सर्वसाधारण मनुष्याने चैतन्य ग्रहण करण्याच्या उद्देशाने सात्त्विक कपडेच घालावेत. सात्त्विक कपडे घातल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण करता येऊन मनुष्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते.
१. विकृत वेशभूषा म्हणजे रज-तमात्मक स्पंदने निर्माण करणारी वेशभूषा
‘विकृतवासो न आच्छादनीयम् ।’, असे म्हणतात. याचा अर्थ आहे, मनुष्याने विकृत वेश करू नये. मनुष्याचा वेश अधिकतर त्याने घातलेल्या कपड्यांवरूनच ठरत असतो. आजकालची तरुण पिढी ‘फॅशन’च्या नावाखाली चित्रविचित्र आकृत्या असलेले, चटेरीपटेरी रंगांचे, जीन्स-स्ट्रेचेबल्स यांसारखे तोकडे आणि घट्ट बसणारे अशा नाना प्रकाराचे कपडे वापरते. ही सर्व विकृत वेशभूषा आहे. विकृत वेशभूषा म्हणजे रज-तमात्मक स्पंदने निर्माण करणारी वेशभूषा. अशा वेशभूषेमुळे मनुष्याची बुद्धी विकृत बनते, तो नाना दुष्प्रवृत्तींचा गुलाम बनतो, काम-क्रोधादी षड्रिपूंच्या अधीन होतो आणि वाईट शक्तींच्या आक्रमणांना (हल्ल्यांना) बळी पडू शकतो. याउलट मनुष्याने सात्त्विक कपडे घातल्याने त्याला ईश्वरी चैतन्य ग्रहण करता आल्यामुळे त्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होतात. तो सदाचरणी आणि विवेकी बनतो, तसेच त्याचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासही साहाय्य होते.
२. नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरणे योग्य
प्रत्येक वस्तूला गुणभूत स्पंदने असतात. कपड्याचा प्रकार, आकार, रंग, वेलवीण (नक्षी), कपड्याची शिलाई इत्यादी घटकांवर कपड्यातील स्पंदने अवलंबून असतात. हे घटक जितके सात्त्विक असतील, तितके कपडे सात्त्विक बनतात. नायलॉन, टेरिलिन यांसारख्या कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या कपड्यांपेक्षा सुती, कौशेय (रेशमी) यांसारख्या नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरावेत.
३. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी सात्त्विक कपडे परिधान करणेच योग्य
सर्वसाधारण मनुष्याने चैतन्यग्रहणाच्या उद्देशाने सात्त्विक कपडेच घालावेत. एखाद्यात भाव असेल, तर त्याची वृत्ती सात्त्विक असते आणि त्याच्याकडून होणार्या भावप्रधान कृतींमुळे त्याला ईश्वरी चैतन्य सहजपणे ग्रहण करता येते. तसेच ६० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या आणि देहबुद्धीचा विसर पडलेल्या साधकांचा प्रवास ईश्वरप्राप्तीच्या दिशेने शीघ्रगतीने होत असतो. अशा साधकांच्या दृष्टीने ‘कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत’, याला फारसे महत्त्वच उरत नाही. असे असले तरी, त्यांनी सात्त्विक कपडे घातल्यावर त्यांची स्वतःची सात्त्विकता वाढतेच, तसेच त्या सात्त्विकतेचा समष्टीलाही मोठा लाभ होतो. सात्त्विक कपड्यांमुळे मुलांवर संस्कार होण्यासही साहाय्य होते. यासाठी त्यांनी सात्त्विक कपडे घालणे केव्हाही श्रेयस्करच आहे.