कलियुगी साधकांनी अनुभवला । श्रीराम अन् शबरी भेटीचा तो विलक्षण सोहळा ॥
रामनाथी (गोवा) – भगवान परशुराम यांची कृपा लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी या आषाढ कृष्ण पक्ष दशमी/एकादशी या शुभदिनी सद्गुरुपदी विराजमान झाल्याची घोषणा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वंदनीय उपस्थितीत सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली.
‘शबरीचा श्रीरामाप्रतीचा भाव कळणे अन् तो अनुभवणे’, हे सामान्य व्यक्तीला समजण्यापलीकडील आहे; परंतु परात्पर गुरूंप्रती अखंड भाव आणि भक्ती मनात साठवून त्यांच्या भेटीसाठी तळमळणार्या ‘कलियुगातील शबरी’ म्हणजे सद्गुरु श्रीमती सुशीला आपटेआजी ! ‘श्रीराम आणि शबरी’, यांची त्रेतायुगात झालेली भेट साधकांनी केवळ काल्पनिकरित्याच अनुभवलेली असते. आज मात्र सद्गुरु आपटेआजी आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची झालेली भेट पाहून प्रत्यक्ष ‘श्रीराम अन् शबरी यांची भेट’ साधकांनी स्थूलातून ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवली आणि हा अमूल्य क्षण साधकांच्या मनी सुवर्णाक्षरांत कोरला गेला.
सन्मानाच्या वेळी स्वतःला पुष्पहार घालून घेण्यास प्रेमाने नकार देणार्या अहंरहित सद्गुरु आपटेआजी !
सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी सद्गुरु आपटेआजी यांचा सन्मान करण्यास पुष्पहार हातात घेतल्यावर सद्गुरु आपटेआजींनी तो गळ्यात घालून घेण्यास प्रेमाने नकार दिला अन् तो पुष्पहार परात्पर गुरु डॉक्टरांच्या गळ्यात घातला. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी त्यांना सन्मानाच्या वेळी दिलेली शाल अन् श्रीफळ हेही सद्गुरु आपटेआजींनी परात्पर गुरु डॉक्टरांना अर्पण केले. सद्गुरु आजींनी केवळ नुकताच प्रकाशित झालेला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिष्यावस्था आणि गुरुरूप’ हा ग्रंथ स्वीकारला.
बालकासम निरागस अन् मातेसम वात्सल्यभाव असलेल्या सद्गुरु सुशीला आपटेआजी !
सद्गुरु सुशीला आपटेआजी त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती आजींचा उच्च कोटीचा भाव असून त्या त्यांना गुरुस्थानी मानतात. त्या बर्याचदा संतांना भेटण्यासाठी आश्रमात येतात. त्यांची दास्यभक्ती असल्याने त्या संतांच्या चरणांपाशी बसतात. त्यांच्या भेटीच्या वेळी त्यांच्यातील बालकासम निरागस अन् मातेसम वात्सल्यभाव असे दोन्ही भाव एकाच वेळी अनुभवण्यास येतात. त्यांच्या भेटीमुळे देव अन् भक्त यांचे नाते किती अतूट असते, तसेच ‘भावा’ला वयाची मर्यादा नसते, हे लक्षात येते. त्यांचे पती वेदशास्त्रसंपन्न होते. यजमानांना यज्ञकर्मात साहाय्य करता करता आजींची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांनी उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त केली. वर्ष २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आश्रमात आल्या असता त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘‘माझ्या देहापासून तुमच्यासाठी पादुका बनवा !’’, अशी प्रार्थना केली होती.
कलियुगी साधकांनी अनुभवला । श्रीराम अन् शबरी भेटीचा विलक्षण सोहळा ॥
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाल्यावर सद्गुरु आपटेआजींनी त्यांना हाताला धरून सुखासनावर बसवले अन् सद्गुरु आजी त्यांच्या चरणांशी बसल्या. काही वेळ गेल्यावर त्यांनी आणलेली अग्निहोत्राची विभूती परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांना, हातांना अन् कपाळी लावून थोडी त्यांच्या जिभेवर ठेवली. या भावक्षणांना मनात साठवून ठेवण्यासाठी साधकही स्तब्ध झाले होते.
सद्गुरु आजींविषयी साधक त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना साधक सांगत असलेले ऐकण्यास सांगितले. तेव्हा ‘मला काही ऐकू येत नाही’, असे त्या म्हणाल्या. (‘संतांमध्ये कर्तेपणा आणि अहं शून्य असतो. त्यामुळे सद्गुरु आजी असे म्हणाल्या’, असे वाटले – कु. ऋतुजा शिंदे) ‘माझे काही सांगू नका, यांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) सांगा’, असे सद्गुरु आजींनी सांगितले. सर्वांत शेवटी परात्पर गुरु डॉक्टरांना उद्देशून ‘तुम्हीच करता आणि करवून घेता’, असे सद्गुरु आजी म्हणाल्या.
आजींनी सांगितल्याप्रमाणे केले की, ते होतेच ! – सौ. प्रणिता आपटे
या वेळी सौ. आपटेकाकू म्हणाल्या, ‘‘आई मला नेहमी ‘भिऊ नकोस’, असे सांगून आधार देतात. त्या मला पुष्कळ प्रेम देतात. त्यांच्या आशीर्वादाने सर्व होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले की, ते होतेच ! त्या मला पाठिंबा देतात.’’
सद्गुरु आपटेआजींनी भावसोहळ्याविषयी दिलेली पूर्वसूचना !
भावसोहळ्याला आरंभ होण्यापूर्वी सद्गुरु (सौ.) बिंदाताई सद्गुरु आजींशी बोलत होत्या. त्या वेळी ‘आजचा दिवस भाग्याचा आहे…’, असे सद्गुरु आजी म्हणाल्या. जणूकाही आज परात्पर गुरूंच्या भेटीच्या वेळी ‘त्या सद्गुरुपदी विराजमान होणार’, हे त्यांनी आधीच ओळखले होते !
सद्गुरु आपटेआजी यांच्या साधकांबद्दलच्या प्रेमभावाचे उदाहरण !
भावसोहळा दुपारी असल्याने त्यासाठी आलेल्या काही साधकांनी जेवण केले नव्हते. सद्गुरु आजी मधे मधे ‘साधक जेवले नाहीत. जेवायला जाऊया’, असे म्हणत होत्या. त्यावर ‘तुम्हाला पाहिल्यावर साधकांचे पोट भरले. त्यामुळे साधकांना भूक लागली नाही’, असे परात्पर गुरु डॉक्टर उत्तरले.
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना जाणवलेली सद्गुरु आपटेआजींची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
या वेळी सद्गुरु आपटेआजी यांच्या संदर्भात सद्गुरु (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘ सद्गुरु आपटेआजींचे घर म्हणजे ‘शबरीची कुटी’च आहे. घरात प्रवेश केल्यावर वेगळे विश्व अनुभवण्यास मिळाले. अनेक वर्षांनी मी त्यांच्या घरी गेले होते. आत जात असतांना मी सद्गुरु आपटेआजी झोपण्यासाठी वापरत असलेल्या पलंगाकडे आकर्षिले गेले. तो पलंग सद्गुरु आजी वापरतात, हे त्या वेळी मला ठाऊक नव्हते. ‘त्यांच्या घराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. खोल्या आकाराने मोठ्या झाल्या आहेत’, असे जाणवले. सद्गुरु आजींच्या घरी प्रतिदिन अग्निहोत्र होते. त्यामुळे त्यांच्या घरी सूक्ष्मातून वेदमंत्र ऐकू येत होते. ‘पूर्वी यज्ञयाग होत असत. त्या युगात मी गेले आहे’, असे जाणवले. एकीकडे सद्गुरु आजी माझ्याशी बोलत होत्या, तर ‘आजूबाजूला वेदमंत्रांचे पठण होत आहे आणि ब्राह्मण यज्ञकर्म करत आहेत’, असे जाणवत होते. घरात असतांना ‘ध्यान लागणे, मन निर्विचार होणे, स्थळ-काळाच्या पलीकडे गेल्याचे जाणवणे’, अशा अनुभूती आल्या. सद्गुरु आजींचा हात हातात घेतल्यावर तो सोडावासा वाटत नव्हता. त्यांच्या घरातूनही निघावेसे वाटत नव्हते. सद्गुरु आजींनी परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुस्थानी मानले आहे. त्यांच्या घरात प्रवेश केल्यापासून बाहेर पडेपर्यंत त्या केवळ परात्पर गुरु डॉक्टरांविषयीच बोलत होत्या. त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचाच ध्यास लागला होता. सद्गुरु आजी आश्रमात येतांना अनवाणी येतात. संतांच्या खोलीतून बाहेर पडतांनाही त्यांच्याकडे किंवा त्यांच्या खोलीकडे पाठ होणार नाही, अशा रितीने बाहेर पडतात. आजही ‘भक्ताला भगवंताची जशी ओढ लागलेली असते’, त्याप्रमाणे सद्गुरु आजी परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीसाठी व्याकुळ झाल्या होत्या. सद्गुरु आपटेआजींना स्वत:बद्दल सांगितलेले आवडत नाही. त्यांच्यात किंचित्ही अहं नाही. सद्गुरु आजींचे राहणीमान पुष्कळ साधे आहे. सण-उत्सव असल्यावर एखादी व्यक्ती सजूनही सुंदर दिसत नाही; पण सद्गुरु आजी साध्या रहातात, तरी त्या सुंदर दिसतात. खरे सौंदर्य म्हणजे भगवंताप्रतीचा भाव आणि भक्ती !’’
सद्गुरु आपटेआजी यांना किंचित्ही अहं नसल्याचे दर्शवणारे प्रसंग !
१. भावसोहळ्याच्या ठिकाणी सद्गुरु आपटेआजी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटल्या, तेव्हा आसंदीवर न बसता त्या भूमीवरच बसल्या.
२. कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर त्यांच्यासाठी ठेवलेल्या सुखासनावर (‘सोफ्या’वर) न बसता साध्या आसंदीवर बसल्या. साधकांनी त्यांना प्रेमपूर्वक आग्रह करून प्रार्थना केल्यानंतर त्या सुखासनावर बसल्या.
३. सद्गुरु (सौ.) बिंदाताई सोहळ्याच्या ठिकाणी आल्यावर सद्गुरु आजींनी त्यांना वाकून नमस्कार केला.
४. भावसोहळ्याच्या वेळी छायाचित्रकार साधक सद्गुरु आजींच्या विविध भावमुद्रा टिपत होता. हे पाहून सद्गुरु आजी म्हणाल्या, ‘‘पुष्कळ छायाचित्रे काढली, आता पुरे कर.’’
सद्गुरु आजींची सेवा ‘गुरुसेवा’ म्हणून केल्यामुळे
सौ. प्रणिता आपटे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
सद्गुरु (सौ.) बिंदाताई म्हणाल्या, ‘‘आम्ही सद्गुरु आजींच्या घरी गेल्यावर काकूंनी थोड्याच वेळात सर्वांसाठी स्वयंपाक बनवला. आजींप्रमाणे त्यांच्यातही प्रेमभाव दिसून येतो. ‘आश्रमातील सर्व साधक आपल्या कुटुंबातीलच आहेत’, या प्रेमभावाने त्या आश्रमातील साधकांमध्ये मिसळतात. त्यांना स्वतःची अशी कोणतीच इच्छा नाही. सद्गुरु आजी सांगतील, त्याप्रमाणे त्या करतात. आजींना ‘गुरु’ मानून त्यांची सेवा करतात. त्यामुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.’’
‘शिष्य कसा असावा ?’, याचा तुम्ही आदर्श घालून दिला ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘तुमच्यासाठी आजीच देव आहेत. ‘शिष्य कसा असावा ?’, याचा तुम्ही आदर्श घालून दिलात’, अशा शब्दांत परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. प्रणिता आपटे यांचे कौतुक केले.
‘आपटेकाकू म्हणजे अंतर्यामी शिष्या आहेत. सद्गुरु आजींना काही सांगावे लागत नाही. त्यांनी न सांगताच त्यांच्या डोळ्यांत पाहून सुचेल, तसे काकू करतात’, असे कु. प्रियांका लोटलीकर यांनी सांगितले. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना ‘कसे सुचते ?’, असे विचारले. त्यावर ‘तुमच्या आशीर्वादाने सुचते’, असे काकू म्हणाल्या. सद्गुरु आपटेआजी यांच्याप्रमाणे काकूंमध्ये अहं अल्प असल्याचे यावरून लक्षात येते.
सौ. प्रणिता आपटे यांचा परात्पर गुरु डॉक्टरांबद्दलचा भाव !
सत्काराच्या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदाताई यांनी सौ. आपटे यांना फुलांची वेणी दिली. ती त्यांनी परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु आजी यांच्या चरणांवर ठेवून त्यांना भावपूर्ण नमस्कार केला. त्यानंतर ती केसांत माळली. सौ. आपटे यांच्या भावाविषयी सद्गुरु आजी म्हणाल्या, ‘‘आती ही वेणी ती ४ दिवस तिच्या केसांत तशीच ठेवणार !’’