आनंदी, प्रेमळ आणि इतरांचा विचार करणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९५ वर्षे) !

 

गुणवैशिष्ट्ये

१. सतत आनंदी असणे

पू. आजींची प्राणशक्ती अल्प असते. त्यांना बोलायलाही त्रास होतो, तरीही त्या आनंदी असतात. कुणी भेटायला आले, तर त्या त्यांची आनंदाने विचारपूस करतात.

२. पू. आजी प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता आरती म्हणतात. आरतीच्या वेळी त्या स्वतः टाळ वाजवतात.

३. प्रेमभाव

३ अ. स्वतः वृद्ध आणि रुग्णाईत असूनही खोलीतील वृद्ध साधिकेची काळजी घेणे

पू. नेनेआजी आणि श्रीमती सत्यवती दळवीआजी एकाच खोलीत रहातात. पू. नेनेआजी दळवीआजींची काळजी घेतात. दळवीआजी पलंगावरून उठल्या की, पू. नेनेआजी मला हाक मारून त्यांच्या मागे जायला सांगतात. ‘त्यांना काय हवे-नको’, इकडे त्यांचे सतत लक्ष असते.

३ आ. सेवा करणार्‍या साधिकेला प्रेमाने स्वतःसाठी आणलेला डाळिंबाचा रस देणे

मला कधी बरे नसले, तर पू. आजी माझी काळजी घेतात. मी त्यांना प्रतिदिन डाळिंबाचा रस देतेे. तेव्हा ‘तुलाही बळ मिळायला पाहिजे, नाहीतर तू सेवा कशी करशील ?’, असे म्हणून त्या मला डाळिंबाचा रस प्यायला सांगतात.

४. इतरांचा विचार करणे

४. अ. मी अन्य सेवा करत असतांना त्यांना काही हवे असल्यास त्या हातात आरसा घेऊन त्यातून सर्व पलंगावर दृष्टी फिरवतात आणि ‘ती वस्तू पलंगावर कुठे आहे ?’, हे पाहून ती घेतात. ‘आपल्यामुळे इतरांना त्रास नको’, असा त्यांचा त्यामागील उद्देश असतो.

४. आ. मी दुपारी झोपल्यावर किंवा लिखाण करत असतांना आजी मला उठवत नाहीत. त्यांना काही हवे असल्यास ते माझ्या कृतींना प्राधान्य देतात आणि ‘तुझे झाल्यावर दे’, असे मला सांगतात.

४. इ. माझ्याकडे पू. आजींचे केस धुण्याची सेवा असते. तेव्हा ‘माझे केस धुऊन तुझी कंबर दुखली असेल. आता तू सेवा करू नकोस. विश्रांती घे. कुणाचे तरी साहाय्य घे’, असे त्या सांगतात.

५. ऐकण्याची वृत्ती

पू. आजींना सरळ झोपायची सवय आहे; पण त्यांना आधुनिक वैद्यांनी कुशीवर आलटून-पालटून झोपायला सांगितले आहे. त्यांना तसे सांगितले की, त्या लगेच ऐकतात.

६. क्षात्रवृत्ती

पू. आजी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतात. त्यातील धर्मांधांची वृत्ते वाचून त्यांना चीड येते. त्या आम्हालाही ती वृत्ते वाचून दाखवतात.

७. कोणत्याही गोष्टीत सवलत न घेणे

‘पू. आजी वार्धक्यामुळे झोपून असतात. त्यांना उठता येत नाही, तरी त्या त्यांच्या सर्व कृती नित्यनियमानेे आणि चिकाटीने करतात. त्या जराही सवलत घेत नाहीत. त्यांचे भोजन झाले की, त्या लगेच दात घासूनच झोपतात.’

८. अनुभूती

८ अ. पू. आजींचे शौच स्वच्छ करतांना उपाय होऊन हलके वाटणे

पू. आजींचे शौच स्वच्छ करतांना माझ्यावर उपाय होतात. मला हलके वाटते. एकदा मला पुष्कळ त्रास होत असतांना शौच स्वच्छ करण्याची सेवा केल्यामुळे माझ्यावरील आवरण निघून मला बरे वाटू लागले.

८ आ. पू. नेनेआजींची सेवा करतांना ‘एखाद्या लहान बाळाची सेवा करत आहोत’, असे मला वाटते. त्या सेवेतून आनंद मिळून मला हलके वाटते.

‘हे श्रीकृष्णा, मला पू. आजींची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. ‘पू. आजींसारखे गुण आम्हा सर्वांमध्ये यावेत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. वैशाली बांदिवडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.२.२०१८)

८ इ. पू. आजींची वेणी घालून झाल्यावर हात अकस्मात दुखू लागणे आणि ‘त्यांच्या केसांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य सहन न झाल्याने हात दुखले असावेत’, असे वाटणे

एक दिवस मी सहजच पू. आजींच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांनी मला त्यांची वेणी घालायला सांगितले. मी त्यांची वेणी घातली. मला त्यांचे केस रेशमासारखे मऊ लागत होते. त्यांची वेणी घालून झाल्यावर माझे हात अकस्मात दुखायला लागले. तेव्हा मला ‘त्यांच्या केसांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य सहन न झाल्याने माझे हात दुखले असावेत’, असे मला वाटले.

८ ई. पू. आजींच्या खोलीत गेल्यावर आध्यात्मिक उपाय होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

८ ए. पू. आजींच्या खोलीत गेल्यावर मन शांत होणे

‘पू. आजींच्या खोलीत पुष्कळ चैतन्य आहे. मनाची अस्वस्थता वाढल्यावर पू. आजींच्या खोलीत जाऊन बसले की, मला चांगलेे वाटते. माझे मन शांत होते.

८ ऐ . पू. आजींच्या खोलीत झोपायला गेल्यावर लगेच झोप लागणे

जेव्हा माझा आध्यात्मिक त्रास वाढतो आणि मला रात्री झोप येत नाही, तेव्हा मी पू. आजींच्या खोलीत जाऊन झोपते. तेथे मला लगेच झोप लागते.

८ ओ. आध्यात्मिक त्रास होत असतांना पू. आजींच्या खोलीत झोपल्यावर १ घंट्याने जाग येणे, त्यानंतर पुष्कळ चांगलेे वाटणे आणि सेवा करता येणे

एक दिवस माझी प्राणशक्ती पुष्कळ न्यून झाली होती. मला मरगळ आणि थकवाही आला होता. तेव्हा पू. (सौ.) अश्‍विनीताईंनी (पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी) मला पू. आजींच्या खोलीत पाठवले. मी तेथे जाऊन झोपल्यावर मला १ घंट्याने जाग आली. त्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटत होते आणि मी सेवा करू शकले.’ – कु. सविता जाधव, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१०.२०१७) 

 

 परात्पर गुरु पांडे महाराज आणि पू. नेनेआजी

अ. पू. आजींना परात्पर गुरु पांडे महाराज खाऊ पाठवतात. तेव्हा त्या दूरभाष करून ‘खाऊ आवडला. चांगला होता’, असे त्यांना कळवतात.

आ. त्या स्वतःच परात्पर गुरु पांडे महाराज यांना स्वतःच्या प्रकृतीचा आढावाही देतात.

इ. पू. आजींचे जेवण पुष्कळ अल्प आहे. एकदा परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘आजी चैतन्यावरच जगतात.’’

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव

१. ‘पू. आजी मधे-मधे चष्मा न लावताही वाचन करतात. एवढी त्यांची दृष्टी चांगली आहे.

२. पू. आजींचे दुर्गाकवच, हनुमान कवच आणि भगवद्गीता यांचे वाचन दिवसभर चालू असते. त्या दैनिक सनातन प्रभातही पूर्ण वाचतात.

३. अखंड अनुसंधानात असणे

पू. आजी रात्री झोपतांना सर्व देवतांशी बोलतात. त्या म्हणतात, ‘‘कुलस्वामिनी, चल आता झोपायला जाऊया.’’ एका रात्री त्या झोपेत म्हणत होत्या, ‘‘मला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. एवढे मोदक मी कधी करणार ?’’ एक दिवस त्या झोपेत आरती म्हणत होत्या.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

अ. पू. आजी म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बोलावले; म्हणून मी आश्रमात आले. त्यांचे माझ्यावर पुष्कळ उपकार आहेत.’’ त्या सतत कृतज्ञता व्यक्त करत असतात.

आ. आधुनिक वैद्य पू. आजींना ‘कोणते व्यायाम करायचे आहेत ?’, याचा प्रतिदिन कागद द्यायचे. ते बघून व्यायाम करतांना पू. आजी म्हणत, ‘‘मला हे व्यायाम परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले आहेत.’’

इ. पू. आजींच्या खोलीत पूर्व दिशेच्या भिंतीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र लावले आहे. पू. आजींना पलंगावर बसवले की, ते त्यांच्या दृष्टीसमोरच दिसते. जेव्हा त्यांना उठून बसावेसे वाटते, तेव्हा मी त्यांना पाठीमागे उशा लावून बसवते. तेव्हा त्या म्हणतात, ‘‘बघ, माझ्याकडे बघून परात्पर गुरु डॉक्टर कसे हसतात !’’

ई. एक साधिका पू. आजींना म्हणाल्या, ‘‘चला, आपण परात्पर गुरु डॉक्टरांना भेटायला जाऊ.’’ त्या वेळी पू. आजी म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समोरच आहेत. ते प्रतिदिन माझ्याशी बोलतात.’’

उ. पूर्वी पू. आजींच्या सेवेतील साधिकांना स्वतःला होणार्‍या त्रासावर आध्यात्मिक उपाय करावे लागत. तेव्हा त्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीजवळ जात. उपायांहून आल्यावर पू. आजी त्यांना विचारत, ‘‘कुठे गेला होतात उपायांना ? इतके मोठे परात्पर गुरु डॉक्टर येथे आहेत. त्यांना सोडून उपायांना कुठे जाता ?’’

गुरुदेवांच्या कृपेने मला संतमाऊलीच्या सेवेची संधी मिळाली. यासाठी मी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’

कु. वैशाली बांदीवडेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२२.३.२०१८)

Leave a Comment