‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’
‘फेब्रुवारी ते जून २०१७ या कालावधीत कु. गौरी मुदगल (वय १७ वर्षे) ही पू. संदीप आळशी यांना काढा बनवून देण्याची सेवा करत असे. या कालावधीत तिला पू. संदीपदादा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. कु. गौरीच्या या लिखाणावरून तिची शिकण्याची तळमळ दिसून येते, तसेच अशी तळमळ असेल, तर ‘देव किती साहाय्य करतो आणि छोट्या-छोट्या कृतींतून साधक कसा घडत जातो’, ते लक्षात येईल.
१. इतरांचा विचार करणे
१ अ. स्वतःला काढा वेळेत मिळण्यापेक्षा तो देणार्या साधिकेची झोप पूर्ण होण्याला प्राधान्य देणे
‘गुरुकृपेने मला पू. संदीपदादांना काढा करून देण्याची सेवा मिळाली. संतसेवा मिळाल्याने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. पू. दादांना सकाळी ८ वाजण्यापूर्वी काढा द्यायचा होता. त्यासाठी मी सकाळी ६ वाजता उठत असे. नंतर स्वतःचे आवरून ७.३० पर्यंत काढा बनवून मी पू. दादांना द्यायला जात असे. पू. दादांनी माझा दिनक्रम जाणून घेतला आणि ते म्हणाले, ‘‘तू एवढ्या लवकर उठू नकोस. आधी तुझी झोप पूर्ण कर. काढा नंतर आणलास, तरी चालेल. काढ्याची वेळ १० मिनिटे मागे-पुढे झाली, तरी चालेल.’’
कधी-कधी मी पू. दादांना एखादी वस्तू देण्यासाठी जात असे. तेव्हा ते म्हणायचे, ‘‘तू सेवा सोडून एवढ्यासाठी घाईने २ माळे चढून वर येऊ नकोस. (पू. दादा आश्रमातील तिसर्या माळ्यावर रहातात.) इकडे येणारच असशील, तेव्हा दिलीस, तरी चालेल.’’
१ आ. प्रसाद देण्यास आलेल्या साधिकेला पू. संदीपदादांनी स्वतः आसंदी आणून देणे आणि त्यांचे समष्टीवर, म्हणजेच प्रत्येक साधकावर पुष्कळ प्रेम असल्याने त्यांच्याकडून अशा कृती सहजतेने होत असणे
एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला दिलेला प्रसाद मी पू. दादांना द्यायला गेले. माझ्याशी बोलता बोलताच त्यांनी एक आसंदी आणली. मला वाटले, ‘ती त्यांनी स्वतःसाठी आणली असेल; पण प्रत्यक्षात त्यांनी मला त्या आसंदीवर बसायला सांगितले. नंतर पू. दादांनी अत्यंत भावपूर्णपणे प्रार्थना केली आणि प्रसाद ग्रहण केला.
या प्रसंगावरून ‘पू. दादा स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. ‘समष्टीला आपल्यामुळे त्रास होऊ नये’, असा त्यांचा हेतू असतो’, हे माझ्या लक्षात आले. त्यांना अशा कृती करायला सुचतात; कारण त्यांचे समष्टीवर, म्हणजेच प्रत्येक साधकावर पुष्कळ प्रेम आहे !
२. निरपेक्ष प्रेम
२ अ. साधिकेची भेट होत नसल्याने पू. दादांनी तिची विचारपूस करणे
काही दिवसांनंतर मी पू. दादांसाठी काढा बनवून तो खोलीत ठेवून लगेच परत येऊ लागले. त्यामुळे त्यांच्याशी माझे फारसे बोलणे होत नव्हते. ७.३.२०१७ या दिवशी पू. दादांनी त्यांच्या पत्नी सौ. अवनीताई यांच्याकडून मला निरोप पाठवला, ‘गौरी कशी आहे ? तिची मनाची स्थिती कशी आहे ?’ तेव्हा ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. ‘काढा करून देणे बंद झाले, तरी साधिकेला ‘ती कधीही भेटायला येऊ शकते’, असे पू. दादांनी सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांमुळे संतांचे असे निरपेक्ष प्रेम अनुभवायला मिळत असल्यामुळे साधिकेला त्याविषयी कृतज्ञता वाटणे
काही दिवसांनी वैद्यांनी ‘पू. दादांना आता काढा द्यायला नको’, असे सांगितले. तेव्हा ‘आता पू. दादांकडे जायला मिळणार नाही’, या विचाराने माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. तेव्हा मी मनाला समजावले, ‘ही ईश्वरेच्छा आहे.’ नंतर मी पू. दादांकडे गेले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘काढ्याच्या निमित्ताने तुझी भेट होत असे. आता तू आली नाहीस, तरी तुझी आठवण मात्र येईल !’’ मी म्हणाले, ‘‘मलाही तुमची आठवण येईल.’’ ते म्हणाले, ‘‘तू कधीही मला भेटायला येऊ शकतेस. मला काहीच अडचण नाही.’’ त्यांच्या या बोलण्यावरून पू. दादांसारख्या संतांचे निरपेक्ष प्रेम माझ्या लक्षात आले.
केवळ परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वांना एकत्र आणून त्यांच्यात असे प्रेम निर्माण केले आणि परस्परांशी जोडून ठेवले आहे. असे दैवी नाते मला अनुभवायला मिळत असल्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.
३. साधक सिद्ध करण्याची पू. दादांची तळमळ
३ अ. ‘साधकाकडून चूक होऊ नये’, अशा प्रकारे सेवा समजावून सांगण्याची सहज सोपी पद्धत !
कोणतीही सेवा इतरांना समजावून सांगण्याची पू. दादांची पद्धत अतिशय सुंदर आणि सोपी आहे. एकदा त्यांनी काढा बनवण्याची सर्व कृती मला समजेल, अशा भाषेत सांगितली आणि ‘समजले का ?’, असेही प्रेमाने विचारले. त्यांनी सांगितले, ‘‘आपल्याला प्रत्येक सेवा योग्य पद्धतीने आणि परिपूर्णच करायला हवी. आरंभी चुका होतील. चुका झाल्या, तरी अडचण नाही; पण त्या चुकीतून शिकून पुढे साधक घडायला हवा !’’ काढा बनवायला लागल्यानंतर पू. दादांनी माझ्याकडून जाणून घेतले, ‘या सेवेसाठी किती वेळ लागतो ? ती करायला कोणत्या अडचणी येतात ? अधिक वेळ कशात जातो ?’ नंतर त्यांनी मला येणार्या अडचणींवर उपाययोजना समजावून सांगितल्या. या वेळी सेवेला आवश्यक तेवढाच वेळ लागावा आणि साधकाची फलनिष्पत्ती योग्य असावी, ही त्यांची तळमळ मला जाणवली.
३ आ. साधिकेला समस्येवर उपाय सांगतांना पू. संदीपदादांनी केलेले सर्वांगीण मार्गदर्शन आणि ते ऐकल्यावर पू. दादांच्या साधक घडवण्याच्या तळमळीविषयी साधिकेचे झालेले चिंतन !
एकदा मी पू. संदीपदादांना माझी अडचण सांगितली, ‘‘काही गोष्टी मला लक्षात येत नसल्याने मला साधक हसतात. त्यामुळे मला फार वाईट वाटते.’’ त्यावर पू. दादांनी पुढील सूत्रे सांगितल्यावर मी नकारात्मक स्थितीतून बाहेर पडले.
१. आपण इतरांच्या शब्दांत न अडकता त्या शब्दांच्या पुढच्या टप्प्याला जायला हवे. आपण सतत शिकण्याच्या स्थितीत राहिलो, तर देव एक-एक पायरी पुढे नेत असल्याचे लक्षात येते.
२. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देव त्याला सेवा देतो.
३. साधकांच्या प्रकृती निरनिराळ्या असल्याने ते त्या पद्धतीने बोलतात. त्याचे वाईट वाटून घेऊ नये. ‘साधक मला काय म्हणतात ?’, यापेक्षा ‘मी सतत देवाच्या अनुसंधानात कशी राहू शकते ? देवाची अनुभूती कशी घेऊ शकते ?’, याकडे लक्ष हवे. अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करून ‘देवाने आपल्याला काय काय दिले आहे’, याविषयी कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे.
४. आता आश्रमच आपल्या घरासारखा असल्याने सर्व साधक आपलेच आहेत.
यानंतर पू. दादांनी अन्य साधकांकडून चूक होऊ नये, यासाठी ‘कळत-नकळतही साधकांचे मन दुखावणे, हे पाप !’ या आशयाची एक चौकटही बनवून दिली.
पू. दादांच्या वरील विवेचनावरून वाटले की, ते प्रत्येक प्रसंगाचा परिपूर्ण रितीने अभ्यास करतात. ‘प्रत्येक साधकाने साधनेत पुढे जाण्यासाठी काय केले पाहिजे ?’, याचाही त्यांचा विचार झालेला असतो. या बोलण्यानंतर माझ्या मनातले सगळे निरर्थक विचार न्यून होऊन माझे मन हलके झाले. माझी साधनेत प्रगती व्हावी, ही तळमळ पू. दादांनाच अधिक असल्याचे जाणवून मला कृतज्ञता वाटली.
३ इ. परिपूर्ण सेवेविषयीचे मार्गदर्शन
एकदा परिपूर्ण सेवेविषयी पू. दादा म्हणाले, ‘‘देवाने प्रत्येकाला त्याची प्रकृती आणि क्षमता यांनुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या आहेत. तुला चित्रे काढणे किंवा कलाकृती करणे जमते, तसे मला जमत नाही. माझी लिखाणाची सेवा तुला येईलच, असे नाही. आपल्याला स्वच्छतेची जरी सेवा मिळाली, तरी ती मनापासून आणि भावपूर्ण रितीने केली पाहिजे. ती सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल, अशी आपली धडपड आणि तळमळ असली पाहिजे.’’
३ ई. साधकांना प्रोत्साहन देणे
११.३.२०१७ या दिवशी सकाळी मी पू. दादांना काढा द्यायला गेले. मी औषध ठेवत असतांना त्यांनी एका वाटीतून मला प्रसाद दिला. ते म्हणाले, ‘‘हा खाऊ तुझ्यासाठी आहे. तू नेहमी आम्हाला खाऊ देतेस ना ! आज मी तुला खाऊ देत आहे.’’ त्यानंतर मी त्यांना माझ्या मनाविरुद्ध घडलेला एक प्रसंग आणि पू. दादांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्या वेळी माझ्याकडून झालेले प्रयत्न यांविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘छान प्रयत्न केलेस. त्यामुळे तुझी प्रगती चांगली चालू आहे.’’
४. तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणे
पू. दादांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही ते त्यावर मात करून सेवा करतात. त्यांची ही क्षात्रवृत्ती आदर्श आहे. ते सतत आनंदी असतात. अनेकदा ते आजारी असूनही त्यांच्या तोंडावळ्यावरून ते कधी जाणवत नाही. ते देवाशी अंतर्मनापासून जोडलेले असल्याने त्यांना कंटाळा आल्याचे मी कधी पाहिलेले नाही.
५. साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे
एकदा मी पू. दादांना सांगितले, ‘‘मला रात्री झोप लागत नाही.’’ यावर त्यांनी मला एक मुद्रा आणि हनुमानाचा जप करण्यास सांगितले. झोपण्यापूर्वी ‘आपल्याभोवती सूक्ष्मातून नामजपाची पेटी कशी बनवावी ?’, हेही त्यांनी शिकवले. त्याप्रमाणे मी करून बघितले, तर मला लगेच झोप लागली आणि सकाळी लवकर जागही आली.
६. पू. दादांचे आदर्श वर्तन
६ अ. खोलीतील नीटनेटकेपणा
पू. दादांच्या खोलीतील वस्तू अत्यंत व्यवस्थितपणे आणि नीटनेटकेपणाने ठेवलेल्या असतात. ‘पू. दादांच्या खोलीतून बाहेर पडूच नये’, असे मला वाटत असते.
६ आ. पू. दादांचे हळूवार बोलणे आणि भावपूर्ण प्रार्थना करणे
पू. दादांचे बोलणे अत्यंत शांत, नम्र आणि हळू आवाजात असल्याने ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते. पू. दादा करत असलेली प्रार्थना ‘ऐकतच रहावी’, असे वाटते. त्यांची प्रार्थनेची कृती पाहून माझी भावजागृती होते. ‘त्यांना प्रार्थनेतून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवते.
६ इ. कृतज्ञताभाव
एकदा पू. दादांच्या डोळ्यांत एक औषध घालायचे होते. त्यांनी सांगितले, ‘‘ते एका प्राण्याचे मूत्र असून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ते डोळ्यांत घालण्यास सांगितले आहे. ‘पृथ्वीवरील प्राण्यांचा मनुष्याला इतका लाभ होतो’, हे आपल्याला ठाऊकच नसते. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामुळे ‘प्राण्यांविषयीही आपण कृतज्ञ राहिले पाहिजे’, हे लक्षात आले.’’
७. पू. दादांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
७ अ. पू. दादांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरच हसत असल्याचे जाणवणे
९.३.२०१७ या दिवशी मी पू. दादांना काढा द्यायला गेले. तेव्हा ते माझ्याकडे पाहून हसत होते. त्याचे कारण मला कळले नाही; पण त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरच हसत आहेत’, असे मला जाणवले.
७ आ. पू. दादांच्या खोलीजवळ गेल्यानंतर थकवा निघून जाणे आणि त्यांना पाहिल्यावर अंगदुखी थांबणे
एकदा सकाळी उठल्यावर माझे अंग पुष्कळ दुखत होते आणि मला थकवा आला होता. नंतर पू. दादांना काढा देण्यासाठी मी त्यांच्या खोलीच्या दाराजवळ गेले, तर माझा सगळा थकवा निघून गेला. पू. दादांनी औषधांचा पेला घेतांना स्मित हास्य केले आणि माझी अंगदुखीही न्यून झाली. यावरून ‘संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असते’, याची अनुभूती आली.
७ इ. पू. दादांच्या खोलीत पुष्कळ सुगंध येणे
१४.३.२०१७ या दिवशी मी पू. दादांच्या खोलीबाहेर उभी होते. तेव्हा त्यांच्या खोलीतून पुष्कळ सुगंध येत होता आणि त्यामुळे माझी अंगदुखी थांबली. पू. दादांच्या खोलीत निरनिराळ्या प्रकारचे सुगंध येतात.
७ ई. पू. दादांची खोली परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीप्रमाणे वाटणे
पू. दादांच्या खोलीत मला पुष्कळ शांत वाटते. तेथे पुष्कळ चैतन्यदायी स्पंदने जाणवतात आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्याच खोलीत आहोत’, असे जाणवते.
७ उ. पू. दादांनी डोळ्यांतील कण काढण्याविषयी साधिकेला सांगितल्यानंतर तो कण निघून जाणे आणि पू. दादांनी या अनुभूतीचे श्रेय साधिकेतील भावाला देणे
एकदा मी पू. दादांच्या खोलीत जाण्यापूर्वी माझ्या डोळ्यांत काहीतरी गेले होते. मला डोळा चोळतांना पाहून पू. दादांनी माझी चौकशी केली आणि ‘तो कण कसा काढायचा’, ते सांगितले. नंतर मी पू. दादांसाठी थर्मासमधील पाणी पेल्यात काढत असतांना माझ्या लक्षात आले की, माझ्या डोळ्यांतील कण निघून गेला आहे. यावरून ‘पू. दादांच्या मनातील विचार देव लगेचच पूर्ण करतो’, हे मी अनुभवले. मी हे पू. दादांना सांगून म्हणाले, ‘‘पू. दादा, तुमच्या चैतन्यामुळे हे झाले.’’ यावर पू. दादा म्हणाले, ‘‘तुझा भाव आहे; म्हणून देव तुला निरनिराळ्या अनुभूती देतो.’’
‘परात्पर गुरु डॉक्टर, पू. संदीपदादांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही ते रात्रंदिन सेवारत असतात. मी मात्र अल्पशा शारीरिक थकव्याने दमून जाते. हे गुरुदेवा, आपणच मला माझ्यातील स्वभावदोषांवर मात करायला शिकवा. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे माझ्या अधिकाधिक कृतीत येऊ देत आणि मला आपल्याला अपेक्षित असे घडता येऊ दे’, ही प्रार्थना !’
कु. गौरी मुदगल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०१७)
पू. संदीप आळशी यांची गुणवैशिष्ट्ये
१. परिपूर्णते, तुझे दुसरे नाव पू. संदीप आळशी !
‘ऑक्टोबर २०१७ मध्ये सनातनच्या देवीविषयीच्या ‘शक्ति’ या लघुग्रंथाचे पुनर्मुद्रण करायचे होते. देवीची उपासना, नवरात्री आदी विषय या लघुग्रंथात आहेत. पुनर्मुद्रणाच्या निमित्ताने त्या लघुग्रंथात घेण्यासाठी मी काही सूत्रे निवडली आणि ती सूत्रे जोडून मी लघुग्रंथाची संगणकीय धारिका पू. संदीपदादा यांना पहाण्यास ठेवली. या सेवेचा आवाका माझ्या दृष्टीने फारसा मोठा नव्हता. मी दोन-तीन सूत्रे त्या लघुग्रंथात अधिक केली होती. मी ठेवलेली धारिका वाचून पू. दादांनी त्यात अनेक लहान लहान तरीही महत्त्वपूर्ण सूत्रे अधिक घेण्यास सांगितली, उदा. गरबा खेळण्याच्या निमित्ताने धर्मांधांकडून होणारा ‘लव्ह जिहाद’चा धोका, नवरात्रीच्या काळात देशात होणारी गर्भनिरोधकांची वाढीव विक्री, नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची मूर्ती लहान न आणता मोठी आणणे. पू. दादा त्यासंदर्भात मला म्हणाले, ‘‘हा लघुग्रंथ असला, तरी त्याचे परत परत पुर्नमुद्रण होत नाही, त्यामुळे सर्व वाचकांपुढे आवश्यक ती सर्व सामाजिक आणि धर्मशास्त्रीय माहिती गेली पाहिजे. लघुग्रंथात अशा सूत्रांविषयी विवेचन करण्यास जागा (पानसंख्या) अल्प असली, तरी ‘ती सूत्रेच सोडून द्यायची’, असे नको. आवश्यक ती माहिती अल्प शब्दांत देऊया.’’ नंतर मला त्यांपैकी काही सूत्रांतील विवेचन अल्प शब्दांत मांडता येईना. त्यांनी तेही मला सूत्ररूपाने कसे मांडायचे ते दाखवले. ते पाहून माझ्या मनात विचार आला, ‘अरे, हे करणे किती सोपे होते !’ कोणताही ग्रंथ-लघुग्रंथ परिपूर्ण संकलित कसा करायचा; वाचकाला शक्य ती सर्व सूत्रे कशी द्यायची; लिखाण किचकट न करता सोपे कसे करायचे; सेवा केवळ ‘पूर्ण’ नव्हे, तर ‘परिपूर्ण’ कशी करायची, हे त्यांनी मला अनेक वेळा दाखवून दिले आहे. यामुळे माझ्या मनात वारंवार एक वाक्य उमटते, ‘परिपूर्णते, तुझे दुसरे नाव पू. संदीप आळशी !
२. शब्दांच्या योग्य वापराविषयी सतर्क असणारे पू. संदीपदादा !
एकदा (सप्टेंबर २०१७ मध्ये) त्यांनी मला त्यांच्याकडे आलेली एक धारिका नीट संकलित करण्यासाठी दिली. ते म्हणाले, ‘‘या धारिकेत सूत्रांची भेसळ झाली आहे.’’ थोड्या वेळाने त्यांनी मला दूरभाष करून सांगितले, ‘‘मगाशी मी ‘भेसळ’ शब्द वापरला, तो योग्य नव्हता, तर तेथे ‘सरमिसळ’ असे मी म्हणायला हवे होते !’’
– श्री. संजय मुळ्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१८)