढळून आले.
आ. सारणीतील प्रभावळीत झालेल्या वाढीच्या स्तंभामध्ये वाढीच्या संदर्भात जो एकंदर कल (ट्रेंड) दिसून येतो, तो सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीच्या वाढीमध्ये दिसून आल्याप्रमाणेच बहुतांशी आहे. याला अपवाद म्हणजे २० मार्च या दिवशी प्रभावळीतील वाढ पुष्कळ अल्प प्रमाणात झाली.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.
३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. श्री दुर्गासप्तशती पाठाचे महत्त्व
‘मार्कंडेयपुराणात श्री चंडीदेवीचे (श्री चंडीदेवी हे श्री दुर्गादेवीचे एक नाव आहे) माहात्म्य सांगितले असून, त्यात तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील अनुमाने सातशे श्लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी निराळा काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’)
३ आ. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशीच्या पूजनानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा आणि चित्राची एकूण प्रभावळ यांमध्ये उत्तरोत्तर वाढ होण्यामागील शास्त्र
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे देवीचे ‘रूप’ (चित्र किंवा मूर्ती) आहे, तिथे तिच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. देवतेच्या त्या रूपाचे पूजन केल्यावर अधिक मात्रेने त्या देवतेचे तत्त्व तिच्या रूपामध्ये येते; कारण पूजनामध्ये त्या देवतातत्त्वाला आवाहन करून त्या रूपामध्ये स्थित करतात. त्यामुळे अनुष्ठानाच्या प्रत्येक दिनी देवीच्या चित्राचे पूजन केल्यावर त्या देवीची स्पंदने तिच्या चित्रामध्ये प्रतिदिन आकृष्ट झाली. याचा प्रत्यय प्रत्येक दिवशी पूजनानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा आणि त्या चित्राची एकूण प्रभावळ यांमध्ये उत्तरोत्तर वाढ झाल्यातून दिसून आला. यातून देवाच्या पूजनाचे महत्त्व लक्षात येते.
(हे अनुष्ठान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी केले होते. प्रतिदिन पूजनामुळे देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा वाढत गेल्यामुळे त्याचा लाभ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झाला. त्यामुळे अनुष्ठानानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढली. याविषयी सविस्तर माहिती निराळ्या लेखात दिली आहे.)
३ इ. अनुष्ठानाच्या कालावधीत देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेल्या वाढीचा वैशिष्ट्यपूर्ण एकंदर कल (ट्रेंड)
अनुष्ठानाच्या कालावधीत देवीच्या चित्राच्या पूजनानंतर त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमधील वाढ पहिले २ दिवस अधिकाधिक होत गेली. त्यानंतर पुढील ४ दिवस वाढीचे प्रमाण अल्प अल्प होत गेले. याचे कारण म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये एखादी स्पंदने ग्रहण करण्याची एक मर्यादा असते. ती वस्तू त्या स्पंदनांनी संपृक्त झाली की, त्यापुढे त्या वस्तूची ती स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता अल्प होत जाते. तसेच येथे झाले. पूजनामुळे देवीच्या चित्रामध्ये देवीची स्पंदने अधिकतम येण्याची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्या चित्रातील देवीच्या स्पंदनांमधील वाढ अल्प होत गेली. हे त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीच्या मोजणीच्या नोंदींतून दिसून आले. अनुष्ठानातील शेवटचे २ दिवस पुन्हा त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमध्ये थोडी वाढ होत गेली. ही देवीची कृपा आहे. शेवटी अनुष्ठानाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अधिकतम लाभ मिळवून देण्यासाठी देवीने त्या चित्रातील आपली स्पंदने पुन्हा थोड्या प्रमाणात वाढवली. यातून ‘देव कसा काटकसरी आहे आणि आवश्यक तेवढी शक्ती तो योग्य वेळी कसा देतो’, हेही शिकायला मिळाले.
देवीच्या चित्राच्या एकूण प्रभावळीच्या संदर्भातही बहुतांशी वरीलप्रमाणेच एकंदर कल असल्याचे लक्षात आले. त्याचेही कारण वरीलप्रमाणेच आहे.
३ ई. अनुष्ठानाच्या कालावधीत २ दिवस पूजनानंतर देवीच्या चित्राच्या एकूण प्रभावळीमध्ये त्या दिवसांच्या आधीच्या दिवशी असलेल्या प्रभावळींपेक्षा घट होण्याचे कारण
अनुष्ठानाच्या कालावधीत २० मार्च आणि २१ मार्च या दिवशी पूजनानंतर देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ अनुक्रमे ४.८० मीटर अन् ४.६७ मीटर होती. याचा अर्थ दिनांक २० च्या तुलनेत दिनांक २१ या दिवशी देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ घटली. त्याचप्रमाणे दिनांक २२ च्या तुलनेत दिनांक २३ मार्च या दिवशी देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ ०.११ मीटर घटली. त्या दोन्ही दिवशी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ घटली नाही. सकारात्मक ऊर्जा ही सगुण स्तराची असते, तर एकूण प्रभावळीमधील ऊर्जा ही निर्गुण स्तराची असते. ज्या अर्थी पूजनानंतर देवीच्या चित्राची प्रभावळ आधीच्या दिवसाच्या तुलनेत घटली, त्या अर्थी ती निर्गुण ऊर्जा व्यय झाली. अनिष्ट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आक्रमणे करत असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्राणशक्ती न्यून असणे, चालतांना तोल जाणे, पुष्कळ ग्लानी असणे इत्यादी त्रास होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी हे अनुष्ठान केले असल्याने त्यांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तींविरुद्ध लढण्यासाठी देवीच्या चित्रातील निर्गुण शक्ती व्यय झाली.
४. मंदिरांतील देवतांच्या मूर्ती या चैतन्याच्या स्त्रोत असल्याने हा आध्यात्मिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपणे आवश्यक !
‘श्री दुर्गासप्तशती पाठा’च्या अनुष्ठानामुळे देवीच्या चित्रातील चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) केवळ ८ दिवसांत अनुमाने दुपटीने वाढले, तर प्राचीन मंदिरांमध्ये शेकडो वर्षांपासून देवतांच्या मूर्तींचे भक्तीभावाने पूजन होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले असेल, याची कल्पनाही करता येत नाही. त्या चैतन्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे आणि यापुढेही अनेक जण घेतील. प्राचीन मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती चैतन्याच्या स्त्रोत आहेत. त्यामुळे हा आध्यात्मिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपणे आवश्यक आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.३.२०१८)