स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिका आणि जीवन आनंदी बनवा !

  • परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ याविषयी अद्वितीय संशोधन ! 
  • व्यष्टी साधना चांगली होण्यासह आनंदी जीवनासाठी उपयुक्त !

अनेक ग्रंथ आणि संतांचे अभंग यांत षड्रिपू (स्वभावदोष) अन् अहं यांचे निर्मूलन करण्याविषयी तात्त्विक विवेचन केलेले असते. ते आचरणात आणायला थोडे कठीण जाते. सनातनच्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या ग्रंथमालिकेत ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ प्रायोगिकरित्या कशी राबवावी, हे सोप्या भाषेत सांगितले आहे. या मालिकेत आतापर्यंत ७ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यातील ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्‍लेषण’ या नूतन ग्रंथाचा परिचय ३ लेखांद्वारे करून देत आहोत. व्यष्टी साधना चांगली होण्यासह आनंदी जीवनासाठी उपयुक्त असलेला हा ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा.

ग्रंथ-निर्मितीविषयी मार्गदर्शक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

ग्रंथाचे संकलक : सौ. सुप्रिया माथूर आणि कु. मधुरा भोसले

लेखांक १

ग्रंथाचे मनोगत

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिका आणि जीवन आनंदी बनवा !

‘स्वभावदोष आणि अहं हे ईश्‍वरप्राप्तीसाठीच्या साधनेतील दोन मोठे अडथळे आहेत. स्वभावदोष आणि अहं असला, तर वैयक्तिक जीवनही दुःखी होते आणि व्यक्तीमत्त्वाचा विकासही खुंटतो. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी भारतातील अनेक राज्यांतून सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात अनेक साधक येतात. आश्रमातील ‘स्वयंपाकघर’ हा या प्रक्रियेचा केंद्रबिंदू आहे; कारण स्वयंपाकघरातील पू. रेखा काणकोणकर आणि सौ. सुप्रिया माथूर साधकांना प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करतात अन् स्वयंपाकची सेवा करण्याच्या माध्यमातून साधकांना प्रक्रियेसंबंधीचा प्रायोगिक भागही शिकता येतो. यामुळे शेकडो साधक काही मासांतच (महिन्यांतच) योग्य साधना करायला लागतात.

पू. रेखा काणकोणकर आणि सौ. सुप्रिया माथूर साधकांना प्रक्रियेविषयीच्या सत्संगात काय मार्गदर्शन करतात, साधकांकडून प्रक्रिया कशी राबवून घेतात, याचे अनेक साधकांना कुतूहल असते. वर्ष २०१६ मध्ये मार्च, एप्रिल आणि मे या तीन मासांत सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी घेतलेल्या अशा सत्संगांना उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. सौ. सुप्रिया माथूर यांचे मार्गदर्शन कु. मधुरा भोसले यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या स्वरूपात सुंदर प्रकारे संकलित केले आहे. त्यातून सर्वच साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेची दिशा मिळेल. बर्‍याच साधकांना प्रक्रिया शिकण्याची तीव्र इच्छा असूनही काही अडचणींमुळे रामनाथी आश्रमात येऊन प्रक्रिया शिकता येत नाही. अशांना हा ग्रंथ निश्‍चितच पुष्कळ उपयोगी ठरेल. केवळ अनेक वर्षांपासून साधना करणार्‍यांसाठीच नव्हे, तर जिज्ञासू आणि नवीन साधक यांच्यासाठीही हा ग्रंथ म्हणजे, जीवनात आनंदप्राप्तीचा मार्ग दर्शवणारा दीपस्तंभच ठरेल.

सनातनच्या ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या मालिकेतील इतर ६ ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांमध्ये त्या त्या विषयाची मूलभूत तात्त्विक आणि प्रायोगिक माहिती दिली आहे. वाचकांनी आधी त्या ग्रंथांचा अभ्यास केल्यास त्यांना प्रस्तुत खंड अधिक चांगल्या प्रकारे समजेल; कारण प्रस्तुत खंडामध्ये प्रामुख्याने ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असलेल्यांना ती अधिक परिणामकारकपणे आणि नेमकेपणाने कशी राबवावी’, याचे मार्गदर्शन केले आहे.

‘या ग्रंथाच्या अभ्यासाने सर्वच साधकांना प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवता येऊन त्यांचे जीवन आनंदी बनो आणि त्यांना शीघ्र ईश्‍वरप्राप्ती करून घेता येवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१.  स्वभावदोष निर्माण होण्याची काही कारणे

१ अ. अयोग्य दृष्टीकोन असणे 

‘समष्टीच्या दृष्टीने विचार करण्यापेक्षा स्वत:च्या सोयीच्या दृष्टीने विचार करणे’, हे चुकीचे आहे. स्वत:च्या सोयीच्या दृष्टीने विचार करण्यामुळे स्वार्थीपणा, संकुचितता आदी स्वभावदोष निर्माण होतात.

१ आ. अयोग्य विचारप्रक्रियेमुळे पुनःपुन्हा निराशा किंवा ताण येणे

पुनःपुन्हा निराशा येत असेल किंवा ताण येत असेल, तर ‘आपण अयोग्य विचारप्रक्रियेत किती दिवस अडकून रहाणार ?’, हे स्वत:च ठरवले पाहिजे.

१ इ. अयोग्य कृती आणि अयोग्य विचार परस्परांशी संबंधित असणे

अयोग्य कृतीमागील अयोग्य विचार शोधायला हवा; कारण अयोग्य कृतीसाठी आपल्या मनातील अयोग्य विचार कारणीभूत असतो.

१ इ १. उदाहरण : कु. रंजना हिचे एक नातेवाईक जेव्हा तिच्याकडे येतात, तेव्हा ती त्यांचे स्वागत वरवर करते, तसेच त्यांचा पाहुणचार मनापासून करत नाही. एकदा ते नातेवाईक रंजनाच्या घरी आले असता तिने त्यांच्यासाठी चहा केला. त्या चहात साखर अल्प झाली, तर चहापूड अधिक झाली. या अयोग्य कृतीविषयी तिने नंतर चिंतन केले, तेव्हा ‘त्या नातेवाईकाविषयी मनात पूर्वग्रह आहे; त्यामुळे चहा मनापासून केला नाही’, असे तिच्या लक्षात आले.

१ ई. अहंमधून स्वभावदोष आणि उपदोष निर्माण होणे

अहंमधून स्वभावदोष आणि स्वभावदोषांमधून उपदोष निर्माण होतात, उदा. ‘मला कळते’, असे वाटणे, हा अहंचा मूळ पैलू आहे. त्यामुळे आपल्यात ‘इतरांना सतत सांगत किंवा शिकवत रहाणे किंवा इतरांचे दोष पहाणे’, हे स्वभावदोष वाढतात आणि ‘अनावश्यक बोलणे किंवा प्रतिक्रियात्मक बोलणे’, हे उपदोष निर्माण होतात.

१ उ. प्रसंगाची तीव्रता अधिक असणे

आपण झोपेतून उठल्यानंतर आपल्याला भूतकाळातील एखादा प्रसंग आठवत असेल, तर ‘त्या प्रसंगाचा आपल्या मनावर झालेला परिणाम अधिक आहे’, हे लक्षात घ्यावे.

२. साधनेतील अडथळे

२ अ. मनाचा अडथळा 

आपल्यात मनाचा अडथळा निर्माण झाला, तर आपल्याला दिलेले साधनेचे दृष्टीकोन आपण स्वीकारू शकत नाही.

२ आ. बुद्धीचा अडथळा

आपल्यात बुद्धीचा अडथळा निर्माण झाला, तर आपण एखादा विषय बुद्धीने नीट समजावून घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्यात ‘माझ्याकडून होणारच नाही’, असे नकारात्मक विचार येतात.

२ इ. मन आणि बुद्धी यांच्या अडथळ्यांमुळे होणारे काही त्रास अन् ते अडथळे दूर करण्याचे उपाय

आपण जाणकाराने सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करून पाहिले, तर आपल्यातील मन आणि बुद्धी यांचे अडथळे दूर होऊ शकतात.

२ इ १. मनस्ताप होणे

आपल्याला एखादा प्रसंग किंवा सूत्र यांचा मनस्ताप झाल्यावर, ‘तो कशामुळे झाला ?’, हे नेमकेपणाने शोधायला हवे.

२ इ १ अ. उदाहरण

श्री. शरद यांच्या घराचे रंगकाम चालू आहे. ते करतांना रंगार्‍याने भिंतीला त्यांनी सांगितलेला रंग न देता, त्यांच्या पत्नीच्या सांगण्यानुसार दुसराच रंग दिला. हे पाहून त्यांना मनस्ताप झाला. याविषयी चिंतन केल्यावर ‘मनाविरुद्ध झालेले पाहून स्वतःला मनस्ताप झाला’, हे त्यांच्या लक्षात आले.

२ इ २. मनाचा संघर्ष होणे

२ इ २ अ. मनाच्या संघर्षाची काही कारणे

१. आपल्याला योग्य कृती ठाऊक असूनही ती करायला आपले मन सिद्ध होत नसेल, तर ‘आपल्या मनात संघर्ष चालू आहे’, हे समजावे.

२. कुणी आपल्याला आपली चूक दाखवल्यावर ‘ती चूक कशी नाही’, हे सांगण्याचा वा दर्शवण्याचा भाग आपल्याकडून होत असेल, तर आपल्या मनाचा संघर्ष होतो.

२ अ. उदाहरण : कु. सईने केलेल्या स्वयंपाकातील चुका तिच्या आईने तिला सांगितल्या. तेव्हा लगेचच ‘त्या चुका कशा नाहीत, चांगला स्वयंपाक बनवण्यासाठी माझ्याकडून कसे प्रयत्न झाले’, हे सांगण्याचा सईने प्रयत्न केला. आईने सांगितलेल्या चुका ऐकतांना सईच्या मनाचा संघर्ष होत होता, म्हणजे आईचे सांगणे तिला स्वीकारता येत नव्हते.

३. आपल्या मनातील अयोग्य विचारप्रक्रियेमागे असणारा मूळ स्वभावदोष शोधून त्यावर योग्य उपाययोजना करत असतांना आपल्या मनाचा संघर्ष होतो; परंतु याच संघर्षातून आपण घडत असतो.

२ इ २ आ. मनाच्या संघर्षावर मात करण्याचे महत्त्व

१. आपण मनाच्या संघर्षावर मात केली, तर आपल्याला स्वत:च्या मनावर मात करता येईल, म्हणजेच आपला मनोलय लवकर होईल.

१ अ. उदाहरण : कु. सईने केलेल्या स्वयंपाकातील चुका तिच्या आईने तिला सांगितल्या. आईचे सांगणे स्वीकारता न आल्याने तिच्या मनाचा संघर्ष झाला. अशा वेळी सईने मनाला समजवायला हवे की, ‘चांगला स्वयंपाक बनवण्यासाठी स्वतःकडून कोणते प्रयत्न झाले’, हे सांगण्यापेक्षा ‘मी आणखीन चांगला स्वयंपाक करण्यात कुठे न्यून पडले’, हे मला आईच्या बोलण्यातून शिकायचे आहे. असा विचार केल्यास सईच्या मनाचा होणारा संघर्ष थांबेल, तसेच संघर्षात वाया जाणारी मनोऊर्जाही वाचेल.

२. ‘मानसिक संघर्षावर मात करणे, ही आपली साधना आहे’, हे आपल्या मनावर बिंबवले पाहिजे.

२ इ २ इ. मनाच्या संघर्षावरील उपाय : आपल्या मनातील अयोग्य विचारांच्या प्रक्रियेवर आपण योग्य उपाय शोधला नाही, तर आपल्यात चुकीची मनोवृत्ती निर्माण होते. मनातील अयोग्य विचारांवर योग्य उपाय शोधण्यासाठी आणि मनाच्या संघर्षावर मात करण्यासाठी नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन’ सारणी अन् ‘अहं-निर्मूलन’ सारणी लिहिणे आणि स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचनांचे सत्र (अभ्याससत्र) करणे, तसेच ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ नियमित राबवणे आवश्यक आहे.

संदर्भ  : सनातन निर्मित ग्रंथ  ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’

Leave a Comment