-
सनातनच्या संतांच्या मांदियाळीत ३ रत्नांची भर !
-
सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून संतपद प्राप्त केलेल्या साधकांची संख्या झाली ७५ !
रामनाथी (गोवा) – धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) हे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून समष्टी संतपदी विराजमान झाले. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून ते अनुक्रमे ७३ वे, ७४ वे आणि ७५ वे संत म्हणून घोषित झाले. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये ५ जूनला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ही आनंदमय घोषणा केली. ‘सनातनचे व्यापक कार्य कशा पद्धतीने चालू आहे’, ‘कार्यक्रमांचे नेटके आयोजन कशा पद्धतीने केले जात आहे’, या हिंदुत्वनिष्ठांच्या प्रश्नांचे उत्तरच या संतसन्मान सोहळ्यातून दिले गेले.
धर्मप्रसाराची तीव्र तळमळ असलेले संतत्रयी !
धर्मप्रसाराची तीव्र तळमळ असलेले आणि सतत कृतज्ञताभावात राहून साधना करणारे धनबाद, झारखंड येथील उद्योगपती श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे) सनातनच्या ७३ व्या संतपदी आरुढ !
धनबाद, झारखंड येथील श्री. प्रदीप खेमका हे एक प्रतिष्ठित उद्योगपती आहेत. ते त्यांचा व्यवसाय सांभाळून तळमळीने धर्मप्रसाराची सेवा करतात. नम्रता, आज्ञापालन आणि भगवंतावरील निष्ठा यांमुळे कोणत्याही कठीण प्रसंगात ते नेहमीच सकारात्मक रहातात. साधकांची पित्याच्या भावाने काळजी घेऊन त्यांना साधनेत, तसेच सेवेत येणार्या अडचणी सोडवण्यासाठी ते तत्परतेने सर्वतोपरी साहाय्य करतात.
त्यांचे कुटुंबही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. त्यांची आई श्रीमती गीतादेवी खेमका यांनी ६७ टक्के, तर पत्नी सौ. सुनीता खेमका यांनी ६९ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.
आजच्या शुभदिनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते सनातनच्या ७३ व्या संतपदी विराजमान झाले आहेत. ते सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील पहिले संत-उद्योगपती आहेत.
अशा पू. प्रदीप खेमका यांची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भगवंतावर अपार श्रद्धा असलेल्या आणि वात्सल्यभावामुळे साधकांची आध्यात्मिक आई बनलेल्या दादर, मुंबई येथील सौ. संगीता जाधव (वय ४९ वर्षे) सनातनच्या ७४ व्या संतपदी विराजमान !
उत्तम नियोजनकौशल्य आणि देवावर अपार श्रद्धा असलेल्या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील सौ. संगीता विष्णुपंत जाधव साधकांशी सहजतेने जवळीक साधतात. त्यांच्यातील वात्सल्यभावामुळे त्या साधकांची आध्यात्मिक आई बनल्या आहेत. साधकांमध्ये भावाचे बीज रुजवून त्या त्यांची सेवेची तळमळ जागृत ठेवतात. तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असतांनाही तळमळीने अन् भावपूर्ण सेवा कशी करायची ?, याचा त्यांनी साधकांसमोर आदर्श ठेवला आहे. मागील २-३ वर्षापासून त्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यासह प्रसार सेवा चांगल्या सक्षमतेने करत आहेत.सौ. संगीता जाधव यांच्या तळमळीमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंबच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे.
आजच्या या शुभदिनी सौ. संगीता जाधव सनातनच्या ७४ व्या समष्टी संत म्हणून संतपदी आरूढ झाल्या आहेत.
पू. (सौ.) संगीता जाधव यांची पुढील वाटचाल अशीच जलद गतीने होवो, अशी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
नम्रता, तत्त्वनिष्ठता आणि आज्ञापालन आदी गुणांचा समुच्चय असलेले कर्नाटकातील श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) सनातनच्या ७५ व्या समष्टी संतपदी विराजमान !
कर्नाटक राज्याचे श्री. रमानंद गौडा यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधकांचा असलेला अचूक अभ्यास ! त्यांना साधकांची आध्यात्मिक पातळी अचूक ओळखता येते. ते साधकांना अचूक मार्गदर्शन करत असल्याने २१० साधकांनी ६० आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली. साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या साधनेच्या तळमळीमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब साधनारत असून त्यांचीही जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे.
श्री. रमानंद यांच्यातील नम्रता, तत्त्वनिष्ठता आणि आज्ञापालन आदी गुणांमुळे त्यांनी वर्ष २०१३ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली होती. आजच्या या शुभदिनी त्यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते सनातनच्या ७५व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत.
भाव, तळमळ आणि आध्यात्मिक स्तरावर उत्तम नेतृत्व करणार्या पू. रमानंद गौडा यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक प्रगती व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वरुणदेवता आणि वानरसेना यांचा शुभसंकेत
संतसन्मान सोहळ्याच्या वेळी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडला, तसेच पाऊस पडल्यानंतर काही वानरही त्या परिसरात येऊन गेले. हा शुभसंकेतच आहे, असे विश्लेषण सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.