महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
आणि विद्यार्थी-साधक यांनी केलेला श्रीलंकेचा रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा !
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती. २ सहस्र ३०० वर्षांपूर्वी राजा अशोकाची कन्या संघमित्रा हिच्यामुळे श्रीलंकेत बौद्ध पंथ आला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत. असे असले, तरी श्रीलंकेत श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्याशी संबंधित अनेक स्थाने आहेत. वाल्मीकि रामायणात महर्षि वाल्मीकींनी जे लिहिले, त्यानुसार घडले असल्याचे अनेक पुरावे श्रीलंकेत आढळतात. श्रीराम, सीता, हनुमंत, लक्ष्मण, रावण आणि मंदोदरी यांच्याशी संबंधित अनेक स्थाने, तीर्थे, गुहा, पर्वत आणि मंदिरे श्रीलंकेत आहेत. त्यांतील ४७ स्थानांची माहिती आतापर्यंत भक्त आणि काही आध्यात्मिक संस्था यांनी शोधली आहे. या सर्व स्थानांची माहिती मिळावी आणि जगभरातील सर्व हिंदूंना ती सांगता यावी, यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेत ४ विद्यार्थी-साधकांनी १ मास (महिना) श्रीलंकेचा दौरा केला. हा दौरा म्हणजे रामायणाशी संबंधित अभ्यास दौरा होता, असे म्हणता येईल.
१. श्रीलंकेतील पर्वतीय भागातील ‘सीता एलिया’ गावात सीता नदीच्या काठी बांधलेले राम, लक्ष्मण आणि सीता यांचे मंदिर !
श्रीलंका हे द्वीप (बेट) आहे. या देशाच्या मध्यभागी उंचच्या उंच पर्वत आहेत. श्रीलंकेत राज्यांच्या ऐवजी प्रांतांमध्ये भूभागाचे विभाजन केलेले आहे. एकूण ९ प्रांत असून त्यातील मध्य प्रांतात सुंदर पर्वत आहेत. तेथे ‘नुवारा एलिया’ नावाचे शहर असून ते समुद्रसपाटीपासून ६ सहस्र २०० फूट उंचीवर आहे. येथून ५ कि.मी. अंतरावर ‘सीता एलिया’ हे गाव आहे. येथील नदीचे नाव ‘सीता नदी’ आहे. नदीच्या काठी ३ सहस्र वर्षे पुरातन असलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती असून तेथे नंतर बांधण्यात आलेले मंदिर आहे.
२, सीतामातेच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ‘अशोक वाटिका’ !
नदीकाठी असलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मंदिरामागे घनदाट जंगल आहे. तेथे कुणीही जात नाही. स्थानिकांनाही तेथे जायला अनुमती नाही. जंगलात जाण्याची वाटही कठीण आहे. तेथ असणार्या अनेक वृक्षांतील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष म्हणजे ‘अशोक वृक्ष’. केवळ बघूनच भाव जागृत करणारे हे जंगल म्हणजे सीतामातेच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ‘अशोक वाटिका’ आहे. स्थानिक तमिळ हिंदू अशोक वाटिकेला ‘अशोक वनम्’ असे संबोधतात.
३. हनुमंताने अशोक वाटिका जाळल्याने तेथील माती काळी आणि राखेसारखी असणे
‘रामायणातील युद्धानंतर हनुमंताने अशोक वाटिका जाळली’, असा उल्लेख वाल्मीकि रामायणात आढळतो. अशोक वाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील माती काळी असून ती राखेसारखी आहे. सीता नदीच्या पलीकडे म्हणजे अशोक वाटिकेच्या समोरच्या दिशेला लाल मातीची भूमी आहे. एकूणच संपूर्ण श्रीलंकेत सगळीकडे लाल रंगाची माती आहे.
४. शोक करत असलेल्या सीतेला आईसारखे प्रेम देऊन तिचा शोक नाहीसा करणारा अशोक वृक्ष !
वाटिकेत गेल्यावर ‘अशोक वृक्ष’ लक्ष वेधून घेतात. त्याच्या पानांच्या शिरा स्पष्ट दिसतात. ‘पान हातात घेतल्यावर चैतन्य शरिरात जात आहे’, असे जाणवते. वर्षातून दोनदा या वृक्षाला लाल रंगाचे फूल येते. त्याला ‘सीता फूल’ म्हणतात. शोक करणार्या सीतेला आईसारखे प्रेम देऊन वृक्षाने शोक नाहीसा केल्याने वृक्षाला ‘अशोक वृक्ष’ म्हणतात.
– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१८)
एक श्लोकी रामायण
आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं
पश्चाद्रावणकुम्भकर्णहननमेतद्धि रामायणम् ॥
अर्थ : ‘आरंभी रामाचे तपोवनात जाणे, त्यानंतर सुवर्णमृगाला मारणे, सीतेचे हरण, जटायूचे बलीदान, राम-सुग्रीव भेट, वालीवध, सेतूबंधन, लंकादहन आणि त्यानंतर रावण अन् कुंभकर्ण यांचा वध’, हा रामायणातील घटनांचा क्रम आहे.
५. हनुमंताने सीतामाता ज्याखाली बसली होती, त्या अशोक वृक्षावर
झेप घेण्यासाठी ज्या दगडावर पाऊल ठेवले, त्यावर त्याचेे पाऊल उमटणे
सीता नदीच्या काठी असलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मंदिराच्या मागील दगडावर हनुमंताचे पाऊल उमटलेले आहे. सीतामातेच्या शोधात या ठिकाणी आलेल्या हनुमंताने त्या दगडावरून ज्या अशोक वृक्षाखाली सीतामाता बसली होती, त्या वृक्षावर झेप घेतली, असे म्हणतात. त्याच्या पावलाची खूण अजूनही भक्तांना पहायला मिळते. अशोकाचे वृक्ष केवळ याच भागात आहेत. इतरत्र कुठेही मिळत नाहीत.
६. अशोक वाटिकेत जाण्याची वाट पुष्कळ अवघड असणे, त्या जंगलात जायचे धाडस
स्थानिक लोकही करत नसणे; परंतु मंदिराचे कार्यदर्शी श्री. जीवराज यांनी केलेेल्या साहाय्यामुळे आणि
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांंच्या तळमळीमुळे ती अवघड वाट चढून अशोक वाटिकेचे दर्शन घेता येणे
सीता एलिया येथील सीता नदीच्या काठी असलेल्या डोंगरावरील अशोक वाटिकेच्या ठिकाणी जाणे कठीण आहे. नदीला लागूनच असलेल्या डोंगरावर हे घनदाट जंगल आहे. दगडांवरून सीता नदीत उतरणे आणि तेथून भुसभुशीत माती असलेल्या या जंगलात चढणे पुष्कळ अवघड आहे. तेथील मंदिराचे कार्यदर्शी श्री. जीवराज यांच्या साहाय्याने आम्ही सर्व जण अशोक वाटिकेत जाऊ शकलो. श्री. जीवराज यांनी सांगितले, स्थानिक लोकही येथे वर चढायचे धाडस करत नाहीत. या आधी भारताच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभा पाटील, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर गुरुजी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान हे आले होते. त्यांच्या समवेत माणसांचा मोठा ताफा होता, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अनेक माणसे होती, तरीही त्यांनी या ठिकाणी चढण्याचे धारिष्ट्य केले नाही. आज येथील हिंदूंसाठी मोठा दिवस आहे. आज मंदिरात हनुमंताचा उत्सव आहे. तुम्ही विशेष दिवशी येथे आला आहात. माताजी, जर तुम्ही म्हणत असाल, तर मी तुम्हाला तेथे घेऊन जातो. त्यावर सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू म्हणाल्या, श्रीराम आमच्या समवेत आहे. त्यानेच आम्हाला येथपर्यंत आणले आहे. आपण अशोक वाटिकेत जाऊयाच. सीता नदीच्या काठी असलेल्या आणि घसरणार्या दगडांवर एक-एक पाऊल टाकत सीता नदीत उतरून तेथून पुढे सद्गुरु काकू अशोक वाटिकेचा तो छोटा डोंगर चढल्या.
७. अशोक वाटिकेच्या ठिकाणी त्या जंगलात पुष्कळ जळू आहेत. सद्गुरु काकूंच्या समवेत असलेल्या आम्हा सर्वांना जळू चावल्या; पण सद्गुरु काकूंना एकही जळू चावली नाही.
८. अशोक वाटिकेचे दर्शन झाल्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
श्रीरामस्वरूप असलेले आमचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच सीतामाता आणि हनुमंत यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या अशोक वाटिकेचे आम्हाला दर्शन झाले. त्यांच्या कृपेनेच आम्ही अत्यंत कठीण असलेल्या वाटेवरून अशोक वाटिकेत जाऊ शकलो. ही सर्व त्यांचीच कृपा होती. यासाठी आम्ही गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत.
– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१८)