श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !

आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्‍त अध्यात्मशास्त्रीय माहिती या लेखामध्ये दिली आहे. प्रथम आपण श्री गणेशाचा कार्यारंभी म्हणायचा श्‍लोक बघूया.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.

श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.

श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये

१. विघ्नहर्ता

विघ्नहर्ता असल्याने लोकनाट्यापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.

२. विवेकबुद्धी निर्माण करून चित्त शांत करणारा

श्री गणेश हा ब्रह्मांडातील दूूषित शक्ती आकर्षून घेणारा आहे, तसेच मनुष्याच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करणारा आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे विकल्पशक्ती प्रभाव पाडत नाही. बुद्धी स्थिर राहून चित्त शांत रहाते. ‘मी कोण, भगवंताने मला या जगतात कशासाठी पाठवले, याची साधकाला जाणीव होऊन तो श्रद्धापूर्वक कार्य करू लागतो. साधकाच्या भावात वाढ होऊन त्याची उत्तरोत्तर प्रगती होऊ लागते. – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३. संगीत आणि नृत्य यांत प्रवीण असलेला

स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार. श्री गणेशालाही ओंकारस्वरूप श्री गणेशा असे म्हटले आहे. श्री गणेश वरदस्तोत्रातील अनेक श्‍लोकांवरून गणेशाचे संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ज्ञानेश्‍वरमाउली, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी आदी संतांच्या अभंगरचनांतूनही गणेशाचा संगीताशी असलेला निकटचा संबंध लक्षात येतो. नर्तकरूपातील गणरायाच्या मूर्तीही आढळतात. सोनेरी देहकांतीच्या या गणपतीला आठ हात असून त्याचा डावा पाय पद्मासनात आहे, तर उजवा पाय अधांतरी आहे. मध्व मुनीश्‍वरांनी ये गणराया मंगलमूर्ति । पतित पावन दीनदयाळा । त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती । कीर्तनरंगी नृत्य करी रे, संगीताची मिळवूनी पूर्ती ॥, अशी श्री गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णिली आहे. गजाननाचे नृत्य पाहून गंधर्व-अप्सराही लज्जित होतात, असे सांगतांना कवी मोरोपंतांनी श्री गणेशाचे मनोहर रूप शब्दसंपदेने आणि कल्पनासौंदर्याने उत्तमरित्या चितारले आहे.

४. वाक्देवता

गणेश प्रसन्न झाला की, वाक्सिद्धी प्राप्त होते.

५. श्री गणपति साधनेला प्रारंभीची दिशा देण्याचे कार्य करतो.

 

श्री गणेश चतुर्थी चलच्चित्रपट (Shri Ganesh Chaturthi Video)

 

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन करण्याचे महत्त्व !

श्री गणपति Ganpati

श्री गणपति

गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात.

गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात.गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.

श्री गणेश हे सर्व संतांनी गौरविलेले आराध्यदैवत आहे. निरनिराळ्या साधना मार्गांतील संत वेगवेगळ्या देवतांचे भक्‍त असले, तरी सर्व संतांनी श्री गणेशाची आळवणी आणि त्याचे स्तवन आवर्जून केले आहे. मराठी संतवाङ्मयातून तर श्री गणेशाचे लौकिक आणि पारलौकिक स्वरूपाचे वर्णन मोठ्या सुबकरित्या केलेले आढळते.

 

डाव्या सोंडेचा गणपति अध्यात्माला पूरक असणे !

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. ‘उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्‍तीशाली आणि जागृत आहे’, असे म्हटले जाते. पूजेत उजव्या सोंडेचा गणपति असल्यास कर्मकांडातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून दैनंदिन पूजाविधी पार पाडावे लागतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे शक्य होत नसल्याने पूजाविधीमध्ये चुका होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. यासाठी पूजेत शक्यतो उजव्या सोंडेचा गणपति ठेवू नये. याउलट डाव्या सोंडेचा गणपति तारक स्वरूपाचा आणि अध्यात्माला पूरक असतो. याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

 

श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तू असण्याचे कारण !

देवतेची पवित्रके म्हणजे देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण. ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच त्या देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो.

या तत्त्वानुसार श्री गणेशाच्या पूजेत तांबड्या रंगांच्या वस्तूंचा उपयोग करावा. तांबड्या रंगात गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे मूर्ती अल्पावधीत जागृत होण्यास साहाय्य होते. यासाठीच श्री गणेशाच्या पूजेत रक्‍तचंदन वापरतात.

 

श्री गणेशाला गंध, हळद-कुंकू वहाण्याची पद्धत !

पूजा करतांना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्‍तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

 

श्री गणेशाला लाल फुले वहाण्याचे महत्त्व आणि प्रमाण !

विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे गणेशतत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

श्री गणेशाला लाल फूल वहाणे
श्री गणेशाला लाल फूल वहाणे

देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्री गणेशाला फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना ‘दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील’, अशा पद्धतीने फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वाहतांना ‘देठ श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल’, असे वाहावे.

 

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

श्री गणेशाला दूर्वा वहाण्याचे कारण आणि पद्धत !

श्री गणेशाला दूर्वा वहाणे
श्री गणेशाला दूर्वा वहाणे

दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा वहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशालादूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५, ७, २१ इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. समिधा एकत्र बांधतो, तशा दूर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो. या गंधामुळे गणेशतत्त्व मूर्तीकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि टिकूनही रहाते. यासाठी दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाव्यात; म्हणून पाण्यात भिजवून मग वहाव्यात. दूर्वा वहातांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला साहाय्य होते.

शमीची आणि मंदारची पत्री वहाणे

शमीमध्ये अग्नीचा वास आहे. आपली शस्त्रे तेजस्वी रहावीत म्हणून पांडवांनी ती शमीवृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. मंथन करून ज्यावेळी अग्नी काढतात, तो मंथा शमीवृक्षाचा असतो. मंदार हे वानस्पत्य रसायन आहे.

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

 

श्री गणेशाच्या तारक आणि मारक तत्त्वाप्रमाणे वापरायच्या उदबत्ती !

श्री गणेशाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता चंदन, केवडा, चमेली आणि वाळा यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात. श्री गणेशाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात. भक्‍तीच्या आरंभीच्या टप्प्यात, म्हणजे द्वैतात असतांना देवतेला दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे. उपासकाने भक्‍तीच्या पुढच्या टप्प्यात, अद्वैताकडे जाण्यासाठी एका उदबत्तीने ओवाळावे. देवतेला उदबत्तीने ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्या जवळील बोट आणि अंगठा यांत धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावे.

सनातनने सात्त्विक उदबत्त्यांची निर्मिती केली आहे.

 

श्री गणेशाला प्रदक्षिणा घालणे !

श्री गणेशाचे दर्शन घेतल्यावर त्याला न्यूनतम ८ प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्यतो ८ च्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

 

श्री गणेशाच्या उपासनेच्या अंतर्गत करावयाच्या कृती

श्री गणेशाला गंध कोणत्या बोटाने लावावे ? अनामिकेने (करंगळीच्या जवळचे बोट)
फुले कोणती वाहावीत ? लाल जास्वंद/ लाल रंगाची अन्य फुले
कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ? चंदन / केवडा / चमेली
उदबत्त्यांची संख्या किती असावी दोन
अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ? हीना
श्री गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात ? आठ किंवा आठच्या पटीत

३. श्री गणेशपूजेला आरंभ करतांना करायच्या प्रार्थना

अ. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.

आ. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.

४. गणेशोत्सवाच्या काळात करायची प्रार्थना : हे श्री गणेशा, गणेशोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा सहस्र पट कार्यरत असलेल्या तुझ्या तत्त्वाचा मला अधिकाधिक लाभ होऊ दे.

 

श्रीगणेशाचा नामजप ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !
श्रीगणेशाची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या रांगोळ्या पहाण्यासाठी ‘क्लिक’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘गणपति’

Leave a Comment