श्री विठ्ठलचरणी क्षात्रतेज आणि भक्तीरूपी पुष्प अर्पित झाले !
रामनाथी (गोवा) – परखड लिखाणाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि विठ्ठलाप्रती उत्कटभक्ती असलेले पंढरपूर येथील ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज (वय ७२ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची घोषणा १ ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आली. ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी ३१ जुलै या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ही घोषणा केली. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश मराठे यांनी ह.भ.प. बडवे महाराज यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. या वेळी उपस्थित असलेले ह.भ.प. बडवे महाराज यांचे मित्र तथा पंढरपूर येथील उद्योजक श्री. अविनाश वांगीकर यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याच्या आरंभी २ मिनिटे श्री विठ्ठलाचे स्मरण करण्यात आले. या वेळी साधकांना श्री विठ्ठल समोर असून त्याचे चरण धरले असल्याचे दिसणे, शांत वाटणे, विठ्ठल विठ्ठल, असा नामजप चालू होणे, विठ्ठल सगुण रूपात समोर उभा असल्याचे दिसणे, आपण पंढरपूर येथील विठ्ठलाच्या गाभार्यासमोर उभे असल्याचे वाटणे, ह.भ.प. बडवे महाराज यांच्या अंतरी विठ्ठलाचे दर्शन होणे, ह.भ.प. बडवे महाराज यांच्याऐवजी कमरेवर हात ठेवलेल्या विठ्ठलाचे दर्शन होणे आदी अनुभूती आल्या. एका साधकाला ह.भ.प. बडवे महाराज यांच्यात विठ्ठलाला भेटण्याची आणि विठ्ठलाशी एकरूप होण्याची तीव्र तळमळ आहे, असेही जाणवले.
ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी परात्पर
गुरु डॉ. जयंत आठवले यांना घातला श्री विठ्ठलाला घातलेला प्रासादिक पुष्पहार !
रामनाथी आश्रमात ह.भ.प. बडवे महाराज यांनी ३१ जुलै या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट घेऊन त्यांना श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लावलेले गोपीचंदन लावले. त्यानंतर श्री विठ्ठलाला घातलेला प्रासादिक पुष्पहार घातला. या वेळी त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पांढरी शाल घातली अन् पंढरपूर येथून आणलेल्या पेढ्यांपैकी एक पेढाही भरवला.
ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ.
जयंत आठवले यांना हार घातल्यावर सद्गुरु बिंदाताई यांना जाणवलेले सूत्र !
ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना हार घालण्यापूर्वी तो हार पाहून भावजागृती होत होती. हार हातात घेतल्यावर तो विठ्ठलाच्याच गळ्यात आहे, असे दिसत होते. महाराजांनी परात्पर गुरूंना पेढा भरवल्यावर संत भक्तराज महाराज यांनी विठ्ठलाला पेढा भरवल्याचा क्षण अनुभवला. श्रीमत् सद्गुरु भक्तराज महाराज यांच्या भजनांतील ओळीप्रमाणे तो क्षण कसा असेल, असे वाटायचे. ह.भ.प. बडवे महाराजांनी पेढा भरवल्यावर देवाने तो क्षण अनुभवण्याची इच्छा पूर्ण केली. तो क्षण आता कायमस्वरूपी हृदयात राहील.
१. श्री विठ्ठलाचा नामजप केल्यानंतर ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांना आलेली अनुभूती
राजा परीक्षित मृत्यूच्या जबड्यात असतांना त्याला शुकमुनींनी श्रीमद्भागवताच्या चतुःश्लोकातील श्लोक सांगितला होता. त्यानुसार प्रत्येक प्राणिमात्रामध्ये आणि येथे असलेल्या सर्व साधकांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. गेली ६० वर्षे मी श्री विठ्ठलाची सेवा तीच धारणा म्हणून करत आहे. आज नामजप करतांना अंतर्मनातील ती गाठ मजबूत झाली आणि भाव जागृत झाला. (या वेळी ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी त्या श्लोकाचे उच्चारण केले.)
२. ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी सनातनचे सद्गुरु आणि साधक यांचे केलेले भावपूर्ण वर्णन !
मनुष्य जीवन कृतार्थ करायचे असेल, तर ते धर्माच्या अधिष्ठानाविना पूर्ण होऊ शकत नाही. गेली ५० वर्षे दैनिक पंढरी संचारच्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता केली. त्यासाठी लाखो रुपयांची संपत्ती विकली; पण राजकीय पुढार्यांच्या कधी पाया पडलो नाही. माझ्या वडिलांनी श्री विठ्ठलाच्या अंगावरील दागिने सांभाळण्याची सेवा ५५ वर्षे केली. त्यानंतर मी ती सेवा २२ वर्षे केली. ही सेवा माझ्याकडून श्री विठ्ठलानेच अपूर्वपणे पूर्ण करून घेतली. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या कृपेने आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे मी सनातन आश्रमातील अत्यंत सश्रद्ध भावनेशी जोडला गेलो.
अ. धर्मसूर्यासम कार्य करणार्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ !
रामनाथी आश्रमात प्रतिदिन एक सूर्य उगवत नाही, तर प्रतिदिन दोन सूर्य उगवतात. एक म्हणजे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि दुसरे म्हणजे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ ! निसर्गातील सूर्य प्रकाश देतो, तर रामनाथी आश्रमातील सूर्य धर्मनिष्ठांवर धर्मज्ञानाचे प्रोक्षण करतो. पुढच्या काळात मी जिवंत असेन कि नाही, हे मला ठाऊक नाही; पण हिंदु राष्ट्राची निर्मिती झाल्यावर तो सूर्य रामनाथी आश्रमात असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी सूर्यफुलाच्या माध्यमातून अर्पण होईल. त्यातील दोन पाकळ्या म्हणजे या सद्गुरुद्वयी असतील.
आ. सनातनच्या साधकांचा भाव !
संत नामदेव यांनी श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवून त्याने तो ग्रहण करावा, यासाठी त्यांनी स्वतःचे डोके त्याच्या चरणांवर आपटण्याचा निर्धार केला. त्याच वेळी श्री विठ्ठलाने संत नामदेवांचा हात धरला आणि त्यांना नैवेद्यातील दूध पाजले. त्या वेळी विठ्ठलाने देव आणि भक्त यांमध्ये भेद नाही, हेच दाखवून दिले. असाच भाव सनातनच्या साधकांमध्ये आहे. मी भागवतकथा सांगितल्यावर त्यामध्ये मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाची माहिती सांगतो. एकदा मुंबईमध्ये भागवतकथा सांगितल्यावर मी उपस्थितांमध्ये सनातनचे कोणी आहेत का ?, असे विचारल्यावर दोन साधिका उभ्या राहिल्या. त्यांना बघितल्यावर माझ्या डोळ्यांतून भावाश्रू तरळले.
३. आकाशाप्रमाणेच रामनाथी आश्रमाच्या ऊर्जेची लांबी, रुंदी आणि खोली मोजू शकत नाही !
अ. रामनाथी आश्रमातील ऊर्जा विलक्षण आहे. साधनारत रहाण्यासाठी संसारविष बाजूला ठेवून सेवाव्रत आचरावे. जशी अथांग समुद्राची खोली, आकाशाची लांबी-रुंदी आणि मानवाच्या मनाची खोल दरी मोजू शकत नाही, तशी रामनाथी आश्रमाच्या ऊर्जेची लांबी, रुंदी आणि खोली मोजू शकत नाही.
आ. माझी श्री विठ्ठलाकडे एकच प्रार्थना आहे की, स्वातंत्र्यदेवतेची हिंदु राष्ट्ररूपी भगवी पताका लाल किल्ल्यावर फडकावी. तो दिवस पहाण्यासाठी देवाने मला आयुष्य वाढवून द्यावे. संपूर्ण हिंदुस्थानामध्ये रामनाथी आश्रमाद्वारे धार्मिक ऊर्जा प्रज्वलित झाली आहे. त्याप्रमाणे साधना आणि हिंदु राष्ट्र यांचा निर्धार द्विगुणीत व्हावा.
इ. एक दिवस भारतमातेचा भगवा फडकेल, हे सत्य आहे आणि त्याचे सर्वांत महत्त्वाचे बीजारोपण सनातन आश्रमात असेल. हिंदु राष्ट्रासाठी लागणारी जाज्वल्य भक्ती रामनाथी आश्रमात आहे.
४. ह.भ.प. बडवे महाराज यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ह.भ.प. बडवे महाराज हे नात्याने माझे चुलत मामा लागतात. मी पूर्वी आजोळी जायचे, तेव्हा त्यांना तेथे भेटत असे. मला तेव्हा भेटत असलेले मामा आणि परात्पर गुरूंच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी भेटलेले मामा पुष्कळ निराळे आहेत. ते मुले, सुना, नातवंडे यांच्यापासून अलिप्त आहेत, असे वाटते.
– सौ. सुचेता सुरेश नाईक
आ. ह.भ.प. बडवे महाराज पंढरी संचार हे दैनिक चालवतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात सात्त्विकता टिकवणे अवघड असते. ते त्यांनी केले आहे. – श्री. सुरेश नाईक
इ. महाराजांना जेवण वाढण्याची सेवा करतांना मी पांडुरंगाचीच सेवा करत आहे, असे मला वाटत होते. सेवा करतांना पुष्कळ उत्साहही जाणवत होता. – कु. करुणा मुळे
ई. ह.भ.प. बडवे महाराजांना गुडघेदुखीचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे आश्रम दाखवण्याच्या वेळी गाडीने वर जाऊया, असे सांगूनही त्यांनी संपूर्ण आश्रम पायी फिरूनच पाहिला. मी कुणीतरी मोठा आहे, असे त्यांना वाटत नव्हते. यातून त्यांच्यातील अहंशून्यता लक्षात आली. जेवण झाल्यावर साधिकेने त्यांचे ताट धुण्यासाठी घेतल्यावर त्यांना अपराधी वाटत असे. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांना महाराज स्वत:च्या आईच्या जागी मानतात. प्रत्यक्षात सद्गुरु गाडगीळकाकू महाराजांपेक्षा वयाने लहान आहेत. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीही अपार भाव आहे. ते परात्पर गुरूंना माता-पिताच मानतात. – श्री. संदीप शिंदे
उ. ह.भ.प. बडवे महाराज यांना पाहिल्यावर ते साक्षात् विठ्ठलस्वरूप असल्याचे वाटले !
सद्गुरु बिंदाताईंनी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करायला सांगून त्याला आळवायला सांगितले. त्यानंतर ह.भ.प. बडवे महाराज यांना पाहिल्यावर ते साक्षात् विठ्ठलस्वरूप असल्यासारखे वाटले. महाराजांचा रामनाथी आश्रमाविषयी असलेला उत्कट भक्तीभाव सर्व साधकांना शिकण्यासारखा आहे. मी एवढ्या वर्षांपासून आश्रमात रहातो, परंतु आश्रमाप्रती भाव कसा असावा, हे महाराजांकडूनच शिकायला मिळाले. त्यांच्यातील विलक्षण विठ्ठलभक्ती आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची तीव्र तळमळ पाहून भावजागृती होते. समाजाने साधना करून ईश्वरप्राप्ती करावी, अशी त्यांची तीव्र तळमळ आहे. या तळमळीपोटी अनेक जण साधना करू लागले आहेत.
– श्री. विक्रम डोंगरे
ऊ. श्री विठ्ठलाप्रती भेटीसाठी व्याकुळ असलेले ह.भ.प. बडवे महाराज !
ऊ १. ज्ञानयोग आणि क्षात्रतेज यांचा संगम
ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी रामनाथी आश्रमाविषयी ३१ जुलैला मुलाखत दिली. त्या वेळी त्यांच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ज्ञानयोग आणि संत तुकाराम महाराज यांचा नाठाळांच्या माथी काठी हाणू यातील क्षात्रतेज सामावलेले असल्याचे जाणवले.
ऊ २. अहं अल्प आणि लीनता
ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी मुलाखत दिल्यावर त्यांनी तुम्हाला हवे तेवढे घ्या किंवा तुम्ही पाहिजे ते काढूही शकता, असे सांगितले. खरेतर पत्रकारिता क्षेत्रातील ५० वर्षांचा अनुभव असतांना काय ठेवायचे आणि काय ठेवायचे नाही ? याविषयी ते अधिकाराने सांगू शकले असते; पण त्यांनी तसे केले नाही. यातूनच त्यांचा अहं अल्प आहे, असे जाणवते.
ऊ ३. श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी व्याकुळता
ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांच्यामध्ये श्री विठ्ठलाची भक्ती अंतःकरणात रुजली आहे. त्यांच्याकडे बघितल्यावरच श्री विठ्ठलाची आठवण येते. त्यांची अवस्था भेटी लागी जीवा लागलीसे आस या ओवीप्रमाणे आहे.
ऊ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव
गेल्या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या वेळी ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी त्यांना श्री विठ्ठलाला घातलेला तुळशीचा हार घातला होता आणि ३१ जुलै या दिवशीही त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी श्री विठ्ठलाला घातलेला फुलांचा हार आणून त्यांना घातला. यातून ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये श्री विठ्ठलाचे रूपच अनुभवतात आणि तशी त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भक्ती आहे, असे जाणवले.
– श्री. भूषण कुलकर्णी
५. क्षणचित्रे
अ. सद्गुरु बिंदाताई यांनी प्रगतीची घोषणा केल्यावर ह.भ.प. बडवे महाराज म्हणाले, सत्कार नको, आशीर्वाद द्या.
आ. ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांचा सत्कार झाल्यानंतर त्यांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या चरणांची धूळ स्वतःच्या मस्तकाला लावली. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही या वेळी त्यांना नमस्कार केला.
इ. ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज यांनी सत्काराविषयी सांगितले, आज अलभ्य गुरुकृपा आहे !
६. ह.भ.प. बडवे महाराज यांच्याविषयी श्री. संदीप शिंदे यांना सुचलेले काव्य
मुखी सदा विठ्ठल नाम घेऊनि ।
चालवूनि झुंझार हिंदुत्वाची लेखणी ॥
सुटला एक जीव जन्म-मृत्यूच्या फेर्यांतूनी ।
लीन झाला पांडुरंगरूपी श्रीगुरुचरणी ॥
ह.भ.प. बडवे महाराज यांच्या ठिकाणी श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन झाले ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
मी महाराजांना परात्पर गुरूंच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी प्रथमच भेटले. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू महाराजांच्या विठ्ठलाप्रतीच्या भावाविषयी सांगत, तेव्हा माझी भावजागृती होऊन महाराजांना भेटण्याची उत्कंठा वाटत असे. या कलियुगात परात्पर गुरुदेवांकडूनच मोठे कार्य होणार आहे, हे त्यांनी जाणले आहे. त्यांची परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा आहे. ज्या ठिकाणी ते प्रवचन करतात, तेथे ते सनातनच्या रामनाथी आश्रमातील कार्याचा उल्लेख करतात. यातून त्यांच्यातील सनातन संस्थेवरील अपार श्रद्धा जाणवते. ते या वेळी आश्रमात आल्यानंतर मी त्यांना भेटायला गेले असता, त्या वेळी त्यांच्या जागी मला श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन झाले. त्या वेळी मी विठ्ठल-रखुमाईकडे हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना केली. महाराजांना सद्गुरु गाडगीळकाकू आणि माझ्याविषयी प्रीती वाटते. सनातनच्या साधकांविषयीही त्यांना प्रेम वाटते.
आषाढ मासात साधकांवर श्री विठ्ठलकृपेचा वर्षाव !
काही दिवसांपूर्वी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांनी रामनाथी आश्रमासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची मूर्ती पाठवली आणि विठ्ठलभक्त ह.भ.प. बडवे महाराज यांचे आश्रमात आगमनही आषाढ मासात झाले. सर्व साधकांवर विठ्ठलकृपेचा वर्षाव करण्यासाठी अन् सनातनच्या सर्व साधकांना आशीर्वाद देण्यासाठी ते आले. ही विठ्ठलाची लीलाच आहे.
ह.भ.प. बडवे महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट
भाव आहे ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव घेतल्यावरच ह.भ.प. बडवे महाराज यांच्या डोळ्यांत भावाश्रू येतात. त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव आहे. ते केव्हाही भेटल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना शिरसाष्टांग नमस्कार सांगतात. ह.भ.प. बडवे महाराज यांची श्रद्धा आहे की, मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्याचे कार्य केवळ हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था याच करू शकतात. याचसमवेत राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात केवळ सनातन संस्थाच थांबवू शकते. पुणे येथे मंदिर महासंघाची पत्रकार परिषद झाली, त्या वेळी त्यांची राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रतीची तळमळ अन् भाव जाणवला.