‘सनातन संस्थे’चे संस्थापक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अध्यात्मातील उच्चतम स्तरावर असूनही त्यांच्यात अद्वितीय अशी जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ आहे. त्यामुळे ते विश्वात पसरलेल्या अनंत ज्ञानातील ज्ञानमोती गोळा करण्याची शिकवण स्वतःच्या कृतीतून देतात. मिळालेले ज्ञान समाजाला देण्याची त्यांची अखंड धडपड असते. हे ज्ञानमोती गोळा करण्यासाठी त्यांच्याच कृपेने मी आणि माझ्यासह असलेले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ४ – ५ साधक वर्ष २०१० पासून भारतभर प्रवास करत आहोत, तसेच वर्ष २०१७ आणि २०१८ या कालावधीत आम्ही नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर असा विदेशांत प्रवास केला.
समुद्रमंथनातून जसे महालक्ष्मी, अमृत, कामधेनू, पारिजात वृक्ष, विविध रत्ने इत्यादी अनमोल गोष्टी मिळाल्या, तसेच आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने केलेल्या प्रवासातील ज्ञानमंथनातून अनमोल गोष्टी मिळाल्या आहेत. आम्ही जेथे जातो, तेथे देवळे, सांस्कृतिक वारसा असलेल्या गोष्टी, ऐतिहासिक वास्तू, हिंदूंच्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरिती, महनीय व्यक्ती आणि संतमहात्मे यांचे चित्रीकरण, मुलाखती, तसेच त्यांच्या संदर्भातील पुस्तके, ध्वनीचित्रचकत्या, ग्रंथ यांच्या माध्यमातून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती गोळा करतो. तेथील काही वस्तूही आध्यात्मिक संशोधनासाठी जतन करतो. काही ठिकाणी आम्ही वैज्ञानिक उपकरणांद्वारे आध्यात्मिक संशोधनही करतो. एखाद्या ठिकाणी हिंदु संस्कृतीचा र्हास झाला असेल किंवा धर्मपालनाचा अभाव दिसून येत असेल, तर त्याचीही माहिती प्रबोधन करण्याच्या उद्देशाने गोळा करतो. या सर्व दौर्यांतून, विशेषतः विदेश दौर्यांतून आम्हाला शिकायला मिळालेल्या गोष्टी सारांशरूपाने येथे देत आहोत.
विश्वव्यापी सनातन हिंदु संस्कृतीच्या
पाऊलखुणांच्या अभ्यासदौर्यातील काही छायाचित्रमय स्मृती !
१. सनातन विश्वरूप
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वीच लिहून ठेवले आहे – ‘सनातन धर्म माझे नित्य रूप….’. आम्ही हा जो विदेशातही प्रवास करत आहोत, तो पूर्वी आर्यांमुळे, तसेच पराक्रमी हिंदु राजांमुळे सनातन संस्कृती संपूर्ण जंबू द्वीपावर (इजिप्तपासून इंडोनेशियापर्यंत) कशी पसरलेली होती, याचा अभ्यास करण्यासाठी करत आहोत. सध्याच्या काळात पुन्हा सनातन धर्माचा प्रसार जगभर करण्याची वेळ आली आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असे हे कार्य करण्यासाठी आमचा प्रवास तेच करवून घेत आहेत.
२. अध्यात्माचा प्रसार
विज्ञान नव्हे, तर अध्यात्मच मानवाचा खरा विकास (उन्नती) करू शकते आणि त्याला आनंद अन् शांती देऊ शकते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेल्या अध्यात्माच्या प्रसाराची ओळख करून देण्यासाठी आणि त्यात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी आमचा प्रवास चालू आहे. अन्यही काही विभूती अध्यात्म जगतात. ते जाणून घेण्यासाठी, तसेच त्यांच्याकडून शिकण्यासाठीही आम्ही प्रवास करत आहोत.
३. साधनेची आवश्यकता
सध्या साधना आणि धर्मपालन यांच्या अभावामुळे वातावरणात पुष्कळ रज-तम पसरलेले आहे. विदेशात तर ते पुष्कळ अधिक प्रमाणात आहे. त्या वातावरणात आपला निभाव लागण्यासाठी स्वतःजवळ आध्यात्मिक बळ असणे आवश्यक आहे. आम्हाला अशी अनुभूती यायची की, विदेशात आम्ही रहात असलेल्या ‘हॉटेल’मधील खोलीमध्ये सात्त्विक वातावरण निर्माण व्हायचे. त्या खोलीच्या बाहेर पाऊल टाकले की, रज-तम जाणवायचे.
४. श्रद्धेचे महत्त्व
एखाद्या ठिकाणी चित्रीकरणासाठी गेल्यावर काही वेळा तेथे काही दिवसांपासून पाऊस पडत असायचा, कडक ऊन असायचे किंवा आणखी काही नैसर्गिक अडचणी असायच्या. यांमुळे वेळ वाया जायची शक्यता असे. तेव्हा ‘आपण करत असलेले सत्चे कार्य देवच करवून घेणार आहे’, ही श्रद्धा आणि देवाच्या चरणी शरणागतभाव हे दोन्ही महत्त्वाचे होते. देवावर श्रद्धा ठेवून त्याला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर या अडचणी सहजतेने दूर व्हायच्या. अशा अनुभूती पुष्कळ वेळा आल्या.
५. गुरुकृपा महत्त्वाची
आम्ही आज एका देशात, तर उद्या दुसर्या देशात असायचो. प्रत्येक देशाची हवा, पाणी वेगवेगळे असायचे. आमचा अनुमाने ६ लाख कि.मी.चा प्रवास झाला आहे. आम्ही एका ठिकाणची सेवा संपवून दुसर्या ठिकाणी जातो, तेव्हा आधीच्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्याची वार्ता आम्हाला पुष्कळदा ऐकायला मिळते. त्या ठिकाणी जीवितहानी झालेली असते अथवा लोकांना त्रास झालेला असतो. आम्ही तिथे असेपर्यंत मात्र आमच्या सेवेत कोणताही अडथळा येत नाही. आमची सर्व सेवा देव निर्विघ्नपणे पार पाडून घेतो. उदाहरणार्थ
अ. श्रीलंकेहून आम्ही भारतात परत आल्यावर आठवडाभरातच तेथे बौद्ध आणि मुसलमान यांच्यात दंगल उसळली अन् तेथेही संचारबंदी घोषित करण्यात आली असल्याची वार्ता आम्हाला कळली.
आ. इंडोनेशिया येथे अनेक ज्वालामुखी आहेत. तेथे सुराबाया आणि बाली यांच्यामध्ये ज्वालामुखी आहे. त्या ठिकाणाहून विषारी वायू निघाला आणि ३० जणांचा मृत्यू झाला.
आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रवास करत असल्याने तो त्यांच्या संरक्षक-कवचामध्ये होतो. त्यामुळे अनेक मास (महिने) सतत प्रवास करूनही आमच्यापैकी कोणीही आजारी पडला नाही, हे विशेष आहे. यालाच ‘गुरुकृपा’ म्हणतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला हा प्रवास करण्याचे भाग्य लाभले. या प्रवासातून शिकायला मिळालेल्या गोष्टी त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण !’
– (सद्गुरु) सौ. अंजली मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
जगातील सर्वांत मोठ्या दूरचित्रवाहिन्यांनी विविध देशांतील हिंदु संस्कृतीचे अवशेष असलेल्या मंदिरांच्या चित्रीकरणात तेथे मूळ हिंदु संस्कृती असल्याचे न दाखवणे, जगभर असलेल्या हिंदु धर्माच्या खुणांविषयी भारतातील शासन उदासीन असणे आणि त्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या देशांमध्ये पाठवले असावे’, असे वाटणे
‘डिस्कव्हरी’ आणि ‘नॅशनल जिओग्राफिक चॅनल’ यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या दूरचित्रवाहिन्या इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया आणि थायलंड आदी देशांमधील हिंदु संस्कृतीचे अवशेष असलेल्या मंदिरांचे चित्रीकरण व्यवस्थित करत नाहीत, तसेच यामागील सत्य इतिहासही सांगत नाहीत’, हे या देशांत आल्यावर आमच्या लक्षात आले. या वाहिन्या त्यांच्या चित्रीकरणात मूळ हिंदु संस्कृती दाखवत नाही. खरेतर भारताचे शासनकर्तेही याविषयी निद्रिस्त आहेत. जगभर असलेल्या हिंदु धर्माच्या खुणा आणि त्यांची माहिती यांसाठी भारतातील शासन काही करतांना दिसून येत नाही. ‘ही आपली संस्कृती आहे आणि आपल्याला तिचे जतन करायचे आहे’, हे भारताचे शासन विसरले आहे. ‘भारतीय संस्कृतीची महानता भारताने दाखवायला हवी; पण तसे होत नसल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना या देशांमध्ये पाठवले असावे’, असे वाटते. प्रत्येक मंदिराची संकल्पना आणि बांधणी, हे सर्व हिंदु धर्मातील पुराणातून उचलली आहे, उदा. बोरोबदूर येथील बुद्ध मंदिराची रचना श्रीयंत्रासारखी आहे, तरी ते न दाखवता ‘बौद्धांनी हे मंदिर कसे बांधले ?’, असे दाखवले जाते. अनेक हिंदु मंदिरांमध्ये असलेल्या हिंदु देवतांच्या मूर्ती काढून त्याजागी बुद्धांची मूर्ती बसवण्यात आली; पण ही सर्व माहिती या दूरचित्रवाहिन्या सांगत नाहीत. ही माहिती या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यावरच कळते.’
– (सद्गुरु) सौ. अंजली मुकुल गाडगीळ, कंबोडिया.