अनुक्रमणिका
- सनातनचे ५ वे सद्गुरु सद्गुरु सत्यवान कदम
- १. बालपणापासून देवाधर्माची आवड
- २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी सांगितलेले सूत्र
- ३. साधनेची वाटचाल करतांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
- ४. आतापर्यंत केलेल्या सेवा आणि त्यामुळे झालेले लाभ !
- ५. परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील श्रद्धा वाढणे
- ५ अ. क्रिकेटचा सामना पहात असतांना गुरुदेवांनी ‘भारत जिंकेल’, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसे घडल्यावर ‘त्यांना आधीच कळते’, हे लक्षात येऊन त्यांच्यावरील श्रद्धा वाढणे अन् क्रिकेट पहाणे बंद होणे
- ५ आ. अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्या साधकांसाठी नामजप करतांना ‘गुरुदेवच नामजप करून घेत आहेत’, याची अनुभूती येणे
- ५ इ. गुरुदेवांनी संस्थेच्या कार्याच्या विस्ताराविषयी सांगितलेले खरे ठरणे
- ६. ‘साधक’ ते ‘सद्गुरु’ हा साधनेचा प्रवास
- ७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गातून अध्यात्माच्या विविध अंगांचे मार्गदर्शन मिळणे
- ८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रत्येक गोष्ट परिपूर्ण कशी करायची, हे शिकायला मिळणे
- ९. पुण्याला दिलेल्या कापडी फलकांची सेवा करायला कोणी साधक नसल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी परत पाठवणे अन् सेवा परिपूर्ण झाल्याचा पुष्कळ आनंद मिळणे
- १०. संतांचे प्रेम
- ११. सांगितलेली कृती तात्काळ करणे
- १२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजप करायला सांगितल्यावर तो त्वरित चालू होऊन सतत नामजप होणे
- १३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चिकित्सालयात सेवेसाठी गेल्यावर अध्यात्माच्या ग्रंथांची कात्रणे विषयवार लावणे आणि ग्रंथांच्या संदर्भांचे लिखाण करणे
सनातनचे ५ वे सद्गुरु सद्गुरु सत्यवान कदम
१. बालपणापासून देवाधर्माची आवड
‘आमच्या घरात कुलाचाराचे पालन केले जायचे. गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी आदी सण-उत्सव साजरे होत असत. वडील गावातील ‘आरेश्वर मंदिरा’त शंकराची पूजा करायचे. मी त्यांच्यासमवेत पूजेसाठी जायचो. त्यामुळे माझ्यावर धार्मिक संस्कार झाले. मला देवतांविषयी भक्तीभाव वाटत होता. हिंदु धर्मातील कुलाचारांची आवड असल्याने पूजाअर्चा करणे, मंदिरात जाणे, तसेच धार्मिक उत्सवांत सहभागी होणे असे माझ्याकडून होत होते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी सांगितलेले सूत्र
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९३ मध्ये मला सांगितले होते, ‘‘पूर्वीपासूनच तुझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के असून तुझी साधना ध्यानमार्गातून होणार आहे !’’ (पुढे मला समष्टी साधनेचे महत्त्व कळल्यावर मी त्या मार्गाने साधना केली.)
३. साधनेची वाटचाल करतांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
३ अ. संतपद प्राप्त केल्यावर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून शिकण्याची संधी मिळणे
वर्ष २००८ मध्ये गुरुदेवांनी मला ‘संत’ म्हणून घोषित केले. देवद आश्रमात झालेल्या राष्ट्रीय सत्संगात परात्पर गुरु पांडे महाराज आणि प.पू. देशपांडेकाका यांनी माझा सन्मान केला. नंतर गुरुदेवांनी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून शिकण्यास सांगितले. मला त्यांच्याकडून ‘प्रत्येक गोष्ट ईश्वराशी कशी जोडायची ?, सेवा पूर्ण होईपर्यंत तिचा पाठपुरावा कसा करायचा ?’, हे शिकता आले.
३ आ. प.पू. कालिदास देशपांडे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे
यांच्यासह दौर्यावर असतांना समष्टी साधनेच्या दृष्टीने अनेक पैलू शिकता येणे
मी शिकण्यासाठी प.पू. देशपांडेकाका यांच्यासह महाराष्ट्राच्या दौर्यावर गेलो होतो. त्यांच्याकडून मला बर्याच गोेष्टी शिकता आल्या. या दौर्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. नंतर एक मास मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यासमवेत पुणे, बेळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत शिकण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी मला प्रसारसेवेतील बारकावे, साधकांचे आढावे आणि बैठका घेणे, त्यांच्याशी जवळीक साधणे, हे सर्व शिकायला मिळाले.
४. आतापर्यंत केलेल्या सेवा आणि त्यामुळे झालेले लाभ !
४ अ. महाराष्ट्रात आणि कर्नाटक राज्यांत लेखाची सेवा पहाणे
वर्ष २००८ मध्ये मला महाराष्ट्रात लेखाची सेवा पहाण्याचे दायित्व मिळाले. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत सेवा केल्यावर मी कर्नाटकात लेखाच्या सेेवेसाठी गेलो. वर्ष २०११ मध्ये मी कर्नाटक राज्यात लेखासेवा करू लागलो. त्यातून मला पुष्कळ शिकता आले. मला काही प्रमाणात कन्नड भाषा येऊ लागली. मला या सेवेची विशेष माहिती नव्हती, तरी गुरुदेवांच्या कृपेमुळे ती सेवा जमू लागली. त्यातून साधकांशी जवळीक आणि प्रेमभाव वाढला. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना उपाययोजना सांगता आली, ही सर्व गुरुदेवांचीच कृपा ! यानंतर ६ वर्षे सेवा केली.
४ आ. ‘प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक उपाय
कसे शोधायचे ?’ हे पू. गाडगीळकाकांकडून शिकता येणे
वर्ष २०१७ मध्ये गणेशचतुर्थीच्या काळात मी रामनाथी आश्रमात आल्यावर गुरुदेवांनी मला आश्रमात रहाण्यास सांगून ‘आध्यात्मिक उपाय कसे शोधायचे ?’, हे पू. गाडगीळकाकांकडून शिकायला सांगितले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून ‘प्राणशक्तीवहन पद्धतीप्रमाणे साधकांना उपाय शोधून देणे’, ही सेवा करून घेतली.
४ इ. सध्या मी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत सद्गुरु स्वातीताई यांच्यासह प्रसारसेवा शिकत आहे.
५. परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील श्रद्धा वाढणे
५ अ. क्रिकेटचा सामना पहात असतांना
गुरुदेवांनी ‘भारत जिंकेल’, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसे घडल्यावर
‘त्यांना आधीच कळते’, हे लक्षात येऊन त्यांच्यावरील श्रद्धा वाढणे अन् क्रिकेट पहाणे बंद होणे
वर्ष १९९० पासून मी शीव सेवाकेंद्रात होतो. तेव्हा मला ‘क्रिकेटचा सामना पहावा’, असे वाटायचे. एकदा क्रिकेटचा सामना पहात असतांना गुरुदेवांनी सांगितले, ‘‘भारत जिंकेल !’’ प्रत्यक्षातही तसे झाले. तेव्हा ‘गुरुदेवांना आधीच कळते’, हे लक्षात आले. त्यांच्यावरील श्रद्धा वाढून क्रिकेट पहाणे बंद झाले.
५ आ. अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्या साधकांसाठी
नामजप करतांना ‘गुरुदेवच नामजप करून घेत आहेत’, याची अनुभूती येणे
वर्ष २००४ मध्ये मला अनिष्ट शक्तींचा त्रास असणार्या साधकांसाठी नामजप करण्याची संधी लाभली. ‘गुरुदेवच तो करून घेत आहेत’, याची मला अनुभूती यायची. नामजपानंतर काही साधक सांगायचे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्यासाठी सूक्ष्मातून नामजप करत आहेत’, असे वाटून त्रास न्यून झाला.’ तेव्हा मला गुरुदेवांची महानता कळली आणि श्रद्धा वाढायला साहाय्य झाले.
५ इ. गुरुदेवांनी संस्थेच्या कार्याच्या विस्ताराविषयी सांगितलेले खरे ठरणे
वर्ष १९९२ मध्ये गुरुदेवांनी ‘पुढे आश्रम कोठे असणार ? साधक कसे वाढणार ? कार्य कसे वाढणार ?’ इत्यादींविषयी सांगितलेले नंतर खरे ठरले.
६. ‘साधक’ ते ‘सद्गुरु’ हा साधनेचा प्रवास
अ. पूर्वी मला घर, शेती, बाग आदींविषयी आसक्ती होती. आता ती आसक्ती उरली नसून कर्तव्य म्हणून पहाण्याचा भाग होतो.
आ. पूर्वी स्वभाव अबोल असल्याने मी इतरांमध्ये मिसळत नसे. गुरुदेव त्याची जाणीव करून द्यायचे. त्यांच्याच कृपेने प्रयत्न होऊन प्रेमभाव अन् इतरांमध्ये मिसळण्याचा भाग वाढला.
ई. नेतृत्व गुण अल्प होता. माझ्याकडून पुढाकार घेऊन सेवा करणे होत नव्हते. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला नंतर तेही जमू लागले.
उ. वर्ष २०१६ मध्ये गुरूंच्या कृपेने मला ‘सद्गुरुपद’ प्राप्त झाले. आता मन निर्विचार असते. आंतरिक समाधान जाणवते. गुुरुदेवांनी भरभरून दिले असल्याने आता मला कशाचीच इच्छा राहिली नाही. त्यांच्याच कृपेमुळे माझी आतापर्यंतची वाटचाल झाली आहे !’
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
अभ्यासवर्गातून अध्यात्माच्या विविध अंगांचे मार्गदर्शन मिळणे
‘वर्ष १९९० मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले मुंबईमध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अभ्यासवर्ग घेत असत. मी दोन्ही दिवस अभ्यासवर्गाला जात असे. अभ्यासवर्गात त्यांच्याकडून अध्यात्माच्या विविध अंगांचे मार्गदर्शन मिळत असे. काही वेळा ते आमच्याकडून कृतीही करवून घेत असत. तेव्हा आम्हाला पुष्कळ आनंद मिळत असे. त्या वेळी ‘केव्हा एकदा शनिवार येतो आणि मी अभ्यासवर्गाला जातो’, असे मला होत असे.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून
प्रत्येक गोष्ट परिपूर्ण कशी करायची, हे शिकायला मिळणे
संत भक्तराज महाराज (बाबा) मुंबईला आल्यावर आम्ही त्यांच्या दर्शनाला जात असू. त्यानंतर बाबा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आल्यावर आम्ही सेवा करण्यासाठी तेथेच थांबायचो. परात्पर गुरूंकडून पुष्कळ शिकायला मिळायचे. त्यांचे सगळीकडे जातीने लक्ष असे. लहान-सहान गोष्टीसुद्धा त्यांना आम्हाला शिकवायला लागत असत. ‘बाबांच्या आसनावर चादर व्यवस्थित कशी घालायची, ती घातल्यावर हात फिरवून सुरकुत्या कशा घालवायच्या’, हेसुद्धा त्यांनी आम्हाला शिकवले. ‘प्रत्येक गोष्ट परिपूर्ण कशी करायची’, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
९. पुण्याला दिलेल्या कापडी फलकांची सेवा करायला
कोणी साधक नसल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
परत पाठवणे अन् सेवा परिपूर्ण झाल्याचा पुष्कळ आनंद मिळणे
मुंबई येथील सेवाकेंद्रात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले सर्व गोष्टी करायला शिकवायचे आणि आमच्याकडून करवूनही घ्यायचे. जेवण बनवणे, सेवाकेंद्रातील नळांचे ‘वायसर’ पालटणे इत्यादी अनेक सेवा आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. एकदा त्यांनी मला पुण्याला कापडी फलक नेऊन द्यायची सेवा दिली होती. त्याप्रमाणे मी कापडी फलक पुण्याला देऊन आलो. परत आल्यानंतर त्यांनी मला सेवेविषयी विचारल्यावर मी सेवा झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला परत पुण्याला पाठवले. माझ्या मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला परत का पाठवले ? नक्कीच माझे काहीतरी चुकले असणार.’ मी पुण्याला गेल्यावर कळले, ‘मी दिलेल्या कापडी फलकांवर पत्ते चिकटवायला आणि ते शहरात लावायला त्यांच्याकडे कुणीही साधक नव्हते.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपण केवळ सांगकाम्यासारखी सेवा केलेली आहे. त्या वेळी ‘बुद्धीचा वापर करून चांगली आणि परिपूर्ण सेवा कशी करता येईल ?’, याचा विचार माझ्याकडून झाला नव्हता. तेव्हा मी कापडी फलक लावतांना ‘ते लोकांच्या दृष्टीस कसे येतील ?’, याचा विचार करून लावले. त्यानंतर ‘आणखी काही सेवा नाही ना ?’, याची निश्चिती करून मगच मुंबईला आलो. त्यामुळे मला परिपूर्ण सेवा झाल्याचा आनंद मिळाला. मुंबईला येऊन हे परात्पर गुरूंना सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘परिपूर्ण सेवाच ईश्वराच्या चरणांशी पोहोचते आणि आपल्यालाही आनंद मिळतो.’’
१०. संतांचे प्रेम
अ. प.पू. बाबा कोणालाही ओरडले, तरी ते सगळ्यांवर प्रेमही करायचे. मुंबईत दादरला एकदा त्यांच्या एका भक्ताकडे बाबा उतरले होते. आम्ही सेवा असल्यामुळे तिकडे जाऊ शकलो नव्हतो. तेव्हा बाबांनी ‘डॉक्टरांची ती पोरे कुठे आहेत ? त्यांना आधी जेवायला बोलवा’, असे एका भक्ताला सांगून आम्हाला जेवायला बोलावले.
आ. परात्पर गुरु डॉ. आठवले सगळ्यांनाच पुष्कळ प्रेम द्यायचे. त्या वेळी अल्प साधक असूनही परात्पर गुरूंनी आपल्या प्रेमाने सगळ्यांना बांधून ठेवले होते.
११. सांगितलेली कृती तात्काळ करणे
अ. वर्ष १९९० मध्ये आम्हाला ‘सेवा म्हणजे काय’, हे ज्ञात नव्हते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले जे काही सांगतील, ते केले पाहिजे’, असे आम्हाला वाटायचे. त्यांनी सांगितले, ‘‘या अभ्यासवर्गाची माहिती देवळा-देवळातून लावा.’’ त्वरित अभ्यासवर्गासंबंधी माहिती हाताने लिहून ती पुठ्ठ्यावर चिकटवून आम्ही देवळा-देवळांतून लावली.
आ. एकदा प.पू. बाबा मुंबईला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आले होते. तेव्हा भांडी घासण्याची सेवा आमच्याकडे होती. आम्ही स्वयंपाकघरात भांडी घासतांना एकमेकांशी गप्पा मारत होतो. दिवाणखान्यात बाबा होते. तेथूनच ओरडून त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘भांडी घासतांना नामस्मरण करा, नाहीतर भांडी घासू नका. भांडी काय मोलकरीणही घासेल.’’ तेव्हापासून ‘कुठचीही सेवा करतांना नामासहित केली पाहिजे, तरच ती ईश्वराच्या चरणी अर्पण होते आणि आनंदही मिळतो’, हे लक्षात आले.
इ. एकदा मी एक पार्सल गोव्याला पाठवण्याऐवजी कराडला पाठवले. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कळल्यावर त्यांनी रात्री अकरा वाजता मला कराडला जाऊन ते पार्सल घेऊन यायला सांगितले. त्या वेळी ‘त्यांनी काहीही सांगितले, तरी ते माझ्या भल्यासाठीच असणार’, असा माझा भाव असे. माझी त्यांच्यावर इतकी श्रद्धा होती की, ‘त्यांनी काहीही सांगितले, तरी ते करायचे !’ त्यामुळे मी त्वरित सिद्ध होऊन ‘कराडला निघतो’, असे त्यांना सांगायला गेलो. तेव्हा क्षणभर त्यांनी माझ्याकडे बघून सांगितले, ‘‘आता कराडला नाही गेले, तरी चालेल. आपण ते पार्सल कराडवरून मागवून घेऊ.’’
१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजप करायला
सांगितल्यावर तो त्वरित चालू होऊन सतत नामजप होणे
वर्ष १९९० मध्ये मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे माझ्या व्यावहारिक कामासाठी गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला ९ मास अखंड कुलदेवतेचा नामजप आणि एक माळ श्री गणेशाचा नामजप करायला सांगितले. तेव्हा मी नोकरी करत होतो. त्या वेळी ‘नामजप अधिकाधिक कसा होईल’, याकडे माझे लक्ष असे. कामावर जातांना-येतांना नामजप होत होताच; पण प्रत्यक्ष काम करतांनासुद्धा नामजप होत असे. तसेच पहाटे ४ ते ६ या वेळेत उठून मी नामजप करत असे. मला नामजप केल्याविना करमत नसे.
१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चिकित्सालयात सेवेसाठी गेल्यावर
अध्यात्माच्या ग्रंथांची कात्रणे विषयवार लावणे आणि ग्रंथांच्या संदर्भांचे लिखाण करणे
त्यानंतर मी कामावरून सुटल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चिकित्सालयात सेवेसाठी जाण्यास आरंभ केला. तेव्हा अध्यात्माच्या ग्रंथांची कात्रणे विषयवार लावणे, ग्रंथांच्या संदर्भांचे लिखाण करणे, अशा सेवा ते मला देत असत. ‘त्यांच्याकडून मिळत असलेले प्रेम आणि सेवेत मिळत असलेला आनंद यांमध्ये वेळ कधी निघून जायचा’, हे कळायचे नाही.