राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु-शिष्य परंपरेची आवश्यकता !

Article also available in :

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.

हिंदु शास्त्रामध्ये वरील श्‍लोक सांगितला आहे. एकदा एका विदेशी व्यक्तीने स्वामी विवेकानंद यांना प्रश्‍न विचारला, ‘‘भारताचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास कसे  कराल ?’’ तेव्हा स्वामी विवेकानंद यांनी सांगितले, ‘‘गुरु-शिष्य परंपरा !’’ गुरु-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून इतिहासापर्यंत पहायला मिळतात, उदा. श्रीराम आणि वसिष्ठ, पांडव आणि श्रीकृष्ण. चंद्रगुप्त मौर्य याला आर्य चाणक्य यांनी गुरु म्हणून मार्गदर्शन केले आणि एका बलशाली राष्ट्राची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांनी मार्गदर्शन केले अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी ५ पातशाह्यांना पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपले आदर्श आहेत. भारतावर इंग्रजांनी किंवा त्यांच्या आधी मोगलांनी केलेल्या राज्यामध्ये प्रजा कधीही समाधानी नव्हती; कारण ते आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेले राज्य होते. चैतन्य वगैरे गोष्टींपासून ते फार लांब होते.

 

गुरु-शिष्य परंपरेवर इंग्रजांनी केलेला आघात

आपण जीवनात शिकत असतांना ज्या ज्या गोष्टींकडून शिकतो, ते आपल्यासाठी गुरुस्वरूपच असतात. त्यामुळे प्रत्येकाला गुरूंची आवश्यकता जीवनात पदोपदी असतेच. या तत्त्वावर विचार करतांना आपल्या लक्षात येते की, गुरु-शिष्य परंपरा हाच महान हिंदु संस्कृतीचा पाया आहे. भारतावर आक्रमण करणार्‍या प्रत्येक आक्रमणकर्त्याने याच पायावर घाला घातला आणि भारताची आजची स्थिती आपल्या समक्ष आहे. वर्ष १८३५ मध्ये लॉर्ड मेकॉले याने तत्कालीन इंग्रज संसदेत पुढील सूत्र मांडले, ‘‘मी भारताच्या कानाकोपर्‍यात प्रवास केला. या काळात मी कुठेही दारिद्य्र किंवा चोर पाहिलेले नाहीत. अशी संपन्नता आणि असे वैभव या ठिकाणी आहे. इतकेच नाही, तर येथील लोकांचे उच्च विचार, नीतीमत्ता आणि गुण पहाता ‘या लोकांवर आपण शासन करू शकू’, असे मला वाटत नाही. या लोकांवर शासन करण्यासाठी आपल्याला त्यांच्या परंपरा, संस्कृती, शास्त्र आणि आध्यात्मिकता यांच्या एकत्वाने बनलेल्या कण्यावर आघात करावा लागेल. यासाठी येथील परंपरागत चालू असलेल्या शिक्षणपद्धतीला (गुरु-शिष्य परंपरेला) पालटावे लागेल. त्यासाठी येथील लोकांच्यात असा समज आणि श्रद्धा निर्माण करावी की, जे इंग्रज आणि विदेशी आहेत, ते भारतियांहून चांगले अन् उच्च आहेत. यातून ते स्वतःचा आत्मसन्मान आणि संस्कृती विसरतील अन् त्यातूनच आपले वर्चस्व आपण त्यांच्यावर अंकित करू शकतो.’’ यातून आपल्या लक्षात येते की, इंग्रजांनी स्वार्थापोटी भारताच्या संस्कृतीवर आक्रमण करून तिला नष्ट-भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. या दुष्कृत्याचे परिणाम आपण स्वातंत्र्यानंतरही कित्येक दशके भोगत आहोत.

१. राष्ट्राला धर्मापासून निराळे करून संपूर्ण समाजाची मोठी हानी होणे

आजची भारताची स्थिती काय आहे ? आज भारतात पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण, बीभत्सपणा आणि संस्कृतीहीन आचरण आदींचे काहूर माजले आहे. हे सर्व का होत आहे ? देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताच्या कोणत्याही शासनकर्त्याने देशाला योग्य पद्धतीने चालवण्यासाठी धर्मगुरु किंवा संत यांचे मार्गदर्शन घेतलेले नाही. देशाला ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याची संज्ञा देऊन देशातील जनतेला धर्मापासून दूर केले गेले. धर्माचरण केल्याने राष्ट्र बलशाली होते; कारण त्याला ईश्‍वरी अधिष्ठान प्राप्त होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेला धर्माधारित करून एका धर्मराष्ट्राची उभारणी केली नाही. त्यापेक्षा मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचा प्रसार-प्रचार करून धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करण्याची घोडचूक केली. राष्ट्राला धर्मापासून निराळे करून संपूर्ण समाजाची मोठी हानी केली. त्यामुळे आजचा समाज हा विवंचनेत सापडलेला पहायला मिळतो. लोकांना धर्माचरण, धर्माविषयीचे शिक्षण आणि त्याचा महिमा यांसंबंधी योग्य शिक्षण दिले गेले नाही. ‘हिंदु धर्मात सांगितलेल्या कृती आणि त्या योग्य पद्धतीने कशा करायच्या ?’, यासंबंधी शिक्षण देणारे गुरु समाजामध्ये नाहीत. त्यामुळे प्रश्‍न असणार्‍यांना त्यांची उत्तरे न मिळाल्यामुळे त्यांचा गोंधळ झाला आहे आणि द्वेष करणार्‍यांना संधी मिळाली आहे.

२. राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश नसणे

राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश नसल्याने स्वैराचारी आणि दुराचारी राजाला शिक्षा देण्याची व्यवस्था नाही. पूर्वीच्या काळी प्रत्येक राजघराण्याचे राजगुरु असत आणि राजा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असे. काही चुकीचे दिसल्यास राजाला त्याविषयी खडसावण्याचे आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात आणून देण्याचे कार्य राजगुरु करत. अशा प्रकारे राजगुरूंच्या माध्यमातून राजसत्तेला धर्मसत्ता नियंत्रित करत असे.

३. गुरूंकडून जीवनात शिकण्याचे महत्त्व

जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत स्वतः शिकत रहावे लागते. अगदी लहानपणी लिहायला, बोलायला, चालायला पुढे-पुढे सायकल किंवा दुचाकी किंवा चारचाकी चालवण्यापासून शाळेतील शिक्षण घेऊन उच्चपदस्थ नोकरी मिळणे, या सर्व गोष्टी आपल्याला शिकाव्याच लागतात. त्याहून पुढे जीवनातील चढ-उतारांच्या काळात स्वतःला सावरण्यासाठी प्रत्येक गोष्ट शिकावीच लागते. हे सर्व करण्यासाठी आपल्याला आई-वडील, नातेवाइक, मित्र-मैत्रिणी साहाय्य करतात. ते एकप्रकारे आपले गुरुच असतात. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता लागत असेल, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, तर आपल्याला आध्यात्मिक गुरूंची नितांत आवश्यकता भासते.

४. गुरूंचे कार्य

‘गुरु’ या शब्दाची व्युत्पत्तीच मुळी हे स्पष्ट करते.

गुशब्दस्त्वन्धकारः स्यात् रुशब्दस्तन्निरोधकः ।

अन्धकारनिरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते ॥

अर्थ : ‘गु’ या शब्दाचा अर्थ अंधकार, अज्ञान किंवा माया असा असून ‘रु’ या शब्दाचा अर्थ प्रकाश किंवा ज्ञान असा होतो. जे शिष्याच्या जीवनातील ‘माया’रूपी अंधकार नष्ट करून ‘ज्ञान’रूपी प्रकाश पसरवतात, तेच गुरु आहेत.

श्रद्धा बाळगणार्‍या बुद्धीजिवांसाठी ‘गुरु’ ही एक व्यापक संकल्पना आहे आणि शिष्यासाठी ती एक प्रचंड शक्ती आहे. ज्याने गुरूंच्या शक्तीची अनुभूती घेतली. तो भाग्यवंत समजावा. गुरु हे देहधारी नसून ते सर्वव्यापी तत्त्व आहे. धर्मकार्याच्या आवश्यकतेनुसार ते संतांच्या रूपात देह धारण करून पृथ्वीवर जन्म घेते. ब्रह्मांडात कुठेही गेलो, तरी गुरु आपल्या पाठीशी सदैव असतातच.

५. गुरु-शिष्य परंपरेच्या पुनरुज्जीवनासाठी भारत हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक !

आज या परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. समाजामध्ये काही प्रमाणात राष्ट्राविषयी अभिमान असला, तरी धर्मप्रेम असणेही तितकेच आवश्यक आहे. धर्माधिष्ठित राज्यप्रणाली असली, तरच समाजामध्ये एकोपा, समंजस्यादी दैवी गुणांचा विकास आणि आचरण होते. लोकांमध्ये धर्मप्रेम रुजवण्याचे कार्य गुरु (संत) करत असतात. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी आदी अनेक संत होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या सात्त्विक वाणीने लोकांमध्ये धर्मप्रेम पर्यायाने राष्ट्रप्रेम जागृत केले. धर्माधारित राष्ट्र स्थापले, तर ते कित्येक शतके टिकून रहाते आणि त्याच्या भौगोलिक मर्यादाही मोठ्या आणि व्यापक असतात. भगवान श्रीरामाने स्थापलेले राज्य पुढील सहस्रो वर्षे टिकले. त्यांनी स्थापलेल्या राज्याच्या सीमा केवळ आताच्या भौगोलिक भारतापुरत्याच नव्हे, तर आताच्या अफगाणिस्तान, इराण येथपर्यंत आणि तिबेटपासून दक्षिणेत इंडोनेशियापर्यंत होत्या. इतिहास पहातांना लक्षात येते की, चंद्रगुप्त मौर्यनेही आर्य चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या सीमा संपूर्ण भारतवर्षासह अफगाणिस्तानपर्यंत होत्या. मौर्य साम्राज्य विश्‍वातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्यासमोर असलेल्या या आदर्शांतून गुरु-शिष्य परंपरेची महानता लक्षात येते. गुरु शिष्याच्या केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर त्याच्या व्यावहारिक उन्नतीचीही काळजी घेतात. त्यामुळे राष्ट्राची उभारणी करण्यासाठी गुरु-शिष्य परंपराच आवश्यक आहे. गुरु-शिष्य परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत पुनःश्‍च हिंदु राष्ट्र बनणे आवश्यक आहे.

६. कृतज्ञता

गुरुच परमेश्‍वर ! गुरुच सर्वेश्‍वर !! सर्व अर्पावे गुरुचरणी !!!’

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

1 thought on “राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु-शिष्य परंपरेची आवश्यकता !”

  1. ‘गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुदेवो महेश्‍वरः ।

    गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

    अर्थ : गुरु हेच ब्रह्म, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. भिन्नच, तर ते साक्षात् परब्रह्म आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.

    Reply

Leave a Comment