केरळ राज्यातील साडे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या वेढ्यात घेणारा भयावह जलप्रलय !

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ – कौशिकपद्धति

अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.

तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

ऑगस्ट २०१८ मध्ये केरळ राज्यात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पूर्ण राज्यात पूर आला होता. अनेकांचा जीव घेणारा आणि सहस्त्रो कोटी रुपयांच्या हानीस कारणीभूत ठरणारा हा पूर केरळ राज्याने ९० वर्षांनंतर अनुभवला. या महापुराने ३७० हून अधिक लोकांचा जीव घेतला असून एकंदर ६.५ लाखांपेक्षा अधिक लोकांना ३ सहस्र ४४६ निर्वासित शिबिरांमध्ये स्थलांतरित केले. केरळमधील १४ जिल्ह्यांमध्ये काही दिवस ‘रेड अलर्ट’ होता. राज्याला २० सहस्र कोटींचे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केंद्र सरकारला कळवले. राज्यातील २११ पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये भूस्खलन झाले. २० सहस्रांपेक्षा अधिक घरे आणि एकंदर ५० सहस्र किमी एवढे रस्ते नष्ट झाले. २१० पेक्षा अधिक पूल जमीनदोस्त झाले. अनेक शाळा, आरोग्य केंद्रे, पंचायत इमारती इत्यादीही नष्ट झाल्या. राज्याला पूर्वस्थितीत यायला अनेक मास लागतील.

सैन्य, नौदल, वायुसेना, कोस्ट गार्ड, एन्.डी.आर्.एफ्. चे ५७ संघ असे १३०० कर्मचारी, ४३५ नौका, ३८ हेलीकॉप्टर, २० एयरक्राफ्ट असे सगळे या बचाव कार्यात लागले आहेत. अनेक स्थानिक लोक, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘सेवा भारती’ ही संघटना या साहाय्याच्या कार्यात अनेक दिवसांपासून लागली आहे.

अनेक दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने केरळमधील २७ धरणांची द्वारे उघडावी लागली. त्याचाच परिणाम म्हणून पुराचे पाणी शिरलेल्या या गावाचे हेलीकॉप्टरमधून टिपलेले छायाचित्र !

 

केरळमधील एका नदीच्या भयावह प्रवाहापासून वाचण्यासाठी पुलावरून आपला जीव मुठीत धरून पळत असलेले लोक !

 

गावातून वहाणारे पुराचे पाणी आणि मुसळधार पाऊस यांमुळे एका घराचे कोसळलेले छत (गोलात दाखवले आहे.)

 

पाण्याने वेढलेल्या केरळच्या एका गावातील वयस्कर नागरिकांना होडीतून सुरक्षित स्थळी हलवतांनाचा क्षण !

१. केरळमधील २७ धरण उघडले !

विनाशकारी पुराच्या पाण्याचा साठा वाढत गेल्याने केरळमधील २७ छोट्या आणि मोठ्या धरणांचे द्वार उघडावे लागले. आशियामधील ‘आर्च’ धरणांपैकी सगळ्यांत मोठे धरण असलेले इडुक्की धरण २६ वर्षांनी उघडण्यात आले. या धरणाची क्षमता २४०३ फूट एवढी आहे, तर धरणातील पाण्याची पातळी २४०० फुटांपर्यंत पोहोचली होती. धरणांमधून पाणी सोडल्यामुळे नद्यांमधील पाणी वाढले आणि त्यामुळे केरळमधील अनेक जिल्हे पाण्यात गेले. नद्यांमधील वाढलेल्या पाण्यामुळे खाडी आणि तळे यांतील पाणीही वाढले.

 

२. उत्खनन आणि वनभूमीवरील अनधिकृत
अतिक्रमणच या नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत !

‘वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्स्पर्ट पॅनेल’ नावाच्या पर्यावरण शास्त्रज्ञांच्या एका समितीने पुराच्या संकटात सापडलेल्या जिल्ह्यांपैकी बरीच क्षेत्रे पर्यावरणशास्त्रीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रे म्हणून आधीच गणली आहेत. याच समितीला ‘गाडगीळ कमिटी’ असेही म्हटले जाते. बेंगळूरूतील जगप्रसिद्ध ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’चे संस्थापक माधव गाडगीळ यांनी वर्ष २०११ मध्येच सरकारला हा अहवाल सुपूर्द केला होता. त्या अहवालाप्रमाणे पश्‍चिम घाटातील १.४ लाख चौरस किमी क्षेत्रामध्ये पर्यावरण संरक्षण करणे अपेक्षित आहे. येथे खाणकाम, उत्खनन तसेच जंगलांवर अतिक्रमण, उंच इमारतींचे बांधकाम इत्यादींना प्रतिबंधित करावे, असे म्हटले होते; पण केरळ सरकारने त्या अहवालाकडे कानाडोळा केला. पर्यावरणशास्त्रज्ञ केरळमधील या आपत्तीला अधिक करून उत्खनन आणि वनभूमीवरील अनधिकृत अतिक्रमण यांनाच कारणीभूत ठरवत आहेत.

 

३. सुरक्षाकार्यात येत असलेल्या भयावह अडचणी

३ अ. भौगोलिक स्थिती

केरळमध्ये साहाय्याला आलेले सैन्य तसेच इतर संघांना स्थानिक भौगोलिक स्थितीची माहिती नसल्याने आणि सरकारी कार्यालयांमधून त्यांना वेळोवेळी साहाय्य मिळत नसल्यामुळे काही ठिकाणी या कार्याला वेळ लागत होता. आलुवा आणि चेंगन्नूर या ठिकाणी अनेक लोक घरांमधे फसल्याचे कळत होते; पण पाऊस आणि पुराचे पाणी यांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण जात होते. पाणी भरलेल्या ठिकाणी केवळ हेलीकॉप्टर किंवा होडीनेच लोकांना वाचवणे शक्य होते. काही ठिकाणी होडी घेऊन गेल्यावर काही अंतरावर पाण्याचा स्तर कमी झाल्यामुळे लोकांना होडी ढकलून पुढे न्यावी लागत होती. काही ठिकाणी होडी या बुडलेल्या घरांच्या छतांना लागून अडकणे, बुडणे किंवा तुटणे असेही घडत होते.

पूल आणि रस्ते तुटल्यामुळे इडुक्की जिल्ह्याशी संपर्क तुटला होता. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळात पाणी शिरल्यामुळे तेथील एक भिंत कोसळली. त्यामुळे विमानतळ बंद ठेवावे लागले. पूर्ण केरळमधे २ दिवस आगगाड्या बंद होत्या.

३ आ. सरकारी व्यवस्था, नियोजन इत्यादी अनेक गोष्टींमध्ये न्यूनता असल्याचे आढळणे !

संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले. काही ठिकाणी सैन्य येऊन पोहोचले होते; पण स्थानिक सरकारी कार्यालयांतून त्यांना पुढची दिशा दिली जात नव्हती. राज्य सरकारकडून अन्न, वस्त्र इत्यादी पोहोचवण्याची व्यवस्था पुष्कळ उशिराने केली गेली. सैन्याने स्वतःसमवेत आणलेल्या साहित्याने लोकांना साहाय्य केले. साहाय्याला अनेक ठिकाणांहून लोक होडी घेऊन पोहोचले, तरीही होडींची नोंदणी झाल्याशिवाय त्यांना पाठवू शकत नसल्याने नोंदणी होईपर्यंत थांबावे लागत होते.

३ इ. लोकांमधील सहकार्य करण्याच्या वृत्तीचा अभाव !

काही ठिकाणी धरणातील पाणी सोडल्यामुळे लोकांना घर सोडून शिबिरांमध्ये जायला सरकारी कर्मचारी, पोलीस यांनी कळवले होते, तरीही ते गेले नाहीत. नंतर पाणी भरल्यावर त्यांना वाचवायला अनेक कष्ट घ्यावे लागले. काही ठिकाणी स्थिती पहायला गेलेल्या लोकांमुळे सुरक्षाकार्यासाठी जात असलेल्या गाड्यांचा वेग मंदावत होता.

३ ई. केंद्र सरकारकडून उशिराने साहाय्य मागितले !

विरोधी पक्षांतील नेत्यांनी सांगूनही मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांनी केंद्र सरकारकडून वेळीच साहाय्य मागितले नाही. परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी केंद्राकडे साहाय्य मागितले आणि त्यानंतर सैन्याचे साहाय्य मिळाले.

३ उ. लोकांना वाचवण्यात आलेल्या अन्य काही अडचणी !

काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्यावर लोक घराच्या वरच्या मजल्यावर जाऊ लागले. पाण्याचा स्तर वाढत गेल्यामुळे ज्यांना छताकडे जायला शक्य होते, त्यांना वाचवता आले; पण छताकडे जायला वाट नसणार्‍यांना घरातून बाहेर काढणे शक्य झाले नाही. काही ठिकाणी विषारी साप असल्यामुळे सुरक्षाव्यवस्थेत अडचणी येत होत्या. अनेक गावांकडे जायला बांधलेले पूल तुटून गेले होते. काही घाटांमध्ये भूस्खलन झाल्याने इमारती कोसळल्या आणि तेथे पोहोचणे कठीण असल्यामुळे लोकांना वाचवणेही कठीण होऊ लागले. ‘देश-विदेशांतून लोक अर्थसाहाय्य करायला सिद्ध होते, पण सगळीकडे ए.टी.एम्. बंद होते’, अशी स्थिती झाली होती. शुद्ध पाणी, अन्न, वस्त्र यांचाही अभाव भासला. वीज, शुद्ध पाणी, ऑक्सिजन (प्राणवायू) यांच्या अभावामुळे ‘मल्टी-स्पेशॅलिटी हॅास्पिटल’ही अडचणीत होते. काही चिकित्सालयांमध्ये पाणी शिरल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

 

४. ‘सोशल मीडिया’ तसेच ‘गूगल मॅप’
यांच्यामुळे अनेकांना वाचवण्यात यश !

घरांमध्ये अडकलेल्या लोकांनी वृत्तवाहिन्या, सुरक्षा कार्यालये तसेच नातेवाइक यांना ‘सोशल मीडिया’च्या माध्यमांतून कळवल्यामुळे त्यांना वाचवता आले. लोक ‘गूगल मॅप’च्या साहाय्याने ‘लोकेशन’ पाठवत. त्यामुळे हेलिकॉप्टर चालक अचूक ठिकाणी पोहोचून अडकलेल्या लोकांना त्यांच्या घराच्या छतावरून सुरक्षित ठिकाणी घेऊन जात. वृत्तवाहिन्यांवरून पुरात फसलेल्या लोकांबद्दल नियमित माहिती दिली जात होती. त्यामुळे  ही त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य होत होते.

केरळमध्ये आलेला हा महाप्रलय अतिभयंकर होता. अशा भयंकर स्थितीतून ईश्‍वरच आपल्याला वाचवू शकतो. काही आठवड्यांपूर्वी शबरीमला येथे स्त्रियांच्या प्रवेशावरून अनेक वाद झाले. सर्वोच्च न्यायालयाकडून स्त्रियांना प्रवेश देण्याचे निर्देशही देण्यात आले. पूरग्रस्त स्थितीत शबरीमला पर्वताच्या खालून वाहणार्‍या पंबा नदीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आणि ते ही अतिवेगाने येत असल्यामुळे त्या जिल्ह्यातील लोकांची स्थिती अत्यंत दुर्दैवी झाली होती. ‘शबरीमलामध्ये आता कोणीही यायला नको, अशी देवाची इच्छा आहे आणि हा प्रलय देवाच्या कोपामुळे झाला’, असेही अनेक भक्तांना वाटत आहे.

– कु. रश्मि परमेश्‍वरन्, केरळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment