अनुक्रमणिका
- १. आनंदी आणि उत्साही
- २. प्रेमभाव
- ३. वृद्धावस्था आणि अनेक व्याधी असूनही सतत सेवा करणे
- ४. खंत वाटणे
- ५. प्रोत्साहन देणे
- ६. क्षमा मागता येणे – पू. आजोबांनी साधनेविषयी योग्य दृष्टीकोन दिल्याने कुटुंबियांची क्षमा मागता येणे
- ७. पू. शेंडेआजोबांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
- ८. रुग्णाईत असतांना सर्व संत, साधक आणि आधुनिक वैद्य यांचे साहाय्य मिळून गुरुकृपेने प्रकृती ठीक होणे
- ९. चार मासांत दुर्धर व्याधीतून ठीक झाल्याने तज्ञ आधुनिक वैद्यांनी आश्चर्य व्यक्त करणे
‘सनातनच्या संतांचे अद्वितीयत्व !’
१. आनंदी आणि उत्साही
‘पू. आजोबांचा तोंडवळा नेहमी आनंदी आणि उत्साही असतो.
२. प्रेमभाव
अ. पू. आजोबा पुष्कळ प्रेमळ आहेत. ते सर्व साधकांवर निरपेक्ष प्रेम करतात. ते सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करतात. ते माझी आणि माझ्या कुटुंबियांचीही पुष्कळ प्रेमाने विचारपूस करतात.
आ. ‘पू. आजोबा आमच्या प्रत्येक साधकाच्या घरातील एक प्रेमळ आजोबा आहेत’, असे मला वाटते. त्यांच्याशी आम्हाला पुष्कळ मोकळेपणाने बोलता येते. तेही सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधतात.
इ. माझा नातू चि. हर्षल याचा १० वीचा निकाल होता. तेव्हा सर्वांत प्रथम पू. आजोबांनी सकाळी लवकर भ्रमणभाष करून त्याला निकाल विचारला. तेव्हा ‘सर्व मुलांवर ते लेकराप्रमाणे प्रेम करतात’, हे माझ्या लक्षात आले. नातवांचा उत्साह वाढावा, म्हणून पू. आजोबा त्यांना परीक्षेच्या वेळी लेखणी (पेन) भेट देतात.
३. वृद्धावस्था आणि अनेक व्याधी असूनही सतत सेवा करणे
‘पू. आजोबांचे वय ७८ वर्षे आहे. वृद्धावस्था आणि अनेक व्याधी असूनही पू. आजोबा कधी विश्रांती घेत नाहीत. कधी कधी ते रुग्णाईत असतात. तेव्हा त्यांना चक्कर येत असते, तसेच त्यांना उभे रहाणे आणि सेवेला जाणे अशक्य असते. तेव्हा ते खोलीत बसून सेवा करतात. पत्रकावर नावे लिहिणे, अत्तराचे खोके बनवणे इत्यादी सेवा ते खोलीत असतांना करतात. खोलीत बसून करण्यासारख्या सेवा ते अविश्रांत करत असतात. पू. आजोबा अत्तर भरण्याची सेवा करतात. अत्तराच्या बाटल्यांना झाकणे लावणे, अत्तरासाठी खोके बनवणे, बाटल्यांची बांधणी करणे इत्यादी अनेक सेवा ते करतात.
४. खंत वाटणे
पू. आजोबांना सेवेसाठी येण्यास काही मिनिटे जरी विलंब झाला, तरी त्यांना पुष्कळ खंत वाटते.
५. प्रोत्साहन देणे
पू. आजोबा माझ्या नातवंडांना सेवेसाठी प्रोत्साहन देतात. ते नातवंडांवर साधनेचे महत्त्व बिंबवतात.
६. क्षमा मागता येणे – पू. आजोबांनी साधनेविषयी
योग्य दृष्टीकोन दिल्याने कुटुंबियांची क्षमा मागता येणे
गेल्या वर्षी माझ्या कुटुंबियांमध्ये क्षुल्लक कारणास्तव मतभेद झाले होते. तेव्हा पू. आजोबांनी साधनेचे दृष्टीकोन देऊन आम्हा कुटुंबियांना एकत्र आणले. पू. आजोबा नेहमी सांगतात, ‘‘जो साधक प्रथम माघार घेतो, चूक स्वीकारतो आणि क्षमा मागतो, तो देवाचा लवकर आवडता होतो.’’ त्यामुळे मला माझ्या कुटुंबियांची सहजपणे क्षमा मागता आली. पू. आजोबांच्या आशीर्वादाने आमच्या कुटुंबियांची मने जुळली.
७. पू. शेंडेआजोबांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
७ अ. उष्णतेचा तीव्र त्रास असूनही पू. आजोबांचे कपडे धुतांना अल्प घाम येणे
पू. आजोबांचे कपडे धुण्याची सेवा ईश्वराच्या कृपेने मला मिळाली. मला उष्णतेचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे थोडा वेळ जरी शारीरिक श्रमाची सेवा केली, तरी मी घामाने पूर्ण भिजून जाते; पण पू. आजोबांचे कपडे धुतांना मला घाम अल्प येतो.
७ आ. पू. आजोबांचे पांढरे कपडे अल्प श्रमात स्वच्छ होणे आणि त्यांतून पांढरा प्रकाश येत असल्याचे जाणवणे
पू. आजोबांचा पांढरा सदरा आणि पायजमा धुतांना ते अल्प श्रमात पुष्कळ स्वच्छ होतात. त्यांतून पांढरा प्रकाश येत असल्याचे जाणवून ‘सेवा भगवंतापर्यंत पोहोचत आहे’, याचा मला आनंद मिळतो.’
– श्रीमती शशिकला भगत, सनातन आश्रम, पनवेल.
८. रुग्णाईत असतांना सर्व संत, साधक
आणि आधुनिक वैद्य यांचे साहाय्य मिळून गुरुकृपेने प्रकृती ठीक होणे
८ अ. रुग्णाईत झाल्यावर साधकांनी आनंदाने आणि भावपूर्ण सेवा करणे
४.३.२०१५ या दिवशी सकाळी मला उठताच येईना. उठल्यावर चक्कर येऊन खाली पडल्यासारखे होऊ लागले. प्रसाधनगृहात जाता येत नव्हते. त्या वेळी कु. संदेश नाणोस्कर माझ्या समवेत राहून माझी सेवा करायचा. तसेच श्री. गोपाळ आणि श्री. किरण कुमार हे दोघे सेवेला असायचे.
८ आ. तज्ञांनी मेंदूला रक्तपुरवठा अल्प होत असल्याचे सांगून ३ मासांसाठी गोळ्या लिहून देणे
४ ते ९ मार्च २०१५ या दिवसांत ‘मानेचा आणि मणक्यांचा त्रास असेल’, असे वाटून मी ६ दिवस मानेचा चुंबकाचा पट्टा बांधला, तरी काहीच गुण आला नाही. नंतर ९.२.२०१५ या दिवशी आश्रमातील आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी यांच्या समवेत महात्मा गांधी (MGM) रुग्णालयात गेलो. तेव्हा मेंदूचे तज्ञ डॉ. बॅनर्जी यांना भेटल्यावर त्यांनी मला चालतांना पाहूनच मेंदूला रक्तपुरवठा अल्प होत असल्याचे सांगितले आणि ३ मासांसाठी गोळ्या लिहून दिल्या. जेवणाचे पथ्य सांगितले अन् चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
८ इ. आश्रमातील संतांनी मानसिक आधार देऊन आध्यात्मिक उपाय करणे
१. नातेवाइकांना भेटून जाण्यास सांगितल्यावर ‘आपण आता अधिक दिवस जगणार नाही’, हाच विचार सतत दोन दिवस मनात येणे
आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी यांनी माझ्या प्रकृतीविषयी रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य मराठेकाकांना दूरभाषद्वारे सांगितले. त्यांनी माझ्या नातेवाइकांना मला भेटून जाण्यास सांगितल्याचे कळल्यावर दोन दिवस मनात ‘मी आता अधिक दिवस जगणार नाही’, हाच विचार सतत येत होता. ‘मला हिंदु राष्ट्र पहावयास मिळणार नाही’, याची चिंता वाटत होती.
२. सद्गुरु राजेंद्रदादा आणि इतर संत यांनी मानसिक आधार देणे अन् सद्गुरु राजेंद्रदादांनी पाठपुरावा करून मनाची सिद्धता करवून घेणे
तिसर्या दिवशी पू. राजेंद्रदादा आणि इतर संत यांनी मला मानसिक आधार दिला. ते मला म्हणाले, ‘‘पू. फडकेआजींनी देह ठेवला, तेव्हा त्यांची पातळी ७२ टक्के होती आणि आता त्यांची पातळी ८५ टक्के झाली. तसेच तुम्हीही देह ठेवल्यानंतर प्रगती करू शकता.’’ त्याच क्षणी माझी चिंता अल्प झाली. मी पू. राजेंद्रदादा समवेतच असल्याने त्यांनी सतत पाठपुरावा करून माझ्या मनाची सिद्धता करवून घेतली. माझे दोष आणि अहं अल्प झाले. तसेच मानसिक त्रासही अल्प झाले.
३. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी आध्यात्मिक उपाय करणे, भ्रमणभाषवर ऐकण्यासाठी सर्व रोगांवरचे मंत्र देणे आणि पू. भावेकाकांनी आयुर्वेदिक औषधे चालू केल्यावर अवघ्या ४ मासांत प्रकृती उत्तम होणे
त्या वेळी सतत वाटायचे, ‘प.पू. गुरुदेवच पू. दादांच्या माध्यमातून माझी काळजी घेत आहेत.’ प.पू. पांडे महाराज यांनी माझ्यावर उपाय करून आरंभी तीन वेळा म्हणण्यासाठी मंत्र दिला. त्याला एकूण ७ घंटे (तास) लागायचे. मला पाठीच्या मणक्याचा त्रास असल्याने ७ घंटे बसणे शक्य नव्हते; म्हणून प.पू. पांडे महाराज यांनी मला सर्व रोगांवरचे मंत्र भ्रमणभाषवर ऐकण्यासाठी दिले आणि गळ्यात घालायला ताईत दिला. तसेच पू. भावेकाकांनीही मेंदू, लघवी, पोटाचे विकार, मणक्याचे विकार आणि बद्धकोष्टता यावरील आयुर्वेदिक औषधे चालू केली. अवघ्या ४ मासांत (महिन्यांत) माझी प्रकृती उत्तम झाली.
९. चार मासांत दुर्धर व्याधीतून
ठीक झाल्याने तज्ञ आधुनिक वैद्यांनी आश्चर्य व्यक्त करणे
२०.७.२०१५ या दिवशी मी परत रुग्णालयात डॉ. बॅनर्जी यांच्याकडे गेलो. मला बघून ते एकदम आश्चर्यचकीत झाले आणि म्हणाले, ‘‘४ मासांत तुम्ही चांगले झालात !’ त्या वेळी माझ्यासमवेत आधुनिक वैद्य भोसले आले होते. त्यांना डॉ. बॅनर्जी यांनी विचारले, ‘‘हे कसे काय घडले ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘साधनेमुळे हा पालट झाला.’’
प.पू. गुरुदेवांनीच प.पू. पांडे महाराज, सर्व संत, साधक आणि आधुनिक वैद्य यांच्या माध्यमातून माझ्यावर उपचार केले आणि मी आता पूर्ण ठीक झालोे आहे. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मी आता ५ – ६ घंटे उत्पादनांची सेवा करत आहे. त्यासाठी मी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असणार्या श्रद्धेमुळे त्यांना ही अनुभूती आली आहे. ही त्यांची वैयक्तिक अनुभूती आहे. – संकलक)
– (पू.) सुदामराव शेंडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.