पनवेल – गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या चैतन्यदायी सोहळ्यात पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी श्रीमती सत्यवती शांताराम दळवीआजी (वय ८३ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याची भावपूर्ण घोषणा केली. त्या सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील ७७ व्या संत आहेत. ‘श्रीमती दळवीआजींना जीवनात अत्यंत खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले. तसेच त्यांना अनेक शारीरिक आजारही आहेत; परंतु ही सर्व परिस्थिती त्यांनी कोणतीही तक्रार न करता स्वीकारली आहे. याही स्थितीत त्यांचा कृतज्ञतेचा भाव सतत जागृत असतो. त्यामुळे श्रीमती दळवीआजी आज संतपदी विराजमान झाल्या आहेत’, असे पू. (सौ.) अश्विनी पवार या वेळी म्हणाल्या.
श्रीमती दळवीआजी संत झाल्याची वार्ता ऐकून उपस्थित सर्वांची भावजागृती झाली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी परात्पर गुरु पांडे महाराज, तसेच आश्रमातील सर्व संत आणि साधक उपस्थित होते.
पू. (श्रीमती) सत्यवती शांताराम दळवीआजींचा सन्मान पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा जोशी यांनी केले. पू. (श्रीमती) दळवीआजी यांची गुणवैशिष्ट्ये उपस्थित संतांसह साधकांनी सांगितली.