प्रार्थना : ईश्‍वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्ग

अनुक्रमणिका

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

१ अ. व्युत्पत्ती

१ आ. अर्थ

२. महत्त्व

२ अ. देवतेविषयी प्रेम आणि आदर निर्माण होणे

२ आ. कार्यात यश मिळणे

२ इ. मनःशांती मिळणे

२ ई. उपासकाला ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारी एक सोपी उपासनापद्धत

२ उ. ईश्वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्ग

२ ऊ. देवतेविषयी श्रद्धा आणि भाव निर्माण होणे

२ ए. सामूहिक प्रार्थनेचे महत्त्व

३. लाभ

३ अ. व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ

३ आ. प्रार्थनेमुळे कृती, विचार आणि वृत्ती या तीनही स्तरांवर लाभ होणे

३ इ. मनावरील ताण दूर होणे

३ ई. अहं अल्प होणे

३ उ. मनोलय आणि बुद्धीलय

३ ऊ. ईश्वर किंवा गुरु यांनी क्षमा करणे


दैनंदिन धकाधकीच्या जीवनात आपण मनःशांती हरवून बसतो. ती मनःशांती प्रार्थनेमुळे मिळते. अशक्य गोष्टी शक्य वाटतात; कारण प्रार्थनेमुळे श्रद्धेचे बळ आणि ईश्वराचा आशीर्वाद लाभतो. प्रार्थनेचे महत्त्व वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. या लेखात आपण प्रार्थनेचे महत्त्व आणि लाभ जाणून घेऊया !

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

१ अ. व्युत्पत्ती

‘प्रार्थना’ हा शब्द `प्र’ (म्हणजे प्रकर्षाने) आणि `अर्थ’ (म्हणजे याचना करणे) या शब्दांपासून बनला आहे.

१ आ. अर्थ

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.’ – पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई. (वर्ष १९८०)

२. महत्त्व

२ अ. देवतेविषयी प्रेम आणि आदर निर्माण होणे

‘ईश्वर आणि देवता यांच्याशी जवळीक साधण्यासाठी, तसेच त्यांच्याविषयी प्रेम अन् आदरभाव निर्माण होण्यासाठी प्रार्थना करावी. ‘ईश्वर, देवता आणि गुरु आपल्याकडून सर्वकाही करवून घेणार आहेत’, याची जाणीव प्रार्थनेमुळे होते.

२ आ. कार्यात यश मिळणे

इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच प्रार्थनेमुळे आत्मशक्ती अन् आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.

२ इ. मनःशांती मिळणे

प्रार्थना करून कृती करतांना मनःशांती मिळते आणि मन शांत अन् स्थिर ठेवून केलेली कृती चांगली होते.’
– पू. (कु.) अनुराधा वाडेकर, सनातन संस्था (२३.५.२००९)

२ ई. उपासकाला ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारी एक सोपी उपासनापद्धत

दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मनःशांती मिळावी, तसेच हळूहळू आपली ईश्वरप्राप्तीकडे वाटचाल व्हावी यांसाठी लोक ईश्वराची उपासना करतात. बहुतांशी लोक आयुष्यभर पूजाअर्चा, धार्मिक विधी इत्यादी कर्मकांडानुसार उपासनाच करत रहातात. कर्मकांडानुसार उपासना ही स्थुलातील उपासना आहे. ईश्वराचे स्वरूप सूक्ष्म आहे. ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी उपासनाही ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारी असायला हवी. प्रार्थना ही देवाला मनाच्या स्तरावर करायची असते; म्हणून ती ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारी एक सोपी उपासनापद्धत आहे.

२ उ. ईश्वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्ग

साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते.

२ ऊ. देवतेविषयी श्रद्धा आणि भाव निर्माण होणे

प्रार्थना केल्यामुळे देवतेची कृपा होऊन अनुभूती येतात. त्यामुळे देवतेविषयी श्रद्धा आणि भाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

२ ए. सामूहिक प्रार्थनेचे महत्त्व

`मुलांद्वारे सामूहिक प्रभुवंदन आणि संकीर्तन केल्याने एकसुरात निर्माण झालेला तुमुल (विशिष्ट) ध्वनी वातावरणात पवित्र लहरी निर्माण करण्यास समर्थ असतो. या वेळी मन ध्वनीवर एकाग्र होते, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि श्रवणशक्ती विकसित होते; म्हणून शाळेत सामूहिक भगवद्प्रार्थनेला महत्त्वपूर्ण मानले गेले आहे.’ (मासिक ‘ऋषी प्रसाद’, नोव्हेंबर २०१०)

३. लाभ

३ अ. व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ

`प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात, हे आता वैज्ञानिक प्रयोगांद्वारेही सिद्ध झाले आहे.’ (मासिक ‘ऋषी प्रसाद’, नोव्हेंबर २०१०)

३ आ. प्रार्थनेमुळे कृती, विचार आणि वृत्ती या तीनही स्तरांवर लाभ होणे

१. कृती

प्रार्थनेमुळे कृती भावपूर्ण झाल्यामुळे कृती करतांना होणार्‍या चुका घटून अपेक्षित अशी ईश्वरसेवा किंवा गुरुसेवा घडू लागते.

२. विचार

मन कार्यरत आहे, तोपर्यंत मनात विचार येतच रहाणार. विचारांमुळे मनोलय होण्यास अडथळा निर्माण होतो. निरर्थक विचारांमुळे मनाच्या शक्तीचाही अपव्यय होतो. तो अपव्यय टाळण्यासाठी प्रार्थना उपयुक्त आहे. प्रार्थनेने चिंता घटून चिंतन वाढते.

३. वृत्ती

प्रार्थना पुनःपुन्हा केल्यामुळे प्रार्थनेचा संस्कार होऊन प्रार्थनेचे चिंतन चालू होते. त्यामुळे व्यक्ती किंवा साधक यांची वृत्ती अंतर्मुख होऊ लागते.

३ इ. मनावरील ताण दूर होणे

१. `मनावर ताण (टेन्शन) आला असल्यास प्रार्थना केल्यावर ईश्वराच्या आठवणीने तो निघून जातो आणि नामजपाचीही आठवण होते.

२. प्रार्थनेमुळे कार्याचे किंवा सेवेचे कर्तेपण ईश्वराकडे दिले जाते; म्हणून मनावर ताण येत नाही.’

– कु. भक्ती पारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (चैत्र कृ. चतुर्थी, कलियुग वर्ष ५१११ ड१३.४.२००९)

३ ई. अहं अल्प होणे

अहंमुळे मनुष्याच्या जीवनात दुःख निर्माण होत असते. मनुष्य प्रार्थनेच्या माध्यमातून सर्वशक्तीमान ईश्वराला शरण जातो. प्रार्थनेद्वारे तो देवाकडे याचना करत असतो; त्यामुळे त्याचा अहं लवकर अल्प होण्यास साहाय्य होते.

३ उ. भावपूर्ण प्रार्थना केल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

३ ऊ. मनोलय आणि बुद्धीलय

`ईश्वरचरणी आत्मनिवेदन केल्याने, तसेच सतत प्रार्थना अन् कृतज्ञता व्यक्त केल्याने मनोलय आणि बुद्धीलय लवकर होतो.’ – प.पू. डॉ. जयंत आठवले (५.१२.२००७)

३ ए. ईश्वर किंवा गुरु यांनी क्षमा करणे

व्यक्तीच्या हातून एखादी चूक झाली असता प्रार्थना करून ईश्वर किंवा गुरु यांना शरण गेल्यास ते क्षमा करतात.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘प्रार्थना’

१. सर्वसाधारण व्यक्ती

ज्याला मायेतील काही पाहिजे असेल, तो देवाची प्रार्थना करतो. त्याच्या लक्षात येत नाही की, देवाची भक्ती केल्याशिवाय तो प्रार्थनेनुसार काही देत नाही. अनेकदा प्रार्थना करून तिचे फळ मिळाले नाही, तर काही जणांचा देवावरचा विश्‍वास न्यून होतो.

२. भक्तीमार्गाने साधना करणारा

भक्तीयोग सोडून कर्मयोग, ज्ञानयोग इत्यादी मार्गांनी साधना करणारे बहुधा प्रार्थना करत नाहीत.

अ. त्याच्या लक्षात येत नाही की, देवाची भक्ती मनापासून केल्याशिवाय आणि प्रार्थनेत भाव असल्याशिवाय देव अपेक्षित देत नाही.

आ. त्याच्या लक्षात येत नाही की, सर्व ईश्‍वरेच्छेने होत असल्यामुळे स्वेच्छेने काही मागणे व्यर्थ आहे. प्रत्यक्षात स्वेच्छा नष्ट करण्यासाठीच साधना करतात.

इ. काय मागावे, हेही बर्‍याच जणांना कळत नसल्यामुळे त्यांनी मागितलेले साधनेला पूरक नसले, तर देव देत नाही.

ई. प्रार्थनेचा महत्त्वाचा लाभ म्हणजे अहं अल्प होण्यास साहाय्य होते.

उ. प्रार्थना करायचीच असली, तर साधनेत साहाय्य मिळावे; म्हणून देवाची प्रार्थना करणे योग्य आहे.

ऊ. साधनेत प्रगती झाल्यावर भक्त देवाकडे काही मागत नाही; कारण त्याला ज्ञात असते की, त्याला आवश्यक असलेले सर्व काही देव योग्य वेळी देतो.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Leave a Comment