
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आणि प.पू. डॉक्टरांच्या आशीर्वादाने रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आणि देवद आश्रमात विविध माध्यमांतून प्राप्त झालेले दैवी नाद, तसेच त्यांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दैवी नादांच्या उपयोगाने आपल्या साधनेला गती मिळणार असून, यातील काही नाद भावजागृतीसाठी, तसेच काही नाद आध्यात्मिक उपायांसाठीही उपयुक्त आहेत.
कधी कधी भावजागृतीचा नादही आपल्यावर उपाय करणारा ठरतो, तर काही मारक नादांतूनही काही जणांची भावजागृती होऊ शकते, म्हणजेच हे नाद त्याच्या प्रकृतीला आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक ठरतात, याविषयीचे निकष आपापल्या स्तरावर प्रयोग करूनच ठरवावेत.
प्रकृतीप्रमाणे त्या त्या साधकाला ते ते तारक आणि मारक तत्त्वाचे नाद आवडतात; म्हणून ‘एखाद्या साधकाला एखादा नाद आवडत असल्याने आपल्यालाही तोच नाद आवडला पाहिजे’, असे सूत्र येथे उपयोगी पडत नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तेवढे साधनामार्ग !’, या उक्तीप्रमाणे प्रत्येकाची आवड-निवड निराळी आहे; म्हणून साधकांनी यात एकमेकांशी तुलना न करता आपापल्या स्तरावर नादांचा भावपूर्ण पद्धतीने अधिक लाभ कसा करून घेता येईल, हे पहावे. आपल्या प्रकृतीला जो नाद ऐकून चांगले वाटते, तो नाद त्या त्या साधकाने साधनेसाठी ऐकावा.
देवाने आपल्याला या दैवी नादांच्या माध्यमातून आकाशतत्त्वाच्या स्तरावरील उच्च चैतन्याचा स्रोत उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया आणि या नादांच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून घेऊन गुरुकृपेला पात्र होऊया !
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्गशीर्ष कृ. ६, कलियुग वर्ष ५११३ १६.१२.२०११))
१. विविध दैवी नाद उपलब्ध करून देऊन ‘साधकांना तीव्र त्रास होत असतांना
त्यांना साहाय्य कसे करायचे’, ही प.पू. डॉक्टरांची चिंता ईश्वराने दूर करणे
‘आपत्काळाची तीव्रता जशी वाढत आहे, त्या प्रमाणात देश-विदेशांतील हजारो साधकांच्या होणार्या आध्यात्मिक त्रासांची तीव्रताही वाढत आहे. आता ६० टक्क्यांहून जास्त पातळीच्या साधकांचे उपाय तीव्र त्रास असलेल्या साधकांत विशेष परिणामकारक होतांना दिसत नाहीत. सनातनच्या संतांची सध्याची १० ही संख्याही अतिशय अपुरी आहे. ‘या स्थितीत काय करायचे’, या विचारात मी असतांना २३.६.२०११ या दिवशी दुपारी ३.१८ वाजता पहिला दैवी नाद ध्वनीमुद्रित करता आला. त्याची उपाय करण्याची क्षमता सर्वत्रच्या हजारो साधकांनी अनुभवली. २८.११.२०११ या दिवसापर्यंत एकूण १५ दैवी नाद ध्वनीमुद्रित करता आले. ईश्वराने विविध दैवी नाद का उपलब्ध करून दिले, याचा उलगडा १३.१२.२०११ या दिवशी झाला. रामनाथी आश्रमातील ज्ञानेश नावाचा एक साधक तीव्र पोटदुखीने गेले वर्षभर आजारी आहे. रुग्णालयात अनेकदा केलेल्या विविध चाचण्यांत कोणत्याही आजाराचे निदान होत नाही. तो दिवसभर खोलीत पडूनच स्वतःवर उपाय करतो. तरी या उपायांनी वेदना सहन होण्याइतपत न्यून झाल्या नाहीत. तेव्हा त्याला १५ दैवी नाद प्रत्येकी २-३ मिनिटे ऐकून त्यांपैकी ज्या नादाने सर्वांत अधिक लाभ होत आहे, तो सातत्याने ऐकण्यास सांगितले. त्याला त्याचा लाभ झाला. दुसर्या दिवशी तीव्र त्रास होणार्या तीन साधिकांना नाद ऐकून त्यांपैकी ज्या नादाने सर्वांत अधिक लाभ होत आहे, तो ऐकण्यास सांगितले. त्यांनाही लाभ झाला. त्यामुळे ‘साधकांना तीव्र त्रास होत असतांना त्यांना साहाय्य कसे करायचे’, ही माझी चिंता ईश्वराने दूर केली. त्यानंतर नादाच्या संदर्भात अनेक साधकांना अनुभूतीही आल्या.
पूर्वी मी साधकांना सप्तदेवतांच्या नामाचा प्रयोग करून ज्या देवतेचा नामजप परिणामकारक वाटतो, तो करायला सांगत असे. त्याची या प्रसंगाने आठवण झाली.’
– डॉ. आठवले (मार्गशीर्ष कृ. ५, कलियुग वर्ष ५११३ (१५.१२.२०११))
२. विविध प्रकारचे दैवी नाद ध्वनीमुद्रित केल्याचा दिनांक आणि वेळ,
निर्मितीचे स्थळ, माध्यम, त्रिगुणांचे प्रमाण, तत्त्व, वैशिष्ट्य आणि संबंधित योगमार्ग
सर्व नादांची परिणामकारकता ७० टक्के आहे.
१. साधनेला सुरुवात करायला उद्युक्त करणारे नाद
नाद ध्वनिमुद्रित केल्याचा दिनांक आणि वेळ | निर्मितीचे स्थळ | माध्यम | त्रिगुणांचे प्रमाण | तत्त्व | संबंधित योगमार्ग | वैशिष्ट्य |
---|---|---|---|---|---|---|
दैवी नाद – साधना (अ) २४.१०.२०११, दुपारी २.४५ |
प.पू. डॉक्टरांची खोली | वातानुकुलीत यंत्राजवळील पंखा (गती ‘२’ वर नियंत्रित) | ५०-३०-२० | तारक | – | ‘ साधनेला सुरुवात करा !’, असे सांगणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (आ) २.११.२०११, रात्री २.३० |
पूर्वी पू. पेठेआजी रहात असलेली परंतु आता आध्यात्मिक उपायांसाठी वापरण्यात येणारी खोली | खिडकीजवळचा पंखा | ५०-३०-२० | तारक | – | ‘साधनेत त्वरा करा !’, असे सांगणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (इ) १९.१०.२०११, रात्री ८ |
नवीन अभ्यासिका | प्रवेशद्वाराच्या जवळचा पंखा (गती ‘३ वर नियंत्रित) | ५०-३०-२० | तारक | – | ‘सातत्याने साधना करा’, असे सांगणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (ई) २४.१०.२०११, दुपारी २.३० |
प.पू. डॉक्टरांची खोली | वातानुकुलीत यंत्राजवळील पंखा (गती ‘१’ वर नियंत्रित) | ५०-३०-२० | तारक | भक्तीयोग (भाव जागृत करणारा) | ‘जागृत व्हा, साधना करायला लागा’, असे सांगणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (उ) २४.१०.२०११, दुपारी २.३५ |
प.पू. डॉक्टरांची खोली | वातानुकुलीत यंत्राजवळील पंखा (गती ‘१’ वर नियंत्रित) | ५०-३०-२० | तारक | भक्तीयोग (भाव जागृती अधिक करणारा) | कृतीला उत्तेजन देणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (ऊ) २४.१०.२०११ दुपारी ३ |
प.पू. डॉक्टरांची खोली | वातानुकुलीत यंत्राजवळील पंखा (गती ‘४’ वर नियंत्रित) | ५०-३०-२० | तारक | भक्तीयोग (समष्टी कार्य) | सतत कृतीशील करणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (ए) २४.१०.२०११, दुपारी ३.१० |
प.पू. डॉक्टरांची खोली | वातानुकुलीत यंत्राजवळील पंखा (गती ‘५’ वर नियंत्रित) | ५०-४०-१० | तारक | कर्मयोग | सतत कृतीला प्रवृत्त करणारा; परंतु सौम्य स्वरूपाचा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (ऐ) ७.११.२०११, दुपारी २.४० |
रामनाथी आश्रमातील ‘प्रसाद भांडारा’ची खोली | शीतकपाट | ५०-४०-१० | तारक | कर्मयोग | सतत कृतीशील करणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – साधना (ओ) २८.११.२०११, रात्री १.३०* |
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील ‘गाढी’ नदीचा काठ | वातावरणात उमटलेला नाद | ५०-३०-२० | मारक | कर्मयोग | सतत कृतीशील करणारा |
ऐका Audio Player |
२. भावजागृती करणारे नाद
नाद ध्वनिमुद्रित केल्याचा दिनांक आणि वेळ | निर्मितीचे स्थळ | माध्यम | त्रिगुणांचे प्रमाण | तत्त्व | संबंधित योगमार्ग | वैशिष्ट्य |
दैवी नाद – भावजागृती (१) १०.१०.२०११, रात्री ९.३०** |
नवीन अभ्यासिका | प.पू. डॉक्टर सध्या वापरत असलेले हिरव्या रंगाचे शीतयंत्र | ५०-३०-२० | तारक | भक्तीयोग (थोड्या प्रमाणात भावजागृती करणारा) | साधनेसाठी उद्युक्त करणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – भावजागृती (२) ३१.१०.२०११, सायं. ७.१५*** |
नवीन अभ्यासिका | प.पू. डॉक्टर सध्या वापरत असलेले हिरव्या रंगाचे शीतयंत्र | ६०-३०-१० | तारक | भक्तीयोग | भक्तीत रंगवून टाकणारा |
ऐका Audio Player |
३. साधनेतील अडथळे दूर करणारे आणि आध्यात्मिक उपाय करणारे नाद
नाद ध्वनिमुद्रित केल्याचा दिनांक आणि वेळ | निर्मितीचे स्थळ | माध्यम | त्रिगुणांचे प्रमाण | तत्त्व | संबंधित योगमार्ग | वैशिष्ट्य |
दैवी नाद – उपाय (अ) २३.९.२०११, दुपारी १.४०. |
नवीन अभ्यासिका | प.पू. डॉक्टर पूर्वी वापरत असलेले पांढर्या रंगाचे शीतयंत्र | ५०-४०-१० | तारक आणि सौम्य मारक | – | साधनेतील अडथळे दूर करणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – उपाय (आ) २३.६.२०११, दुपारी ३.१८ (पहिला नाद) |
प.पू. डॉक्टरांची खोली | स्नानगृहाजवळील छताजवळच्या वातावरणात आलेला नाद (अश्वनाद) | ५०-३०-२० | मारक-तारक | – | मारक, तसेच भावजागृतीही करणारा |
ऐका Audio Player |
||||||
दैवी नाद – उपाय (इ) ३०.९.२०११, दुपारी २.३० |
नवीन अभ्यासिका | प.पू. डॉक्टर सध्या वापरत असलेले हिरव्या रंगाचे शीतयंत्र |
५०-३०-२० | मारक | – | सलग मारक तत्त्व प्रक्षेपित करणारा |
ऐका Audio Player |
४. दैवी नाद आणि आसुरी नाद यांचे युद्ध दर्शवणारा नाद
नाद ध्वनिमुद्रित केल्याचा दिनांक आणि वेळ | निर्मितीचे स्थळ | माध्यम | त्रिगुणांचे प्रमाण | तत्त्व | संबंधित योगमार्ग | वैशिष्ट्य |
दैवी नाद – युद्ध (अ) २८.११.२०११, रात्री ११.३० **** |
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील ‘गाढी’ नदीचा काठ | वातावरणात उमटलेला नाद | ५०-४०-१० | अधिक मारक | – | वातावरणात उमटलेला दैवी नाद आणि तो उमटू नये; म्हणून व्यत्यय आणणारा आसुरी नाद या दोन नादांचे मिश्रण असलेला नाद ***** |
ऐका Audio Player |
Click here to download all Divine (Sattvik) Sounds in a ZIP file
* हा नाद रात्री १२.३५ ते सकाळी ७ पर्यंत चालू होता.
** आणि *** हे शीतयंत्र अन्य खोलीत (अभ्यासिकेत) नेल्यावर नाद ऐकू आला नाही; मात्र पुन्हा प.पू. डॉक्टर ग्रंथलिखाण करत असलेल्या खोलीत आणल्यावर नाद ऐकू आला. यावरून स्थळाचे महत्त्व लक्षात आले.
**** हा नाद रात्री १०.३० ते १२.३५ पर्यंत सुरू होता.
***** वातावरणात उमटलेला दैवी नाद आणि तो उमटू नये; म्हणून व्यत्यय आणणारा आसुरी नाद या दोन नादांचे मिश्रण असलेला नाद यातील दैवी नाद हा रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या खोलीत उमटलेल्या मूळ नादतत्त्वाचेच पडसादात्मक रूप आहे. हा नाद व्यापक प्रमाणात वातावरणात पसरत चालला असल्याने आसुरी शक्तीही त्याला त्रासदायक नादाच्या माध्यमातून विरोध करत असल्याचे हे उदाहरण आहे.
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्गशीर्ष कृ. ३, कलियुग वर्ष ५११३ (१३.१२.२०११))
३. प.पू. डॉक्टरांच्या तळमळीमुळे संपूर्ण मानवजातीला प्राप्त झालेले दैवी नाद !
संतांचे कार्य हे केवळ जगाच्या उद्धारासाठीच असते. त्यांची प्रत्येक गोष्ट ही समष्टीच्या कल्याणासाठीच असते. संतांच्या अस्तित्वामुळे आणि संकल्पामुळे अनेक जिवांचा उद्धार होत असतो. संत सतत सर्वांच्या कल्याणाचाच विचार करत असतात. हा त्यांचा विचारच संकल्प बनून कार्य करतो. समष्टी कल्याणासाठी संकल्पाने कार्य करणार्या संतांपैकी एक आहेत प.पू. डॉ. जयंत आठवले (प.पू. डॉक्टर).
आज जगभरात सगळ्याच ठिकाणी वाईट शक्तींचा प्रादुर्भाव वाढला आहे. साधना करणार्या व्यक्तींच्या साधनेत वाईट शक्ती अनेक प्रकारे अडथळे आणत आहेत. ‘हे अडथळे दूर कसे होतील’, याचा विचार प.पू. डॉक्टरांच्या मनात येत होता. ते या विचारात असतांनाच २३.६.२०११ या दिवशी दुपारी ३.१८ वाजता कोणतेही स्थुलातील कारण नसतांना त्यांच्या रामनाथी आश्रमातील रहात्या खोलीत एक नाद ऐकू आला. तो नाद ध्वनीमुद्रित करण्यात आला. ‘या नादामुळे वाईट शक्तींचा त्रास असणार्यांवर आध्यात्मिक उपाय होऊ शकतात’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले. तो ऐकणार्यांचा त्रास दूर होण्याबरोबरच त्यांना विविध चांगल्या अनुभूतीही आल्या. यातून तो नाद दैवी असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर २८.११.२०११ या दिवसापर्यंत १५ प्रकारचे विविध दैवी नाद प.पू. डॉक्टरांच्या रहात्या खोलीत आणि ते सेवा करत असलेल्या अभ्यासिकेत ते वापरत असलेला पंखा आणि शीतयंत्र या उपकरणांतून, तसेच त्यांच्यासाठी वापरत असलेल्या शीतकपाटातून ऐकू आले. त्यानंतर देवद आश्रमाच्या परिसरातही नाद ऐकू आला. या नादांची उपाय करण्याची क्षमता सर्वत्रच्या हजारो साधकांनी अनुभवली. ‘जगभरातील साधना करणार्या जिवांना होणारा वाईट शक्तींचा त्रास अल्प कसा होईल’, ही तळमळ प.पू. डॉक्टरांच्या मनात असल्याने ईश्वराने संपूर्ण मानवजातीसाठी अमूल्य अशी ही भेट दिली आहे. यातून प.पू. डॉक्टरांच्या मनात समष्टीविषयी असलेले पितृतूल्य निरपेक्ष प्रेम लक्षात येते.
हे नाद ऐकतांना ‘कोणत्या नादाने आपल्याला त्रास होतो, आपल्या त्रासांमधे वाढ होते किंवा कोणत्या नादाने चांगले वाटते’, ते पहावे आणि ‘तो नाद आपल्यासाठी आवश्यक आहे’, असे समजावे.
वाईट शक्तींचा त्रास नसलेल्यांना एखाद्या नादाने त्रास झाला, तर त्यांना त्रास आहे, असे समजावे. त्यांनी, तसेच वाईट शक्तींचा त्रास असणार्या व्यक्तींना जो नाद ऐकून त्यांच्या त्रासाचे प्रमाण वाढते त्यांनी तो नाद त्रास असह्य होईपर्यंत ऐकावा; कारण तेव्हा उपाय होत असतात. नाद ऐकणे असह्य झाल्यावर तो नाद न ऐकता जो नाद ऐकून चांगले वाटते, तो नाद त्रासाचे प्रमाण न्यून होईपर्यंत ऐकावा. त्यानंतर पुन्हा त्रास होणारा नाद ऐकावा. असे करत रहावे. त्यामुळे उपाय होऊन वाईट शक्तीचा जोर कमी होतो.
आजार पालटल्यास निराळे औषध घ्यावे लागते. त्याचप्रमाणे त्रास देणार्या वाईट शक्तीने निराळ्या तर्हेचा त्रास देण्यास सुरुवात केली किंवा निराळी वाईट शक्ती त्रास देऊ लागली, तर पुन्हा सर्व नाद ऐकून आपल्यासाठी उपयुक्त नाद कोणता, ते शोधावे आणि उपायांसाठी तो नाद वापरावा. काही वेळा काही तासांनीही निराळा नाद ऐकावा लागतो.
वाईट शक्तींचा त्रास नसणार्या व्यक्तींनी ज्या नादाने त्यांना चांगले वाटते, तो नाद सतत ऐकावा. काही कालावधीनंतर ‘या नादाची परिणामकारकता न्यून झाली’, असे वाटल्यास त्यांनी पुन्हा सर्व नाद ऐकून आपल्यासाठी अधिक चांगला नाद कोणता, हे शोधून काढावे.
साधनावृद्धी करणारे, तसेच भाववृद्धी करणारेही काही नाद आहेत. वाईट शक्तींचा त्रास होत नसतांना अशा नादांचाही लाभ करून घेऊ शकतो.
या नादांचा उपयोग व्यावहारिक लाभांसाठी, म्हणजे आपल्या संसारातील, चाकरीतील किंवा आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी करू नये. त्या अडचणी सोडवण्यासाठी या दैवी नादांचा उपयोग होणार नाही; म्हणून केवळ आध्यात्मिक लाभ होण्यासाठीच हे नाद वापरावेत.
– सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
४. विविध दैवी नादांतून ‘भगवंत कोणता संदेश देत आहे’, हे प.पू. डॉक्टरांनी सर्वसामान्यांना कळेल, अशा सोप्या शब्दांत सांगणे आणि यावरूनच ‘सर्वांनी साधना करावी’, याविषयीची तळमळ प.पू. डॉक्टरांनाच पुष्कळ आहे, हे लक्षात येणे आणि गुरूंना ‘सार्या जगताची माऊली’ का म्हणतात, तेही उमजणे
रामनाथी आणि देवद आश्रमांत उमटलेले आणि ध्वनीमुद्रित केलेले विविध दैवी नाद ऐकतांना प.पू. डॉक्टरांनी ‘हे दैवी नाद मानवजातीला शब्दांतून कोणते संदेश देत आहेत’, तेही सांगितले. नाहीतर साधकांना हे संदेश कळणे, अत्यंत अवघड आहे. सर्वांच्या बुद्धीच्या पलीकडची ही घटना आहे. ‘या दैवी नादांतून साक्षात भगवंत आम्हा पामरांना काय म्हणाला’, हेच यावरून सर्वसामान्यांनाही कळून येते. भगवंताची सूक्ष्म दैवी नादाच्या रूपात असलेली ही आकाशवाणी शब्दांच्या पातळीला येऊन प.पू. डॉक्टरांनी आम्हाला सांगितली. यावरून ‘आम्ही साधना करावी, याबद्दल त्यांचीच तळमळ किती आहे’, ते लक्षात आले आणि यातूनच गुरूंना सर्व जगताची ‘माऊली’ का म्हणतात, तेही लक्षात आले.
केवळ दैवी नाद ऐकून आपली भावजागृती होणे किंवा साधनेप्रती आपली तळमळ वाढणे खूप कठीण असते; परंतु प.पू. डॉक्टरांनी सर्वज्ञतेच्या साहाय्याने ‘या नादातून देव आपल्याला कोणता संदेश देत आहे’, तेही सांगितल्याने हे नाद ऐकतांना देवाबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि नादातील संदेश कळल्यामुळे त्या दृष्टीने साधनेत प्रयत्न करणे सोपे जाते.
प.पू. डॉक्टर सर्वसामान्यांच्या पातळीला येऊन प्रत्येक दैवी गोष्टीचा अर्थ सर्वांना सुलभ होऊन कसा कळेल आणि तो त्यांच्या अंतर्मनापर्यंत कसा पोहोचेल, याच दृष्टीने सतत प्रयत्नरत असतात; म्हणूनच प.पू. डॉक्टर हे सर्वसामान्यांसह आम्हा साधकांना, तसेच संतांनाही समजून घेणारी आणि आम्हा सर्वांवर प्रीतीयुक्त कृपेची पाखर घालणारी कृपावंत गुरुमाऊली आहे, हेच खरे !
– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (मार्गशीर्ष कृ. ७, कलियुग वर्ष ५११३ (१७.१२.२०११))
Play store मध्ये नेहमी aikanyasathi kase download करायचे te कळविणे