मारिया वर्थ यांचा परिचय
मारिया वर्थ या मूळच्या जर्मनी येथील असून त्यांनी हॅम्बर्ग विश्वविद्यालयातून मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे. पुढे ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या नियोजनाने त्यांनी जर्मनी सोडले. मार्गात असलेल्या भारतात काही दिवसांसाठी भेट देण्याच्या हेतूने त्या उतरल्या. वर्ष १९८० च्या हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यात त्या सहभागी झाल्या. त्या वेळी त्यांना तेथे उच्चकोटीचे संत भेटले. त्यांच्या आशीर्वादाने मारिया भारतातच राहिल्या आणि ऑस्ट्रेलियात पुढे कधीच गेल्या नाहीत. त्यांना हे लक्षात आले की, हिंदु धर्मातील नीतीमूल्ये आणि शिकवणीच्या विरोधात पद्धतशीररित्या षड्यंत्रे आखली जात आहेत. याचा विरोध करण्यासाठी आणि जगाला हिंदु धर्माचे महत्त्व कळावे; म्हणून मारिया यांनी लिखाणास आरंभ केला. मारिया या त्यांच्या mariawirthblog.wordpress.com या ‘ब्लॉग’द्वारे हिंदु धर्माचा प्रचार-प्रसार आणि धर्मावरील आघात यांविषयी लिखाण करत असतात.
१. ख्रिस्ती आणि इस्लाम यांच्या प्रसाराला प्रसिद्धी देणारी;
मात्र अनादि सनातन हिंदु धर्माविषयी अपसमज पसरवणारी प्रसारमाध्यमे !
प्रामाणिकपणा आणि सत्य याला काही अर्थ राहिलेला नाही. ‘राजकारणी जे काही सांगतात, ते बरोबर’, असे झाले आहे. असे का घडले, हे एक आश्चर्यच आहे ! प्रमुख प्रसारमाध्यमे आणि संस्था यांनी ‘राजकारणी जे सांगतात, ते योग्य आहे’, असेे सांगून ते लोकांना स्वीकारण्यास भाग पाडले आहे. आपल्या बुद्धीला पटत नसले, तरी आपण कसा विचार करायला हवा, हे ते आपल्या मनावर बिंबवत असतात. मी तुम्हाला एक उदाहरण देते. ज्या वेळी वर्ष १९९९ मध्ये पोपने घोषित केले की, ‘२१ व्या शतकात चर्चकडून आशियामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला जाईल’, त्या वेळी सर्व प्रसारमाध्यमांनी त्याला संमती दर्शवली. याचा अर्थ, ‘संपूर्ण जगात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे, हे चर्चचे कर्तव्यच आहे आणि त्याप्रमाणे पोप त्यांचे कर्तव्य करत आहेत.’ ज्या वेळी डॉ. झाकीर नाईक यांच्यासारख्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करत होत्या, तेव्हाही प्रसारमाध्यमांनी त्याला संमती दर्शवली. याचा अर्थ, ‘जगातील सर्व व्यक्ती मुसलमान होईपर्यंत इस्लामचा प्रसार होणे आवश्यक आहे’, असे प्रसारमाध्यमे समजतात, असा होतो; परंतु ज्या वेळी हिंदु संघटना धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणतात, त्या वेळी प्रसारमाध्यमांना राग येतो आणि ती सांगतात की, ‘या संघटना जातीयवादी आणि फुटीरतावादी असून त्यांना समाजाची घडी विस्कटून असहिष्णू अशा हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’ याविषयी दूरचित्रवाणीवर पुष्कळ दिवस चर्चा चालू रहाते. खरेतर सत्य वेगळे असतांना प्रसारमाध्यमे असा चुकीचा प्रसार का करतात ? या तीन धर्मांपैकी केवळ हिंदु धर्म अथवा सनातन धर्म हा जातीयवादी आणि फुटीरतावादी नाही. केवळ हाच अनादी धर्म आहे. तो कोणतीही अट न घालता सर्वांना स्वतःत सामावून घेतो. ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे ‘या वसुंधरेवर (पृथ्वीवर) असलेले सर्व लोक एक कुटुंब आहे’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे.
२. १८ व्या आणि १९ व्या शतकात हिंदु संस्कृतीचा
प्रभाव असणे; मात्र नंतरच्या काळात हा प्रभाव अल्प करण्याचा प्रयत्न होणे
नव्याने स्थापन झालेल्या ख्रिस्ती आणि इस्लाम या पंथांनी मानवजातीची सश्रद्ध अन् अश्रद्ध अशी विभागणी केली आहे. ‘श्रद्धाळू हे योग्य, तर अश्रद्ध हे चुकीचे’, असे त्यांचे मत आहे. ‘श्रद्धाळू व्यक्तींवर सर्वशक्तीमान ईश्वराचे प्रेम असते आणि त्यांना स्वर्गात स्थान प्राप्त होते, तर अश्रद्ध व्यक्ती जरी सदाचाराने वागत असल्या, तरी ईश्वर त्यांना नरकात पाठवतो’, असे दावे पुराव्याशिवाय केले जातात. हे सर्व बिनबुडाचे आरोप सत्य तर नाहीतच; परंतु त्याचसह ते असह्य, जातीयवादी आणि फुटीरतावादी नाहीत का ? म्हणून हिंदु धर्माला नव्हे, तर ख्रिस्ती आणि इस्लाम यांना फुटीरतावादी शक्ती म्हटले पाहिजे. हे उदारमतवाद्यांना पटणार नाही आणि ‘हिंदु धर्म हा फुटीरतावादी असून त्याचा प्रसार थांबला पाहिजे’, असेच ते म्हणणार. ते असे खात्रीपूर्वक का सांगतात, हे समजून घेण्यासाठी आपण १८ व्या आणि १९ व्या शतकात जाऊया. तेव्हा पाश्चिमात्य विद्यापिठांना वेदांचे ज्ञान ठाऊक झाले. तेथील बुद्धीजिवी व्यक्तींवर त्याचा प्रभाव पडून त्यांना त्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. व्होल्टेअर, मार्क ट्वेन, शोपनहेर, स्लेगल बंधू, पॉल ड्युसेन आणि इतर अनेक महनीय व्यक्तींनी हिंदु संस्कृतीविषयी तेजस्वी विचार मांडले आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हैसनबर्ग, श्रोडींगर, पाऊली, ओपनहेमर, आईनस्टाईन किंवा टेल्सा यांना त्यांच्या संशोधनासाठी वेदांमधून प्रेरणा मिळाली आणि ते तसे मान्य करतात. मग काय पालट झाला ? जगभरात हिंदु संस्कृतीविषयीचा आदर अल्प कसा झाला ? इतकेच काय, पाश्चिमात्य व्यक्ती ‘हिंदु धर्म हा सर्वांत वाईट धर्म आहे’, असे म्हणू लागले आहेत. ‘वेद ही मानवजातीला मिळालेली मोठी देणगी आहे’, ही व्होल्टेअरनी केलेली स्तुती वाचल्यानंतर हे विचार माझ्या मनात डोकावले. चर्चच्या विरोधात लढतांना व्होल्टेअर नेहमीच अग्रभागी असे. त्यासाठी त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. पाश्चिमात्य विद्वानांनी केलेली भारतियांच्या बुद्धीमत्तेची स्तुती चर्चला मान्य होत नव्हती. चर्चच्या विरोधात गेलेल्यांना शिक्षा करण्याची ताकद नसल्यामुळे चर्च नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. ‘खरा परमेश्वर जो स्वर्गात बसलेला असतो, तो इतर देवतांचा मत्सर करतो आणि ज्यांचा बाप्तीस्मा झालेला नाही, त्यांना नरकात पाठवतो’, हा ख्रिस्त्यांचा दृष्टीकोन ‘ज्याप्रमाणे प्रत्येक लाटेमध्ये समुद्राचा अंश असतो, त्याप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ब्रह्माचा अंश असतो’, या भारतीय विचारसरणीशी जुळत नाही. ‘ब्रह्म हे डोळ्यांनी पहाता येत नाही; परंतु त्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. ब्रह्माचा विचार मनाने करता येत नाही; परंतु ब्रह्मामुळे मन विचार करू शकते’, ही सखोल विचारसरणी, ‘आपला ईश्वर ज्याला इतर व्यक्ती वेगळ्या नावाने पुजतात, त्यांना कठोर शिक्षा करतो’, या ख्रिस्त्यांच्या विचारसरणीला आव्हान देतो. चर्चच्या सभासदांनी वर्चस्वाखाली रहावे आणि प्रतिकार करू नये; म्हणून ख्रिस्त्यांचा देव हा चर्चने लावलेला शोध आहे, अशा प्रकारे त्याकडे पाहिले जाईल, अशी भीती चर्चला वाटत आहे. हे खरे तर सत्य आहे; परंतु ते सामान्य व्यक्तीला कळता कामा नये. पाश्चिमात्यांचे श्रेष्ठत्व अबाधित रहावे, अशी राजकीय शक्तींची इच्छा असल्यामुळे चर्चने त्यांच्या साहाय्याने उच्च भारतीय संस्कृतीची स्तुती करणे बंद व्हावे; म्हणून रणनीती आखल्याचे लक्षात येते. ही रणनीती साधी आणि सद्य:स्थितीला अनुसरून आहे. जगभरातील सर्व विद्यार्थ्यांना हिंदु धर्माविषयी नकारार्थी गोष्टी शिकवणे आणि त्यामुळे १५ वर्षांनंतर येणार्या नवीन पिढीला हिंदु धर्माविषयी काहीही जाणून घेण्याची इच्छा रहाणार नाही. त्यांच्या शिक्षकांनी शिकवल्यामुळे यामध्ये काही अर्थ नाही, अशी त्यांची धारणा होईल.
३. हिंदु धर्माविषयी पसरवले गेलेले अपसमज आणि हिंदु संस्कृती नष्ट करण्याचा झालेला प्रयत्न !
हिंदु धर्माविषयी कोणत्या नकारार्थी गोष्टी ते मुलांना सांगत होते ? पहिली म्हणजे अन्यायकारक वर्णव्यवस्था आणि दुसरी म्हणजे मूर्तीपूजा. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे ही रणनीती भारतात उपयोगात आणली गेली. संस्कृत, संस्कृती हा भारताचा आधारस्तंभ आहे आणि स्थानिकांना कह्यात ठेवायचे असेल, तर हा आधारस्तंभ मोडला पाहिजे, हे थॉमस मेकॉलेने अचूक ओळखले. मेकॉलेच्या सल्ल्याप्रमाणे शिक्षण संस्कृत ऐवजी इंग्रजी भाषेत देण्यास आरंभ झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंग्रजांची शिक्षणपद्धत स्वातंत्र्यानंतर आजही चालू आहे. बव्हारीयन या छोट्या शहरातील प्राथमिक शाळेत मला सांगितले गेले आहे की, ‘भारतामध्ये भयानक अशी वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता आहे.’ असा दावा करणे ही हिंदूंना कमी लेखण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती आहे, त्यामुळे त्याच्या प्रामाणिकतेविषयी शंका उत्पन्न होते. अन्यथा ‘गोर्यांनी आणि अरबांनी मानवतेवर केलेले अत्याचार हे भारतियांनी केलेल्या अत्याचारांपेक्षा अधिक आहेत’, हे सत्य लगेचच बाहेर आले असते. गुलामगिरी, वसाहतवाद, अमेरिकेचे ख्रिस्तीकरण, मुसलमानांचे उल्लंघन, महिलांविषयी केला जाणारा भेदभाव, ज्यू आणि काळ्या व्यक्ती यांच्या विरोधात केला जाणारा वंशविद्वेष, धर्माच्या नावावर केला जाणारा आतंकवाद आणि पाशवी अत्याचार यांमुळे लाखो लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. भारतियांनी अशा प्रकारच्या भयानक घटना केल्याची नोंद कोठेही आढळून येत नाही, त्यामुळे त्यांनी बचावाचा पवित्रा घेण्याचे काहीच कारण नाही. दुर्दैवाने हिंदु या सापळ्यात अडकले आणि त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला.
त्यांनी मागासवर्गीय आणि महिला यांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांच्या बाजूने अनेक कायदे केले; परंतु त्यामुळे त्यांचे समाधान झाले नाही. हिंदु आणि त्यांच्या परंपरांवर अत्यंत विखारी असे आक्रमण भारतीय आणि पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून हिंदु नावाच्या व्यक्तींमार्फत सातत्याने चालूच आहे. या आक्रमणाचा हेतू ‘मुलांना विकृत शिकवण देणे, हिंदु धर्माविषयी खोटी माहिती देणे, भारतीय परंपरांच्या महानतेचा शोध घेतला न जाणे’, हा आहे.
४. हिंदु धर्म चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक !
वेद हे ईश्वराकडूनच आलेले आहेत आणि त्यांचे असे सांगणे आहे की, ईश्वर हा प्रत्येकामध्ये असतो आणि तो कोणालाही कायमस्वरूपी शाप देत नाही. आत्मशक्तीला जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला अनेकवेळा संधी दिली जाते. भिन्न मतप्रणाली असल्यामुळे सत्य काय, हे शोधण्यासाठी बुद्धीमान व्यक्तींचे चर्चासत्र आयोजित केले पाहिजे. ख्रिस्ती आणि मुसलमान यांना सत्य शोधण्यामध्ये स्वारस्य नसेल, तर ज्या पायावर त्यांच्या धर्माची इमारत उभी आहे ती कोसळेल. त्यामुळे सत्यता सिद्ध करण्याचे दायित्व हिंदूंचे आहे. ज्यांची उपजीविका धर्मावर चालते, अशांना वगळून, ख्रिस्ती आणि मुसलमान, तसेच सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी त्यांचे दायित्व घेणे आवश्यक आहे. ईश्वरावरचा विश्वास उडाल्यामुळे पुष्कळसे ख्रिस्ती हे नास्तिक झाले आहेत; परंतु भारतीय ऋषींचा ईश्वराविषयीचा वेगळा दृष्टीकोन त्यांना माहीत नाही. हिंदु धर्म चांगल्या प्रकारे समजून घेऊन मानवजातीच्या कल्याणासाठी असलेली त्याची आवश्यकता जाणून घेतली असता आपल्या हे लक्षात येईल की, हा धर्म सगळ्यात चांगला आहे; मात्र हे कोणाच्याही लक्षात येऊ नये; म्हणून तो मानवजातीसाठी घातक आहे, असे चित्र निर्माण केले गेले.
– मारिया वर्थ