रामनाथी – ६ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सनातन संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याविषयी एक विशेष सत्र झाले. प्रारंभी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांच्या सक्षमीकरणासाठी घेण्यात येणार्या उपक्रमांची माहिती सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी दिली.
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत बालसाधिकांचा परिचय करून दिला. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील कु. अनुष्का सोनटक्के (वय १० वर्षे), राजस्थान येथील कु. सान्वी मोदी (वय ७ वर्षे), यापूर्वी अमेरिकेत वास्तव्यास असलेली आणि सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून साधना शिकणारी कु. प्रिशा सभरवाल (वय ११ वर्षे) या बालसाधिकांचा या वेळी परिचय करून देण्यात आला. तिघींचीही आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून लहान वयातही सात्त्विक बुद्धी, प्रगल्भ विचार, भाव, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची तळमळ, साधनेची तळमळ आदी गुण त्यांच्यामध्ये आहेत. ‘वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र भविष्यात हेच बालसाधक चालवतील’, असे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. तेजल पात्रीकर, संशोधन विभागाच्या डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, कलेशी निगडित सेवा करणार्या सौ. जान्हवी रमेश शिंदे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला, अक्षरकला, रांगोळी आदी कलांविषयी चालू असलेले संशोधन, तसेच वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून केले जाणारे संशोधन यांविषयी माहिती सांगितली.