राष्ट्रभक्ती वाढवणारे विनामूल्य `प्रथमोपचार,
आपत्कालीन मदत आणि अग्निशमन प्रशिक्षणवर्ग’
अ. विनामूल्य प्रशिक्षणवर्ग
राज्यकर्तेच नीतिभ्रष्ट, दुराचारी, बेजबाबदार आणि अकार्यक्षम असल्याने जनतेतही राष्ट्राप्रति सद्भावना अन् राष्ट्राभिमान यांचा अभाव, तसेच राष्ट्रहिताबद्दल अनौत्स्युक्य आढळून येत आहे. राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राष्ट्रहितदक्ष नागरिकांनी आता स्वत:च्या रक्षणाबरोबरच राष्ट्राचे रक्षण करणेही गरजेचे बनले आहे. याच दृष्टिकोनातून सनातन पुढील प्रशिक्षणवर्ग ठिकठिकाणी विनामूल्य आयोजित करते.
अ १. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग
एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यास वा तिला आकस्मिक त्रास सुरू झाल्यास किंवा तिच्यावर अन्य एखादी आपत्ति कोसळल्यास तिला सहकार्य करणे आणि तिच्या प्राणाचे रक्षण करणे, हे देशातील प्रत्येक नागरिकाचे अलिखित कर्तव्यच आहे. हा समाजऋण फेडण्याचा एक भागही झाला. या दृष्टीने संस्थेतर्फे ठिकठिकाणी प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. यांमध्ये पीडित व्यक्तींची प्राथमिक तपासणी कशी करावी, हे शिकविण्यात येऊन विविध तर्हेच्या इजा आणि त्रास यांची सविस्तर माहिती देण्यात येते. तसेच त्या त्या प्रकारात प्रथमोपचाराची कोणती उपचारपद्धति अवलंबावी, हे कृतीसह शिकविण्यात येते.
अ २. आपत्कालीन मदत प्रशिक्षणवर्ग
पूर, वादळ, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने, तसेच युद्धजन्य परिस्थितीत वा अराजक माजले असताही मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. आज प्रशासनातील भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा आणि अकार्यक्षमता जनतेला चांगलीच परिचित आहे. त्याचप्रमाणे देशातील मोडकळीस आलेली समाजव्यवस्था, राष्ट्ररक्षण, अर्थव्यवस्था, युद्धाच्या दृष्टीने स्फोटक परिस्थिति, देशविघातक कारवायांचे वाढते प्रमाण इत्यादींचा मोठा परिणाम नजीकच्या काळात मानवी जीवनावर होईल. या पार्श्वभूमीवर भावी काळात जर आपल्यावर एखादी आपत्ति ओढवली, तर तिच्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला प्रशासकीय साहाय्य अथवा आवश्यक ती सर्व वैद्यकीय आणि इतर मदत, साधनसामग्री कितपत उपलब्ध होईल ? याच दृष्टिकोनातून सनातनतर्फे आपत्कालीन मदत प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येतात. या प्रशिक्षणवर्गांत वेगवेगळया आपत्तींविषयी सविस्तर माहिती देण्यात येऊन प्रत्येक आपत्तीत मदतकार्य कसे करावे, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येते.
अ ३. अग्निशमन प्रशिक्षणवर्ग
अल्पावधीतच प्रचंड जीवितहानि आणि वित्तहानि करणार्या अग्निप्रलयापासून बचावण्याचे किंबहुना अशी आपत्ति उद्भवूच नये यासाठी योग्य ती दक्षता घ्यावयाचे तंत्र सर्वांनी आत्मसात् करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रम अशा कोणत्याही टप्प्यावर वा अन्य प्रकारे अशा आपत्तीच्या वेळी जनतेने कसे वागावे, हे राज्यकर्त्यांकडून शिकविण्यात आलेले नाही. या ज्ञानाच्या अभावामुळेच जनसामान्य अशा आपत्तीच्या वेळी दिङ्मूढ झालेले दिसतात. सनातनतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या अग्निशमन प्रशिक्षणवर्गात या आपत्तीला धीराने सामोरे जाण्याचे, तसेच ही आपत्ति अचूकपणे हाताळण्याचे तंत्र शिकविण्यात येते. या प्रशिक्षणवर्गांत आग लागण्याची आणि ती पसरण्याची विविध कारणे सांगण्यात येऊन आग पाहिल्याक्षणी कोणती कृती करावी, हे शिकविण्यात येते. आग विझविण्याच्या निरनिराळया पद्धती, त्यासाठी आवश्यक विविध माध्यमे आणि त्यांची कार्यपद्धती, चुकीचे माध्यम वापरल्याने होणारे दुष्परिणाम इत्यादींचे सविस्तर मार्गदर्शनही करण्यात येते. आग लागल्यावर सुरक्षात्मक उपाययोजना कशी योजावी, याची प्रात्यक्षिकेही या प्रशिक्षणवर्गांत अंतर्भूत आहेत.
आ. भाषाशुद्धि आणि भाषिक अस्मिता जागृति चळवळ
स्वभाषाभिमानाने राष्ट्राभिमान वाढीस लागतो. सर्व क्षेत्रांत होणारा इंग्रजी भाषेचा वाढता वापर रोखून आपल्या भाषेविषयी अस्मिता जागृत करणे, तसेच सर्व लिखाण व्याकरणदृष्ट्या शुद्ध असावे, याकरिता सनातन ही चळवळ राबवित आहे.