‘व्यक्तीच्या जीवनात धर्म नावाचे चैतन्य नसेल, तर आसुरी वृत्तीची एक प्रभावळ या विश्वात निर्माण होईल. ही प्रभावळ देशविघातक अशी असेल, यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या सनातन संस्थेसारख्या एका विशाल कल्पवृक्षाची या विश्वाला अत्यंत आवश्यकता आहे.
अध्यात्म आणि वेदप्रामाण्यवादी यांच्या दृष्टीने धर्म हा कल्पनातीत आहे. आपण याची कल्पना करू शकत नाही; म्हणूनच धर्मचैतन्य, धर्मऊर्जा आणि धर्मसंस्कार जिवंत ठेवण्याचे महान कार्य गोव्यातील सनातनच्या आश्रमातून निर्माण होत आहे. तो नुसता आश्रम नव्हे, तर ‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ आहे.
आपण कल्पना करू शकत नाही, इतकी सूक्ष्म शक्ती या आश्रमाभोवती विस्तीर्ण पसरलेल्या वातावरणात अनुभवता येते. त्याही पुढे जाऊन ‘याची अनुभूती घेता येते’, असे म्हणणे हे अतिशयोक्ती मुळीच नाही; पण महामुर्ख आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांच्या कल्पनाशक्तीच्या पुढचे हे सत्य आहे.
कठोपनिषदात ‘नचिकेता’ नावाची एक गोष्ट येते. धर्मप्रामाण्यवादी शक्तीचा अंगभूत अंतर्भाव असलेल्या नचिकेता या तरुणाने एकदा प्रत्यक्ष यमराजाला विचारले, ‘‘महाराज मृत्यूनंतर कोण मरतो आणि कोण रहातो ?’’ समोरची व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या वैभवसंपन्न असल्याने यमराजांना प्रश्न पडला. त्यांनी या बालकाच्या बुद्धीला भुलभुलैय्या करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले, ‘‘बाळा, तुला मी प्रचंड मोठे साम्राज्य देतो, तुला त्याचा सम्राट करतो. पुढच्या कित्येक पिढ्या तुला ऐश्वर्यसंपन्न करतो’’; पण नचिकेताचे लक्ष्य वेगळे होते. या सर्व प्रलोभनांना त्याने नकार दिला आणि सांगितले, ‘‘मला फक्त उत्तराची अपेक्षा आहे.’’ हतबल झालेल्या यमराजाने मृत्यूचे आणि त्यानंतरचे अध्यात्म, गूढ आणि तत्त्वज्ञान सांगितले. या ठिकाणी नचिकेताने अध्यात्मातील पुरुषार्थ सिद्ध करून दाखवला. धर्माच्या ऊर्जेचा आणि चैतन्याचा नचिकेताचा विचार एक स्रोत आहे. नेमक्या याच स्रोताचा अमृतकुंभ डोंगरकपारी वसलेल्या आणि निसर्गाने न्हाऊन निघालेल्या सनातन आश्रमात आपल्याला पहायला मिळते.
जीवनाची दिशा आणि दशा ही जशी कर्मावर अवलंबून असते, तेव्हा त्या कर्माची दिशा अन् दशा पालटण्याचे सामर्थ्य ईश्वरी साधनेत असते. श्रीमद्भगवतगीतेच्या तिसर्या आणि चौथ्या अध्यायात यज्ञाचे १२ प्रकार सांगितले आहेत. सनातन आश्रमाचे तत्त्व ईश्वरी साधना एक तत्त्व मानतो. आपण प्रत्यक्षात अनुभूती घ्यायची असेल किंवा ज्यांना अध्यात्माचा स्पर्श किंवा गंध नसेल, तेव्हा प्रत्येक व्यक्तीने जातीपातीच्या कुबड्या बाजूला ठेवून सनातनच्या दिव्य आश्रमाला फक्त एक वेळेस भेट देऊन अनुभूतीजन्य प्रचीती घ्यावी, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
व्यक्तीच्या हातून घडलेल्या पापाचे संचितात रूपांतर होते. कालांतराने ते प्रारब्धात परिवर्तित होते आणि एकदा ते परिपक्व झाले की, कर्मानुसार त्याचे प्रारब्ध पुढे फळ देत असते. ही आमच्या धर्मनिष्ठ तत्त्वज्ञानाची बैठक आहे. मृत्यूला एकदा कवटाळावेच लागते. मोक्ष किंवा वैकुंठ या कर्माच्या अधीन गोष्टी आहेत; परंतु साधनेने जीवन घडवले, तर ती साधना मोक्षाच्या मार्गाची आपल्याला प्रचीती मिळवून देईल. हेच अध्यात्माचे तत्त्व परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या विचारांचे स्रोत आहे, असे वाटते आणि विश्वासही वाटतो.