भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.
वैराग्यस्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय !
१ अ. दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम असणे
‘भगवान दत्तात्रेय म्हणजे ‘’ब्रह्मा, विष्णु आणि महेश’’ या त्रिमूर्तींचे रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णु वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहे. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे.
१ आ. वैराग्य आणि संन्यस्थ
भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते ‘’स्वेच्छाविहारी’’ आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेनेच मिळते.
१ इ. अखंड शिष्यभावात असणे
भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत ‘शिष्य अवस्थेत’ वावरतात. ‘शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.’ शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान दत्तात्रेय होय. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. ‘आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला’, हे यांत अवधूत यांनी सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी २४ गुरु आणि २४ उपगुरु केले. ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकत असतात.
१ ई. क्षमाशील
शिष्य कितीही चुकला, तरी गुरु त्याला क्षमा करून पुन्हा शिकण्याची संधी देतात, याचे उत्तम उदाहरण भगवान दत्तात्रेय आहेत. ते केवळ शिष्याचे दोष क्षमा करत नसून विरोधकांचे अपराधही क्षमा करून त्यांचा उद्धार करतात. श्रीपादश्रीवल्लभ यांचा द्वेष करणार्या ‘‘नरसावधानी’’ नावाच्या मनुष्याला कर्मफलन्यायानुसार कठोर शिक्षा मिळाली होती. तेव्हा त्याने श्रीपादश्रीवल्लभांचे चरण धरले. यावर क्षमाशील वृत्तीच्या श्रीपादश्रीवल्लभांनी नरसावधानीला क्षमा करून त्याचा उद्धार केल्याचे उदाहरण श्रीपादश्रीवल्लभ यांच्या जीवनचरित्रात आढळते. दत्तगुरूंच्या क्षमाशीलतेची अनेक उदाहरणे गुरुचरित्रात आपल्याला पहावयास मिळतात.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०१६, सायं. ६.२५)
२. आध्यात्मिक वैशिष्ट्ये
२ अ. उच्च देवतांपैकी एक : दत्तगुरु हे उच्च देवतांपैकी एक आहेत.
२ आ. अन्य देवतांशी संबंध : दत्तामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांचे तत्त्व सामावले आहे. त्यामुळे दत्तगुरु हे त्रिदेवांशी संबंधित आहेत.
२ इ. परिवार
२ इ १. सगुण रूपाशी संबंधित परिवार : माता अनुसूया, पिता अत्रिऋषि आणि बंधु दुर्वास असा दत्तात्रेयांच्या सगुण रूपाशी संबंधित परिवार आहे.
२ इ २. निर्गुण रूपाशी, म्हणजे तत्त्वाशी संबंधित परिवार : गाय, चार कुत्रे आणि औदुंबर वृक्ष असा दत्तात्रेयांच्या निर्गुण रूपाशी संबंधित परिवार आहे.
२ इ ३. परिवाराचा भावार्थ
२ ई. संबंधित लोक : तपोलोक ते सत्यलोक या दरम्यान विविध देवतांचे सगुणलोक आहेत. यात प्रथम गणेशलोक असून दुसरा दत्तलोक आहे.
– कु. मधुरा भोसले, (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०१७)
२ उ. संबंधित पंचमहाभूत
२ उ १. पहिली विचारसरणी – कु. मधुरा भोसले : दत्तामध्ये विष्णुतत्त्व प्रबळ आहे. विष्णूचा संबंध आपतत्त्वाशी असल्याने दत्त आपतत्त्वाशी संबंधित आहे.
२ उ २. दुसरी विचारसणी – श्री. राम होनप : विष्णूचा संबंध आपतत्त्वाशी नाही, तर आकाशतत्त्वाशी आहे.
२ ऊ. संबंधित नदी : कावेरी नदी ही दत्ताशी संबंधित आहे. तिच्यामध्ये अधिक प्रमाणात दत्ततत्त्व आहे.
२ ए. कुंडलिनीतील सप्तचक्रांशी संबंध : कुंडलिनीतील मणिपूरचक्र हे दत्ताशी संबंधित आहे.
२ ऐ. संबंधित सुगंध : वाळ्याचा गंध दत्ताला प्रिय आहे. हा गंध घेतल्यामुळे दत्ततत्त्वाचे चैतन्य प्राप्त होऊन पूर्वजांचा त्रास दूर होतो. दत्ताच्या तारक रूपाच्या उपासनेसाठी चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर हे सुगंध पूरक आहेत. दत्ताच्या मारक रूपाच्या उपासनेसाठी हीना आणि दरबार हे सुगंध पूरक आहेत.
२ ओ. प्रिय पुष्पे, पत्री आणि वृक्ष : औदुंबर वृक्षामध्ये दत्ततत्त्व आकृष्ट होते. त्यामुळे औदुंबर वृक्षाची पूजा केली जाते. जुई, निशिगंधा आणि चाफा यांच्या गंधाकडे दत्तात्रयांच्या गंधलहरी आकृष्ट होतात. जुई आणि निशिगंधा यांमध्ये सूक्ष्मातून आकृष्ट झालेले दत्ततत्त्व या फुलांच्या उत्साहवर्धक सुगंधाच्या रूपाने वातावरणात प्रक्षेपित होते. ही फुले ७ किंवा ७ च्या पटींनी दत्ताच्या चरणी वहावीत.
२ औ. प्रदक्षिणांची संख्या : दत्तामुळे देहातील सातही चक्रांची शुद्धी होऊन आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे दत्ताला ७ प्रदक्षिणा घालाव्यात.
२ अं. संबंधित धातू किंवा रत्न : पुष्कराज हे रत्न गुरुतत्त्वाशी संबंधित आहे.
२ क. संबंधित वार : आठवड्यातील सात वारांपैकी गुरुवार हा दत्ताशी संबंधित वार आहे.
२ ख. संबंधित तिथी : मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्तजयंती ही तिथी दत्ततत्त्वाशी संबंधित आहे.
२ ग. तत्त्वाचा रंग : दत्ततत्त्वाचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा विशुद्ध ज्ञानाचे प्रतीक आहे.
२ घ. प्रिय नैवेद्य : साखर मिश्रित दूध आणि रव्याचा शिरा दत्ताला प्रिय आहे.
२ च. शस्त्र : त्रिशूळ आणि सुदर्शनचक्र ही दत्ताशी संबंधित शस्त्रे आहेत.
२ छ. संबंधित वाद्य : डमरू हे वाद्य शिव आणि दत्त यांच्याशी संबंधित आहे. शिवाप्रमाणेच दत्ताला शंख-डमरूचा नाद प्रिय आहे. त्याचप्रमाणे पांचजन्य शंख हा दत्त आणि विष्णु यांच्याशी संबंधित आहे. विष्णु आणि दत्त यांना शंखनाद प्रिय आहे.
३. दत्ताची कार्यानुमेय असणारी विविध रूपे
३ अ. तारक रूप : भक्तांचे कल्याण करणारे दत्ताचे तारक आणि कल्याणकारी रूप सतत कार्यरत असते.
३ आ. मारक रूप : भक्तांना त्रास देणार्या अनिष्ट शक्तींचे निवारण करण्यासाठी मारक रूप धारण करून त्यांच्यावर लयकारी शक्तीचा प्रयोग करतात. दत्ताचे मारक रूप प्रसंगानुरूप कार्यरत होते.
३ इ. सगुण रूप : दत्ताचे त्रिमुखी रूप हे त्याच्या सगुण तत्त्वाशी अधिक संबंधित आहे.
३ ई. निर्गुण रूप : दत्ताचे एकमुखी रूप हे अधिक प्रमाणात निर्गुणस्वरूप आहे. दत्ततत्त्व हे निर्गुणवाचक आहे.
३ उ. विविध रूपे : दत्तमूर्ती, दत्तपादुका आणि औदुंबरवृक्ष यांना दत्तस्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते.
३ उ १. दत्ताच्या पादुका : दत्ताच्या पादुकांमध्ये सगुण-निर्गुण स्तरावर गुरुतत्त्व केंद्रित झालेले असते. त्यामुळे दत्ताच्या पादुकांची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. गाणगापुरला निर्गुण पादुका, नरसोबावाडीला मनोहर पादुका आणि औदुंबरला विमल पादुका आहेत. अशाप्रकारे दत्ताच्या तीन पादुकांची तीन तीर्थक्षेत्री स्थापना झालेली आहे.
४. दत्ताची विविध गुणवैशिष्ट्ये
४ अ. दत्त हा गुरुस्वरूपात पूजला जाणारा एकमेव देव असणे : दत्त उच्च देवता असून तो गुरुरूपात पूजला जातो. याचे कारण तो उच्च देव असूनही शिष्यांना आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी गुरु म्हणून अखंड कार्यरत असतो.
४ आ. ऋषिवेषातील देवता : दत्ताचा पेहराव उच्च प्रकारची रेशमी वस्त्रे आणि विविध सुवर्णालंकार परिधान केलेला असा नसून साधे पितांबर नेसून गळ्यात ऋषींप्रमाणे रुद्राक्षाच्या माळा आणि दंडाला भस्माचे पट्टे, असे आहे. दत्तामध्ये वैराग्य प्रबळ असल्यामुळे त्याने ऋषींप्रमाणे पेहराव केलेला आहे.
४ इ. दत्तात्रेयामध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला असणे : भगवान दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप. ब्रह्मदेव ज्ञानस्वरूप, श्रीविष्णु वात्सल्यस्वरूप आणि शिव वैराग्यस्वरूप आहेत. अशा त्रिमूर्तींचे एकत्रित रूप असणार्या दत्तात्रेयांमध्ये ज्ञान, वात्सल्य आणि वैराग्य यांचा सुरेख संगम झालेला आहे.
४ ई. वैराग्य आणि संन्यस्थ : भगवान दत्तात्रेयांमध्ये वैराग्य असल्यामुळे ते संन्यस्त जीवन व्यतीत करतात. त्यांचा निवास मेरुशिखरावर असतो. संध्या आणि अन्य दिनक्रम ते इतर ठिकाणी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये वैराग्यवृत्ती प्रबळ असल्याने त्यांना कोणत्याही स्थानाचे मोहबंधन नाही. त्यामुळे ते स्वेच्छाविहारी आहेत. ते जीवनमुक्त असल्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात मुक्तपणे विचरण करतात. दत्तात्रेय आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याचा आशीर्वाद देतात. जगात सर्व काही मिळू शकेल; परंतु देवदुर्लभ असे वैराग्य केवळ श्रीगुरुकृपेने मिळते.
४ उ. अखंड शिष्यभावात असणे : भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे. शिष्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे भगवान श्रीदत्तात्रेय होय. श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरु केले आणि त्यांच्यापासून काय बोध घेतला, हे यांत अवधूत यांनी सांगितले आहे. त्यांच्या शिष्यावस्थेमुळेच त्यांनी २४ गुरु आणि २४ उपगुरु केले. ते प्रत्येक प्राणीमात्राला गुणगुरु मानतात आणि प्रत्येकाकडून शिकतात. जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे, हे शिकता येते.
४ ऊ. अहं अल्प असणे : संन्यस्त जीवन व्यतीत करत असतांना ते प्रतिदिन दुपारची भिक्षा कोल्हापूरला येऊन मागतात. त्यांचा अहं अल्प असल्यामुळे ते ज्ञानगुरुपदावर आरूढ असूनही भिक्षा मागतात. (कोल्हापूर येथील भिक्षापात्र दत्त मंदिरात प्रतिदिन दुपारी सूक्ष्मातून दत्तात्रेय भिक्षा ग्रहण करण्यासाठी येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यांच्या स्वागतासाठी दुपारी १२ वाजता मंदिरात आरती केली जाते. प्रत्येक दिवशी दुपारी श्री महालक्ष्मीदेवी दत्तगुरूंना भिक्षा देते.)
४ ए. भक्तवत्सल असल्यामुळे स्मर्तृगामी असणे : दत्तात्रेयांमध्ये वैराग्यभाव प्रबळ असल्यामुळे ते सर्व मोहमायेपासून अलिप्त आहेत; परंतु ते भक्तांच्या प्रेमाच्या मायेत बद्ध आहेत. कोणत्याही भक्ताने त्यांचे स्मरण करताच ते तात्काळ प्रगट होतात. त्यामुळे त्यांना स्मर्तृगामी म्हटले आहे. यातून त्यांच्यातील भक्तवत्सलतेचे दर्शन घडते. दत्तात्रेयांच्या भक्तवत्सलतेमुळेच श्रीगुरुचरित्रात श्रीपादश्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांनी अनेक भक्तांचा उद्धार केल्याचा उल्लेख आढळतो.
४ ऐ. ज्ञानसंपन्न होऊन विनम्र आणि परोपकारी बनावे याची शिकवण दत्तगुरूंनी देणे : दत्त सर्वज्ञ असूनही ते विविध ठिकाणी भ्रमण करून भिक्षा मागतात आणि त्यांना शरण आलेल्या उपासकांचे कल्याण करतात. त्यांच्या आचरणातून ते ज्ञानी असूनही किती विनम्र आणि परोपकारी आहेत, हे दिसून येते.
४ ओ. सतत भ्रमण करत असतांनाही अखंड साधनारत असणे : शिवशंकराप्रमाणे भगवान दत्तात्रेयसुद्धा प्रत्येक क्षण साधनारत असतात. ते विरक्त आणि संन्यस्त जीवन जगत असल्याने सतत भ्रमण करतात; परंतु त्याच वेळी ते ध्यानधारणा अन् योगसमाधी यांद्वारे साधनारत रहातात. गिरनार पर्वताच्या ठिकाणी वास करून ते अखंड साधना करतात.
४ औ. धर्म आणि मोक्ष यांचे आश्रयदाते : भगवान दत्तात्रेयांचे तत्त्व मोक्ष पुरुषार्थाचे अनुसरण करत असते. दत्तगुरूंचे विविध अवतार धर्म या पुरुषार्थाची जोपासना करतात. धर्माच्या चार पुरुषार्थांपैकी धर्म आणि मोक्ष यांना दत्तात्रेयांचा आश्रय लाभलेला आहे.
४ अं. पूर्वजांना गती देणारा आणि त्यांचा उद्धार करणारा देव : हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. दत्त पूर्वजांना गती देतो आणि त्यांचा उद्धार करतो. त्यामुळे दत्ताच्या उपासनेमुळे व्यक्तीला होणारा पूर्वजांचा त्रास न्यून होतो.
५. उपासना
५ अ. दत्ताशी संबंधित ग्रंथ
५ अ १. दत्तपुराण : यामध्ये कर्मकांड, उपासनाकांड (दत्तमहात्म्य) आणि ज्ञानकांड (त्रिपुरसुंदरीरहस्य) यांचा समावेश केलेला आहे.
५ अ २. अवधूतगीता : श्री दत्तगुरूंनी कार्तिकेयाला अवधूतगीता उपदेशिली. हा नाथपंथाचा प्रमुख ग्रंथ आहे.
५ अ ३. गुरुचरित्र : यात गुरुमहिमा सांगितला आहे. या ग्रंथामध्ये दत्तसंप्रदायाचा आचारधर्म सविस्तर सांगितला आहे.
५ आ. संबंधित स्तोत्र किंवा कवच : श्री दत्तगुरूंची आरती प्रचलित आहे. दत्तस्तुती, श्री दत्तात्रेयस्तोत्र, करुणा त्रिपदी,
श्री दत्त बावनी, बावन्न श्लोकी गुरुचरित्र, श्री दत्त प्रार्थना आणि दत्तकवचस्तोत्र हे प्रसिद्ध आहेत.
५ आ. दत्ताचा श्लोक
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरु: साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम : ॥
अर्थ : गुरू साक्षात् ब्रह्मा, विष्णु आणि महेश आहेत. साक्षात् परब्रह्मस्वरूप असणार्या गुरूंना मी वंदन करतो.
५ इ. दत्ताचा जयघोष
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त आणि अलख निरंजन हे दत्ताशी संबंधित प्रसिद्ध जयघोेष आहेत.
५ इ १. अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त याचे अर्थ
अ. अवधूत चिंतन, म्हणजे अवगूण धुवून टाकून त्रिगुणातीत अवस्थेला नेणार्या दत्ताच्या अवधूत या रूपाचे नित्य स्मरण करणे.
आ. अवधूत चिंतन, म्हणजे त्रिगुणात्मक सगुणतत्त्वातून निर्गुणाच्या टप्प्याला म्हणजे त्रिगुणातीत अवस्थेला नेणार्या दत्ताच्या अवधूत या रूपाचे नित्य स्मरण करणे.
५ इ २. अलख निरंजन
अ. जो अलख निरंजनाचा जयघोष करून जिवाच्या अंत:करणात सुप्तावस्थेत असणारी ज्ञानाची जिज्ञासा जागृत करून त्याला ज्ञानातील आनंदाची अनुभूती देतो तो अलख निरंजन स्वरूप म्हणजे तेजस्वी ज्ञानाने युक्त असतो.
५ ई. दत्तगायत्री मंत्र
ॐ दत्तात्रेयाय विद्महे । अवधूताय धीमहि ।
तन्नो दत्त: प्रचोदयात् ॥
अर्थ : आम्ही दत्तात्रेयाला जाणतो. आम्ही अवधूताचे ध्यान करतो. तो दत्त आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो. – (संदर्भ : सनातनचा ग्रंथ दत्त)
५ ई १. दत्तगायत्री मंत्राचा आध्यात्मिक लाभ : दत्तगायत्री मंत्राचा उच्चार केल्यामुळे उपासकाला दत्ताच्या तेजतत्त्वाशी संबंधित दैवी शक्ती आणि ज्ञानप्राप्तीसाठी प्रगल्भता प्राप्त होतात.
५ उ. संबंधित बीजमंत्र
दं हे दत्तबीज आहे. ढं हे गुरुबीज आहे.
५ ऊ. संबंधित यज्ञ
दत्तयाग हा दत्ताशी संबंधित यज्ञ आहेत.
५ ए. संबंधित व्रत
दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी दत्तोपासक प्रत्येक गुरुवारी उपवास करतात. वैशाख शुद्ध पंचमी आणि गुरुवारी आलेल्या पंचमीला सत्य दत्तव्रताची पोथी वाचून सत्य दत्तव्रत करतात.
५ ऐ. संबंधित सण
दत्तजयंतीच्या सात दिवस आधीपासून गुरुचरित्राचे पारायण करून दत्तजयंतीला भजन, पूजन आणि कीर्तन केले जाते. काही ठिकाणी दत्तनवरात्र साजरी होते. या नवरात्रीचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो आणि दत्तजयंतीला समापन होते.
५ ओ. संबंधित उत्सव
दत्तजयंतीचा दिवस उत्सवाच्या रूपात साजरा करतात.
६. दत्ताच्या चरणी कृतज्ञता आणि प्रार्थना !
दत्तगुरूंच्या चरणी कृतज्ञताभावाने नतमस्तक होऊन त्यांना संपूर्ण शरण जाऊन पुढील प्रार्थना करूया. हे दत्तगुरु, तुम्हीच आमचा उद्धार करा आणि आमच्यावर कृपावंत होऊन आमच्यामध्ये भक्तीभाव निर्माण करा. आम्हालाही तुमच्यासारखे गुणगुरु करून आमच्यातील दुर्गुणांचा भागाकार आणि सद्गुणांचा गुणाकार करण्याची आम्हाला प्रेरणा होऊ दे अन् हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर होण्यासाठी आपले कृपाशीर्वाद लाभू दे, अशी आपल्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०१७)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
धर्माच्या अभ्यासकांना विनंती
सनातनच्या साधकांना मिळणारे नाविन्यपूर्ण ज्ञान
योग्य कि अयोग्य ?, याचा अभ्यास करण्याच्या संदर्भात साहाय्य करा !
आतापर्यंतच्या युगायुगांतील धर्मग्रंथांत उपलब्ध नसलेले नाविन्यपूर्ण ज्ञान ईश्वराच्या कृपेने सनातनच्या काही साधकांना मिळत आहे. ते ज्ञान नवीन असल्यामुळे जुन्या ग्रंथांचा संदर्भ घेऊन त्या ज्ञानाला योग्य कि अयोग्य ?, असे म्हणता येत नाही. ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?, या संदर्भात धर्माच्या अभ्यासकांनी आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. एवढेच नव्हे, तर अयोग्य काय ?, हेही कळेल. यासाठी आम्ही धर्माच्या अभ्यासकांना या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. – सनातन संस्था
परम आदरणीय, सनातन संस्था .. नमस्कार मी एक गृहस्थ असुन जैन धर्मीय आहे. मला बरेच दा दत्त महाराज स्वप्नात दिसले व मुर्ती जवळ श्री क्षेत्रपाल दिसतात जे शेन्दुर लेपन केलेले असते. कृपया मार्ग दर्शन करावे.. कारण मी जैन भाविक आहे.
पुन्शच सविनय नमस्कार.
जय जीनेन्द्र जय गुरू देव
नमस्कार,
आपल्याला आलेली अनुभूती चांगली आहे. आपण करत असलेल्या साधनेला दत्ताच्या नामजपाची जाेड द्यावी. हा नामजप अतृप्त पूर्वजांना गती देण्यास उपयुक्त आहे. हा नामजप कसा करावा, किती करावा याविषयी सविस्तर माहिती पुढील लिंक वर दिली आहे – https://www.sanatan.org/mr/a/824.html
दत्त वज्र कवच देखील आहे