कलाकार जीव ज्या वेळी जन्माला येतो, त्या वेळी तो इतर जिवांपेक्षा ईश्वराकडून काहीतरी जास्त घेऊन जन्माला आलेला असतो. एखादी कला अवगत होणे, हे ईश्वरी कृपेविना अशक्यच असते. या ईश्वरी वरदानाचा उपयोग जर कलाकाराने ईश्वरप्राप्तीसाठी केला, तरच खर्या अर्थाने कलाकाराच्या मनुष्यजन्माचे सार्थक होते. नेमके हेच आपल्याला सनातन संस्था शिकवते. केवळ लोकेषणासाठी आपल्या कलेचा उपयोग करणे, म्हणजे मनुष्य जन्माच्या मूळ उद्देशापासून दूर जाण्यासारखे आहे.
वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून ईश्वराजवळ कसे जायचे, याचा ती मार्ग दाखवते. आज सनातन संस्थेच्या माध्यमातून कितीतरी साधक वेगवेगळ्या मार्गानुसार साधना करत आहेत. याचे समाजाला ज्ञान व्हावे; म्हणून विविध कलेच्या माध्यमातून साधना करत असतांना कलाकार साधकांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी केलेले प्रयत्न यांची थोडक्यात ओळख आम्ही आपल्याला या लेखमालेत करून देणार आहोत. प्रयत्न केले की, स्वतः ईश्वरच आपल्याला ज्ञानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करू लागतो. याची अनुभूती सध्या काही साधकांना येत आहे.
१. ईश्वरप्राप्तीसाठी चित्रकला आणि देवतांची सात्त्विक चित्रे काढण्यामागची पार्श्वभूमी
सध्या कलियुगात माणसांची सात्त्विकता फार अल्प झाली आहे. सध्याच्या काळात उपासनेसाठी वापरली जाणारी चित्रे आणि मूर्ती यांत सात्त्विकता हवी, तरच उपासकाला साधना कराविशी वाटेल. याविषयी विचार केल्यानंतर प.पू. डॉक्टरांच्या मनात विचार आला, ‘आपण सात्त्विक अशी देवतांची चित्रे बनवावी. म्हणजे त्यांच्याकडे पहावे, असे तरी लोकांना वाटू लागेल.’ हा विचार त्यांच्या मनात आल्यानंतर काही मासांतच १९९७ मध्येचित्रकलेत पदवी प्राप्त करून नुकत्याच महाविद्यालयामधून उत्तीर्ण झालेल्या कु. श्रुती शेलार (आताच्या सौ. जानव्ही शिंदे) आणि कु. अनुराधा वाडेकर (आताच्या पू. अनुराधा वाडेकर) नावाच्या दोन साधिका सनातनमध्ये आल्या. त्यांनी १० ते २० सहस्र रुपयांच्या चाकरीवर पाणी सोडून ईश्वरप्राप्तीसाठीच हा साधनामार्ग पत्करला.
२. साधकांनी काढलेल्या देवतांच्या चित्रांत
त्या त्या देवतेचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवणे
विश्वव्यापी देवतांची तत्त्वे कागदावरच्या चित्रांमध्ये येण्यासाठी, म्हणजेच ते चित्र देवतेच्या विश्वव्यापी रूपाशी अधिकाधिक मिळतेजुळते येण्यासाठी साधक देवतांची चित्रे रेषांचे सूक्ष्म-परीक्षण करून काढतात. देवतांची
सात्त्विक चित्रे सिद्ध करतांना प.पू. डॉक्टर साधक-चित्रकारांना सांगायचे, ‘‘आपण इतकी भक्ती केली पाहिजे की, देवालाच वाटले पाहिजे की, साधकांसमोर जाऊन साक्षात् उभे रहावे आणि ‘माझे चित्र काढ’, असे सांगावे.’’ आरंभी सनातनला एक-एक चित्र काढायला ६ ते ८ मास लागले. या चित्रात त्या त्या देवतेचे ६ टक्के इतके तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता निर्माण झाली. मग टप्प्याटप्प्याने चित्राची सात्त्विकता १० टक्के, १२ टक्के, १४ टक्के आणि आता सरासरी २७ टक्के या क्रमाने साधकांनी वाढवली. कलियुगामध्ये आपण एखाद्या चित्रात जास्तीतजास्त ३० टक्क्यांपर्यंत देवतेचे तत्त्व आकर्षित करू शकतो.
३. सनातनच्या सात्त्विक चित्रांची वैशिष्ट्ये
ईश्वरप्राप्तीचे ध्येय असलेले साधक जेव्हा साधना म्हणून देवतांचे चित्र काढतात, तेव्हा त्यांना ईश्वर स्वतः संतांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतो. सनातनची सात्त्विक चित्रे अशा तर्हेने सिद्ध केली आहेत.
४. ईश्वरप्राप्तीसाठी मूर्तीकला
एकदा प.पू. डॉक्टरांच्या मनात विचार आला, ‘आपण देवतांची चित्रे काढतो; पण मूर्तीचे काय ?’ त्यानंतर पुण्यातील श्री. गुरुदास खांडेपारकर नावाचे एक साधक आपोआपच सनातनला लाभले. त्यांनी गणपतीची सात्त्विक मूर्ती बनवली.
गणपतीच्या सात्त्विक मूर्तीची मापे सनातनने त्याच्या नियतकालिकांत प्रसंगानुरूप छापली आहेत. श्री. खांडेपारकर गणपतीची मूर्ती बनवत असतांना सनातनच्या त्या आश्रमात दोन-तीन संत आले होते. त्यांनी आश्रमात पाऊल टाकताच म्हटले, ‘‘येथे पुष्कळ सात्त्विकता जाणवत आहे.’’ ती मूर्ती अर्धवट सिद्ध झाली असतांनाच तिच्यात चैतन्य निर्माण झाले होते, ते मूर्तीकाराच्या भक्तीभावामुळेच ! श्री गणेशमूर्ती दीड वर्षांच्या प्रयत्नांनंतर २९ टक्के इतकी चांगली करता आली.
५. ईश्वरप्राप्तीसाठी नृत्यकला
आपल्या संस्कृतीतील नृत्यकला ही मंदिरातच निर्माण झाली आहे. उपासनेचे माध्यम म्हणूनच ती विकसित झाली. नृत्यकलेकडे आपण आदरभावाने पहातो. धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी नृत्यकलेचे सादरीकरण करून त्यातून मानसिक
सुख मिळवण्याचा प्रघात हिंदूंमधे आहे. नृत्यशैली आणि नृत्यकलेतील विविध मुद्रा यांतून नवरस (शृंगार, वीर, हास्य, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत) निर्माण करून त्यातून नृत्यप्रेमींना मानसिक आनंद देण्याचा प्रयत्न केला जातो. सनातनच्या साधिका सौ. सावित्री इचलकरंजीकर आणि आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी या नृत्यकलेच्या माध्यमातून अध्यात्मातील शक्ती, चैतन्य, आनंद आणि शांती अशा अनुभूती मिळवण्यासाठी अभ्यास करत आहेत. या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करण्याच्या प्रयत्नाला त्यांनी आरंभ केला आहे. नृत्यातून चिरकाल टिकणारा आनंद मिळवण्यासाठी या साधिका प्रयत्नरत आहेत.
६. ईश्वरप्राप्तीसाठी संगीतकला
सूक्ष्म-विभागातील साधिका सौ. अंजली गाडगीळ यांनी संगिताच्या माध्यमातून साधनेला आरंभ केला. तेव्हा त्यांना कोणताही राग म्हणतांना अध्यात्माच्या दृष्टीकोनातून काय वाटले पाहिजे, रागाचा परिणाम काय होतो किंवा
स्वर्गलोकातील संगीत कसे आहे, याची माहिती कोणत्याही ग्रंथातून मिळाली नाही. संगीत ऐकून मनाला सुख मिळते, पण संगिताचा सूक्ष्म स्तरावर कसा परिणाम होत असतो, याविषयीची माहिती मिळवण्याचा सौ. गाडगीळ यांनी प्रयत्न केला. मग प.पू. डॉक्टरांच्या सांगण्यावरून त्यांनी याविषयी देवाकडून उत्तरे मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यावर त्यांना संगितातील सर्व ज्ञान मिळू लागले. त्यांनी विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो, यांचाही अभ्यास केला आहे. चिरकाल टिकणारा आनंद मिळवण्यासाठी त्यांना मिळालेले ज्ञान संगीतप्रेमींना फार उपयुक्त आहे.
विविध कलांकडे पहाण्याचा सनातनचा दृष्टीकोन – केवळ कलेसाठी कला नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ यासाठी कलांच्या माध्यमातूनही ईश्वरप्राप्ती कशी करायची, हे सनातन शिकवते.