१. व्याख्या
देवता किंवा गुरु यांचे सगुण रूप मनाने कल्पून मनानेच त्याची स्थुलातील कृतीप्रमाणे पूजा करणे, म्हणजे मानसपूजा होय.
२. महत्त्व
अ. कर्मकांडातील पूजा स्थूल स्तरावरील, तर मानसपूजा त्यामानाने सूक्ष्म स्तरावरची बाब आहे. ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’ या साधनेतील सिद्धांताला अनुसरून मानसपूजा ही कर्मकांडातील पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे.
आ. काही जणांना नोकरी, व्यवसाय यांसारख्या कारणांमुळे देवपूजा करण्याची इच्छा असूनही ती करायला मिळत नाही. अशांना प्रवासात जाता-येता वा अन्यत्र मानसपूजा करण्याची संधी असते. त्याचप्रमाणे कोणी रोज देवपूजा करत असला, तरी त्यानेही मानसपूजा करायला हरकत नाही.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’
मानसपूजा कशी करावी ?
श्री महालक्ष्मीदेवीच्या मानसपूजेचे एक उदाहरण पुढे दिले आहे. याप्रमाणे श्री शांतादुर्गा, श्री विठ्ठल-रखुमाई आदी देवतांचे भक्त त्या त्या देवतेची मानसपूजा करू शकतात.
श्री महालक्ष्मीदेवीची मानसपूजा
पूजेचे साहित्य
सोन्याचे तबक, सोन्याच्या परडीत फुले, सोन्याचे ताम्हण आणि कलश, सोन्याची ५ निरांजने अन् मोठ्या वाट्यांत हळद-कुंकू.
पूजा
‘आज माझ्या जीवनातील भाग्याचा दिवस आहे. मला देवीची पूजा करण्याची संधी मिळाली आहे. मी एका सोन्याच्या कलशात कोमट सुगंधी जल घेतले आहे. आता त्या कोमट जलाने मूर्तीला स्नान घालत आहे. आता मी एका सोन्याच्या फुलपात्रात पंचामृत घेतले आहे. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीला हळूवारपणे पंचामृताचा अभिषेक करत आहे. आता पुन्हा कोमट जलाने मूर्तीला स्नान घालत आहे. देवीची मूर्ती पुसायला मऊ रेशमी वस्त्र घेतले आहे. त्या वस्त्राने हळूवारपणे मी मूर्ती पुसत आहे.
महालक्ष्मीदेवीने लाल रंगाचे रेशमी वस्त्र परिधान केले आहे. त्याच्या कडा सोनेरी आहेत. तिने अंगावर पिवळेजर्द वस्त्र पांघरले आहे. त्यावर सुंदर वेलवीण (नक्षी) आहे. देवीने वेगवेगळे दागिनेही घातलेले दिसत आहेत. माझ्या मनातील भावानुसार देवीचे रूपही पालटतांना दिसत आहे. देवीची ही विविध रुपे पाहून मनाला आनंद वाटत आहे.
सोन्याच्या ताम्हनात असलेल्या सोन्याच्या वाट्यांत हळद-कुंकू, केशर, अष्टगंध अन् कस्तुरी आहे. ते मी देवीच्या कपाळावर अलगद लावत आहे. आता मी देवीला आवडणारी मोगरा, कमळ, चाफा, बकुळी इत्यादी सुवासिक फुले तिच्या चरणी अर्पण करत आहे. आता मी २ सुवासिक उदबत्त्यांनी श्री महालक्ष्मीदेवीला प्रेमाने ओवाळत आहे. ओवाळतांना मी घंटी वाजवत आहे. आता मी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवत आहे. आई महालक्ष्मीदेवीला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आर्ततेने प्रार्थना करत आहे. मी तुपाची ५ निरांजने लावली आहेत. पंचारती ओवाळतांना मला देवीची निरनिराळी रूपे दिसत आहेत. देवीच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन तिला ‘माझा उद्धार कर’, असे विनवत आहे. देवी माझ्याकडे वात्सल्ययुक्त नजरेने पहात आहे. तिच्या एका कृपाकटाक्षाने माझ्या सर्व दुःखांचा नाश झाला आहे. आई तिचा प्रेमळ वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेऊन मला आशीर्वाद देत आहे. देवी मला मोगर्याच्या फुलांची वेणी प्रसाद म्हणून देत आहे. मी तिच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करत आहे,‘ आई मला तुझी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कोटी कोटी कृतज्ञ आहे.’
खूप छान