१. ‘साधकांसाठी चहा बनवून देऊया’, असा विचार पू. आजींच्या मनात येणे, त्यांना त्रास नको; म्हणून साधकांनी पू. आजींना ‘चहा बनवू नका’, असे सांगणे आणि पू. आजींना ‘साधकांसाठी काहीतरी करायला हवे’, असे वाटणे
‘९.६.२०१८ या दिवशी सर्व साधक सत्संगासाठी एकत्र आले होते. त्या वेळी पू. मंगळवेढेकर आजींच्या मनात विचार आला, ‘इथे काही साधक आले आहेत, तर त्यांच्यासाठी आपण चहा बनवून देऊया.’ मग पू. आजींनी सत्संगासाठी आलेल्या साधकांना विचारले, ‘‘मी तुमच्यासाठी चहा बनवून देऊ का ?’’ पू. आजींना चालण्यासही अडचण येते. त्यामुळे ‘त्यांना त्रास नको’, हा विचार करून साधकांनी पू. आजींना ‘चहा बनवू नका’, असे सांगितले, तरीही पू. आजींना ‘प.पू. गुरुदेव माझ्यासाठी इतके करतात, तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे’, असे वाटत होते.
२. एका साधिकेने सर्व साधकांसाठी चहा बनवण्याचे ठरवणे; पण त्यासाठी साखर नसल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने पू. आजींकडे साखर मागणे, त्या वेळी साखर देण्याची सेवा मिळाल्याविषयी पू. आजींना पुष्कळ कृतज्ञता वाटणे त्यानंतर थोड्या वेळाने सौ. पैलवानकाकूंनी ‘सर्व साधकांसाठी चहा बनवूया’, असे ठरवले
चहा बनवण्यासाठी सर्व साहित्य होते; पण साखर नव्हती. पैलवानकाकू साखर मागण्यासाठी पू. आजींकडे गेल्या आणि त्यांना साखर मागितली. साखर मागितल्याक्षणी पू. आजींना प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली आणि त्या म्हणाल्या, ‘‘मला चहा बनवणे अवघड जाणार’, हे गुरुदेवांना ठाऊक होते; म्हणूनच त्यांनी चहासाठी लागणारी साखर देण्याची सेवा मला दिली. गुरुदेव किती विचार करतात ना माझा !’’ या प्रसंगातून ‘गुरुदेवांची सेवा करावी’, ही पू. आजींची तळमळ गुरुदेवांपर्यंत पोहोचली’, हे माझ्या लक्षात आले आणि गुरुदेवही ‘शिष्याला जमेल तीच सेवा देऊन शिष्यांवर त्यांच्या प्रीतीची उधळण करतात’, असे मला वाटले.
३. पू. आजींसारखी सेवेची तळमळ निर्माण होण्यासाठी गुरुदेवांच्या चरणी केलेली प्रार्थना !
जे शिष्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, त्या शिष्यवत्सल गुरुमाऊलीच्या आणि शारीरिक स्थिती चांगली नसूनही गुरुसेवेची तळमळ असणार्या पू. आजींच्या चरणी अनंत कोटी दंडवत ! ‘गुरुदेवा, ‘अशी तळमळ माझ्यातही तुम्हीच निर्माण करा आणि तुमचे शिष्य होण्याची पात्रता माझ्यात निर्माण करा’, हीच तुमच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’
– जयेश ताटीपामूल, सोलापूर (२०.६.२०१८)