अखंड शिकण्याच्या स्थितीत रहाणारे आणि गुरुदेवांवर अढळ श्रद्धा असणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा साधनाप्रवास !

अनुक्रमणिका

१. बालपण

१ अ. आई बाळंतपणासाठी माहेरी जात असतांना
प्रवासात पोटावर पडणे, ईश्‍वरी कृपेने आई आणि गर्भ यांना काहीही न होणे

‘११.४.१९४८ या दिवशी माझा जन्म मामाच्या गावी (मोहरी, तालुका जामखेड, जिल्हा नगर) येेथे झाला. आमचे (होनप यांचे) मूळ गाव नान्नज हे हैद्राबाद संस्थानामध्ये होते. तेथे रझाकारशाही होती. त्यामुळे दिवसाही लपून बसावे लागत होते. त्यामुळे आई माझ्या वेळी बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली होती. आईच्या माहेरी जातांना बैलगाडीतून प्रवास करावा लागत असे.

आई बाळंतपणाला जात असतांना वाटेत बैलगाडी एके ठिकाणी उलटली. त्यामुळे आई पोटावर पडली. या अपघातात गर्भाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन काहीही झाले असते; परंतु ईश्‍वरी कृपेने आई आणि गर्भ (मी) दोघेही वाचलो. ‘साधना करण्यासाठी देवानेच मला वाचवले’, असे मला वाटते.

१ आ. वडील लवकर वारल्याने बालपण कष्टात जाणे

माझे बालपण खेडेगावी गेले. मी ७ – ८ वर्षांचा असतांनाच माझे वडील वारले. घरी कमावणारे कुणीही नव्हते. आई, आजी, तीन मोठे भाऊ, मी आणि बहीण एवढे जण आम्ही नान्नज येथील घरी होतो. आम्ही इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण तेथेच पूर्ण केले. आई आणि थोरला भाऊ श्री. देवीदास यांनी अनेक संकटांना सामोरे जाऊन आम्हाला सांभाळले. तेव्हा ‘संकटाला सामोरे कसे जावे ?’, हे मला शिकायला मिळाले.

१ इ. देवाची आवड असणे

लहानपणापासून मला देवाची आवड होती. देवळात जाणे, धार्मिक कृती करणे आणि सण साजरे करणे, इत्यादी गोष्टी मी आवडीने करायचो.

 

२. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण

२ अ. शिक्षणानिमित्त दुसरीकडे रहायला असल्याने वर्षातून एकदा वा दोनदा घरी जाणे

मी १२ – १३ वर्षांचा असतांना शिक्षणानिमित्त दुसरीकडे रहायला होतो. त्या वेळी ६ मास किंवा १ वर्षांनंतर माझे घरी जाणे होत होते. त्या वेळी ‘आई पुष्कळ आठवण काढते’ किंवा ‘आम्ही घरी यावे’, अशी परिस्थिती नव्हती. याउलट आई म्हणत असे, ‘तुम्ही जिथे असाल, तिथे सुखी रहा.’ या प्रसंगातून देवानेच ‘माया कशी त्यागावी ?’, हे शिकवले.

२ आ. इतरांच्या घरी राहून त्यांच्या घरातील कामे करत करत माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे

नान्नज येथे केवळ ७ वी पर्यंतची शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी मला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागले. ८ वी ते ११ वी पर्यंतचे शिक्षण मी दुसर्‍यांच्या घरी राहून पूर्ण केले. त्यांच्या घरी आम्हाला झाडणे, दळण आणणे आदी कामे करावी लागायची, त्यांच्या घरची देवपूजाही करावी लागायची. मी, माझा दुसरा भाऊ श्री. मधुकर आणि तिसरा भाऊ श्री. सुधाकर यांनीही असे करून त्या वेळच्या जुन्या ११ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या परिस्थितीमुळे ‘सेवा कशी करावी ?’, हे मला शिकायला मिळाले.

२ इ. घरी आल्यानंतर चुलत आजीने विविध पदार्थ प्रेमाने देणे

नान्नज येथे घरी आल्यानंतर आमच्या शेजारी आमचे चुलते रहात होते. आमची चुलत आजी पुष्कळ प्रेमळ होती. आम्ही घरी आल्यावर ती ज्वारीच्या लाह्याचे पीठ दूध आणि गूळ यांत कालवून आम्हाला एकेक गोळा देत असे. तेव्हा लाडू, करंजी, पोहे केवळ सणावाराला केले जायचे. काही वेळा ती शिळ्या पोळ्यांचा कुस्कराही देत असे. पोळीचा कुस्करा फार महत्त्वाचा नव्हता; पण त्यातील प्रेम महत्त्वाचे होते. ‘इतरांवर प्रेम कसे करावे ?’, हे तिच्याकडून मला शिकता आले.

२ ई. महाविद्यालयीन शिक्षण प्रथम नगरला आणि नंतर पुण्याला होणे

जामखेडमध्ये महाविद्यालय नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी मला जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे नगर येथे जावे लागले. महाविद्यालयात असतांना २ वर्षे वाणिज्य शाखेतील शिक्षण घेऊन नंतर पुढील शिक्षणासाठी मी २ वर्षे पुणे येथे गेलो. वर्ष १९६९ मध्ये मी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली.

 

३. नोकरी

३ अ. नोकरी मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यावर लगेचच नोकरी मिळणे

शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात होतो. एक ते दीड वर्षे होऊनही मला नोकरी मिळत नव्हती. त्या वेळी ‘एप्लॉयमेंट एक्सचेंज’द्वारे नोकरी मिळत असे. तेथे नाव नोंदवूनही मला नोकरीसाठी बोलावणे (कॉल) येत नव्हते; म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले. नंतर त्या पत्राचा संदर्भ देऊन ‘एप्लॉयमेंट एक्सचेंज’मधून मला बोलावणे आले. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागासाठीची ती नोकरी होती. त्यांनी लगेचच माझी परीक्षा घेऊन त्याच दिवशी मुलाखतही घेतली. पुढील आठवड्यात मला नोकरीसाठी नियुक्ती पत्र (‘अपॉईंटमेंट लेटर’) मिळाले. डिसेंबर १९७० मध्ये मला ही नोकरी लागली. देवाच्या कृपेमुळे मला मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याची बुद्धी झाली आणि नोकरी मिळाली. (त्या काळच्या मुख्यमंत्र्यांची तुलना पुढील काळातील मंत्र्यांशी केली, तर पुढील काळातील मंत्री त्या काळच्या मुख्यमंत्र्यांशी तुलना करण्याच्या लायकीचे नाहीत, हे लक्षात येईल. – संकलक)

३ आ. फिरतीची नोकरी असल्याने गावोगावी जावे लागणे

माझी नोकरी फिरतीची होती. ग्रामपंचायत लेखा परीक्षणासाठी मला गावोगावी जावे लागायचे. त्या वेळी अनेक गावांपर्यंत एस्.टी. बसगाड्या पोहोचायच्या नाहीत. त्यामुळे बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागायचे.

३ इ. बढतीसाठी दिलेल्या सर्व परीक्षांत उत्तीर्ण होणे

नंतर मी बढतीसाठी वित्त विभागाची परीक्षा दिली. माझ्या समवेतच्या परिक्षार्थींमध्ये मी एकटाच त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. मी परीक्षा लवकर उत्तीर्ण झाल्यामुळे मला एक वेतनवाढ आगाऊ मिळाले. त्यानंतर पुढेही मी बढतीसाठी परीक्षा दिल्या. त्यातही उत्तीर्ण होऊन वर्ष १९७९ मध्ये मला ‘लेखाधिकारी’ म्हणून मला बढती मिळाली. वर्ष २००६ मध्ये मी नोकरीतून सेवानिवृत्त झालो.

 

४. वैवाहिक जीवन

४ अ. ‘विवाह करावा’, असे वाटत नसतांनाही आईच्या
इच्छेमुळे विवाह करणे, पत्नीनेही तिच्या वडिलांच्या आग्रहामुळे विवाह करणे

नोकरी लागल्यानंतर ४ – ५ वर्षांनी माझा विवाह झाला. वर्षे १९७६ मध्ये ‘लग्न करावे’, असे मला वाटत नसतांनाही आईच्या इच्छेसाठी मी विवाह केला. तेव्हा मी ‘परेच्छेने वागण्यास शिकलो’, असे आता लक्षात येते.

माझी पत्नी सौ. निर्मला हिचे वडील पुष्कळ रागीट आणि कडक होते. त्यामुळे ती बंधनात राहिली. ती सहसा सायंकाळी एकटी बाहेर जात नसे. तिलाही विवाह करण्याची इच्छा नव्हती; परंतु वडिलांच्या इच्छेसाठी तिने विवाह केला.

४ आ. स्वतःचा सर्व पगार पत्नीच्या स्वाधीन करणे, तिने संसारासाठी काटकसरीने व्यय करणे

माझी नोकरी फिरतीची असल्याने प्रत्येक रविवारी मी घरी येत असे. पगार मिळाल्यानंतर मी तो पत्नीच्या स्वाधीन करत असे. मी तिला कधीच त्याचा हिशोब विचारला नाही. तिनेही काटकसरीने संसार केला. त्यामुळे मला कुटुंंबाच्या व्ययाकडे फार लक्ष द्यावे लागले नाही. नोकरीमध्ये ५ वर्षांनी स्थानांतर होत असे. वर्ष १९८५ मध्ये नाशिक येथे माझे स्थानांतर झाले. त्यानंतर आम्ही नाशिक येथेच राहिलो.

४ इ. घराजवळील मंदिरात कीर्तन ऐकायला जाणे

नाशिक येथे आमच्या घराजवळच भद्रकाली आणि काळाराम मंदिर होते. मी तेथे नियमित दर्शनाला जात होतो. नाशिकमधील ४ मंदिरांमध्ये वर्षभर कीर्तन असायचे. मी आणि पत्नी भद्रकाली मंदिरात कीर्तन ऐकायला जायचो. आम्ही पुष्कळ कीर्तनकार पाहिले; पण सर्व जण पोटभरूच होते.

 

५. सनातन संस्थेशी संपर्क

५ अ. भद्रकाली मंदिरात दर्शनाला गेल्यावर तेथे
सनातनचा सत्संग चालू असणे, तो विषय आवडल्याने सत्संगात सहभागी होणे

वर्ष १९९८ मध्ये नाशिक येथे भद्रकाली मंदिरात सायंकाळी सनातनचा सत्संग व्हायचा. एके दिवशी मी देवीच्या दर्शनाला गेलो असतांना सत्संगातील विषय ऐकला आणि मला तो चांगला वाटला. इतर प्रवचने आणि कीर्तने यांपेक्षा तो वेगळा वाटला. मला वेळ नसल्याने मी मोठी मुलगी कु. दीपाली आणि धाकटा मुलगा श्री. राम यांना सत्संगाला जाण्यास सांगितले. त्यांनी सत्संग ऐकला आणि त्यात ते सहभागी झाले.

मी नोकरीनिमित्त बाहेरगावी जात असल्याने सुटीच्या दिवशी सत्संग असेल, तर मीही त्यात सहभागी व्हायचो. त्या कालावधीत कीर्तन ऐकणे, सत्संगाला जाणे, गुरुचरित्र पारायण करणे इत्यादी साधना मी करत होतो.

५ आ. संस्थेत आल्यावर ‘भक्ती कशी करावी ?’ हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळणे

प्रवचन, कीर्तन यांमध्ये ‘भक्ती कशी करावी ? भक्तीचे प्रकार कोणते ?’ यांविषयी मी ऐकत होतो; परंतु त्याप्रमाणे माझ्याकडून कृती होत नव्हती आणि मला त्याचा अर्थही कळत नव्हता. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यानंतर ‘प्रत्यक्ष कृती कशी करावी ? भक्ती कशी करावी ?’, हे शिकायला आणि प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

५ इ. गुरुदेवांनी पूर्णवेळ साधक होण्यास सुचवल्यावर
‘मी सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ होणार’, असे त्यांना सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले नाशिकला आले होते. तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर श्री. राम (माझा धाकटा मुलगा) नामजपादी उपायांसाठी त्यांच्यासमवेत मिरज आश्रमात गेला. त्या वेळी त्यांनी मलाही ‘तुम्ही पूर्णवेळ साधक होऊ शकता’, असे सुचवलेे. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ होणार.’’ त्या वेळी माझ्या साधनेचा पाया कच्चा असल्याने मला त्याचे महत्त्व कळले नाही. आता त्याचे महत्त्व कळत आहे.

५ ई. मुलांना भेटण्यासाठी आश्रमात गेल्यावर
गुरुदेवांनी आश्रमात राहून साधना करू शकता, असे सुचवणे

कु. दीपाली आणि श्री. राम (मुले) हे दोघे रामनाथी आश्रमात सेवेसाठी गेले. मी त्यांना भेटण्यासाठी रामनाथी आश्रमात गेलो. त्यानंतर २ – ३ दिवसांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमात राहून सेवा करण्याविषयी सुचवले.’

६. रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणे

६ अ. आश्रमात राहू लागल्यावर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया समजून घेणे

१.८.२००६ या दिवसापासून मी रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागलो. त्यापूर्वी मी नामजपाव्यतिरिक्त काहीही करत नव्हतो. त्यामुळे मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेची माहिती नव्हती. मी ती प्रक्रिया अवगत करून घेतल्यावर ‘काय करावे आणि काय करू नये ?’, याची मला जाणीव झाली.

६ आ. लेखाची सेवा अचूकतेने करण्याचा प्रयत्न करणे,
आश्रमात झालेल्या चुकांच्या सत्संगांमधून पुष्कळ शिकायला मिळणे

आश्रमात मी लेखाशी संबंधित सेवा करत होतो. लेखाची सेवा म्हणजे आकड्यांची सेवा ! त्या सेवेत अचूकतेला फार महत्त्व आहे. त्यानुसार मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आढावा सत्संग आणि व्यवस्थापनात सेवा करणार्‍या साधकांनी घेतलेल्या दोन चुकांचे सत्संग यांमधून मला बरेच काही शिकायला मिळाले. ‘आपण कुठे चुकतो ?’, याची जाणीव झाली. त्यानंतर ‘त्या चुका पुन्हा होणार नाहीत’, याकडे मी कटाक्षाने लक्ष दिले.

६ इ. दिलेली सेवा मनापासून करणे

लेखा सेवेच्या व्यतिरिक्त मी अन्य सेवाही करत असे. आयत्या वेळी साधक उपलब्ध नसल्यास भोजनकक्ष आवरणे, धान्य निवडणे, अल्पाहाराची पूर्वसिद्धता करणे, ध्यानमंदिरात आरती करणे इत्यादी सेवा मी मनापासून करायचो.

६ ई. देवाने लहान-लहान इच्छाही पूर्ण करणे

आश्रमात असतांना मला झालेली इच्छा लगेचच पूर्ण होत असे. एखाद्या दिवशी ‘गोड पदार्थ खावा’, असे वाटल्यास त्याच दिवशी महाप्रसादात तो पदार्थ असायचा किंवा कुणीतरी तो पदार्थ मला आणून देत असत.

६ उ. ‘भावपूर्ण सेवा कशी करावी’, हे गुरुदेवांनी इतरांच्या उदाहरणातून शिकवणे

एकदा एक नवीन साधिका टंकलेखन करत होती. तेव्हा ‘आपल्याकडून चुका होतील’, असे तिला वाटत होते. तेव्हा ती प्रार्थना करून आणि देवाला आळवून सेवा करत होती. तिच्या टंकलेखनामध्ये अनेक चुका असूनही गुरुदेवांनी ‘टंकलेखन चांगले झाले’, असे सांगितले. एकदा अन्य एका अनुभवी साधिकेने टंकलेखन केले होते. तिच्या टंकलेखनामध्ये पहिल्या साधिकेच्या तुलनेत अल्प चुका होत्या. तरीही गुरुदेवांनी तिच्या सेवेत ‘अनेक चुका आहेत’, असे सांगितले. तेव्हा मला लक्षात आले की, ‘‘साधकाने त्याच्या स्थितीनुसार भावपूर्ण सेवा केलेली गुरूंना आवडते.’’ त्यामुळे भावपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले.

६ ऊ. इतरांचा आनंद पाहून पुष्कळ आनंद होणे

आश्रमातील एखादी साधिका मला ‘आनंदी कसे रहावे ?’ असे विचारायची. तेव्हा मी सत्मध्ये रहाणे, सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात रहाणे, सकारात्मक रहाणे इत्यादी सूत्रे सांगायचो. नंतर २ दिवसांनी ती म्हणायची, ‘‘आता मी कशी दिसते ? आनंदी दिसते ना ?’’ तेव्हा माझ्याही आनंदात वाढ व्हायची. तो आनंद मी शब्दांत वर्णन करू शकत नाही, आनंदाचे डोही आनंद तरंग !

 

७. परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा वाढवणारे प्रसंग

७ अ. पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यावर रुग्णालयात
दाखल न करता आश्रमातच ठेवल्याने शेवटपर्यंत तिची सेवा करता येणे

वर्ष २००८ मध्ये पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्याने ती आश्रमात खोलीतच राहू लागली. त्या वेळी पत्नीला अनेक वैद्यांना दाखवले; परंतु काहीच उपयोग होत नव्हता. तिला उपचारांसाठी मुंबईला नेण्याचे ठरले. तेव्हा ‘आधुनिक वैद्य रुग्णालयात प्रवेश घेऊन तिला कोमामध्ये ठेवतील अन् लाखो रुपयांचे देयक भरावे लागेल. तिच्याशी संपर्कही रहाणार नाही’, अशी माहिती मला चौकशीअंती समजली. त्यामुळे तिला आश्रमात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मला आणि मुलांना तिची शेवटपर्यंत सेवा करता आली. तेव्हा हे सगळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे शक्य झाले, हे लक्षात आले.

७ आ. साधकांना मार्गदर्शन करतांना काही सूत्रे आपोआप सुचणे

वर्ष २०११ मध्ये मी काही जिल्ह्यांत दौर्‍यावर असतांना साधकांसाठी आवश्यक सूत्रे मला आपोआपच सुचायची आणि ती त्यांना सांगितली जायची. तेव्हा ‘मी काय सांगितले ?’, ते मलाही कळायचे नाही. साधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे माझ्याकडून आपोआप दिली जायची. त्या वेळी त्यातील काही प्रश्‍नांची प्रत्यक्ष उत्तरे मला ठाऊकही नसायची. ‘हे सर्व कोण करतो ?’, याचे चिंतन केल्यावर ‘माझ्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवलेच बोलायचे’, असे लक्षात आले.

७ इ. उत्तर भारतात लेखाची सेवा करतांना तेथील विषम
हवामानाचा त्रास न होणे, तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करता येणे

वर्ष २०१२ नंतर २ वर्षे लेखाशी संबंधित सेवेसाठी मी उत्तर भारतात होतो. तेव्हा मला १२ – १४ घंटे लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागायचा; परंतु कधीही त्रास झाला नाही. त्या कालावधीत मला उत्तर भारतातील साधकांचा प्रेमभाव अनुभवता आला. तेथे उन्हाळ्यात अती उष्ण आणि हिवाळ्यात अती थंडी असे विषम हवामान असायचे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य सतत मिळत असल्याने त्याचा माझ्या शरिरावर परिणाम झाला नाही.

७ ई. घर आणि शेती यांच्या विक्रीच्या वेळी अनेक अडथळे येऊनही व्यवहार पूर्ण होणे

वर्ष २०१६ मध्ये आमचे नाशिकचे घर विकतांना अनेक अडथळे आले. ठरलेला व्यवहारही रहित झाला; परंतु असे झाले, तरी २ वर्षांत विनासायास घर विकले गेले. ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा ! मी शेतजमीनही विकण्याचे ठरवले होते. विक्रीचा व्यवहार होऊ नये; म्हणून बाहेरच्या व्यक्तीकडून प्रयत्न झाले, तरीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच शेतजमिनीचीही विक्री झाली. ‘प्रत्येक प्रसंगात ईश्‍वरच साहाय्य करतो’, असे लक्षात आले.

७ उ. मुलगा श्री. राम याला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. ‘तो आतापर्यंत जगला, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच’, याची जाणीव झाली आणि नामजपादी आध्यात्मिक उपायांचे महत्त्व समजले.

 

८. ६० टक्के ते ७० टक्के या आध्यात्मिक प्रवासातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

८ अ. एकाच वर्षी पती-पत्नी दोघांचीही ६० टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे

ऑक्टोबर २००८ मध्ये प्रथम सौ. निर्मलाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित झाले. त्यानंतर ८ – १५ दिवसांनी माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे सांगण्यात आले. ६० टक्के आध्यात्मिक स्तर झाल्याचे घोषित करणे आणि संत म्हणून घोषित करणे, हे तर ‘न भूतो न भविष्यती’, असे होते. आध्यात्मिक पातळी घोषित होणे, ही केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपाच होती, अन्य काही नव्हते.

८ आ. आरंभी साधकांसाठी केलेला नामजप परिणामकारक होणे,
नंतर नामजपाचा परिणाम दिसत नसल्याचे लक्षात येणे, तेव्हा ‘आता पुढच्या टप्प्यातील
सूक्ष्मातील लढा चालू असून त्यासाठी आध्यात्मिक पातळी वाढवायला हवी’, असे समजणे

माझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर अधूनमधून मी साधकांसाठी नामजप करण्याची सेवा करायचो. तेव्हा ‘साधकांना वाईट शक्तींचे त्रास कसे होत आहेत ?’, हे लक्षात आले. साधकांसाठी नामजप केल्यानंतर तो नामजप परिणामकारक झाल्याचा साधक सांगायचे. ‘काही कालावधीनंतर नामजपाचा परिणाम फारसा दिसत नाही’, असे लक्षात आले. तेव्हा ‘आता ६ व्या आणि ७ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातील लढा आहे अन् तो त्रास कमी करण्यासाठी न्यूनतम ७० टक्के आध्यात्मिक पातळी असणे आवश्यक आहे’, असे दैनिक सनातन प्रभातमध्ये वाचले. ‘साधकांसाठी नामजप करायचा, तर माझी आध्यात्मिक पातळी वाढवणे आवश्यक आहे’, याची मला जाणीव झाली.

८ इ. वर्ष २०१० मध्ये ६६ टक्के आध्यात्मिक पातळी होणे, पुढील वर्षी संत होण्याचे ध्येय ठेवणे

वर्ष २०१० च्या गुरुपौर्णिमेला माझी आध्यात्मिक पातळी ६६ टक्के झाल्याचे घोषित झाले आणि माझा उत्साह वाढला. वर्ष २०११ च्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे (संत होण्याचे) ध्येय ठेवले. त्या काळात मी समष्टीसाठी नामजप करणे, वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांसाठी नामजप करणे अन् साधकांना व्यष्टी साधनेचे मार्गदर्शन करणे, हे प्रयत्न केले.

८ ई. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी संतपदी आरूढ झाल्याचे घोषित केल्यावर आनंदावस्थेत जाणे

११.६.२०११ या दिवशी आश्रमात आलेल्या एका संतांचा सत्कार करण्यासाठी मी चित्रीकरण कक्षात (‘स्टुडिओ’मध्ये) गेलो होतो. तेथे येणार्‍या संतांची वाट पहात असतांना पू. राजेंद्र शिंदे (आताचे सद्गुरु राजेंद्र शिंदे) यांनी मी संत झाल्याचे घोषित केले. मला एवढाच प्रसंग आठवतो. नंतर काय झाले, मी काय बोललो, तेही मला आठवत नाही. ईश्‍वरानेच मला आनंदावस्थेत नेऊन माझ्याकडून चार शब्द वदवून घेतले. आनंद झाला असल्याने मी बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. तो आनंद आणि ती अवस्था शब्दांत वर्णन करू शकत नाही. केवळ ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

 

९. पत्नीच्या देहावसानाच्या वेळी ‘दुःखही नाही आणि आनंदही
नाही’, अशी स्थिती असणे अन् सर्व साधना समष्टीसाठी करण्यास आरंभ होणे

१२.८.२०१० या दिवशी पत्नी सौ. निर्मलाचे निधन झाले. निधन होण्यापूर्वी ती रुग्णाईत असल्याने ‘आता ती काही दिवसांचीच सोबती आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्याच काळात आश्रमात प.पू. पेठेआजी आणि कु. मंगल मयेकर यांचे निधन झाले होते. त्या वेळी माझ्या मनाला काहीही वाटत नव्हते. दुःखही नाही आणि आनंदही नाही. अशीच अवस्था मी सौ. निर्मलाच्या निधनाच्या वेळीही अनुभवण्याचे ठरवले. त्यामुळे मला स्थिर रहाता आले. मनावर मिळवलेला तो मोठा विजय होता. त्यानंतर मला ‘माझी किंमत शून्य आहे’, याची जाणीव झाली. ‘मी कोण, तर कोणीही नाही’, याची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यानंतर ‘स्वतःसाठी काही करायचे नाही. सर्वकाही समष्टीसाठी करायचे’, असे मी ठरवले. त्याप्रमाणे समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा चालू झाली.

 

१०. स्वतःमध्ये झालेले पालट

१० अ. राग येण्याचे प्रमाण उणावणे

पूर्वी मला पुष्कळ राग यायचा. मी कार्यालयातून घरी आलो, तरी कुटुंबातील सदस्य मला घाबरायचे; परंतु आता राग पुष्कळच अल्प झाला आहे. पूर्वी मी स्वतःच्या मतावर ठाम रहायचो. आता ते अल्प होऊन इतरांचे ऐकण्याचे प्रमाण वाढले आहे.

१० आ. बहिर्मुखता उणावणे

पूर्वी माझ्याकडून चेष्टा-मस्करी करणे, विनोदाने बोलणे, असे होत होते. आता त्याचे प्रमाण उणावले आहे. पूर्वीपेक्षा प्रतिक्रियांचे प्रमाणही आता अल्प झाले आहे.

१० इ. साक्षीभावाची स्थिती निर्माण होणे

‘प्रत्येक प्रसंग शिकण्यासाठी आहे’, हे लक्षात घेऊन त्याकडे साक्षीभावाने पहायचा प्रयत्न होतो. एखाद्याचे लग्न ठरले, मुलगा झाला, तर पुष्कळ आनंद होतो, असे नाही. त्याचप्रमाणे एखाद्याचा मृत्यू झाला, तर दुःख होते, असेही नाही. मला याचे काहीही वाटत नाही.

 

११. आलेल्या अनुभूती

११ अ. संत भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनी ते काठीने मारत असल्याचे दिसणे

संत भक्तराज महाराज यांच्या प्रकटदिनी सभागृहात त्यांच्या प्रतिमेचे पूजन चालू होते. तेव्हा मला ‘मी त्यांचे चरण धरले आहेत आणि ते मला काठीने मारत आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले. ते बराच वेळ मला काठीने मारत असूनही मला एकही मार लागला नाही. याचा अर्थ मला नंतर कळला. काठीने मारून त्यांनी माझे प्रारब्ध संपवून माझी आध्यात्मिक प्रगती करून घेतली. ही अनुभूती दिल्याविषयी आणि प्रगती करवून घेतल्याविषयी मी ईश्‍वरचरणी कृतज्ञ आहे.

११ आ. आरतीच्या सेवेच्या वेळी चंदन उगाळतांना भगवंताला
आर्ततेने प्रार्थना होणे, तेव्हा श्रीकृष्णानेही प्रत्युत्तर केल्याचे ऐकू येणे

आश्रमातील सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहित घरी गेल्याने ३ दिवस सकाळी ध्यानमंदिरातील आरती करण्याची सेवा माझ्याकडे होती. आरतीची सेवा करत असतांना मी चंदन उगाळत होतो. त्या वेळी ‘आता माझी क्षमता नाही. तूच ही सेवा करून घे’, अशी प्रार्थना झाली. तेव्हा श्रीकृष्णाने मला सूक्ष्मातून सांगितले, ‘घासितो नाथा घरी चंदन । म्हणजे मीच चंदन उगाळत आहे.’ तेव्हा ‘ईश्‍वरच सर्व करत आहे’, याची जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त झाली.’

– (पू.) श्री. पद्माकर होनप, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०१८)

Leave a Comment