ज्ञानी असूनही विनम्र असणारे आणि प्रेमभावाचे मूर्तीमंत प्रतीक असलेले पू. (वैद्य) विनय भावेकाका !

‘पू. (वैद्य) विनय भावेकाका हे रत्नागिरी जिल्ह्यातील मोरडा, साखरपा येथे रहाणारे असून ते सध्या सनातनच्या रामनाथी आश्रमात राहून पूर्ण वेळ साधना करत आहेत. त्यांच्यासमवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.

 

१. शिकण्याची वृत्ती

रामनाथी आश्रमाला भेट देण्यास येणार्‍यांमध्ये काही जण वैद्यकीय क्षेत्रांतील उपचारतज्ञ असतात. ते आश्रमातील साधकांवर नवीन उपचार पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवायला येतात. त्या वेळी पू. काका ते बारकाईने पहातात आणि ती पद्धत शिकून घेतात. आसामचे डॉ. पटवा यांची ‘न्यूरोथेरपी’ची प्रात्यक्षिके असोत, पुण्याचे श्री. मोहन फडके यांचे मंत्रोपचार असोत किंवा मानसिक ताणतणाव निर्मूलनासाठी डॉ. मिनू रतन यांचे समुपदेशन असो, पू. भावेकाका प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.

 

२. उत्तम स्वयंपाक करणे

पू. काकांना उत्तम स्वयंपाक करता येतो. त्यामुळे ते काही वेळा स्वतः स्वयंपाकगृहात जाऊन सर्व साधकांसाठी भाजी किंवा आमटी करतात. त्यातील वेगळेपणा जाणवून साधक म्हणतात, ‘आजची भाजी वा आमटी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आहे, म्हणजे ती पू. भावेकाकांनी केली असेल.’ त्या दिवशी आश्रमातील साधकांना पू. रेखाताई आणि पू. भावेकाका या संतद्वयींनी बनवलेला सात्त्विक महाप्रसाद ग्रहण करण्याचे सौभाग्य प्राप्त होते.

 

३. इतरांना साहाय्य करणे

आश्रमातील आगाशीत प्रतिदिन सकाळ- सायंकाळ ‘महामृत्यूंजय आणि नवग्रह मंत्रपठण’ असते. त्यासाठी ८ साधकांची आवश्यकता असते. एके दिवशी एका साधकाचा ऐन वेळी ‘मंत्रपठणासाठी येऊ शकणार नाही’, असा मला निरोप आला. त्या वेळी मी पर्यायी साधक शोधत असल्याचे पाहून पू. भावेकाका स्वतःहून मंत्रपठणासाठी आले.

 

४. प्रेमभाव

४ अ. रुग्णांशी प्रेमाने वागणे

४ अ १. रुग्णाची स्थिती समजून घेणे

एखादा साधकरुग्ण केव्हाही आला, तरी ते त्याला शांतपणे औषधे घेण्यास सांगतात. अनेक वेळा रुग्ण त्यांना होणारा त्रास दिवसभर वा कित्येक दिवस अंगावर काढतात आणि ऐन वेळी पू. भावेकाकांना भेटायला येतात, तरीही पू. भावेकाका ‘असू दे’, असे म्हणून जराही चिडचिड न करता शांतपणे त्या रुग्णाला औषधे कोणती घ्यायची हे सांगतात. ‘रुग्णांना बरे होण्यासाठीच त्यांना वेळेचे बंधन कशाला घालायचे?’, ते आपल्याला केव्हाही भेटू शकतात ! असा त्यांचा दृष्टीकोन असतो.

४ अ २. रुग्णांची प्रेमाने चौकशी करून त्यांना धीर देणे

ते प्रत्येक साधकरुग्णाची प्रेमाने चौकशी करून जवळीक साधतात. ते साधकांच्या सेवेची, तसेच त्रास असलेल्या साधकाच्या आध्यात्मिक नामजपादी उपायांचीही चौकशी करतात. एखाद्याने सांगितले, ‘‘मला चार घंटे नामजप आहे.’’ तर पू. काका म्हणतात, ‘‘काही साधकांना तर ७ – ८ घंटे नामजप आहे. त्यापेक्षा तुझे बरे आहे.’’ ते ऐकून त्या साधकाला पुष्कळ धीर मिळतो.

४ अ ३. पू. काकांचे चैतन्य आणि प्रेमभाव यांमुळे ते रामनाथीला आल्यानंतर त्यांचा सल्ला घेण्यासाठी साधकांची संख्या वाढल्याचे लक्षात येते.

४ आ. घरून येतांना साधकांसाठी खाऊ आणणे

पू. काका घरून आश्रमात येतांना स्वत:समवेत सेवा करणारा प्रत्येक साधक आणि त्याचे कुटुंब यांच्यासाठी खाऊ आणतात आणि प्रत्येकाला तो मिळाल्याची निश्‍चितीही करतात. ते पातळ पोह्यांचा चिवडा, गाजर, भडंग, हलवा, असा खाऊ आणतात. ते घरून येतांना त्यांच्या घरी लावलेली भाजी आणि सुंदर फुले आश्रमासाठी घेऊन येतात. यावरून ‘त्यांना संपूर्ण आश्रम आपला वाटतो’, हे लक्षात येते.

४ इ. ते घरातील एक ज्येष्ठ व्यक्ती असल्याप्रमाणे आम्हाला त्यांचा आधार वाटतो.

 

५. ज्ञानी असूनही विनम्र असणे

५ अ. केवळ आध्यात्मिक ज्ञान नसून अनेक विषयांवर प्रभुत्व असणे

पू. विनय भावेकाका आयुर्वेदामध्ये तज्ञ आहेत. आयुर्वेदिक औषधे सिद्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांचा व्यासंग पुष्कळ दांडगा आहे. त्यांना केवळ आध्यात्मिक ज्ञान आहे, असे नसून राजकारण, आर्थिक व्यवस्था, इतिहास आदी विषयांवरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व आहे. हे त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्या लक्षात येते.

५ आ. विनम्रता

१. ते साधकांशी मिळून-मिसळून रहातात. तेव्हा आम्हाला ‘ते संत आहेत’ याचा काहीवेळा विसर पडतो. ‘ते संत आहेत’, याची त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला ते कधीच जाणीव करून देत नाहीत.

२. आमच्या व्यष्टी आढाव्याच्या वेळी ते कधी कधी स्वतःच्याही चुका सांगतात. ते आम्हाला आमच्या चुकांवर योग्य दृष्टीकोनही देतात.

५ इ. आदरभाव

५ इ १. अन्य औषधोपचार पद्धतींविषयीही आदर वाटणे

पू. भावेकाका स्वतः आयुर्वेद तज्ञ असूनही त्यांना ‘अ‍ॅलोपथी’विषयी आदर आहे. ते सांगतात, ‘‘अ‍ॅलोपथी’मध्ये शस्त्रक्रियेची शाखा अतिशय प्रगत झालेली आहे. जे चांगले आहे, त्याला चांगले म्हणायला काय हरकत आहे ? ’’ त्यांना अन्य औषधोपचार पद्धतींविषयीही आदर वाटतो. ते स्वतः मधुमेहावर आयुर्वेदिक काढा घेतात आणि ‘अ‍ॅलोपथी’चीही औषधेही घेतात.

५ इ २. अन्य संतांविषयी नम्रतेने आणि प्रेमाने बोलणे

पू. भावेकाकांना सनातनच्या इतर सर्व संतांविषयी अत्यंत आदर वाटतो. अन्य संत काही कारणाने त्यांना भेटायला आल्यावर पू. काका त्यांच्याशी अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने बोलतात. त्या वेळी दोन संतांमध्ये एकमेकांविषयी असलेला प्रेमभाव आणि आदर पहाण्याचे भाग्य आम्हाला लाभते.

 

६. पू. भावेकाकांचा अनमोल सत्संग

६ अ. संतांच्या गोष्टी सांगणे

पू. काका रात्री सेवा करणार्‍या साधकांना संताची एखादी गोष्ट सांगून सत्संग देतात. ते कधी संत एकनाथ, तर कधी संत चोखामेळा यांच्या कथा सांगतात.

६ आ. प.पू. अण्णा करंदीकर यांच्या गोष्टी सांगणे

एकदा त्यांनी सांगितले, ‘‘प.पू. अण्णा करंदीकर स्वतः अभियंता होते; परंतु साधना केल्यानंतर त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करून ते रुग्णांची सेवा करत होते. त्यांना रुग्णाला प्रत्यक्ष पहाण्यापूर्वीच त्याला कोणता आजार झाला आहे, ते सूक्ष्मातून समजायचे. एवढी त्यांची साधना उच्चकोटीची होती.’’

६ इ. पू. काका आसंदीत बसले असतील, तेव्हा माळ
घेऊन नामजप करत असतात. ‘तेव्हा त्यांचे ध्यान लागले आहे’, असे जाणवते.

६ ई. पू. काकांच्या अस्तित्वाने वातावरण पालटून आनंददायी होणे

पू. काका बाहेरगावी जातात, तेव्हा आश्रमात सेवा करणारे आम्ही सर्व साधक त्यांच्या येण्याची वाट पहात असतात. ते आश्रमात येतात, तेव्हा सर्वांना पुष्कळ आनंद होतो आणि आश्रमातील वातावरण पालटून आनंददायी होते. त्यांच्या चैतन्याचा हा परिणाम आम्हा सर्वांना अनुभवायला मिळतो.

 

७. संशोधनाची दृष्टी असणे

पू. भावेकाका नियमितपणे प्रतिदिन सप्तशतीपाठाचे पठण करतात. ते अधून मधून त्यांच्या रत्नागिरी येथील घरी यज्ञयागही करतात. तेव्हा ते त्या यज्ञाची विभूती सूक्ष्म-परीक्षणासाठी आश्रमात पाठवून त्याविषयी विचारतात.

 

८. भाव

पू. भावेकाका यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. गुरुदेवांचा विषय निघाल्यावर त्यांचा भाव दाटून येतो. त्यांचा गुरूंप्रतीचा भाव पाहून पहाणार्‍याचाही भाव जागृत होतो.

‘गुरुदेव, माझ्यामध्ये प्रेमभाव अत्यल्प आहे; त्यामुळे मला प्रेमभावाचे मूर्तीमंत उदाहरण असलेले पू. भावेकाका यांच्या सत्संगात रहाण्याची संधी दिलीत, यासाठी मी आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे. ‘मला पू. भावेकाकांचा चैतन्याच्या स्तरावर लाभ घेता येऊ दे, तसेच मला त्यांचे गुण आत्मसात करता येऊ देत ’, अशी मी श्रीगुरुचरणी प्रार्थना करतो.’

– डॉ. भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ( १८.७.२०१८)

१. ‘पू. भावेकाकांचे बोलणे मृदू आणि हळू आवाजात असते.

श्रीमती रजनी नगरकर

२. प्रेमभाव

अ. रुग्ण साधक भेटल्यावर ते अत्यंत प्रेमाने त्याची विचारपूस करतात, तसेच साधकाच्या मनावर ताण असल्यास ते त्याच्याशी विनोद करून किंवा गमतीने बोलतात. त्यामुळे त्याच्या मनावरील ताण न्यून होतो.

आ. ते घरून येतांना सर्व साधकांसाठी भाजी करण्याकरता अळूची पाने घेऊन येतात आणि अगदी आईच्या ममत्वाने सर्व साधकांसाठी भरपूर भाजी बनवतात. त्या दिवशी साधक भाजी खातांना आनंदी असतात. साधक त्या चविष्ट भाजीतील चैतन्याचा आणि सात्त्विकतेचा अनुभव घेत असतात.

३. सेवाभाव

अ. पू. भावेकाकांना औषधे बनवणे आणि इतर पुष्कळ सेवा असतात, तरी ते सर्व सेवा अत्यंत सहजतेने करतात.

आ. त्यांना वेळ असेल, तेव्हा ते लगेच स्वयंपाकघरात जातात आणि तेथील अल्पाहार बनवण्याच्या सेवेत किंवा स्वयंपाकाच्या सेवेत हातभार लावतात.

(‘पू. काकांना स्वयंपाकाची आवड आहे. ते संत भक्तराज महाराज यांच्या सेवेत असतांना ते आचारी (स्वयंपाकी) म्हणून सेवा करत होते. संत भक्तराज महाराज यांच्या एका कार्यक्रमात स्वयंपाक करणारा आला नव्हता. तेव्हा संत भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘थांबा, काळजी करू नका. माझा आचारी (पू. भावेकाका) येईलच एवढ्यात !’ – श्रीमती पळणीटकर)

४. सतत देवाच्या अनुसंधानात असणे

अ. पू. भावेकाका सतत ध्यानावस्थेत असतात आणि त्यांना जेव्हा वेळ असतो, तेव्हा त्यांच्या हातात जपाची माळ दिसते.

आ. ते रुग्ण साधकाच्या आजाराविषयी शांतपणे ऐकून घेतात. तेव्हा ते ‘धन्वंतरीदेवतेस प्रार्थना करून औषध विचारत असावेत’, असे मला वाटते.

इ. ते सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानातच असतात.’

– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.७.२०१८)

Leave a Comment