ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनचा सहभाग

  • आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त !
  • श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळ !

ठाणे – मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. देवनिधी लुटणार्‍या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्‍या शासनाला श्री शनैश्‍चर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. शासनाने श्री शनैश्‍चर देवस्थानचे सरकारीकरण तत्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे. शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्‍यांवर अद्याप कारवाई केलेली नसून भ्रष्टाचारी मोकाट आहेत. यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हिंदूंच्या भावनांशी खेळू नये, अशी चेतावणी ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आली. ठाणे रेल्वेस्थानकाजवळील सॅटिस पुलाजवळ २० जुलैला सायंकाळी ६ वाजता हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात श्रीराम हिंदु सेना, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठांनी हातात फलक धरून सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या निर्णयाच्या निषेधार्थ सरकारला देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. कर्नाटक सरकारने ‘हज हाऊस’ला टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

क्षणचित्रे

१. नागरिक आंदोलनाच्या ठिकाणी थांबवून विषय समजून घेत होते.

२. या विषयाच्या विरोधात सरकारला देण्यात येणार्‍या निवेदनावर ४३६ हून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून त्यांचे धर्मकर्तव्य       बजावले.

३. विषय समजल्यावर काही नागरिक आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

४. आंदोलन पाहून प्रभावित झालेल्या एका नागरिकाने धर्मशिक्षणवर्गासाठी कल्याण येथे सभागृह उपलब्ध करून देण्याचे,तसेच       कार्याला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment