मुंबई – सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. ‘आपली संस्कृती टिकावी’, यासाठी उत्सव मंडळे या सर्व अडचणींवर मात करून उत्सवाच्या काळात अविरत कार्यरत असतात. तरीही आजमितीला समाजामध्ये उत्सव मंडळांची प्रतिमा तितकीशी चांगली नाही. ही प्रतिमा सकारात्मक करण्यासाठी काय करता येईल, तसेच उत्सवांच्या निमित्ताने होणार्या हिंदूसंघटनाचा लाभ हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ईश्वरी कार्यात कसा होऊ शकतो, यावर विचारमंथन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, १५ जुलै या दिवशी काळाचौकी येथील अभ्युदय एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शंखनाद आणि दीपप्रज्वलन करून शिबिराला आरंभ करण्यात आला. या शिबिराला सनातनच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.