परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्यावर अनन्य निष्ठा असणार्‍या देवद आश्रमात रहाणार्‍या सनातनच्या ७७ व्या पू. (श्रीमती) सत्यवती दळवीआजी (वय ८१ वर्षे) !

‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’

देवद(पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८१ वर्षे) यांची मी सेवा करते. आजींमध्ये आश्रमाप्रती, तसेच प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव आहे. त्यांच्या सत्संगात जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

 (पुढील लिखाण दळवीआजींना संतपद प्राप्त होण्यापूर्वीचे असल्यामुळे त्यांचा उल्लेख ‘पू. आजी’ असा केलेला नाही. – संकलक)

 

१. स्वावलंबी

‘आजी आश्रमात पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आणि त्यांच्या पायात ‘रॉड’ घालावा लागला. अशा स्थितीतही त्या शक्य होतील तेवढी कामे स्वतः करतात. त्यांना जमेल तसा पायाचा व्यायाम करतात आणि उर्वरित व्यायाम साधिकांकडून करून घेतात. आजींचे वय ८१ वर्षे आहे, तरी त्या स्वतःची औषधे स्वतः काढून घेतात. गोळी घ्यायला त्या कधीच विसरत नाहीत. ‘आता कुठल्या गोळ्या घ्यायच्या आहेत ?’, हे त्याच आम्हाला सांगतात.

 

२. चांगली स्मरणशक्ती

आजींना वार, दिनांक, तसेच ‘एखादी घटना कोणत्या दिवशी घडली ? कुणाचा वाढदिवस कधी आहे ?’, हे सर्व लक्षात असते.

 

३. इतरांचा विचार करणे

अ. आजींचे अंग पुसतांना त्या शक्य होईल, तेवढे साहाय्य करतात. त्यांना त्रास होत असला, तरी त्या शांत असतात आणि आपण सांगू, तशी कृती करून सहकार्य करतात.

आ. माझ्याकडून कधी त्यांचा व्यायाम करवून घ्यायचा रहातो, तर त्यांना कधी तीर्थ द्यायचे रहाते; पण आजींची कधी अपेक्षा नसते. त्या शांतपणे मला आठवण करून देतात.

 

४. सहनशीलता

४ अ. स्ट्रेचरवर अधिक वेळ झोपावे लागूनही शांत रहाणे

एकदा रुग्णालयात ‘केसपेपर’ काढण्यासाठी आम्हाला दीड घंटा थांबावे लागले. त्या वेळी आजी ‘स्ट्रेचरवर’ होत्या. त्यांचे स्ट्रेचर जिथे ठेवले होते, तिथे ऊन यायचे. त्यामुळे ऊन येईल, तसे आम्ही स्ट्रेचर बाजूला सरकवत होतो. त्या वेळी फार उकडत होते, तरी आजी शांत होत्या. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

४ आ. शांत राहून पायाच्या वेदना सहन करणे

रुग्णालयात त्यांच्या पायात ‘रॉड’ घालतांना, तसेच दोन मासांंनी तो काढतांनाही त्या शांतच होत्या. वेदनेने त्या थोड्यासुद्धा विव्हळल्या नाहीत. जवळ उभी असलेली त्यांची मुलगी रडत होती; पण आजी तिला शांत करत होत्या. पायातून ‘रॉड’ काढल्यावर त्यांचा पाय दुखत होता, तरी कळा थांबण्यासाठी त्यांनी गोळ्या घेतल्या नाहीत.

 

५. इतरांना साहाय्य करणे

मी माझ्या पंजाबी पोषाखाची बाजूची शिलाई उसवायला घेतली होती. आजींनी माझ्याकडून तो पोषाख मागून घेतला आणि तो झोपलेल्या स्थितीतच तो उसवून मला दिला. ‘मला तेवढेच साहाय्य होईल’, हा त्यांचा विचार होता.

 

६. प्रेमभाव

आजींना स्वतःच्या वस्तू इतरांना द्यायला आवडतात. त्या नेहमी नऊवारी पातळ नेसतात. नवीन पातळ घेतले की, त्या आश्रमातील साधिकेला सणाच्या दिवशी त्याची घडी मोडायला सांगतात. सण असला की, साधिकाही आजींकडून साड्या घेऊन जातात. आजींना भेटायला साधिका आल्या की, आजी त्यांना मिठी मारतात आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलतात.

 

७. संतांनी केलेले कौतुक

आजींना भेटायला खोलीत संत येतात. तेव्हा आजींची भावजागृती होते. संत आजींविषयी म्हणतात, ‘‘आजी किती आनंदी असतात !’’ एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे आजींना भेटायला आले होते. नंतर ते मला म्हणाले, ‘‘आजी प्रत्येक गोष्टीला भावाची जोड देतात.’’

 

८. आजींचा आश्रमाप्रती असलेला भाव – ‘मी
मेल्यावर माझे विधी आश्रमातच होतील’, असे मुलाला सांगणे

आजींच्या मुलीचा भ्रमणभाष आल्यावर आजी त्यांना तळमळीने सांगतात, ‘‘तुम्ही नामजप करा. देवाने मला कसे फुलासारखे ठेवले आहे.’’ एकदा आजींचा मुलगा त्यांना आश्रमात भेटायला आला होता. तेव्हा आजींनी त्याला ‘मी मेल्यावर मला कुठेही न्यायचे नाही. जे काही होईल, ते आश्रमातच होईल’, असे सांगितले.

 

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेली श्रद्धा आणि भाव !

अ. आजींना एकदा ‘डायालिसिस’ करायला सांगितले होते. त्या वेळी मला काळजी वाटली; पण आजी म्हणाल्या, ‘‘मला काहीही होणार नाही. परात्पर गुरुदेव आहेत ना बघायला !’’ आणि तसेच घडले. त्यांना गोळ्या चालू केल्या आणि त्यांचे ‘डायलिसिस’ रहित झाले.

आ. एक दिवस आजींना लघवी होत नव्हती. त्यामुळे त्यांचे पोट फुगले होते. आजींनी परात्पर गुरुदेवांना आर्ततेने हाक मारली आणि या त्रासाविषयी सांगितले. नंतर त्यांना लघवी झाली. हा प्रसंग सांगताना त्यांचा भाव जागृत होत होता.

इ. आजी म्हणतात, ‘‘आई आपल्याला पदराखाली घेते, तसेच प.पू. गुरुदेवांनी आपल्याला पदराखाली घेतले आहे. आपण काय करतो ? पदर बाजूला काढून टाकतो, म्हणजे त्यांनी सांगितलेले ऐकत नाही.’’ हे सांगतांना आजींची भावजागृती होऊन गळा दाटून आला.

ई. आजी पाय घसरून पडल्यावर ‘प.पू. गुरुदेवांनी स्वतःला अलगद खाली बसवले’, असे त्यांना जाणवले. आम्हीही ते पाहिले.

उ. आजी सांगतात, ‘‘मी २ मास एका जागेवर आहे. परात्पर गुरुदेव (सूक्ष्मातून) रात्री हात धरून मला फिरवतात; म्हणून मी सकाळी आनंदी असते, नाहीतर झोपून कंटाळले असते. प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच मी जिवंत आहे.’’

ऊ. श्री. विनायक आगवेकर यांनी आजींच्या खोलीत लावायला परात्पर गुरु डॉक्टरांचे मोठे छायाचित्र दिले. तेव्हा आजी म्हणाल्या, ‘‘मी कुठे जाऊ शकत नाही; म्हणून प.पू. गुरुदेवच मला भेटायला खोलीत आले आहेत.’

 

१०. आजींची सेवा केल्यामुळे स्वतःत जाणवत असलेले पालट

आजींची सेवा करायला लागल्यापासून माझ्या मनातली नकारात्मकता न्यून झाली आहे. माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून झाले आहेत. आजींच्या सेवेतून मला चैतन्य मिळून आनंद आणि उत्साह जाणवू लागला आहे. त्याचप्रमाणे माझी अंतर्मुखताही वाढली आहे.’

– कु. वैशाली बांदिवडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment